नवप्रवर्तन: नवीन वस्तूंचा व नवीन प्रक्रियांचा शोध आणि विकास करून त्यांचा अर्थव्यवस्थेत विस्तृतपणे फैलाव करणे. बऱ्याचशा नवप्रवर्तनांची सुरुवात तांत्रिक नवशोधांपासून होत असली, तरी काही प्रमाणात नवप्रवर्तन तांत्रिक नवशोधांशिवायदेखील घडून येते. उदा., एखाद्या नवीन कच्च्या मालाचा वापर केल्याने किंवा नवीन खाणीच्या सुरुवातीमुळे अस्तित्वात येणारे उत्पादन. नवप्रवर्तनाच्या मुळाशी तांत्रिक शोधच असावयास पाहिजे असे नाही. व्यवस्थापनाविषयीची एखादी नवी संकल्पना (उदा., गुणवत्ता नियंत्रण किंवा काल व क्रिया-विश्लेषण) किंवा संघटनेचा एखादा नवा आविष्कार (उदा., सुपरबाजार) यांतूनही नवप्रवर्तन संभवते. असे असले, तरी तंत्रविद्याविषयक प्रगतीमुळेच बरीचशी नवप्रवर्तने अस्तित्वात आली आहेत. नवीन तांत्रिक शोधांमुळे अस्तित्वात आलेल्या नवीन वस्तू व नवीन प्रक्रिया याच नवप्रवर्तनाचा वेग आणि दिशा दर्शवितात.

तांत्रिक नवशोध व नवप्रववर्तन यांत फरक आहे. तांत्रिक नवशोधाने एखादी नवी वस्तू किंवा प्रक्रिया अस्तित्वात येते परंतु जेव्हा तिचा विस्तृत प्रमाणावर प्रत्यक्ष वापर होऊन ती उत्पादकांच्या किंवा उपभोक्त्यांच्या गरजा भागवू शकते, तेव्हाच नवप्रवर्तन झाले असे मानतात. सर्वच नवशोधांचा यशस्वी विकास साधून नवीन वस्तू व प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर वापरात येतात असे नाही. कितीतरी नवशोध नवप्रवर्तन न साधताच लुप्त होतात व त्यांच्या विकासासाठी केलेला खर्च वाया जातो. उदा., कॉरफॅम या कृत्रिम चामड्यापासून बनविलेली पादत्राणे अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर निर्माण करून खपविण्याचा द्यू पाँ कंपनीचा प्रकल्प १९७० मध्ये बंद करावा लागला व त्यात त्या कंपनीला सु. १० कोटी डॉलरचा तोटा सोसावा लागला. याउलट त्याच कंपनीने नायलॉनच्या उत्पादनात अत्यंत यशस्वी नवप्रवर्तन साधले.

औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीस बहुतेक नवशोध कारखान्यात यंत्रावर काम करणाऱ्या कारागिराने किंवा स्वतंत्रपणे संशोधन करणाऱ्या नवकल्पकाने लावले. त्यावेळी उत्पादनक्रिया व यंत्रसामग्री साध्या, सुटसुटीत होत्या आणि म्हणून नवीन वस्तू व प्रक्रिया शोधून काढणे व्यक्तीमात्रासही शक्य होते. त्यासाठी अवाढव्य संघटना, सुसज्ज प्रयोगशाळा, भरपूर भांडवल किंवा मौलिक विज्ञानाधिष्ठित संशोधन इत्यादींची गरज भासत नसे परंतु अलीकडे मात्र नवप्रवर्तनाच्या मुळाशी मोठमोठ्या कंपन्यांच्या अवाढव्य संशोधन व विकास संघटनांचे कार्य असते. केव्हाकेव्हा त्यासाठी करावा लागणारा खर्च कंपन्यांबरोबरच शासनालाही सोसावा लागतो. अशा अनेक आधुनिक नवप्रवर्तनांची उदाहरणे निरनिराळ्या उद्योगधंद्यांमध्ये सापडतात. रासायनिक उद्योगांत उत्पादनासाठी गट-प्रक्रियेऐवजी प्रवाहप्रक्रिया (फ्लो प्रोसेस) अंमलात आणल्याने मोठेच नवप्रवर्तन झाले. जर्मन रासायनिक कारखान्यांनी आपापल्या संशोधन आणि विकास प्रयोगशाळा स्थापून रंग व कृत्रिम खते यांच्या उत्पादनात जागतिक आघाडी मारली. तेलशुद्धीकरणाच्या उद्योगात ऊष्मीय अपघटनाची (थर्मल क्रॅकिंग) व उत्प्रेरकी अपघटनाची (कॅटॅलिटिक क्रॅकिंग) प्रक्रिया वापरून अमेरिकेने जगातील इतर राष्ट्रांना मागे टाकले. जर्मनी, अमेरिका व ब्रिटन या देशांतील कृत्रिम धाग्यांच्या उत्पादनामागे त्या त्या देशांतील सर्वांत मोठ्या अशा आय्. जी. फारबेन, द्यू पाँ आणि आय्.सी.आय्. ह्या रासायनिक कंपन्यांचे संशोधन व विकासाचे प्रयत्न होते. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिकी उद्योगांतील रेडिओ, दूरदर्शन, रडार व गणकयंत्रे यांसारख्या यशस्वी नवप्रवर्तनामागे निरनिराळ्या कंपन्यांच्या किंवा शासकीय विभागांच्या संशोधन आणि विकास संघटना होत्या. अशा संघटनांमधून संशोधक खूप मोठ्या संख्येने एकत्र काम करीत असतात, त्यांचा विद्यापीठांतील संशोधनकार्याशी निकट संपर्कही असतो व एकूण संशोधनकार्यावर अतिशय मोठ्या प्रमाणावर खर्चही करावा लागतो. ग्रेट ब्रिटनमधील सर्व उद्योगांचा १९६८-६९ मधील संशोधन व विकास खर्च सु. ६४९ दशलक्ष पौंड होता, तर १९७० साली अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये हा खर्च १७,१८९ दशलक्ष डॉ. होता. यापैकी शासनाने केलेला खर्च ग्रेट ब्रिटनमध्ये सु. ३० टक्के व अमेरिकेमध्ये ४५ टक्के होता.

केवळ मौलिक विज्ञानाधिष्ठित संशोधन केल्याने नवप्रवर्तन साधेलच असे नाही. असे संशोधन फारतर विविध प्रश्नांची उत्तरे पुरवू शकते परंतु संशोधन संघटनांना वा संशोधकांना जेव्हा उपभोक्त्यांच्या किंवा उत्पादकांच्या संभाव्य गरजांची जाणीव होते, तेव्हा संशोधनाच्या प्रयत्नांना विशिष्ट दिशा लाभते. जसजसा एखाद्या उद्योगाचा विस्तार वाढतो व त्याला लागणारी यंत्रसामग्री वाढत जाते, तसतशा त्या उद्योगाविषयीच्या संशोधनाच्या संधी वाढतात व नवप्रवर्तनापासून मोठ्या प्रमाणावर फायदे मिळण्याची शक्यता उद्‌भवते. त्याचप्रमाणे एखाद्या उद्योगाला लागणाऱ्या विशिष्ट उत्पादक-घटकाची कमतरता भासू लागली, तर त्या घटकाचा वापर कमी करण्याबाबतच्या संशोधनाकडे संशोधक वळतात. पाश्चिमात्य विकसित राष्ट्रांमध्ये ज्या उद्योगांसाठी श्रमिकांची कमतरता भासली, त्यांमध्ये श्रमाची बचत साधणारे नवप्रवर्तन उदयास आले. अर्धविकसित राष्ट्रांमध्ये भांडवलाची कमतरता असूनही आर्थिक विकासासाठी त्यांनी पाश्चात्त्य राष्ट्रांच्या औद्योगिकीकरणाचेच अनुकरण केले. वास्तविक त्यांच्या दृष्टीने भांडवलाची बचत करणाऱ्या नवप्रवर्तनांची गरज होती आणि त्या दिशेने प्रयत्न व्हावयास हवे होते.

