रॉबर्ट एम्. सोलो

सोलो, रॉबर्ट एम्. : (२३ ऑगस्ट १९२४). अमेरिकेतील एक ख्यातकीर्त अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्र विषयाच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी. त्याचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात मिल्टन व हनाह सोलो या दांपत्यापोटी ब्रुकलिन (न्यूयॉर्क) या उपनगरात झाला. त्याने न्यूयॉर्कमधील पब्लिक स्कूलमधून सुरुवातीचे शिक्षण घेऊन हार्व्हर्ड विद्यापीठाची बी.ए. ही पदवी संपादन केली (१९४७). तत्पूर्वी त्याने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सक्तीची लष्करी सेवा केली (१९४२–४५). नंतर हार्व्हर्ड विद्यापीठातून एम्.ए. (१९४९) व पीएच्.डी. (१९५१) या पदव्या संपादन केल्या. या काळातच त्याला कोलंबिया विद्यापीठाची अधिछात्रवृत्ती मिळाली होती आणि पीएच्.डी. पूर्वीच तो मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून नोकरीस लागला. विविध पदोन्नत्या मिळून अखेर तो अर्थशास्त्र विभागाचा प्राध्यापक व प्रमुख झाला आणि पुढे याच पदावरून निवृत्त झाला. तिथेच तो गुणश्री प्राध्यापक म्हणून कार्यरत होता.

सोलो याने अर्थशास्त्रातील सखोल अभ्यासांती काही निष्कर्ष मांडले. त्याच्या मते, अर्थशास्त्रातील सैद्धांतिक प्रतिमानाचा आर्थिक विश्लेषणावर फार मोठा प्रभाव पडला असून आर्थिक वाढीच्या (इकॉनॉमिक ग्रोथ) प्रक्रियेतील एक साधन म्हणून हे प्रतिमान विविध दिशांचा मागोवा घेते. उत्पन्नाच्या अनेक स्रोतांचा त्यात अंतर्भाव असून त्यात यदृच्छा घटक गुणसुद्धा सूत्रबद्ध केलेले असतात. साकलिक अर्थशास्त्रामधील सैद्धांतिक संशोधनाद्वारे यातील प्रवृत्ती आणि आनुभविक संशोधन हे या वृद्धीच्या उपपत्तीस कारणीभूत ठरते. त्याने बेरोजगारी-विषयीच्या केनेशियन विश्लेषणाकडे दुर्लक्ष केले कारण केनेशियन विश्लेषण अल्पकाळातील अस्थैर्यावर लक्ष केंद्रित करते. सोलो मात्र दीर्घकाळच्या वैकासिक विश्लेषणात अधिक रस घेतो. त्याच्या मते, आर्थिक वृद्धी प्रतिमानाची मांडणी अशी असावी की, जीमध्ये आधुनिक साकलिक अर्थशास्त्राची संरचना करता येईल. त्याच्या या संशोधनासाठी त्याला अर्थशास्त्रातील प्रतिष्ठित नोबेल पुरस्कार लाभला (१९८७).

सोलो याला नोबेल व्यतिरिक्त अनेक मानसन्मान लाभले. त्यांपैकी डेव्हिड ए. वेल्स प्राइझ (प्रबंधासाठी–१९५१), जॉन बेट्स क्लार्क मेडल (१९६१), किलियन अवॉर्ड (१९७७), सिड्मन अवॉर्ड (१९८३), नॅशनल मेडल ऑफ सायन्स (२०००) हे काही महत्त्वाचे व मान्यवर होत. त्याला ग्रेट ब्रिटन व अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथील विविध प्रतिष्ठित विद्यापीठांनी एल्.एल्.डी., डी.लिट्. वगैरे सन्माननीय पदव्या देऊन गौरविले. अमेरिकेतील अनेक संस्थांची त्याने सदस्य, उपाध्यक्ष व अध्यक्ष ही स्थाने भूषविली. त्याची ग्रंथसंपदा व संशोधनात्मक स्फुटलेख आणि भाषणे विपुल असून त्याच्या ग्रंथांपैकी लिनिअर प्रोग्रॅमिंग अँड इकॉनॉमिक ॲनॅलिसिस (१९५८), कॅपिटल थिअरी अँड द रेट ऑफ रिटर्न (१९६३), सोअर्सिस ऑफ अनइम्प्लॉयमेंट इन द युनायटेड स्टेट्स (१९६४), प्राइस एक्स्पेक्टेशन्स् अँड बिहेव्हिअर ऑफ द प्राइस लेव्हल (१९७०), ग्रोथ थिअरी : ॲन एक्स्पोझिशन (१९७०), द लेबर मार्केट ॲज ए सोशल इन्स्टिट्यूट (१९८९), लर्निंग फ्रॉम लर्निंग बाय डुइंग (१९९४), ए क्रिटिकल एसे ऑन मॉडर्न मॅक्रो-इकॉनॉमिक थिअरी (सहलेखक–फ्रँक हन, १९९५) इ. मान्यवर व महत्त्वाचे होत. याही वयात लेखन-वाचनात तो व्यस्त असतो.

संदर्भ : Benette, Raymond Chand, S. K. Ed. The Encyclopedia of Nobel Laureates : Economics, New Delhi, 2007.

राऊत, अमोल