दूरदर्शन : दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम प्रेक्षेपित करणारी भारत सरकारची एक संस्था. माहिती व नभाेवाणी खात्यापासून स्वतंत्र रीत्या दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम संयोजित करण्यासाठी दूरदर्शन ही संस्था १ एप्रिल १९७६ राेजी स्थापन करण्यात आली.

भारतात दूरचित्रवाणीचा विकास १९६० नंतरच विशेषत्वाने घडून आला. सप्टेंबर १९५९ मध्ये पहिले दूरचित्रवाणी केंद्र यूनेस्कोच्या मदतीने प्रायोगिक स्तरांवर दिल्ली येथे सुरू करण्यात आले. प्रथम त्याचे स्वरूप एक मार्गदर्शी दूरचित्रवाणी प्रकल्प असे होते आणि त्यावरून आठवड्यातून फक्त शैक्षणिक कार्यक्रम होत. हळूहळू ते सर्वांगांनी परिपूर्ण करण्यात आले.

‘फोर्ड प्रतिष्ठाना’ तर्फे शैक्षणिक दूरचित्रवाणीचा भारतात कसा प्रसार होईल, हे पाहण्याकरिता एक मंडळ १९६० साली आले. मंडळाने दिल्ली दूरचित्रवाणी व तिचा परिसर यांचा अभ्यास करून भारतातील शैक्षणिक दूरचित्रवाणीकरिता एक आराखडा तयार करून दिला. त्याप्रमाणे माध्यमिक शाळांत नियमित शालेय पाठांचे कार्यक्रम दाखविण्यात येऊ लागेल. १९६५ मध्ये दिल्लीतील सु. २२७ शाळांत (एकूण शाळा ३०७) दूरचित्रवाणीचे संच होते व १९७५ मध्ये ही संख्या जवळजवळ ४२४ च्या घरात गेली (एकूण शाळा ५४९).

दूरचित्रवाणीचा म्हणावा तसा प्रसार १९६५ पर्यंत झाला नाही. त्या वर्षापासून केंद्र सरकारने दूरचित्रवाणीचे जाळे देशात प्रसृत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हँबर्गहून सहा तज्ञांचे एक मंडळ भारतात आले (ऑगस्ट, १९६५) आणि त्यांनी पहिले आधुनिक दूरचित्रवाणी कलामंदिर भारताच्या राजधानीत उभारले. त्यानुसार सु. २,००० दूरचित्रवाणी संचांस एकाच वेळी दूरदर्शनाचा लाभ होईल आणि त्याचे क्षेत्र ४० किमी. असेल, अशी तांत्रिक व्यवस्था करण्यात आली. याच साली केंद्र सरकारच्या माहिती आणि नभोवणी खात्याने डॉ. एस्. भगवंतम् यांच्या अध्यक्षतेखाली दूरचित्रवाणी विकास, प्रसार, नवीन पद्धती व तंत्र यांच्या अभ्यासासाठी एक समिती नेमली. या समितीने आपला अहवाल सादर करून सबंध देशभर उच्च दर्जाचे दूरदर्शन कार्यक्रम दिसावेत, म्हणून १३ परिवाह योजनेच्या विकासावर (थर्थींन चॅनेल प्लॅन) भर देण्याची आणि दूरचित्रवाणीच्या स्वायत्त निगमासंबंधीची शिफारस केली. त्यानंतर डॉ. अशोक के. चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने १९६४ मध्ये नेमलेल्या दुसऱ्या समितीने आपला अहवाल १९६६ मध्ये केंद्र सरकारकडे सादर केला. त्या समितीने नभोवाणी व दूरचित्रवाणी या दोहोंसाठी दोन स्वायत्त निगम निर्माण करण्याची शिफारस करून निरक्षरता घालविण्याचे व शिक्षणप्रसाराचे एक प्रभावी साधन म्हणून दूरचित्रवाणीचा सर्व देशभर पुढील दहा वर्षांत झपाट्याने प्रसार करण्यात यावा असे सुचविले. सरकारने या दोन समित्यांच्या काही मौलिक सूचना मान्य केल्या. तथापि दोन स्वायत्त निगम स्थापण्याची शिफारस स्वीकारली नाही.

