टॉमस रॉबर्ट मॅल्थस मॅल्थस, टॉमस रॉबर्ट : (१४ फेब्रुवारी १७६६–२३ डिसेंबर १८३४). लोकसंख्यावाढीच्या समस्येचे भीषण संकट जगापुढे मांडणारा पहिला सुविख्यात इंग्रज सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ. सरे परगण्यातील गिल्फर्डजवळील रॉकरी या गावी जन्म. टॉमस तसा सधन घराण्यातील त्याच्या वडिलांची तत्त्वज्ञ डेव्हिड ह्यूम यांच्याशी घनिष्ठ मैत्री होती रूसोच्या एमिली या ग्रंथाचा त्यांच्यावर बराच प्रभाव असल्याने टॉमसच्या शिक्षणाबाबत त्यांनी उदार दृष्टिकोण बाळगला होता. १७८४ मध्ये केंब्रिजच्या जीसस महाविद्यालयात प्रवेश घेईपर्यंत टॉमसचे बरेचसे शिक्षण घरीच झाले होते. १७८८ मध्ये या महाविद्यालयामधून टॉमसने पदवी संपादिली. त्या वर्षीचा तो नववा रँग्लर होता. अनेक विषयांचा सखोल अभ्यास करून त्याने लॅटिन तसेच ग्रीक भाषांमध्ये बक्षिसे मिळविली होती. १७९१ साली टॉमसने एम्.ए. पदवी प्राप्त केली. १७९३ मध्ये वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी त्याला जीसस महाविद्यालयाची अधिछात्रवृत्ती मिळाली. १७९७ मध्ये तो ॲलबरीच्या चर्चमधील धर्मगुरूच्या हाताखाली काम करू लागला. १८०५ मध्ये टॉमसचे लग्न झाले पुढल्याच वर्षी त्याची ईस्ट इंडिया कंपनीच्या हॅलीबरी येथील महाविद्यालयात ‘अर्वाचीन इतिहास’ व ‘अर्थशास्त्र’ या विषयांचा प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. या ठिकाणी तो अखेरपर्यंत काम करीत होता.

व्यक्तिगत अज्ञान व सामाजिक निष्क्रियता हे आदर्श समानतेपुढील दोन अडसर असून प्रचार व शिक्षण या दोन मार्गांनीच ते दूर होऊ शकतील, अशी फ्रेंच तत्त्वज्ञ मारी झां आंत्वान काँदॉर्से (१७४३–९४) आणि इंग्रज राजकीय विचारवंत व लेखक विल्यम गॉडविन (१७५६–१८३६) यांची मते टॉमसच्या वडिलांना मान्य होती. टॉमसला मात्र हे विचार पटत नव्हते. त्याच्या मते आदर्श मानवी समाजाची उभारणी करण्याच्या प्रयत्नांना अन्नधान्य-पुरवठ्याच्या मानाने लोकसंख्या अधिक प्रमाणात वाढत जाण्याची प्रवृत्ती निश्चित खीळ घालते. टॉमसच्या वडिलांनी त्याला हे विचार लिहून काढावयास सांगितले व १९७८ मध्ये टॉमसने ॲन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन ॲज इट ॲफेक्ट्स द फ्यूचर इंप्रूव्हमेंट ऑफ सोसायटी, विथ रिमार्क्स ऑन द स्पेक्युलेशन्स ऑफ मिस्टर गॉडविन, एम्. काँदॉर्से अँड अदर रायटर्स या शीर्षकाची एक प्रदीर्ध पत्रिका प्रसिद्ध केली. १८०३ मध्ये याच पत्रिकेचे मॅल्थसने ए व्ह्यू ऑफ इट्स पास्ट अँड प्रेझेंट इफेक्ट्स ऑन ह्यूमन हॅपिनेस विथ ॲन इन्क्‌वायरी इंटू अवर प्रॉस्पेक्ट्स रिस्पेटिंग द फ्यूचर रिमूव्हल ऑर मिटिगेशन ऑफ द ईव्हिल्स विच् इट ऑकेझन्स या शीर्षकाने एक पुस्तक प्रसिद्ध केले. एका पत्रिकेमधून मांडलेल्या विचारांद्वारा जनांकिकी विषयासंबंधीचा एक प्रदीर्घ संशोधनात्मक प्रबंधच मॅल्थसमुळे जगापुढे आला. मॅल्थसच्या हयातीत या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या शेवटची सहावी आवृत्ती १८२६ मधील होती.

