कार्ल गन्नार मीर्दालमीर्दाल, कार्ल गन्नार : (६ डिसेंबर १८९८– ). सुविख्यात स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक, राजनीतिज्ञ आणि १९७४ च्या नोबेल अर्थशास्त्र पारितोषिकाचे ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञ हायेक यांच्याबरोबरीचे मानकरी. जन्म डालार्ना प्रांतातील गुस्टाफ्स परगण्यातील सोल्व्हार्बो या खेडेगावी एका शेतकऱ्याच्या कुटुंबात.

प्रारंभी मीर्दाल यांचा निसर्गविज्ञानांकडे ओढा होता स्टॉकहोम विद्यापीठात प्रथम विधीचा अभ्यास करण्यास प्रारंभ, १९२३ मध्ये लॉ स्कूलमधून पदवी प्राप्त तथापि लवकरच ते अर्थशास्त्र विषयाकडे वळले. १९२४ मध्ये अल्वा रीमर (१९०२–८६) हिच्याशी त्यांचा विवाह झाला. मीर्दाल दांपत्याला एक मुलगा व दोन मुली आहेत. १९२७ मध्ये त्यांनीअर्थशास्त्र विषयातील डॉक्टरेट संपादिली. १९२७–५० यांदरम्यान स्टॉकहोम विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्य नट विकसेल, डेव्हिड डेव्हिडसन, एली एफ्‌. हेक्शेर, गोस्टा बॅग, कार्ल गुस्टाव्ह कासेल यांसारख्या अर्थशास्त्रातील महान व्यक्तींचे मीर्दाल हे शिष्य. रॉकफेलर अधिछात्रवृत्ती संपादून मीर्दाल अमेरिकेत शिकण्यास गेले १९२९ च्या महामंदीनंतर त्यांचे लक्ष राजकीय विषयांकडे वळले. मायदेशी परतल्यावर त्यांनी अल्वा ह्या आपल्या समाजशास्त्रविदुषी व लेखिका पत्नीसह सक्रिय राजकारणात उतरावयाचे ठरविले. १९३२ मध्ये स्वीडनमध्ये मजूर पक्ष सत्तेवर आला. मीर्दाल यांचा अनेक शाही आयोग व समित्या यांत सहभाग होताच. तशात ते १९३५ मध्ये संसदप्रतिनिधी बनले. १९३४ मध्ये मीर्दाल दांपत्याने संयुक्तपणे क्रायसिस इन द पॉप्युलेशन क्वेश्चन हा ग्रंथ लिहिला. त्यात स्वीडनमधील अतिशय वेगाने घटत जाणाऱ्या जननमानासंबंधी अभ्यासपूर्ण विवरण करण्यात आले होते. त्यांच्या विश्लेषणाचा भर सामाजिक नियोजनाच्या गरजेवर असून तीयोगे जीवनमानाची पातळी न बदलविता जननदरात वाढ केली जाण्याची आवश्यकता प्रतिपादिली होती. त्यांच्या या ग्रंथाचा १९३० च्या पुढील काळात स्कँडिनेव्हियाच्या सामाजिक नियोजनावर मोठा प्रभाव पडून स्वीडनमधील सामाजिक सुधारणा घडून येण्यास मोठी मदत झाली.

मीर्दाल यांच्या प्रबंधाचे प्राइस फॉर्मेशन अँड इकॉनॉमिक चेंज या शीर्षकाने पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले (१९२७) त्यात किंमती, नफा व भांडवलमूल्यांमधील बदल यांच्या विश्लेषणात असलेले अपेक्षांचे महत्त्व विशद करण्यात आले आहे. यांपैकी बऱ्याच संकल्पनांचा विचार मीर्दाल यांच्या १९३१ मधील मोनेटरी इक्विलिब्रियम या सूक्ष्म अर्थशास्त्रविषयक ग्रंथांत आढळतो. या ग्रंथात समग्र बचत आणि गुंतवणूक यांच्या समानतेबाबत ‘एक्स-अँटी’(नियोजित वा अपेक्षित) व ‘एक्स-पोस्ट’ (वास्तव वा प्रत्यक्षात मिळालेली) या दोन संज्ञा मीर्दाल यांनी प्रथम वापरून प्रचलित केल्या. आर्थिक प्रक्रियांचे विश्लेषण करताना अपेक्षांचे महत्त्व विशद करून त्यांनी अर्थशास्त्राला स्थितिशील सिद्धांतामधून (ज्या सिद्धांतांमध्ये भविष्यकाळ हा भूतकाळासारखाच समजण्यात येतो किंवा इतर गोष्टी समान असल्याचा युक्तिवाद करण्यात येतो) बाहेर काढून गतिशील सिद्धांताप्रत (ज्या सिद्धांतांमध्ये काळ, अनिश्चितता व अपेक्षा यांचे प्रमुख कार्य असते) नेले. मोनेटरी इक्विलिब्रियम या स्वीडिश, इंग्रजी व जर्मन भाषांतून प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात नट विकसेल या अर्थशास्त्रज्ञाचे आर्थिक सिद्धांत विकसित करण्यात आले असून त्यामध्ये केन्स यांच्या सुविख्यात द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी (१९३६) या ग्रंथामधील अनेक विचारबीजे प्रकर्षाने आढळून येतात.