उद्दिष्टे : दूरदर्शन संस्थेची उद्दिष्टे आकाशवाणीच्या उद्दिष्टांप्रमाणेच आहेत. देशी, विदेशी बातम्यांचे संकलन करून बातमीपत्रे प्रक्षेपित करणे. देशाचा योजनाबद्ध सर्वांगीण विकास कसा होईल, याबद्दलचे विचार व माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे, शिक्षणाचा प्रसार व प्रचार करणे प्रत्यक्ष शैक्षणिक धडे, कृषिविषयक प्रात्यक्षिके इ. द्वारा कृषिशिक्षण देणे, कुटुंबनियोजन व तत्संबंधीची माहिती देणे, मनोरंजन करणे वगैरे विविध स्वरूपाची उद्दिष्टे आहेत. मनोरंजन व माहितीकरीता नभोनाट्य, देशी या विदेशी चित्रपट, संगीताचे बहुविध कार्यक्रम, चर्चासत्रे, व्याख्याने वगैरे कार्यक्रम ठेवण्यात येतात.

केंद्रसंख्या : भारतीय दूरदर्शनाची १९६० मध्ये फारच थोडी प्रगती झाली होती. दिल्ली हे एकमेव दूरदर्शन केंद्र अस्तित्वात होते पण चौथ्या व पाचव्या पंचवार्षिक योजनाकालात दूरदर्शनाचा कार्यक्रम दोन टप्यांत विभागण्यात आला असून तो १९७९ पर्यंत पूर्ण होईल. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दिल्ली केंद्राचा दर्जा वाढविण्यात यावयाचा असून सु. ६ नवीन प्रमुख वा मूळ केंद्रे (मदर सेंटर्स) व सहक्षेपण केंद्रे सु. २५० दशलक्ष रु. खर्च करून उभारण्यात यावयाची होती. ही प्रमुख केंद्रे मुंबई, कलकत्ता, जलंदर, लखनौ, मद्रास व श्रीनगर येथे स्थापण्यात येतील, तर सहक्षेपण केंद्रे आसनसोल, अमृतसर, भतिंडा, कानपूर, रसौली, खरगपूर, मसूरी व पुणे या ठिकाणी असतील. यामुळे देशातील १०% भूप्रदेश आणि १७% लोकसंख्या यांस दूरदर्शनाचा लाभ मिळेल. परंतु १९७४ पर्यंत मुंबई व श्रीनगर येथे प्रमुख केंद्रे आणि अमृतसर व पुणे येथे सहक्षेपण केंद्रे स्थापण्यात आली. पुढे १९७५ मध्ये कलकत्ता, मद्रास व लखनौ येथे प्रमुख दूरदर्शन केंद्रे स्थापन झाली. पाचव्या पंचवार्षिक योजनेत पुढील शहरांत प्रमुख दूरदर्शन व सहक्षेपण केंद्रे स्थापण्याचा माहिती आणि नभोवणी खात्याचा संकल्प आहे : अहमदाबाद, बंगलोर, भोपाळ, कटक, गौहाती, हैदराबाद, जयपूर, पाटणा आणि त्रिवेंद्रम (सर्व प्रमुख केंद्रे) अलाहाबाद, जम्मू, कोल्हापूर, नागपूर, रोहटक, तिरूची, वाराणसी आणि विल्लुपुरम् (सहक्षेपण केंद्रे). १९८२ च्या सुमारास देशात कमीत कमी १०० दूरदर्शन केंद्रे, त्यापैकी प्रमुख ऐंशी सहक्षेपण केंद्रे निर्माण होतील, असे केंद्र सरकारचे धोरण असून त्यांद्वारे देशातील ९०% जनतेस दूरचित्रवाणीचा लाभ मिळेल. यासाठी सु. ३०० कोटी रूपये लागतील, पण नियोजन आयोगाने फक्त ८० कोटी रु. मंजूर केले असल्यामुळे दूरचित्रवाणीच्या विकासावर परिणाम होणे साहजिक आहे.


