ख्रिस्तोफर ए. सिम्स

सिम्स, ख्रिस्तोफर ए. : (२१ ऑक्टोबर १९४२ – ). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचे सहमानकरी. साकलिक अर्थशास्त्रातील अनित्य/परिवर्ती घटकावर (मॅक्रो-इकॉनॉमिक व्हेअरिअबल्स) प्रभाव पाडणारी कारणे आणि त्यांचे परिणाम या संदर्भात केलेल्या उल्लेखनीय संशोधनाबद्दल (१९७७— ८७) अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ ⇨ टॉमस जे. सार्जंट यांच्याबरोबर त्यांना हे पारितोषिक देण्यात आले (२०११). त्यांचा जन्म अमेरिकेतील वॉशिंग्टन डी. सी. येथे झाला. हार्व्हर्ड कॉलेजमधून गणित विषयात त्यांनी बी. ए. ही पदवी संपादन केली (१९६३). बर्कली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली (१९६४). नंतर हार्व्हर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पीएच्.डी. पदवी मिळविली (१९६८). ‘इकॉनॉमेट्रिक थिअरी फॉर डायनॅमिक मॉडेल्स’ व ‘मॅक्रोइकॉनॉमिक थिअरी ॲण्ड पॉलिसी’ हे सिम्स यांच्या अभ्यासाचे व संशोधनाचे विषय होत.

सिम्स यांनी निर्देशक (१९६७-६८) व सहायक प्राध्यापक (१९६८— ७०) म्हणून हार्व्हर्ड विद्यापीठात अध्यापन केले. पुढे ते सहयोगी प्राध्यापक (१९७०— ७४) व प्राध्यापक (१९७४— ९०) या पदावर मिनेसोटा विद्यापीठात कार्यरत होते. याशिवाय त्यांनी येल विद्यापीठात हेन्री फोर्ड प्राध्यापक म्हणून अध्यापन केले (१९९०— ९९). सध्या ते प्रिन्स्टन विद्यापीठात अर्थशास्त्र व बँकिंगचे हॅराल्ड बी. हेल्म्स प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत (२०१२). अध्यापनाबरोबरच त्यांनी मिनीॲपोलिस फेडरल रिझर्व्ह बँक, न्यूयॉर्क फेडरल रिझर्व्ह बँक, इंटरनॅशनल मॉनेटरी फंड, अटलांटा फेडरल रिझर्व्ह बँक वगैरे महत्त्वाच्या प्रतिष्ठित संस्थांत सन्माननीय सल्लागार व प्रशासकीय स्वरुपाची काही पदे भूषविली आहेत. याशिवाय ते प्रिन्स्टन विद्यापीठाच्या पदव्युत्तर अर्थशास्त्र विभागाचे संचालक (२००३— ०८) होते. त्यांनी रिव्ह्यू ऑफ इकॉनॉमिक स्टडीज (१९७३— ९५), इकॉनॉमेट्रिका (१९७७— ८१), जर्नल ऑफ बिझ्‌निस ॲण्ड इकॉनॉमिक स्टॅटिस्टिक्‌स (१९८३— ९३), जर्नल ऑफ ॲप्लाइड इकॉनॉमेट्रिक्स (१९८६— ८९) इ. नियतकालिकांत संपादकीय पदे भूषविली आहेत. इकॉनॉमेट्रिक सोसायटी (१९९५) आणि नॅशनल ॲकॅडेमी ऑफ इकॉनॉमिक सायन्सेस (२००६— ०९) या संस्थांचे ते अध्यक्ष होते. अमेरिकन इकॉनॉमिक्स असोसिएशनचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत (२०१२). त्यांचे अनेक शोधनिबंध विविध नियतकालिकांमधून प्रसिद्घ झालेले आहेत.