कार्नेगी कॉर्पोरेशनद्वारा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील कृष्णवर्णीयांच्या (निग्रोंच्या) समस्येबाबत संशोधन करण्यासाठी मीर्दाल यांची निवड करण्यात आली (१९३८) या संशोधन-प्रकल्पाचे फलित म्हणजे त्यांनी लिहिलेला ॲन अमेरिकन डायलेमा : द नीग्रो प्रॉब्लेम अँड मॉडर्न डेमॉक्रसी (१९४४), हा अभ्यासपूर्ण ग्रंथ होय. १९४२ मध्ये मायदेशी परतल्यावर मीर्दाल यांनी पुढील पाच वर्षे स्वतःस राजकीय कार्यास वाहून घेतले. दुसऱ्या महायुद्धोत्तर काळातील सोशल डेमॉक्रटिक पक्षाच्या कार्यक्रमांचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्षपद मीर्दाल यांनी भूषविले. त्यानंतर संसद सदस्य, स्वीडिश बँकेच्या संचालक मंडळाचे सदस्य, स्वीडनच्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष, वाणिज्यमंत्री (१९४५–४७) अशी विविध पदे त्यांनी भूषविली. संयुक्त राष्ट्रांच्या ‘यूरोपीय आर्थिक आयोगा’चे कार्यकारी सचिव म्हणून त्यांनी दहा वर्षे काम पाहिले (१९४७–५७). यानंतरची दहा वर्षे मीर्दालनी आशियातील विकास-समास्यांचा अभ्यास करण्यात व्यतीत केली त्याचेच फलित म्हणजे एशियन ड्रामा : ॲन इन्क्वायरी इंटू द पॉव्हर्टी ऑफ नेशन (१९६८) हा प्रचंड त्रिखंडीय ग्रंथ होय. १९५१–६० व १९६१–७३ या काळात मीर्दाल यांनी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, अर्धविकसित अर्थव्यवस्थांच्या समस्या, पश्चिमी आर्थिक विचारांमधील पूर्वग्रहदूषित मूल्ये यांसारख्या विषयांवर मेकॅनिझन ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इन्‌इक्वॉलिटी (१९५६), बियाँड द वेल्फेअर स्टेट (१९६०), इकॉनॉमिक प्लॅर्निंग अँड इट्स्‌ इंटरनॅशनल इंप्लिकेशन्स (१९६०), चॅलेंज टू ॲफ्‌लूअन्स (१९६३), द चॅलेंज ऑफ वर्ल्ड पॉव्हर्टी : ए वर्ल्ड अँटी-पॉव्हर्टी प्रोग्रॅम इन आउटलाइन (१९७०), अगेन्स्ट द स्ट्रीम : क्रिटिकल एसेज ऑन इकॉनॉमिक्स (१९७३) इ. ग्रंथांद्वारा विपुल लेखन केले.