एखाद्या नवीन वस्तूचा शोध लागला किंवा एखादी नवीन प्रक्रिया सुचली, म्हणजे तिचा प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर वापर करता येतोच असे नाही कारण, त्या वस्तूशी व प्रक्रियेशी स्पर्धा करणाऱ्या अन्य वस्तू व प्रक्रिया असतात. शिवाय आर्थिक परिस्थितीही अनुकूल असावी लागते. या स्पर्धेत व तत्कालीन आर्थिक परिस्थितीत नवीन वस्तूंचा व प्रक्रियांचा टिकाव लागला, तरच त्यातून यशस्वी नवप्रवर्तन घडते. ज्याप्रमाणे नवशोध लागलीच प्रचारात येऊ शकत नाही, त्याचप्रमाणे त्याचा प्रथम वापर व विस्तृत प्रमाणावर वापर यांमध्ये बराच काळ लोटावा लागतो. त्यासाठी नव्या यंत्रसामग्रीची गरज असल्यास ती तयार होण्यास अवधी लागतो. नवी वस्तू वापरात आल्याने जर एखाद्या जुन्या वस्तूचे उत्पादन बंद करावे लागणार असेल, तर त्यासाठी योग्य आर्थिक परिस्थिती येईपर्यंत वाट पहावी लागते. शिवाय उपभोक्त्यांना नवीन वस्तूंची माहिती पुरवून तिच्यासाठी त्यांची मागणी येण्याकरिता प्रयत्न करण्यासाठीही वेळ लागतो.

नवप्रवर्तनाचा मुख्य परिणाम म्हणजे वस्तू व सेवा पुरविण्याच्या अर्थव्यवस्थेच्या क्षमतेत भर टाकणे, हा होय. एकतर, नवप्रवर्तनामुळे अगदी नवीन वस्तू अस्तित्वात येऊन त्यांचा जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर रूढ होतो. उदा., मोटारी, जेट विमाने, रेडिओ, प्रतिजैविक पदार्थ, प्लॅस्टिकच्या वस्तू, कृत्रिम धागे, रासायनिक खते इ. वस्तू गेल्या काही वर्षांतच अस्तित्वात आल्या असून त्या आज उपभोक्त्यांच्या गरजा मोठ्या प्रमाणावर भागवीत आहेत. अशा रीतीने नवप्रवर्तनामुळे जनतेचे राहणीमान सुधारले आहे. शिवाय काही नवप्रवर्तनांमुळे भांडवलाच्या व श्रमिकांच्या उत्पादकतेत भर पडली आहे मग ते नवप्रवर्तन संघटनात्मक असो वा तंत्रविद्याविषयक असो. नवप्रवर्तनामुळे मानवी जीवनात प्रदूषणादी दोषही उत्पन्न झाले आहेत. नवप्रवर्तनाने राहणीमानात साधलेल्या सुधारणेचे मोजमाप करता येणे अद्याप शक्य झाले नाही परंतु काही नवप्रवर्तनांमुळे उत्पादकतेत होणारी वाढ मोजण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. नवप्रवर्तनाची एकूण आर्थिक विकासास कितपत मदत होते, हेही निश्चितपणे मोजता येणे अशक्य आहे. आर्थिक विकास इतक्या विविध कारणांमुळे घडून येतो व या कारणांचा एकमेकांवर इतका परिणाम होत असतो, की त्यांतील केवळ नवप्रवर्तनाचा परिणाम काय, हे सांगणे कठीण आहे. मात्र नवप्रवर्तनाखेरीज आजपर्यंत झालेला आर्थिक विकास शक्य झाला नसता, हे निश्चित होय.