 परवाना शुल्क : दूरचित्रवाणी संच घरी वापरण्याकरीता प्रतिवर्षी ३० रु. परवाना शुल्क भरावा लागे. उपाहारगृहे, रुग्णालये तसेच इतर सार्वजनिक स्थळीही परवाना शुल्क अधिक असून शैक्षणिक संस्थांना, विशेषतः विद्यालये व ग्रंथालय यांना, परवाना शुल्कामध्ये सवलत दिली आहे. १ सप्टेंबर १९७६ पासून दूरचित्रवाणी संचांचे परवाना शुल्क पुढीलप्रमाणे वाढविण्यात आले आहे. घरगुती वापरासाठी ५० रु. व्यापारी वापरासाठी १०० रु विक्रेत्यासाठी ६० रु. प्रात्यक्षिक संच ५० रुपये. परवाना शुल्काची मुदत तसेच परवान्याचे नूतनीकरण यांची मुदत रेडिओ संचाप्रमाणे १ जानेवारी ते ३१ डिसेंबर अशी एका वर्षासाठी असते आणि परवाना शुल्क ३१ डिसेंबरपर्यंत भरावे लागते. काही वेळा परवाना शुल्क भरण्याची सवलत केंद्र सरकारच्या आदेशानुसार वाढविण्यात येते. मुदतीत परवाना शुल्क न भरल्यास विशिष्ट दंड भरावा लागतो. परवाना पुस्तक हरवल्यास परवानाधारकास अधिक आकार देऊन ते पुन्हा घेता येते. विनापरवाना दूरचित्रवाणी संच वापरणे हा गुन्हा असून गुन्हेगारास दंड व शिक्षा यांची कायद्यात तरतूद आहे.

दूरचित्रवाणी संचाच्या परवानाधारकांची संख्या १९६३ मध्ये ५५१ होती, ती ३० सप्टेंबर १९७५ मध्ये ३,६०,१२४ झाली. १९७४ अखेर दूरचित्रवाणी संचांचे वर्गीकरण (मंडले व प्रकार यांनुसार) तक्ता क्र. १ वरून स्पष्ट होईल.

तक्ता क्र. १. दूरचित्रवाणी संचांचे वर्गीकरण (मंडले व प्रकार) 

मंडलाचे नाव

सवलतीचा प्रकार 

 

घरगुती 

स्वस्त 

समूह 

शाळा 

रुग्णालये 

व्यापारी 

विक्रेता 

एन्. डी. पी. एल्. 

प्रात्यक्षित

            एकूण 

आंध्र प्रदेश 

 

 

 

 

 

 

 

 

 

दिल्ली 

१,४०,३८१ 

३७३ 

९८७ 

३० 

१,२९५ 

१० 

३२४ 

१,४३,४०० 

जम्मू व काश्मीर 

२,२४० 

१५ 

३७३ 

 

 

३४ 

५३ 

१० 

२,७२५ 

केरळ 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

महाराष्ट्र 

९४,९६७ 

१४० 

६६१ 

२९ 

९७७ 

३० 

 

२४ 

९६,८३२ 

पंजाब 

२५,०२१ 

३४ 

 

 

 

४७६ 

 

 

 

२५,५३८ 

राजस्थान 

१५ 

 

 

 

 

 

 

 

 

१६ 

तमिळनाडू 

 

 

 

 

 

 

 

 

 

१८ 

उत्तर प्रदेश 

६,१३३ 

 

 

 

 

३२७ 

 

 

३४ 

६,४९४ 

पश्चिम बंगाल

१५२

 

 

 

 

 

 

२३ 

— 

१७५

ए.पी.एस्.

१९८

 

 

 

 

 

 

 

 

२१२

एकूण

२,६९,१२३

५४

८८६ 

१,६४८ 

५९ 

३,१२४

८५ 

४४ 

४०१ 

२,७५,४२४


जगातील प्रमुख देशांमधील १९७४ सालातील दूरचित्रवाणी संचांची आकडेवारी तक्ता क्र. २ मध्ये दिलेली आहे.