ॲन अमेरिकन डायलेमा या ग्रंथासाठीचा प्रकल्प न्यूयॉर्कस्थित कार्नेगी कॉर्पोरेशनच्या विश्वस्तांच्या निमंत्रणावरून मीर्दाल यांनी करावयास घेतला. मीर्दाल हे ‘ बिगर-साम्राज्यवादी देशातील असल्याने त्यांना वर्णभेदाचा स्पर्श नाही’ हे लक्षात घेऊन विश्वस्तांनी मीर्दाल यांच्याकडे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील निग्रोंविषयी एक विस्तृत अभ्यासप्रकल्प वस्तुनिष्ठ उद्देशाने व सामाजिक आविष्काराच्या दृष्टिकोनातून तयार करण्याचे काम सोपविले. दुसऱ्या महायुद्ध- समाप्ती-पूर्वकाळात प्रकाशित झालेल्या ॲन अमेरिकन डायलेमा या ग्रंथात १९३०–४० आणि १९४०–४५ या काळातील घटनांचा विस्ताराने वृत्तांत देण्यात आला असून त्यांचे शास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण व त्यांचा कार्यकारण-संबंध तसेच भावी काळातील बदल-प्रवृत्ती विशद करण्यात आल्या आहेत. हा ग्रंथ म्हणजे विधिविषयक, समाजशास्त्रीय व मानवशास्त्रीय विद्वत्तेचा एक अभिजात नमुना मानण्यात येतो. अमेरिकेतील वर्णसमस्येकडे या ग्रंथाने लक्ष वेधले आहे. मीर्दाल यांच्या मते, निग्रोंची दुःस्थिती म्हणजे अमेरिकेतील सर्वसामान्य नैतिक पेचाचा-न्याय्य अमेरिकन उद्दिष्टे व ध्येये आणि समाजातील घटकव्यक्तींचे प्रत्यक्ष वर्तन यांमधील संघर्ष-केंद्रबिंदूच मानावयास हवा. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये अनेक निवाड्यांबाबत मीर्दाल यांचा उपर्युक्त ग्रंथ संदर्भ म्हणून वापरण्यात आलेला आहे. ॲन अमेरिकन डायलेमा या ग्रंथाच्या दोन डझनांवर आवृत्या निघाल्या असून त्या ग्रंथामुळे मीर्दाल यांना आंतरराष्ट्रीय ख्याती लाभली.

एशियन ड्रामा: ॲन इन्क्वायरी इंटू द पॉव्हर्टी ऑफ नेशन्सया त्रिखंडीय ग्रंथात द. आशियाई राष्ट्रांतील विकाससमस्यांचे नैराश्यवादी विश्लेषण केलेले पहावयास मिळते. या ग्रंथात सामाजिक विषमता आणि आर्थिक विषमता यांमधील परस्परसंबंध स्पष्ट करून अविकसित देशांमधील विकासात्मक समस्या सोडविण्यासाठी गांधीजींचे अर्थशास्त्र कसे उपयुक्त ठरेल, याचा ऊहापोह मीर्दालनी केला आहे. मीर्दाल यांच्या मते या राष्ट्रांनी विकासाबाबतच्या पारंपरिक जुन्या कल्पना पूर्णपणे झुगारून दिल्याशिवाय संपन्न आणि विपन्न राष्ट्रांमधील विषमतेची दरी वा अंतर बुजले जाणे अवघड आहे. विकासाच्या वाटचालीकरिता परदेशी मदतीचे प्रमाण अथवा कोणत्याही आर्थिक प्रणालीचा अवलंब हा काही महत्त्वाचा निकष किंवा घटक होऊ शकत नाही, तर जनतेमध्ये सामाजिक शिस्त बाणली जाणे, हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. लोकांनी उत्स्फूर्तपणे स्वयंसाहाय्याचा हात पुढे केल्याशिवाय, त्यांच्यामध्ये जागृती झाल्याशिवाय तसेच राष्ट्र उभारणीसाठी लोकांनी सक्रिय सहभाग दिल्याशिवाय, कुटुंब-नियोजनाचा प्रभावी कार्यक्रम अंमलात आल्याशिवाय आणि शासकीय व्यवहारांतील भ्रष्टाचार वा लाचलुचपत यांचे समूळ उच्चाटन झाल्याखेरीज आशियाई राष्ट्रांत विकास नाट्याऐवजी शोकांतिका घडून येईल, असे मीर्दाल यांनी प्रतिपादिले आहे.

मीर्दाल यांना सु.३० विद्यापीठांकडून एल्‌एल्‌.डी, डी. लिट्. एल्‌एल्‌. डी., डी. डी. अशा सन्मान्य पदव्या मिळाल्या आहेत. १९७० मध्ये मीर्दाल दांपत्याला पश्चिम जर्मन सरकारने शांतता पारितोषिक प्रदान केले. सांप्रत मीर्दाल हे स्टॉकहोमस्थित ‘ आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्था’ व ‘ लॅटिन अमेरिकन संस्था’ या दोन्ही संस्थांचे अध्यक्ष आहेत.

गद्रे, वि. रा.

Close Menu
Skip to content