महामंदी : ऑगस्ट १९२९ ते मार्च १९३३ अशी दीर्घकाळ चालू असलेली तीव्रतम जागतिक मंदी. दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या काळात भांडवलशाही राष्ट्रांतील अर्थव्यवस्थांना तेजी-मंदी चक्राने ग्रासून टाकले होते. ग्रेट ब्रिटनमधील औद्योगिक क्रांतीनंतरच्या सु. दोन शतकांच्या काळातील एकंदर युगकालीन प्रवृत्ती विकासाची असली, तरी या विकासात मधूनमधून येणाऱ्या  मंदीच्या लाटेमुळे खंड पडत असे. भांडवलगुंतवण, उत्पादन, रोजगार, उपभोगखर्च कमी होणे, किंमतींची पातळी खाली येणे, नफा कमी होणे, त्यामुळे पुन्हा भांडवलगुंतवणीवर विपरीत परिणाम होणे हे दुष्टचक्र मंदीकाळाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. याउलट घटना तेजीकाळात घडत, पण तेजीच्या पाठीपाठ मंदी यावयाची, हे जवळजवळ ठरल्यासारखे होते.

दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या काळात अशा अनेक मंदीच्या लाटा आल्या आणि गेल्या. त्यांतील १९२९ मध्ये सुरू झालेली व सु. ४३ महिने चालू असलेली मंदी सर्वांत तीव्र होती, यांबद्दल अर्थशास्त्रज्ञांचे एकमत आहे. म्हणूनच या मंदीला ‘महामंदी’ असे म्हटले जाते. १९२९ मध्ये उत्पादनात घट होण्यास सूरूवात झाली. मंदीकाळात झालेली घट भरून येऊन पुन्हा उत्पादन ह्यापूर्वी गाठल्या गेलेल्या उच्च पातळीवर येण्यास तब्बल आठ वर्षे लागली. म्हणजे महामंदीचा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला सु. आठ वर्षे भोवला, असे म्हणण्यास हरकत नाही. या महामंदीचे सर्वत्र परिणाम महान होते. जर्मनीच्या राजकारणात हिटलरचा उदय म्हणजेच पर्यायाने दुसऱ्या महायुद्धाचा उगम या महामंदीतच आढळतो. या मंदीमुळे अर्थव्यवस्थेत ठाण मारून बसलेल्या व तीव्र स्वरूप धारण केलेल्या बेकारीचे कायमचे उच्चाटन कसे करावे, याबाबत अर्थशास्त्रज्ञांत विचारमंथन सुरू झाले व त्याचीच परिणती केन्सवादी आर्थिक विचारांचा उदय व विकास होण्यात झाली.

या काळातील महामंदी अतिशय तीव्र होती आणी सर्व जगाला (रशिया वगळता) तिने ग्रासले असल्यामुळे ती जागतिक महामंदी होती. मात्र तिचे उगमस्थान एका देशात म्हणजे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत होते. या महामंदीचा तडाखा उद्योगधंद्यांच्या तुलनेने शेतीला जबरदस्त प्रमाणात बसला. भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे व ग्रेट ब्रिटनने स्वार्थासाठी मंदीकाळात परतंत्र भारताचा उपयोग करून घेतल्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाले शेतमालाचे भाव कमालीचे उतरले शेतकरीवर्गाला अत्यंत हलाखी प्राप्त झाली. त्यामुळेच महामंदीच्या काळात भारतातून अभूतपूर्व अशी सुवर्ण-निर्यात झाली.

उगम : महामंदीचा उगम १९२२ मध्ये सुरू झालेल्या तेजीतच शोधला पाहिजे. या तेजीच्या सात वर्षाच्या काळात पहिल्या महायुद्धानंतर उफाळून वर आलेली मागणी, उपभोग खर्च करण्याची     लोकांची वाढलेली प्रवृत्ती, एकंदर आशादायक वातावरण व त्यामुळे भांडवल-गुंतवणीचा अमाप उत्साह आणि बँकांकडून कर्जे मिळण्याची सुलभता, यांमुळे सर्व उद्योगांत अफाट भांडवलगुंतवण झाली. पण भांडवलगुंतवण जेवढी वाढली, त्या मानाने मागणीचा प्रभाव फार काळ टिकू शकला नाही. मागणी पूर्ण होत गेली. तसतसा युद्धकाळातील दबलेल्या मागणीचा जोर ओसरत गेला. लोकसंख्या वाढ याचे प्रमाण कमी झाल्याने मागणी तितक्या जोमाने तयार होईना. घरबांधणीचा वेग १९२६ मध्ये प्रथम मंदावला. भांडवलगुंतवण मागणीच्या अपेक्षेने केली जाते. पण मागणीचा जोम कमी झाला, तेव्हा हे अंदाज फारच आशावादी होते असे लक्षात येऊ लागते, थोडक्यात, १९२२ च्या तेजीत उत्पादन शक्ती जेवढी वाढली, तेवढ्या प्रमाणात मालाचा उठाव होऊ शकणार नाही याची जाणीव होताच गुंतवणूक करणारे निराशाग्रस्त झाले. सारांश, तेजीतील अतिभांडवलगुंतवण हे महामंदीचे प्रमुख कारण होते.