मॅल्थसचा लोकसंख्या सिद्धांत हा पुढील दोन संकल्पनांवर आधारभूत आहे: (१) मनुष्याच्या अस्तित्वासाठी अन्न आवश्यक आहे व (२) पुरुष आणी स्त्री यांच्यामधील आकर्षण व प्रेमभावना हे मनोविकार अत्यावश्यक असून ते तसेच अखेरपर्यंत राहतील. लोकसंख्येच्या वाढीचा वेग, त्या लोकसंख्येला पुरेल इतके अन्न निर्माण करण्याच्या पृथ्वीच्या गतीपेक्षा निश्चितच अधिक आहे. लोकसंख्येवर नियंत्रण न घातल्यास गुणोत्तर श्रेणीने (भूमिती श्रेणीने) (उदा., २–४–८–१६–३२ अशा प्रमाणात) वाढण्याची तिची प्रवृत्ती असते मात्र अन्नधान्योत्पादन वाढ समांतर श्रेणीने (गणिती श्रेणीने) उदा.,१ २–३–४–५–६…. अशा प्रमाणात) होत असते. मॅल्थसच्या मते अन्नधान्योत्पादन २५ वर्षांत दुप्पट, ५० वर्षांत तिप्पट, ७५ वर्षांत चौपट व १०० वर्षांत पाच पटींनी वाढते. मात्र लोकसंख्या याच काळात अनुक्रमे दुप्पट, चौपट, आठपट व सोळा पटींनी वाढते. याचाच अर्थ असा की, अन्नधान्योत्पादनाच्या वाढीचा वक्र व लोकसंख्या वृद्धीचा वक्र यांच्यामध्ये वाढते अंतर निर्माण होत असते. प्रत्यक्षात लोकसंख्या अन्नधान्योत्पादनापेक्षा अधिक वाढू लागली, तर तिच्यावर मर्यादा घालण्यासाठी अथवा असमतोल दूर करण्यासाठी युद्धे, दुष्काळ तसेच रोगराई यांसारख्या नैसर्गिक उपायांनी (पॉझिटिव्ह चेक्स) मृत्यू घडून येतात, म्हणजेच मृत्यूमानावर त्यांचा परिणाम होतो. नैसर्गिक उपाय हे अधिक संहारक स्वरूपाचे असतात. याच्याउलट, प्रतिबंधात्मक वा नियंत्रणात्मक उपाय (प्रिव्हेंटिव्ह चेक्स) म्हणजे गर्भपात, बालमृत्यू हे असून ते जननदरांवर परिणाम करतात.

लोकसंख्येवरील नियंत्रणामुळे लोकसंख्या आणि अन्नधान्योत्पादन यांत समतोल निर्माण होतो. नैसर्गिक नियंत्रणामुळे मृत्यूप्रमाण वाढते, तर प्रतिबंधात्मक नियंत्रणामुळे जननप्रमाण घटते. प्रगत समाजाने ब्रह्मचर्य, उशिरा विवाह व नैतिक आत्मसंयमन करून जननमान कमी करावे, असे मॅल्थसने सुचविले आहे. कृत्रिम संततिप्रतिबंधक साधनांचा अवलंब करून संततिनियमन करणे मॅल्थसला अमान्य होते. तथापि मॅल्थसने सुचविलेला नैतिक आत्मसंयमनाचा उपाय जनसामान्यांपर्यंत कितपत पोहोचेल आणि पोहोचल्यास त्याची कितपत कार्यवाही होईल, याबद्दल खुद्द मॅल्थसलाच शंका होती त्यामुळेच मॅल्थसच्या लोकसंख्यासिद्धांताला ‘नैराश्याची झालर’ चिकटली गेली.

मॅल्थसने प्रतिपादिलेल्या सैद्धांतिक विवेचनाला निश्चित स्वरूपाची ऐतिहासिक पार्श्वभूमी होती. औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये अवतीर्ण झाली, ती झोपडपट्टी व कंगालपणा, रोगराई, दारिद्र्य व बेरोजगारी (बेकारी) या समस्या घेऊनच. अमेरिकन वसाहतींमध्ये तसेच ग्रेट ब्रिटनमध्ये लोकसंख्या वाढत्या प्रमाणात वाढत होती. अशा प्रकारच्या ऐतिहासिक-सामाजिक पार्श्वभूमीवर मॅल्थसचे लोकसंख्या-सिद्धांत-विषयक विश्लेषण अगदी अचूक होते. त्याच्यापूर्वी अशाच प्रकारचे विचार ॲडम स्मिथ, राबर्ट वॉलेस, जोसेफ टाउनसेंड यांसारख्या विचारवंतांनी व्यक्तविले होते. तथापि मॅल्थसने विविध विचारांचे पद्धतशीर संश्लेषण करून सुसंगत लोकसंख्याविषयक सिद्धांत प्रथमच मांडला.