रचना : भारत सरकारच्या माहिती व नभोवणी खात्याच्या अखत्याखाली व आकाशवाणीचा एक विभाग म्हणून दूरचित्रवाणीचे कार्य पूर्वी चालत असे, पण १ एप्रिल १९७६ रोजी दूरदर्शन ही एक स्वतंत्र संख्या स्थापन करण्यात आली, तिचे कार्यविभाग व तंत्रविभाग असे दोन स्वतंत्र विभाग असून प्रक्षेपणाची सर्व तांत्रिक बाजू संबंधित तंत्रज्ञ सांभाळतात, तर कार्यक्रमांची रूपरेषा संचालक मंडळ ठरविते. प्रत्येक केंद्राचा प्रमुख केंद्राधिकारी असतो. तो कार्यक्रमांची देखरेख आणि योजना करतो. आकाशवाणीचा संशोधन व प्रशिक्षण विभाग दोन्ही संस्थांना साहाय्य करणार आहे.

कार्यक्रम : दूरचित्रवाणीवरून सादर करण्यात येणारे कार्यक्रम आठवड्यातून २५ तास असतात. शिवाय शाळांकरिता १२ १/२ तासांचा कार्यक्रम असतो. यात हिंदी व इंग्रजी बातमीपत्रे, राज्यपातळीवर प्रादेशिक बातमीपत्रे (१० तास), विशेष कार्यक्रम (४ तास), मनोरंजन (दोन तास). यांव्यतिरिक्त प्रेक्षकांच्या पत्रांची उत्तरे, देशी आणि विदेशी चित्रपट इ. कार्यक्रमांना वेळ दिला जातो. जवळजवळ ९० टक्के कार्यक्रम भारतातच तयार करण्यात येतात. उरलेल्या कार्यक्रमांची भारत सरकार व दूरचित्रीकरण करणाऱ्या नऊ देशांतून देवघेव करण्यात येते. शेतकऱ्याचे  जीवनमान सुधारावे तसेच त्यांनी कृषिविषयक नवीन उपक्रम आत्मसात करावेत, धान्योत्पादन वाढावे म्हणून आठवड्यातून दोनदा ‘कृषिदर्शन’ कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या बाबतीत यूनेस्को या संघटनेने १९६९ मध्ये जॉन विलिंग्ज यांच्या मार्गदर्शनाखाली काही कृषिविषयक कार्यक्रम सुचविले. त्यांत अल्पवेळात दूरचित्रवाणी प्रशिक्षण, कृषिसंशोधन व शेतीसंबंधीचे इतर कार्यक्रम होते. दूरचित्रवाणीचे व्यापारीकरण केल्यास महसूल वाढून दूरचित्रवाणीच्या प्रसारास अधिक मदत होईल, असे भगवंतम्‌ व चंदा समित्यांनी सुचविले. पण व्यापारीकरणास सरकारचे मत अनुकूल नव्हते. तथापि १ जानेवारी १९७६ पासून १० सेकंद अवधीच्या काही जाहिराती कार्यक्रमांच्या अगोदर व शेवटी दाखविण्यात येऊ लागल्या आहेत. या दहा सेकंदांच्या व्यापारी जाहिरातीचे मुंबई–पुणे दूरदर्शन केंद्रांवरील प्रशुल्क चार हजार रुपये  असून पुरस्कारित केलेल्या एका कथापटाचे प्रशुल्क १७,७०० रु. पर्यंत असते. चित्रपटांच्या जाहिराती दूरदर्शन केंद्रांवरून सादर केल्या जात नाहीत.

तक्ता क्र. २.प्रमुख देशांमधील दूरचित्रवाणी संच संख्या, १९७४. 

देशाचे नाव 

संख्या 

अमेरिकेची संयुक्त संस्थाने 

११,००,००,०००         (१९७३) 

सोव्हिएट रशिया 

४,९२,००,००० 

जपान 

२,४९,२५,०००            (१९७३) 

प.जर्मनी 

१,८९,२०,०६३ 

ग्रेट ब्रिटन 

१,७६,६५,२८७ 

फ्रान्स 

१,३६,३२,०२६ 

इटली 

१,२५,९६,६७२ 

कॅनडा 

६२,५७,००० 

स्पेन 

६१,२५,००० 

पू. जर्मनी 

४९,६६,५००                 (१९७३) 