आर्थिक धोरणातील तात्पुरत्या स्वरुपाच्या बदलामुळे आणि संबंधित घटकामुळे अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण करणारी सदिश स्वयंचलित व्युत्क्रम वर्तन (व्हेक्टर ऑटोरिग्रेशन) पद्घती सिम्स यांनी विकसित केली आहे. सिम्स व त्यांच्या सहकाऱ्यांनी या पद्घतीचा उपयोग मध्यवर्ती बँकेने व्याजदरात वाढ केल्यास त्याचे कोणते परिणाम संभवतात, हे तपासण्यासाठी केलेला आहे. व्याजदरातील वाढीनंतर चलनवाढ कमी होण्यास साधारणपणे एक ते दोन वर्षांचा कालावधी जावा लागतो, तर अर्थव्यवस्थेतील वृद्घी अल्पकालावधीसाठी हळुहळू मंदावते. परिणामतः अर्थव्यवस्था मूळ पदावर येण्यासाठी दोन वर्षांचा अवधी जावा लागतो. सिम्स आणि सार्जंट यांनी आपले स्थूल अर्थमिती संशोधन स्वतंत्रपणे केलेले असले, तरी त्यांचे संशोधन या संदर्भात एकमेकाला पूरक आहे. त्यांच्या साधर्म्य (सिमिलर) असणाऱ्या संशोधनाचा उपयोग जगभरातील अर्थतज्ज्ञांनी व धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या राजकारण्यांनी केलेला आहे. त्यांनी विकसित केलेल्या पद्घती साकलिक अर्थशास्त्रीय विश्लेषणाची (इसेन्शल टूल्स ऑफ मॅक्रो-इकॉनॉमिक ॲनॅलिसिस) आवश्यक साधने म्हणून नावारुपाला आलेली आहेत.

सिम्स यांनी आपल्या ‘साकलिक अर्थशास्त्र आणि वास्तव’ (मॅक्रो-इकॉनॉमिक्स अँड रिॲलिटी) या संशोधनपर लेखात साकलिक अर्थशास्त्रीय आकडेवारीचे विश्लेषण करण्याची नवीन रीती प्रस्तावित केलेली आहे. भूतकालीन आकडेवारीतील (हिस्टॉरिकल डाटा) आर्थिक आघातांचा (इकॉनॉमिक शॉक्स) शोध घेऊन त्यांचा अन्वयार्थ लावणे आणि अशा आघातांचे रुपांतर हळुहळू साकलिक अर्थशास्त्रीय घटकांमध्ये कसे होते, हे तपासण्याची नावीन्यपूर्ण पद्घत त्यांनी विकसित केली आहे.

सिम्स यांनी विकसित केलेल्या साकलिक अर्थशास्त्रीय पद्घतींचे पुढील तीन टप्प्यांत वर्गीकरण करता येते : पहिल्या टप्प्यात, सदिश स्वयंचलित व्युत्क्रम वर्तन प्रतिकृतींच्या आधारे साकलिक अर्थ-शास्त्रीय घटकासंबंधी पूर्वानुमान वर्तविले जाते. ही सांख्यिकीय माहितीचे विश्लेषण करण्याची नेहमीची पद्घत असून, या निरीक्षण केलेल्या घटकांच्या किंमती भविष्यकाळासंबंधीचे सर्वोत्तम अनुमान काढण्यासाठी वापरल्या जातात. अशी पूर्वानुमाने आणि प्रत्यक्ष परिणाम यांतील विचलन (डीव्हिएशन) म्हणजेच पूर्वानुमान दोष असून, त्यांना विशिष्ट घटकासंदर्भातील आघातांचा प्रकार मानले जाते. पूर्वानुमानातील अशा चुकांचे आर्थिक विश्लेषण असंदिग्ध असू शकत नाही, हे त्यांनी दाखवून दिले. जे घटक अर्थव्यवस्थेत स्वतंत्रपणे प्रभाव टाकतात, ते मूलभूत आघात या स्वरुपातील असतात. दुसऱ्या टप्प्यात, अर्थव्यवस्था प्रभावित करणाऱ्या मूलभूत आघातांची निश्चिती केली जाते. अशा अभ्यासाच्या आधारे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मूलभूत आघातांची निश्चिती करण्याची विकसित केलेली पद्घत, हे सिम्स यांचे या संदर्भातील विधायक योगदान मानले जाते. मूलभूत अवसादांची निश्चिती केल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात, साद-प्रतिसाद (इम्पल्स-रिस्पॉन्स) विश्लेषण करण्यात येते. या प्रकारच्या विश्लेषणामुळे मूलभूत आघातांचा साकलिक अर्थशास्त्रीय घटकांवरील दीर्घकालीन स्वरुपातील परिणाम अभ्यासता येतो.

चौधरी, जयवंत