तथापि मॅल्थसच्या वरील सिद्धांताला निश्चितच काही मर्यादा होत्या. जैव प्रेरणेतून उद्‌भवणारी लैंगिक इच्छा (शारीरिक इच्छा) व सामाजिक प्रेरणेतून उत्पन्न होणारी प्रजोत्पादनाची अभिलाषा, या दोन प्रेरणा सर्वस्वी भिन्न असल्याचे मॅल्थसच्या लक्षात आले नसावे. त्याचप्रमाणे जगामध्ये जन्माला येणारा प्रत्येक मनुष्यप्राणी हा केवळ खाण्यासाठी पोट व तोंड घेऊन येतो असे नसून, उत्पादनासाठी दोन हातही घेऊन जन्म पावतो, या ठळक बाबीकडे त्याचे दुर्लक्ष झाले असावे. त्याचबरोबर त्याने एकीकडे लोकसंख्या व दुसरीकडे केवळ अन्नधान्योत्पादनाचा पुरवठा यांमधील संबंध दाखविण्याच्या प्रयत्नाऐवजी लोकसंख्या व एकूण राष्ट्रीय उत्पादन यांचा परस्परसंबंध आधुनिक अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून प्रस्थापित करावयास हवा होता, तसा त्याने तो केला नाही.


एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस मॅल्थसचा लोकसंख्याविषयक सिद्धांत केवळ पश्चिमी राष्ट्रांच्या संदर्भात मागे पडल्याचे आढळून येऊ लागले. कारण त्या राष्ट्रांमधील उंचावत जाणारे जीवनमान व जननमानात होत जाणारी घट, यांमुळे मॅल्थसच्या लोकसंख्या-सिद्धांतामधून व्यक्तविण्यात आलेल्या अतिरिक्त लोकसंख्या भयातील हवाच काढून घेतल्यासारखे झाले. या देशांमधून आधुनिक पद्धतीने व विविध यंत्रांच्या साहाय्याने, तसेच सुधारित बी-बियाणे, रासायनिक खते इत्यादींचा अधिक वापर करून अन्नधान्योत्पादनात प्रचंड प्रमाणात वाढ होऊन कृषिविकास घडून आला. त्यामुळे औद्योगिक दृष्ट्या प्रगत राष्ट्रांना जरी मॅल्थसचा सिद्धांत गैरलागू ठरला (उदा., आपले कुटुंब मर्यादित राखण्याच्या दृष्टीने अशा प्रगत राष्ट्रांतील लोकांनी संततिनियमन उपायांचा केलेला वापर), तरी दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात आशिया व आफ्रिका खंडांतील अविकसित व अर्धविकसित राष्ट्रांपुढे ठाकलेल्या लोकसंख्यावृद्धीच्या समस्येमुळे मॅल्थसचे पुन्हा स्मरण होणे हे क्रमप्राप्तच ठरले. आशिया, आफ्रिका व लॅटिन अमेरिका या खंडांमधील नवोदित स्वतंत्र राष्ट्रांच्या कृषिप्रधान अर्थव्यवस्थांत आढळून येणाऱ्या उच्च जननमानाचे, तर औद्योगिक अर्थव्यवस्थांत आढळणाऱ्या नीच मृत्युमानाचे प्रतिबिंब पडलेले असून याचबरोबर अशा राष्ट्रांत अतिरिक्त लोकसंख्येचे (अल्प अन्नधान्य पुरवठा, खाणारी माणसे अधिक अशी अवस्था) फार मोठे भय असते. याचमुळे पावणेदोनशे वर्षे होऊन गेली, तरी मॅल्थसच्या लोकसंख्या सिद्धांताची प्रचीती अविकसित व विकसनशील राष्ट्रांत प्रकर्षाने आल्याशिवाय रहात नाही.