स्वरूप : अमेरिकेत महामंदीची सुरूवात झाल्यामुळे आणि तिचे परिणाम उद्योगप्रधान राष्ट्रांपैकी अमेरिकेला विशंष जाणवल्यामुळे अमेरिकेसंबंधीची आकडेवारी दिल्यास महामंदीच्या तीव्रतेची चांगली कल्पना येईल. १९२९ ते १९३३ या काळात अमेरिकेचे राष्ट्रीय उत्पन्न ५२ टक्क्यांनी घटले, म्हणजे अर्ध्यापेक्षा अधिक चलनाच्या मापात कमी झाले वास्तव राष्ट्रीय उत्पन्न ३५ टक्क्यांनी कमी झाले देशातील रोजगार ३१ टक्क्यांनी कमी झाला किंमतीही ३१ टक्क्यांनी घसरल्या. औद्योगिक उत्पादन ३६ टक्क्यांनी तसेच भांडवली वस्तूंचे उत्पादन ४४ टक्क्यांनी घटले, तर नवी घरे बांधण्यात ८७ टक्के कपात झाली म्हणजे नवी घरे बांधणे जवळजवळ बंदच झाले. इतर उद्योगप्रधानदेशांवर त्या मानाने कमी परिणाम झाले. एकंदरीने उद्योगधंद्यांत उत्पादन ज्या मानाने घटले, त्या मानाने किंमती घसरल्या नाहीत. शेतीचे उत्पादन सामान्यतः अलवचिक असल्याने ते तसे कमी झाले नाही, पण किंमती मात्र वेगाने खाली आल्या. उदा., गव्हाची किंमत १९२९−३१ या दोनच वर्षांत निम्यापेक्षा अधिक कमी झाली.

परिणाम : मंदीचा एक वाईट परिणाम म्हणजे, आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्य या काळात जवळजवळ संपुष्टात आले. सर्वत्र देशांतील लोकांची क्रयशक्ती कमी झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर मंदीचा अत्यंत अनिष्ट परिणाम झाला. महामंदीच्या काळात औद्योगिक माल व कच्चा माल यांच्या आंतरराष्ट्रीय देवघेवींत अनुक्रमे ४० टक्के व २० टक्के घट झाली. भांडवलगुंतवणीत कोणत्याच देशांत अनुकूल वातावरण नव्हते. परदेशांत भांडवलगुंतवण करणे सुरक्षितही नव्हते, कारण महामंदीच्या काळात आर्थिक राष्ट्रवादाला साहजिकच जोर आला होता. दुसऱ्या देशातील मंदीची झळ आपल्याला लागू नये म्हणून प्रत्येक स्वतंत्र राष्ट्र प्रयत्नशील होते. साहजिकच आर्थिक राष्ट्रवाद जोपासला गेला व प्रत्येक देशाने आपल्याभोवती आर्थिक संरक्षणाचा किल्ला उभा केला. यामुळेही जागतिक व्यापार कमी व विशेषतः परदेशांत केली जाणारा भांडवलगुंतवण फारच कमी झाली. सुवर्ण परिणामावर अधिष्ठित असलेली जागतिक चलनव्यवस्था कोलमडून पडली. सुवर्ण परिमाणाचे स्वरूप प्रामुख्याने जागतिक असल्यामुळे त्या चलनव्यवस्थेत एका देशात जे घडले, त्याचे परिणाम इतर देशांवर झाल्यावाचून राहिले नाहित. अशी चलनव्यवस्था आर्थिक राष्ट्रवादाला परवडण्याजोगी नव्हतीच. शिवाय काही देशांना सुवर्ण परिमाण टिकविणे या काळात जडच जात होते. त्यामुळे सुवर्ण परिमाण एकापाठोपाठ एक देशांनी झुगारले. सुवर्ण परिमाणावर निष्ठा ठेवणाऱ्या ग्रेट ब्रिटन १९३१ मध्ये सुवर्ण परिमाणाचा त्याग केला. या सर्वांचा निष्कर्ष असा की, महामंदीमुळे आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्य कोलमडून पडले. आंतरराष्ट्रीय तणाव वाढून दुसऱ्या महायुद्धाची आर्थिक पार्श्वभूमी तयार झाली. अमेरिकेतील महामंदीची नांदी नाट्यपूर्ण होती. ऑक्टोबर १९२९ मध्ये शेअर बाजारांतील किंमती धडाधड कोसळल्या. त्या इतक्या कोसळल्या की, त्यांमुळे भांडवलगुंतवण करणारांची उमेद संपूर्णपणे खचली व हजारो बँकांना दिवाळखोरीशिवाय अन्य मार्ग उरला नाही. वरवर पाहता शेअर बाजारांतील उलथापालथ हे महामंदीचे एक कारण वाटते, पण ते बरोबर नाही. जाणकारांना हे दिसून येईल की, महामंदीचा उगम वास्तव आर्थिक जीवनात होता व तिची चाहूल लागणाऱ्या  घटना शेअर बाजार कोसळण्यापूर्वीच घडू लागल्या होत्या व शेअर बाजारांतील उलथापालथ त्यांचा परिपाक होता. एवढे मात्र खरे की, शेअर बाजारांतील किंमती अभूतपूर्व प्रमाणात कोसळल्यामुळे मंदीची तीव्रता वाढली, तिला भयानक स्वरूप प्राप्त होऊन ती महामंदी ठरली.