नेदर्लंड्स

३५,४४,९०९

ऑस्ट्रेलिया

३०,२२,०००

इझ्राएल

३,८५,०००

भारत

३,६०,१२४                    (१९७५)

चीन

३,००,०००


विविध दूरदर्शन केंद्रे : दिल्ली दूरदर्शन केंद्र : (स्था. १५ सप्टेंबर १९५१). हे प्रतिदिनी ४ तासांचे विविध कार्यक्रम चित्रित करते. या केंद्राचे दृकश्राव्य ६८ किमी. आहे. हिंदी व इंग्रजी या भाषांतून बातम्या व भाष्ये (समीक्षणे) दररोज प्रसारित केली जातात. दर रविवारी हिंदी कथापट, तर दर शनिवारी प्रादेशिक भाषांमधील आणि जुने हिंदी  चित्रपट सादर करण्यात येतात. कृषिदर्शन हा खास शेतकऱ्यासाठी योजलेला कार्यक्रम आठवड्यातून तीन वेळा दाखविला जातो. हा कार्यक्रम दिल्ली, हरयाणा व उत्तर प्रदेश यांमधील ८६ खेड्यांना समूह दूरचित्रवाणी संचांद्वारा पाहता येतो. मुले, युवक आणि स्त्रिया यांच्याकरिताही स्वतंत्र कार्यक्रम सादर करण्यात येतात.

शालांतर्गत दूरचित्रवाणी कार्यक्रम १९६१ पासून सुरू करण्यात आले. इंग्रजी, गणित, भौतिकी, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांचे शालेय अभ्यासक्रमाधारित पाठ विद्यार्थ्यांना दूरचित्रवाणीवरून शिकता येतात. ३ मार्च १९७५ पासून दिल्ली दूरदर्शन केंद्राने प्राथमिक शाळांस जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा अनौपचारिक शालेय पाठ चित्रित करण्यास  प्रारंभ केला. हे कार्यक्रम आठवड्यातून दोनदा (सोमवार व मंगळवार) सकळी १०·१५ वाजता सुरू होतात. १९७५ मध्ये प्रथमच उन्हाळ्याच्या सुट्टीत विविध वयोगटांतील विद्यार्थ्यांकरिता दिल्ली दूरदर्शन केंद्राने सकाळच्या वेळी शैक्षणिक कार्यक्रम सादर केला. दिल्ली केंद्रावरून सादर केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांपैकी ८४  टक्के कार्यक्रम स्वतःच्या कलामंदिरांमध्ये तयार केलेले, २ टक्के कार्यक्रम देशातील इतर केंद्रांकडून मिळविलेले आणि १४ टक्के कार्यक्रम परदेशांतून आयात केलेले असतात. दूरदर्शन प्रक्षेपण केंद्रापासून सामान्यतः १०० किमी. अंतरापर्यंत त्याचे कार्यक्रम मिळू शकतात. काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये ५,००० किमी. अंतरावरील केंद्राचे कार्यक्रमही मिळाल्याची उदाहरणे काही वेळा घडली आहेत.

मुंबई दूरदर्शन केंद्र : (स्था. २ ऑक्टोबर १९७२). केंद्राचे ग्रहणक्षेत्र ७० ते १००  किमी. च्या दरम्यान आहे. प्रतिदिनी ३ तास कार्यक्रम इंग्रजी, मराठी, गुजराती, हिंदी व उर्दु भाषांमधून सादर करण्यात येतात. शनिवारी व रविवारी अधिक कार्यकम असतात. दररोज इंग्रजी, हिंदी व मराठी भाषांतून तीन बातमीपत्रे (वार्तापट) व हिंदी–मराठीमधून वार्ताभाष्येही  (वार्तासमीक्षणेही) प्रसारित होतात. आठवड्यातून दोनदा (सोमवार व गुरूवार) औद्योगिक कामगारांसाठी ‘कामगारविश्व’ हा कार्यक्रम सादर केला जातो. पुण्यात स्थापन करण्यात आलेला दूरदर्शन केंद्राचा चित्रपट विभाग  ग्रामीण भागांना भेटी देऊन ग्रामस्थांकरिता विविध प्रकारचे कार्यक्रम (त्यांत शेतीविषयक कार्यक्रम समाविष्ट) तयार करतो व ते मुंबई आणि पुणे दूरदर्शन केंद्रांवरून दाखविण्यात येतात. आठवड्यातून दोन वेळा क्रीडा समीक्षणे व इतरत्र चालू असलेल्या क्रीडांचे चित्रीकरण सादर केले जाते. शनिवारी प्रादेशिक भाषांमधील कथापट (प्रधानपट) तर रविवारी हिंदी चित्रपट दाखविण्यात येतात. आठवड्यातून एकदा मुलांसाठी चित्रपट सादर केले जातात. मुंबई दूरदर्शन केंद्रावरून ८ ऑक्टोबर १९७३ पासून शालेय कार्यक्रम दाखविण्यास प्रारंभ झाला. आठवड्यातून सोमवार, बुधवार व शुक्रवार अशा तीन दिवशी (दिवसातून दोनदा) इंग्रजी आणि विज्ञान विषयांचा प्रत्येकी २० मिनिटांचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांकरिता सादर करण्यात येतो.

