ट्रान्स-सायबीरियन रेल्वे : यूरोपीय रशिया आणि पॅसिफिक ह्यांना सायबिरियामधून जोडणारा जगातील सर्वाधिक लांबीचा (९,३११ किमी.) रशियाचा प्रमुख लोहमार्ग. असा लाहमार्ग बांधण्याचा निर्णय झार राजवटीतच १८९१ मध्ये घेतला गेला. त्याबद्दलचा अभ्यास व आखणी यांची पूर्वतयारी त्यापूर्वीच सुरू झाली होती. प्रत्यक्ष बांधकामास प्रारंभ चिल्याबिन्स्क (पश्चिम) व व्हॅ्‌लडिव्हस्टॉक (पूर्व) या दोन्ही स्थानकांपासून जवळजवळ एकदमच १८९१ मध्ये काउंट एस्.वास. विट्टी याच्या पुढाकाराने झाला. लोहमार्ग बांधण्याच्या कार्यात रुंद नद्या, बैकल सरोवराभोवतालचे तीव्र चढाचे प्रदेश, पूर्व सायबीरियामधील नित्य गोठलेली नदी, हवामानामधील तीव्र चढउतार ह्यांसारख्या अनेक अडचणी आल्या. मूळचा लोहमार्ग चिल्याबिन्स्कपासून पूर्वेकडे ऑम्स्क, नोव्होसिबिर्स्क, क्रॅस्नोयार्स्क, इर्कुत्स्क व चिता येथपर्यंत गेला १८९६ मधील रशिया-जपान करारानंतर रशियनांनी केवळ रशियातून जाणारा हा लोहमार्ग बांधण्याचा विचार स्थगित करून मँच्युरियातून व्हॅ्लडिव्हस्टॉकपर्यंत जाणारा लोहमार्ग बांधला. त्यास ‘चायनीज ईस्टर्न रेलरोड’ असे म्हणत. १९०५ मधील रशिया-जपान युद्धात जपानने रशियाचा पराभव केल्याने आणि चीनचा पूर्वभाग (चांगचुन) घेतल्यामुळे, रशियाने सबंध लोहमार्ग आपल्याच प्रदेशातून बांधण्याचे काम हाती घेतले व ते १९१७ पर्यंत पूर्ण केले. बैकल सरोवराच्या किनारीय भागातील पर्वतांमधून ३८ बोगदे पाडण्यात आले. बैकल सरोवरातून फेरी-प्रवास टाळण्यासाठी सरोवराच्या दक्षिण भागास वळसा घालून लोहमार्ग टाकण्यात आला (१९१६). हा लोहमार्ग चितापासून मँचुरियामध्ये न शिरता, अमूर व उसुरी या नद्यांच्या बाजूने खबार फ्‌स्कवरून व्हॅ्‌लडिव्हस्टॉकला नेण्यात आला. चिल्याबिन्स्कपासून मॉस्को व लेनिनग्राडकडेही पुढे हा मार्ग नेण्यात आला आहे. १९३० पासून या लोहमार्गाचे आधुनिकीकरण, काही भागाचे विद्युतीकरण व एकेरी ऐवजी दुहेरी मार्ग करण्यात आले. आता ‘रशिया एक्सप्रेस’ मॉस्कोपासून व्हॅ्‌लडिव्हस्टॉकला (९,३११ किमी.) आठ दिवसांत पोहोचते. ट्रान्स-सायबिरियन लोहमार्गाच्या अनेक शाखा आहेत. तो तुर्कस्तान-सायबिरिया लोहमार्गासही जोडण्यात आला आहे. मुख्यतः एक मार्गऑम्स्क आणि स्व्हर्डलोव्ह्‌स्क यांस जोडतो. १९५४ मध्ये दुसरी शाखा उश्ट-कूट या शहराला जोडण्यात आली.

ट्रान्स-सायबीरियन रेल्वे

ट्रान्स-सायबीरियन लोहमार्गामुळे सायबिरियाच्या विकासाला मोठी कलाटणी मिळाली त्या प्रदेशातील आतापर्यंत शक्य न झालेले समुपयोजन, वसाहतीकरण आणि औद्योगिकीकरण ह्यांना मोठ्या प्रमाणावर वाव मिळाला. त्याशिवाय रशियाचा गहू पिकविणारा व पशुधनाचा स्टेप प्रदेश, सूचिपर्णी वृक्षांच्या अरण्यांचा प्रदेश आणि आशियाई रशियाचा खाणप्रदेश यांतील उत्पादनांची वाहतूक सुलभ झाल्यामुळे ती उत्पादने वाढली, तेथील वस्ती वाढली आणि पूर्वेकडील सापेक्षतः अविकसित प्रदेश पश्चिमेकडील विकसित प्रदेशाशी जोडला गेल्यामुळे त्याचाही विकास होऊ लागला. पॅसिफिकमार्गे दळणवळण अधिक सुलभ झाले आणि रशियाचे पॅसिफिकमधील सामर्थ्यही वाढले.

सत्तर वर्षांहूनही अधिक काळापूर्वी बांधण्यात आलेल्या ट्रान्स-सायबीरियन लोहमार्गावर आता वाहतुकीचा प्रचंड ताण पडत असून गेल्या ३० वर्षांत या मार्गावरील वाहतूक दहा पटींनी वाढली आहे. या मार्गाचा आता पुरेसा विस्तार करणे शक्य होणार नाही. यामुळे आता बैकल सरोवराच्या आणखी उत्तरेस एक नवीनच लोहमार्ग-बैकल अमूर मॅजिस्ट्रल किंवा बॅम (मेन बैकल अमूरलाइन)–बांधण्याच्या प्रकल्पास प्रारंभ झाला आहे. त्यायोगे पूर्व सायबीरियाच्या विकासाला अधिकाधिक चालना मिळणार आहे. हा नवा लोहमार्ग जुन्या ट्रान्स-सायबीरियन लोहमार्गावरील केवळ ताणच कमी करणार असे नसून, त्यायोगे निर्यात-आयात व्यापार व प्रवासी वाहतूक यांमध्ये प्रचंड प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा नवा लोहमार्ग कॉम्स्‌मॉल्स्क या अमूर नदीवरील औद्योगिक स्थानकापासून सुरू होऊन तो टिंडा, उडोकन, उश्ट-कूट, ब्रात्स्क, टाइशेट या स्थानकांवरून जाणार आहे. या नव्या मार्गामुळे तेल, नैसर्गिक वायू, कोळसा, लोहखनिज, अलोह धातू व अभ्रक या उद्योगांना ऊर्जितावस्था लाभणार आहे. मात्र हा मार्ग मानवाकडून अनुपयोजित अशा ‘तैगा’च्या प्रदेशातून जात असल्यामुळे, तेथील नैसर्गिक समतोल ढळण्याचा धोका आहे.  

  

गद्रे, वि. रा.