नवप्रवर्तनामुळे अर्थव्यवस्थेची उत्पादनक्षमता वाढत असली, तरी ही वाढणारी संभाव्य क्षमता प्रत्यक्षात उतरून उत्पादनात भर पडण्यासाठी एकूण प्रभावी मागणीसुद्धा वाढली पाहिजे. ही जर हळूहळूच वाढली, तर अर्थव्यवस्थेत मंदी येईल. उलट ती जर अतिशय वेगाने वाढली, तर भाववाढीचे संकट येईल. काहींच्या मते नवप्रवर्तनामुळे अर्थव्यवस्थेत होणारे चढउतार व्यापारचक्राची आपत्ती ओढवतात परंतु शासनाने योग्य ते मौद्रिक व राजकोषीय धोरण अंमलात आणले, तर व्यापारचक्राचे संकट टाळता येणे शक्य आहे.

उद्योगसंस्थांना आपले कार्य करताना सभोवतालच्या परिस्थितीची दखल घ्यावी लागते. या परिस्थितीचे दोन प्रमुख घटक असतात. एक म्हणजे निर्मित किंवा निर्माण करावयाच्या वस्तूंच्या बाजारातील परिस्थिती व दुसरा म्हणजे विज्ञान व तंत्रविद्या यांच्या प्रगतीमुळे निर्माण झालेले व होणारे वातावरण. या दोन घटकांचा मेळ घालण्याचा प्रयत्न म्हणजेच नवप्रवर्तन असल्यामुळे सर्वच उद्योगसंस्थांना नवप्रवर्तन अटळ असते. नवप्रवर्तनाची निकड मात्र निरनिराळ्या उद्योगांना निरनिराळ्या प्रमाणावर असते. काहींच्या बाबतीत निकड सौम्य किंवा बेताचीच असते. कृषिउत्पादन, घरबांधणी किंवा खाद्यपेय व्यवस्था अशांसारख्या उद्योगांतील संस्थांचे नवप्रवर्तन पारंपरिक स्वरूपाचे असते. फारतर काही नव्या प्रक्रियांचा शोध लागून त्या सर्वांना खुल्या असल्यामुळे त्यांचा वापर सर्वच संस्थांतून करण्यात येतो. रासायनिके, यांत्रिक उपकरणे किंवा इलेक्ट्रॉनिकी यांसारख्या उद्योगांच्या बाबतीत नवप्रवर्तन केल्याशिवाय गत्यंतरच नसते, कारण अशा उद्योगांतील नवप्रवर्तन न साधणारी संस्था लयासच जाईल. नवप्रवर्तन साधण्यासाठी उद्योगसंस्थांना निरनिराळे डावपेच उपलब्ध असतात : (१) आक्रमक नवप्रवर्तन : हे साधणारी संस्था संशोधनप्रधान असते व तिचा स्वतःचा मोठ्या प्रमाणावर संशोधन आणि विकास करणारा विभाग असतो. नवशोधाचे पेटंट काढून मक्तेदारी नफा मिळविण्याकडे तिचे लक्ष असते. उपयोजित संशोधन व प्रयोगाधिष्ठित विकासकार्य यांच्या साहाय्याने नवीन वस्तू किंवा प्रक्रिया यांची निर्मिती करून व त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर साधण्याचे उद्दिष्ट ठेवून अशा संस्थेला अवाढव्य खर्च करण्याची तयारी ठेवावी लागते. आक्रमक नवप्रवर्तक संस्थांमध्ये आय्. जी. फारबेन, द्यू पाँ, जनरल इलेक्ट्रिक, बेल, मार्कोनी, आय्. सी. आय्. वगैरे कंपन्यांचा समावेश होतो. मात्र नवप्रवर्तन यशस्वी व्हावे म्हणून अशा संस्थांना आपल्या कर्मचाऱ्यांचे व ग्राहकांचे प्रशिक्षण करणे आवश्यक असते. (२) बचावात्मक नवप्रवर्तन : कोणत्याही राष्ट्रात आक्रमक नवप्रवर्तन करणाऱ्या संस्था थोड्याशाच असतात. बहुतेक उद्योगसंस्था बचावात्मक नवप्रवर्तनाचा मार्ग अवलंबितात. त्यांनादेखील संशोधन व विकास संघटना आवश्यकच असते. जगामध्ये एखादी वस्तू किंवा प्रक्रिया प्रथमच प्रचारात आणण्याची घाई त्यांना नसते परंतु तांत्रिक परिवर्तनाची लाट येत असताना त्यांना मागे राहावेसे वाटत नाही. आक्रमक नवप्रवर्तकाने एखादी वस्तू बाजारात आणली, म्हणजे तिचा अभ्यास करून त्याने