पुणे दूरदर्शन केंद्र : (स्था. २ ऑक्टोबर १९७३). हे केंद्र मुंबई दूरदर्शन केंद्राचे सर्व कार्यक्रम सहक्षेपित करीत असून त्या केंद्राचे सहक्षेपण क्षेत्र २३,००० चौ. किमी. आहे. पुणे केंद्रावरून प्रेषित केलेले कार्यक्रम सुस्पष्ट आणि रेखीव दिसावेत म्हणून सिंहगडावर उंच प्रेषक व ग्राही आकाशकाकरिता १०० मी. उंचीचा मनोरा उभारण्यात आला आहे. मुंबई केंद्राने प्रेषित केलेला कार्यक्रम, पुणे व मुंबई या केंद्रामध्ये जागोजागी बसविलेल्या अभिचालक दुय्यम केंद्रांद्वारे पुणे येथील आकाशकापर्यंत पोहोचविला जातो. पुणे येथील आकाशक हा कार्यक्रम ग्रहण करून पुन्हा त्याचे प्रेषण करतो. मुंबईपासून येणाऱ्या प्रक्षेपणाची कंप्रता व पुणे येथील आकाशकापासून प्रेषित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची कंप्रता या एकमेकींपासून भिन्न असतात.


श्रीनगर दूरदर्शन केंद्र : (स्था. १६ जानेवारी १९७३). हे केंद्र दररोज ४ तास कार्यक्रम काश्मीरी व उर्दू भाषांमधून आणि दर रविवारी सकाळी आणखी दोन तास जादा कार्यक्रम सादर करते. युवक, स्त्रिया, मुले आणि ग्रामीण समाज यांच्याकरिता विशेष कार्यक्रम सादर केले जातात.

अमृतसर दूरदर्शन केंद्र : (स्था. २९ सप्टेंबर १९७३). यापासून ६५ किमी. अंतरापर्यंत कार्यक्रम ग्रहण करता येतात. प्रतिदिनी इंग्रजी, हिंदी, पंजाबी व उर्दू भाषांमधून तीन तासांचे विविध कार्यक्रम सादर केले जातात. अमृतसरमध्ये उभारण्यात आलेला एक छायाचित्रण विभाग हा पंजाब राज्यातील सामाजिक, सांस्कृतिक व इतर कार्यक्रमाचे चित्रिकरण करतो आणि ते कार्यक्रम नंतर अमृतसर केंद्रावरून दाखविले जातात. ग्रामीण जनतेसाठी आठवड्यातून एकदा कार्यक्रम सादर केला जातो. व्यंग्यपट व अनुबोधपट, शास्त्रीय मासिक, कोडी व पंजाबी नाटके त्याचप्रमाणे इंग्रजी चित्रपट या केंद्रावरून सादर करण्यात येतात.

कलकत्ता दूरदर्शन केंद्र : हे ९ ऑगस्ट १९७५ रोजी सुरू झाले. त्याचे कार्यक्रम ४५  किमी. अंतरापर्यंत मिळू शकतात. या केंद्राच्या कार्यक्रमांचा लाभ ६,३५० चौ. किमी. परिसरातील अंतरापर्यंत ११५ लक्ष लोकांना होतो.