मॅल्थसची ख्याती त्याच्या लोकसंख्या सिद्धांतावर अधिष्ठित असली, तरी खंड, व्यापारचक्र आणि मूल्यसिद्धांत यांविषयीचे त्याचे विचार अर्थशास्त्रात महत्त्वाचे मानले जात असून ते पूर्ण रोजगारीविषयीच्या आधुनिक सिद्धांतांशी फार जवळचे आहेत. ॲन इन्क्वायरी इंटू द नेचर अँड प्रोग्रेस ऑफ रेंट (१८१५) या ग्रंथात त्याने आपला खंडविषयक सिद्धांत मांडला आहे. जमीनमालकाच्या मक्तेदारीमुळे अन्नधान्याच्या किंमती वाढतात, असे झां बातीस्त से (१७६७–१८३२) व झां सीसमाँदी (१७७३–१८४२)या अर्थशास्त्रज्ञांचे म्हणणे होते. मॅल्थसचे त्याविषयी दुमत आहे. लोकसंख्येत वाढ झाली की, अन्नधान्याला होणारी मागणी वाढते आणि किंमती वर जातात. खंड म्हणजे उत्पादनखर्च आणि किंमती यांमधील फरक होय. मॅल्थसच्या मते खंडाचा उगम किंमतवाढीत आहे. आपल्या प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी (१८२०) या ग्रंथात मॅल्थसने न्यून उपभोगाची संकल्पना विशद केली. प्रभावी मागणीतील कमतरतेमुळे बाजारात अतिरिक्त उत्पादनाची शक्यता निर्माण होते. परिणामी अर्थव्यवस्थेला तेजी-मंदीच्या चक्रांतून जावे लागते. असे त्याने प्रतिपादन केले. सनातनवाद्यांच्या मतप्रणालीला आव्हान देणारे त्याचे हे विवेचन केन्सच्या अर्थशास्त्राला अत्यंत साहाय्यभूत ठरले. ‘मॅल्थस हा आपल्या काळाच्या फार पुढे गेलेला अर्थशास्त्रज्ञ होता’, असे गौरवपूर्ण उद्‌गार केन्सने काढले आहेत.

लोकसंख्या सिद्धांताला पायाभूत असलेला व कृषि-उत्पादनात लागू पडणारा घटत्या उत्पादनाचा सिद्धांत प्रथम मॅल्थसनेच शोधून काढला, असे मानण्यात येते मात्र या सिद्धांताला हे विवक्षित नाव त्याने दिले नाही किंवा या सिद्धांताचे पुरे महत्त्व तो जाणू शकला नाही. मॅल्थसच्या लोकसंख्या सिद्धांतामुळे जनांकिकीच्या अभ्यासाला मोठी चालना मिळाली. त्याच्या तत्त्वप्रणालीचा अभिजात (सनातन) अर्थशास्त्रावर व त्यानंतर उद्‌भवलेल्या सामाजिक विचारांवर पुढीलप्रमाणे दुहेरी परिणाम झाल्याचे आढळते : (१) वैयक्तिक आर्थिक स्पर्धेमध्ये मॅल्थसच्या विचारप्रणालीमुळे उत्पन्न झालेल्या मतभेदांचा परिणाम पुढे कार्ल मार्क्सने रिकार्डोची मते स्वीकारून भांडवलशाहीच्या उगम सिद्धांताची निर्मिती करण्यात झाला. (२) मॅल्थसच्या लोकसंख्या सिद्धांतामधून सुविख्यात इंग्रज निसर्गशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन (१८०९–८२) याने ‘नैसर्गिक निवडीने होणारा जातींचा उगम’ या आपल्या सिद्धांतासाठी काही महत्त्वाचे विचार घेतले.

मॅल्थसची १८२० मध्ये ‘रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटी’ या संस्थेचा अधिछात्र म्हणून निवड करण्यात आली १८२१ मध्ये ‘ द पॉलिटिकल इकॉनॉमी क्लब’ या संस्थेचा तो एक संस्थापक-सदस्य होता. याच संस्थेचे डेव्हिड रिकार्डो, जेम्स मिल हे प्रथितयश अर्थशास्त्रज्ञही सदस्य होते. १८११ पासून रिकार्डोचे व मॅल्थसचे जुळलेले स्नेहबंध, ही गोष्ट मॅल्थसच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची घटना होय. हा स्नेह रिकार्डोच्या मृत्यूपर्यंत (१८२३) टिकून राहिला. १८३३ मध्ये फ्रेंच अकादमी-पॅरिस, तसेच रॉयल ॲकाडेमी-बर्लिन या प्रसिद्ध संस्थांनी मॅल्थसला सदस्यत्व बहाल करून त्याचा सन्मान केला. बाथजवळील क्लॅव्हर्टन या गावी मॅल्थसचे वयाच्या सहासष्टाव्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले.

पहा : आर्थिक विचार-इतिहास आणि विकास जनांकिकी लोकसंख्या.

गद्रे, वि. रा. भेण्डे, सुभाष