केलेल्या चुका टाळून व त्याने निर्माण केलेल्या बाजाराचा फायदा घेण्यासाठी बचावात्मक नवप्रवर्तक संस्था आपल्या उत्पादनाची दिशा बदलते. जाहिरात व विक्रीविभाग यांवर विशेष भर देऊन आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा नव्या उत्पादनाकडे ग्राहकांची मागणी आकर्षून घेण्याचा प्रयत्न करते. लहान औद्योगिक राष्ट्रांमधील संस्थांची साधनसंपत्ती व वैज्ञानिक प्रगती तुटपुंजी असल्याने त्यांना बचावात्मक नवप्रवर्तनाचे डावपेचच हाताळावे लागतात. (३) अनुकरणशील नवप्रवर्तन : बचावात्मक नवप्रवर्तक आक्रमकाच्या वस्तूंचे तंतोतंत अनुकरण करीत नाही. उलट, त्या वस्तूच्या संकल्पनात किरकोळ तांत्रिक सुधारणा करून आपले उत्पादन वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण आहे, असे ग्राहकांस पटविण्याचा प्रयत्न तो करीत असतो परंतु अनुकरणशील नवप्रवर्तक दुसऱ्या उत्पादकांनी निर्मिलेल्या वस्तूंचे काही काळानंतर अनुकरण करून त्या बाजारात विकतो. त्याला विक्रीच्या बाबतीत काही सुविधा उपलब्ध असतात. त्याच्याशी बांधीलकी असणारे काही गिऱ्हाइक असतात किंवा विशिष्ट प्रांतात विक्री करणे त्याला सुलभ असते. कदाचित त्याचा उत्पादन खर्चही मूळ उत्पादकांपेक्षा कमी असू शकतो अथवा कच्चा माल, इंधन, वाहतूक या बाबतींत त्याला विशेष फायदे मिळू शकतात. त्याचे व्यवस्थापनकौशल्य किंवा उपरिखर्चाचे प्रमाण त्याला अनुकूल असते. या सर्व गोष्टींचा फायदा त्याला मिळू शकतो परंतु संशोधन आणि विकास यांसाठी त्याला काहीच खर्च करावा लागत नाही. त्यातूनही जकात-कराचे संरक्षण त्याला मिळाले, तर अनुकरणशील नवप्रवर्तन अधिकच फायदेशीर होते. असे अनुकरण यशस्वी होण्यास काही कालावधी लागतो. हफबावर याने प्लॅस्टिक, कृत्रिम रबर आणि कृत्रिम धागे या उद्योगांतील ५६ प्रथम उत्पादकांचा व त्यांचे अनुकरण करणाऱ्या इतर उत्पादकांचा अभ्यास केला. त्यामध्ये त्याला आढळले की, सर्वांत अधिक आक्रमक नवप्रवर्तन करणाऱ्या राष्ट्रांच्या बाबतीत इतर राष्ट्रांचे अनुकरण करण्यासाठी लागणारा अवधी सर्वांत कमी असतो. जर्मनी किंवा अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांना इतरत्र उत्पादन झालेल्या नवनिर्मित वस्तूचे अनुकरण करण्यास सरासरी तीन वर्षे लागली परंतु ब्रिटन व फ्रान्स यांना कितीतरी अधिक वर्षे व इतर राष्ट्रांना १० हून अधिक वर्षे लागली. बहुतेक राष्ट्रांच्या बाबतीत हा काळ २० हून अधिक वर्षांचा होता. (४) आश्रित नवप्रवर्तन : काही उद्योगसंस्था मालाच्या खपासाठी सर्वस्वी अन्य संस्थांवर अवलंबून असतात. त्यांना आपले उत्पादन गिऱ्हाईक-संस्थांच्या मागणीबरहुकूम बदलावे लागते. त्यांच्या उत्पादनात होत जाणारा बदल आश्रित नवप्रवर्तनाचे उदाहरण होय. अशा संस्था स्वतः नवीन वस्तू निर्माण करीत नाहीत किंवा अन्य प्रवर्तकांच्या वस्तूंचे अनुकरणदेखील करीत नाहीत. यंत्रांचे किंवा जुळणीप्रक्रियेने बनविण्यात येणाऱ्या वस्तूंचे सुटे भाग तयार करून मोठ्या कंपन्यांना पुरविणारे कारखाने केवळ आश्रित नवप्रवर्तन साधतात. त्यांना स्वतःला विशेष मोठ्या प्रमाणावर संशोधन करण्याची फारशी गरज भासत नाही.