मद्रास दूरदर्शन केंद्र : १५ ऑगस्ट १९७५ रोजी हे केंद्र कार्यान्वित झाले. याचा प्रेषक आकाशक १७५ मी. उंचीच्या मनोऱ्यावर बसविला आहे. या केंद्राचे कार्यक्रम सुस्पष्ट पाहता आणि ऐकता यावेत यासाठी हा बांधण्यात आलेला आहे. या केंद्रावरून सध्यातरी प्रतिदिनी दोन तासांचे कार्यक्रम सादर करण्यात येतात शनिवारी आणखी अर्ध्या तासाचा अवधी देण्यात येतो.

लखनौ दूरदर्शन केंद्र : हे केंद्र २७ नोव्हेंबर १९७५ रोजी सुरू झाले. भारतातील पृष्ठप्रदेशाला दूरदर्शन कार्यक्रमांचा लाभ मिळवून देणारे लखनौ हे पहिले दूरदर्शन केंद्र होय. सध्या या केंद्राचा दूरचित्रीकरणाचा पल्ला (आवाका) ६० किमी. असला, तरी या केंद्राच्या प्रेषक आकाशक मनोऱ्याची उंची वाढविल्यानंतर तो पल्ला ७५ किमी. पर्यंत जाईल. या केंद्रावरून सादर केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांत ग्रामीण विभागामिमुख कार्यक्रम अधिक असतात.

दूरचित्रवाणी निर्मितिउद्योग : १९६९ मध्ये भारतीय बनावटीचा पहिला दूरचित्रवाणी  संच ‘टेलिव्हिस्टा’ या नावाने बाजारात आला. सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स एंजिनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (सीरी) या संस्थेने बनविलेल्या मूळ नमुन्याबरहुकूम टेलिव्हिस्टा संच तयार करण्यात आला होता. १९७५ च्या सुमारास सबंध भारतात ३६ दूरचित्रवाणी संच उत्पादन करणाऱ्या कंपन्या असून त्यांची उत्पादनक्षमता प्रतिवर्षी ७५,००० संच होती. सुमारे ५१ सेंमी. पडदा असलेल्या दूरचित्रवाणी संचांची कारखाना–किंमत २,२०० रुपये असली, तरी ग्राहकाला त्यावरील करांमुळे ३,५०० रुपये भरावे लागत होते. त्यामुळे दूरचित्रवाणी संचांच्या विक्रीमध्ये मंदी निर्माण झाली. परिणामी केंद्र सरकारने दूरचित्रवाणी संचावरील (१,६०० रु. किंमतीच्या), अबकारी कर (उत्पादनशुल्क) २० टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी केला. सरकारी क्षेत्रामधील भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. हा एकमेव उद्योग भारतीय दूरचित्रवाणी संच निर्मात्यांना चित्रनलिका पुरवितो. या उद्योगानेही चित्रनलिकेची किंमत १०० रुपयांनी कमी केली. त्यामुळे अनेक दूरचित्रवाणी संच उत्पादकांनी (२० इंची) या संचांची किंमत १,८०० रुपयांवर निर्धारित केली. १९७५ मध्ये दूरचित्रवाणी संचांचे उत्पादन २८ टक्क्यांनी वाढले १९७४ मधील ७६,००० वरून ते ९६,००० पर्यंत गेले.१९७४ मध्ये संघटित क्षेत्रातील कारखानदारांचे उत्पादन २६,००० संच होते, ते १९७५ मध्ये ४३,००० वर गेले लघुउद्योगक्षेत्रातील कारखानदारांचे उत्पादन ५०,००० वरून ५३,००० वर गेले.१९७५ च्या अखेरीस भारतात पन्नासहून अधिक दूरचित्रवाणी संचाचे उत्पादक होते.