आर्थिक विचारांना नवी दिशा :  सर्वसाधारणपणे मार्च १९३३ मध्ये महामंदीने आपला नीचबिंदू गाठला. त्यानंतर पुन्हा अर्थव्यवस्थेस ऊर्जितावस्था येऊ लागली. मार्च १९३३ ते मे १९३७ हा पन्नास महिन्यांचा कालखंड पुनरूज्जीवनाचा काळ मानला जातो. पुनरूज्जीवनाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य हे होते की, बहुतेक सर्व देशांत महामंदीचे निवारण करण्यासाठी राज्यसंस्थेकडून क्रियाशीलतेचे धोरण अनुसरण्यात आले. अमेरिकेत केन्सवादी नव्या आर्थिक विचारांशी सुसंगत असलेल्या अध्यक्ष रूझवेल्ट यांच्या नवनीतीने (न्यू डील) महान कामगिरी केली. तुटीचा अर्थपुरवठा, मोठ्या प्रमाणावर सरकारी भांडवलगुंतवण ही तंत्रे यशस्वी ठरली. जर्मनीत हिटलरने याच तंत्राचा अवलंब केला. ग्रेट ब्रिटनने आर्थिक स्थिती सुधारली, तिचे सुपरिणाम इतर देशांतही दिसू लागले. पण या ठिकाणी लक्षात घेण्याची मुख्य गोष्ट म्हणजे, महामंदीने जुन्या आर्थिक विचारांना जबर धक्का दिला. विशेषतः अर्थव्यवस्थेच्या बाबतीत सरकारचे धोरण निष्क्रियतेचे, निर्हस्तक्षेपाचे असावे, हा सनातन आर्थिक विचार कायमचा गाडला गेला. मंदीच्या काळात सरकारचे उत्पन्न कमी होते म्हणून सरकारने अर्थसंकल्पीय समतोलासाठी आपला खर्च कमी करावा, ही जुन्या अर्थशास्त्राची शिकवण होती. रूझवेल्टपूर्वीच्या हूव्हूर या अध्यक्षांनी ती तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न केला व महामंदीला राज्यसंस्थेचा हातभार लागला. ही जुनी शिकवण झुगारून देण्यात आली आणि महामंदीचे निवारण करण्यात सरकारने पुढाकार घेतला. केन्सवादी अर्थशास्त्राला मिळवून देण्याचे सहकार्य महामंदीने केले, असेच म्हटले पाहिजे. मंदीची चाहूल वेळीच ओळखून योग्य ते उपाय करण्याचे तंत्र आता अंगवळणी पडल्यामुळे १९२९ च्या महामंदीची पुनरावृत्ती होणार नाही, अशी आशा बाळगण्यास हरकत नाही.

सहस्त्रबुद्धे, व. गो.