वरील विविध मार्गांनी नवप्रवर्तनाचे प्रयत्न उद्योगसंस्था करीत असल्या, तरी त्यांच्या सर्वच प्रयत्नांना यश मिळतेच असे नाही. मोठमोठ्या संस्था जागतिक बाजारावर दृष्टी ठेवून नवप्रवर्तन करू इच्छितात व त्यामुळे त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर अनिश्चिततेस तोंड द्यावे लागते. नवप्रवर्तनाचा अवाढव्य वाढता खर्च भागविण्यासाठी त्यांना शासनाकडून आर्थिक साहाय्यही घ्यावे लागते. केव्हाकेव्हा नवप्रवर्तनाचे प्रयत्न चालू ठेवले, तर राष्ट्राची इभ्रत धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होऊन शासनाला आर्थिक साहाय्य देणे अटळ होऊन बसते.

विकसनशील राष्ट्रांना त्वरित औद्योगिक विकास साधण्यासाठी नवप्रवर्तनाचा अवलंब करावा लागतो. अशा राष्ट्रांनी केवळ अनुकरणशील किंवा आश्रित नवप्रवर्तनाचा मार्ग अनुसरला, तर त्यांचा विकास मंदावतो. म्हणून शासकीय मदतीने आक्रमक व बचावात्मक मार्गांचा वापरही विकसनशील राष्ट्रांतील उद्योगसंस्थांना करावा लागतो. या राष्ट्रांचे राहणीमान निकृष्ट पातळीवर असल्याने सर्वसामान्य जनता नवप्रवर्तनातून वापरात येणाऱ्या सुविकसित नवीन वस्तूंच्या भारी किंमती देण्यास असमर्थ असते. साहजिकच अशा राष्ट्रांतील संस्थांना आपले नवप्रवर्तनाचे प्रयत्न श्रीमंत आणि उच्चभ्रू वर्गांच्या गरजा भागविण्याकडेच केंद्रित करावे लागतात. असाच प्रकार जागतिक पातळीवरही आढळतो. संशोधन आणि विकास यांसाठी होणाऱ्या एकूण जागतिक खर्चापैकी ९८% खर्च औद्योगिक राष्ट्रांत होत असल्याने नवप्रवर्तनाचा उपयोग बहुसंख्य गरीब जनतेच्या गरजा भागविण्यास अद्याप फारसा झालेला आढळत नाही.