दूरचित्रवाणी प्रशिक्षण : दूरचित्रवाणीविषयक सर्व प्रकारचे शिक्षण देण्याकरिता १९७१ मध्ये एक दूरचित्रवाणी प्रशिक्षण केंद्र संयुक्त राष्ट्रांच्या विकासकार्यक्रमांमार्फत नवी दिल्ली येथे १० ऑगस्ट १९७१ पासून कार्यान्वित झाले. आतापर्यंत या केंद्राचा लाभ फक्त आकाशवाणीच्या कर्मचाऱ्यांनाच मिळत होता. देशात ठिकठिकाणी उभारण्यात येत असलेल्या व यावयाच्या दूरदर्शन केंद्रांसाठी तज्ञ मनुष्यबळाच्या आवश्यकतेपायीच या केंद्राची निकड भासली. आतापर्यंत या केंद्रातून सु. ३०० प्रशिक्षित कर्मचारी बाहेर पडले  आहेत. पुणे येथील भारतीय चित्रपट व दूरदर्शन संस्थेमध्ये आता हे केंद्र हलविण्यात आले आहे. तीन वर्षांच्या शिक्षणक्रमासाठी सु. १५० विद्यार्थ्यांची या केंद्रात सोय आहे. इतर आशियाई देशांतील विद्यार्थ्यांनाही या संस्थेत प्रवेश मिळू शकतो.


 भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन–इझ्रो ) अमेरिकेच्या राष्ट्रीय विमानविद्या व अवकाश प्रशासनाशी (नॅशनल एअरॉनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन–नॅसा) सप्टेंबर १९६९ मध्ये करार करून भारताच्या  ग्रामीण भागांतील लोकांना शैक्षणिक कार्यक्रमांचा लाभ मिळवून देण्यासाठी  एक उपग्रह एका वर्षासाठी मागितला. याकरिता ९०० लक्ष रु. खर्च लागला.या उपग्रह शैक्षणिक दूरदर्शन प्रयोगाद्वारे (सॅटलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिझन एक्स्पेरिमेंट–साइट) १ ऑगस्ट १९७५ रोजी दूरदर्शनामार्फत शैक्षणिक कार्यक्रमांचा प्रसार सुरू झाला. आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान व  ओरिसा ह्या दूरवर पसरलेल्या सहा राज्यांतील २,४०० खेड्यांमधील ३५ लक्ष लोकांना कृषिशिक्षणापासून कुटुंबनियोजन कार्यक्रमांमार्फत सर्व प्रकारच्या शिक्षणाचा लाभ एक वर्षभर मिळू शकला. हा साइटचा कार्यक्रम ३१ जुलै १९७६ रोजी समाप्त झाला. तथापि त्यानंतरही या लोकांना दूरदर्शनाचा लाभ मिळण्याची योजना केंद्र सरकार कार्यान्वित करीत आहे. त्याकरिता सहा राज्यांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे भौमिक दूरदर्शक प्रक्षेपक बसविण्यात येणार आहेत. सूक्ष्म तरंगांचे जाळे उभारून राष्ट्रीय दूरदर्शन केंद्रे एकमेकांशी जोडण्याची योजना असून १९७७ मध्ये दिल्ली, मुंबई व कलकत्ता ही तीन शहरे सूक्ष्मतरंगांच्या साहाय्याने जोडण्यात येणार असल्यामुळे सु. ८ ते १० महिन्यांत वरील तीन शहरांपैकी एका शहरातून प्रक्षेपित केला जाणारा कार्यक्रम कोणत्याही अन्य दोन शहरांना सहक्षेपित करणे शक्य होईल.

पहिले भू–उपग्रह स्थानक पुण्याजवळील आर्वी येथे उभारण्यात आले आहे. डेहराडूनजवळील लाछीवाला येथे सु.१० कोटी रुपये खर्चून दुसरे भू–उपग्रह स्थानक उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन २५ फेब्रुवारी १९७७ रोजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले, ह्या भूकेंद्राला दिवंगत राष्ट्रपती अली अहमद यांचे नाव देण्यात आले आहे. हे भूकेंद्र जगातील अत्याधुनिक केंद्रांपैकी एक असून त्यामधील काही विशिष्ट परिवाहांद्वारा (चॅनेल्स) आंतरराष्ट्रीय दूरचित्रवाणी कार्यक्रम पाहता येतील.

गद्रे. वि. रा. देशपांडे, सु. र.