विक्रीव्यय : (सेलिंग कॉस्टस्). वस्तूंची अथवा सेवांची मागणी वाढवण्यासाठी उत्पादक किंवा विक्रेते जो खर्च करतात, त्याला ‘विक्रीव्यय’ म्हणतात. जाहिरातींवरील खर्च हा विक्रीव्ययाचा प्रमुख घटक होय. या व्यतिरिक्त किरकोळ व्यापाऱ्यांना द्यावयाची अडत (कमिशन), ग्राहकांना मालाचे नमुने मोफत पुरवण्याचा खर्च, विक्री वाढवण्यासाठी घेतलेल्या स्पर्धा ग्राहकांना आकर्षून घेण्यासाठी केलेले दुकनांचे गवाक्षशोभन (विंडो-ड्रेसिंग) प्रात्यक्षिकाचे कार्यक्रम विक्रीयोत्तर सेवा इ. वरील खर्च हे विक्रीव्ययात समाविष्ट असतात.

अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ ई,एच्. चेंबरलिन (१८९९−१९६७) ह्यांनी द थिअरी ऑफ मॉनॉपलिस्टिक काँपिटिशन या ग्रंथात मक्तेदारीयुक्त स्पर्धा असलेल्या बाजारपेठेचे विवेचन केले विक्रीव्यय हे अशा बाजारपेठेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते.

विक्रीव्यय व उत्पादन परिव्यय यांत फरक केला जातो. उत्पादन परिव्यय हा वस्तूंचा किंवा सेवांचा पुरवठा वाढवण्यासाठी केला जातो तर विक्रीव्यय हा त्यांची मागणी वाढवण्यासाठी केला जातो, असे ढोबळ मानाने म्हणता येते. विक्रीव्ययामुळे वस्तूला वा सेवेला नवीन ग्राहक मिळतात व जुने ग्राहक त्यांची अधिक मागणी करतात. बाजारपेठेत केवळ वस्तूंच्या गुणवत्तेच्या आधारावर स्पर्धा असेल (बिगर किंमत स्पर्धा) तर विक्रीव्ययामुळे मागणीचे स्थान बदलते म्हणजेच मागणी वाढते, असे म्हटले जाते.

बाजारपेठेत ज्यावेळी विशुद्ध मक्तेदारीची परिस्थिती असते त्यावेळी विक्रीव्ययाची गरज नसते व पूर्णस्पर्धेच्या बाजारपेठेत सर्व ग्राहक व विक्रेते यांना बाजारातील परिस्थितीचे पूर्ण ज्ञान असते आणि सर्व वस्तू ह्या एकजिनसी असतात, असे गृहीत असल्यामुळे विक्रीव्ययाचा प्रश्नच निर्माण होत नाही. केवळ मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या (अपूर्ण स्पर्धेच्या) परिस्थितीतच स्पर्धात्मक जाहिरातींना उत्तेजन मिळून विक्रीव्ययाला महत्त्व प्राप्त होते.

उत्पादन परिव्ययाप्रमाणे विक्रीव्ययालाही चढत्या आणि उतरत्या सीमांत प्रत्ययांचे नियम लागू आहेत. उत्पादनाचा विक्रीव्यय जस-जसा वाढत जातो तसतशी सुरुवातीला वस्तूच्या मागणीची वाढ चढत्या प्रमाणात होते व नंतर मागणीची वाढ उतरत्या प्रमाणात होते.

विक्रीव्ययामुळे संसाधनांची उधळपट्टी होऊन समाजाचा तोटा होतो, विक्रीव्यय हा किंमतीत समाविष्ट केला गेल्याने ग्राहकाला विनाकारण वस्तू व सेवा यांसाठी अधिक किंमत मोजावी लागते, जाहिरातींमुळे वस्तूविषयी ग्राहकाच्या मनात तीव्र अभिलाषा तर निर्माण केली जाते परंतु त्याचबरोबर त्याची क्रयशक्ती ती वस्तू विकत घेण्यास पुरेशी नसल्यास तो वैफल्यग्रस्त होण्यांची शक्यता असते इ. आक्षेप विक्रीव्ययावर घेतले जातात. याउलट विक्रीव्ययामुळे जाहिरातींद्वारे ग्राहकाला वस्तूंविषयी माहिती मिळण्यास मदत होते, ग्राहकाला पर्यायी वस्तूंमधून निवड करण्यास वाव मिळतो विक्रीव्ययामुळे ग्राहकांच्या वस्तूविषयक आवडीनिवडींत बदल घडवून आणता येतात इ. मुद्दे विक्रीव्ययाच्या समर्थनार्थ मांडले जातात.

पहा : उत्पादन परिव्यय सिद्धांत मूल्यनिर्धारण सिद्धांत.

संदर्भ : 1. Chemberiain E. H. The Theory of Monopolistic Competition, Cambridge (Mass). 1962.

           2. Reckie, W. D. The Economics of Advertising, London 1981

           3. Stiglee, George J. The Economics of Information,” Journal of Political Economy, New York, 1961.

सुर्वे, गो.चि. हातेकर. र. दे .