नवप्रवर्तनासाठी मोठमोठ्या उद्योगसंस्था व शासने अवाढव्या खर्च करीत असतात परंतु हा सर्वच खर्च आर्थिक दृष्ट्या किंवा लोकहिताच्या दृष्टीने उचित असतो, असे म्हणता येत नाही. लढाऊ विमाने, अणुबाँब व इतर अण्वस्त्रे, मार्गदर्शित क्षेपणास्त्रे यांसाठी निरनिराळ्या राष्ट्रांनी केलेला खर्च किंवा अंतरिक्ष प्रवास, चंद्रावर स्वारी, मंगळासंबंधीचे संशोधन यांसारख्या प्रकल्पांसाठी करण्यात आलेला प्रचंड खर्च विज्ञान व तंत्रविद्या यांची प्रगती दर्शवीत व घडवीत असला, तरी प्रत्यक्ष लोककल्याणाच्या दृष्टीने तो उचित ठरेलच असे नाही. शिवाय तांत्रिक नवप्रवर्तनाचे प्रयत्न विशेषतः भांडवली वस्तूंच्या व हिंसक शस्त्रास्त्रांच्या उत्पादनावरच केंद्रित होत असल्याने सामान्य जनतेच्या गरजा भागविणाऱ्या उपभोग्य वस्तूंच्या उद्योगांना नवप्रवर्तनाचा मिळावा तसा फायदा अद्याप मिळाला नाही. जरी नवप्रवर्तनाने काही उपभोग्य वस्तू उपलब्ध झाल्या, तरी त्यांच्यामुळे उपभोक्त्यांच्या अग्रहक्कांच्या गरजा भागतीलच असे नाही कारण त्यांच्या निर्माणाविषयीचे निर्णय संशोधकांनी व प्रवर्तकांनी अगाऊच घेतलेले असतात. याचाच अर्थ नवप्रवर्तनामुळे उपभोक्त्यांच्या तथाकथित सार्वभौमत्वास बाध येतो. शिवाय जसजशा उपभोग्य वस्तू अधिकाधिक सुविकसित व गुंतागुंतीच्या होत जातात, तसतशी त्यांच्यासंबंधी खरेदीपूर्व पूर्ण माहिती मिळविण्याचे उपभोक्त्याचे स्वातंत्र्य नष्टप्राय होते कारण त्याला असलेले तांत्रिक ज्ञान मालाची योग्य परीक्षा करण्यास अपुरे पडते. एवढेच नव्हे, तर खरेदी केलेल्या नवीन वस्तूंची दुरुस्ती वारंवार करण्याची पाळी खरेदीदारावर येते. रेडिओ, मोटारी, दूरदर्शन संच यांसारख्या नवप्रवर्तनजन्य वस्तूंच्या बाबतीत हा अनुभव बहुतेक ग्राहकांना येतो, म्हणूनच ग्राहकसंघांची स्थापना करून, उत्पादकांचे शासकीय नियमन करून व नवप्रवर्तनाची दृष्टी जनकल्याणाकडे अधिक केंद्रित करून उपभोक्त्यांना आपले सार्वभौमत्व टिकविण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास उत्पादकांचे सार्वभौमत्व त्यांना सतत मान्य करावे लागेल.

उपभोक्त्यांच्या गरजांकडे केवळ भांडवलशाही राष्ट्रांमधील नवप्रवर्तकांचेच दुर्लक्ष होते असे नाही. चीन व रशिया यांसारख्या समाजवादी राजवटींमध्येदेखील नवप्रवर्तनाचा उपयोग लोककल्याणासाठी फारसा झालेला आढळत नाही. बड्या राष्ट्रांशी शस्त्रास्त्रांबाबत स्पर्धा करण्याकडेच त्यांचे लक्ष केंद्रित झाल्याचे दिसते. विज्ञान व तंत्रविद्या यांच्या द्रुत प्रगतीमुळे मानव जर चंद्रावर उतरू शकतो किंवा प्रतिसेकंदास ३,७५,००० गुणाकार करणारे गणकयंत्र निर्माण करू शकतो, तर त्या प्रगतीचा उपयोग करून दारिद्र्य, प्रदूषण व महानगरी वाहतूक यांसारख्या क्षेत्रांतील समस्या नवप्रवर्तनाने सुटू शकतील, अशी आशा करण्यास जागा आहे.

संदर्भ : Freeman, C. The Economics of Industrial Innovation, Harrmondsworth, 1974.

धोंगडे, ए. रा.