जीवनमान : एखाद्या व्यक्तीच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या किंवा राष्ट्राच्या बाबतीत त्यांच्या गरजा कितपत भागतात याचे मोजमाप. संदर्भानुसार हा शब्द तीन निरनिराळ्या अर्थांनी वापरला जातो : (१) समाजाच्या / राष्ट्राच्या राहणीची प्रत्यक्ष परिस्थिती. (२) जे राहणीमान असावे असे समाजास/राष्ट्रास वाटते, ती राहणीमानाची पातळी. (३)आंतरराष्ट्रीय संकेताप्रमाणे राहणीमानाची इष्ट पातळी. प्रत्येक राष्ट्राचे जीवनमान वेगवेगळे असले, तरी संयुक्त राष्ट्रांनी मानवी हक्कांच्या घोषणेमध्ये आयुर्मान, मालमत्ता, शिक्षण, कामधंदा व फुरसत यांचा समावेश केला आहे. एखाद्या समाजाचे/राष्ट्राचे जीवनमान ज्या गोष्टींवरून ध्यानी येते त्यांमध्ये आरोग्य, अन्न व पोषण, शिक्षण, रोजगार व कामाची परिस्थिती, उपभोग व बचत, वाहतूकविकास, गृहनिवसन, वस्त्रे, करमणूक, सामाजिक सुरक्षा व मानवी स्वातंत्र्य यांचा समावेश होतो.
राष्ट्राचे जीवनमान मुख्यत्वे दोन गोष्टींवर अवलंबून असते : (१) प्रतिडोई राष्ट्रीय उत्पन्न, (२) राष्ट्रीय उत्पन्नाची विभागणी. उत्पादनाची विपुल साधने, तंत्रविद्येतील प्रगती, भरपूर भांडवल व यंत्रसामग्री, कामगार व व्यवस्थापन कौशल्य यांच्या साहाय्याने विकसित राष्ट्रे प्रचंड राष्ट्रीय उत्पादन करून आपल्या विविध गरजा भागवू शकतात म्हणजेच त्यांचे प्रतिडोई राष्ट्रीय उत्पन्न आणि जीवनमान उच्च असते. याउलट विकसनशील व अविकसित राष्ट्रांमध्ये लोकसंख्येच्या मानाने साधनसामग्री, भांडवल, उत्पादनतंत्राचे आणि व्यवस्थापनाचे कौशल्य यांचा पुरवठा अपुरा पडतो म्हणून त्यांचे प्रतिडोई राष्ट्रीय उत्पन्न कमी असते. साहजिकच तेथील बहुसंख्य लोकांचे जीवनमान निकृष्ट असते. एखाद्या राष्ट्रातील विशिष्ट भागाचे किंवा वर्गाचे जीवनमान सरासरी राष्ट्रीय जीवनमानापेक्षा निकृष्ट असण्याचे कारण म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची विषम विभागणी, हे असते.
जीवनमान सुधारण्याचे प्रयत्न सर्वच राष्ट्रे करीत असतात. मानवी गरजा अनंत आहेत व त्यांच्यापैकी काही पूर्ण झाल्या, तरी इतर नवीन नवीन गरजा उत्पन्न होतच असतात. या वाढत्या गरजा अधिकाधिक प्रमाणावर भागविता येण्यासाठी प्रत्येक विकसित अर्थव्यवस्था झटत असते. विकसित राष्ट्रांचे ऐश्वर्य व सुबत्ता पाहून अविकसित व विकसनशील राष्ट्रांनाही आपले जीवनमान सुधारावेसे वाटते आणि त्या दिशेने तेथील अर्थव्यवस्थांचे प्रयत्न सुरू असतात. ज्या प्रमाणात त्यांना विकसित राष्ट्रांची विविध प्रकारची मदत मिळेल, त्या प्रमाणात त्यांचे प्रयत्न लवकर यशस्वी होण्याची शक्यता आहे. बहुतेक विकसनशील राष्ट्रांनी राष्ट्रीय नियोजनाचे तंत्र अवलंबून आपले जीवनमान त्वरित सुधारण्याचे प्रयत्न चालविले आहेत.
निरनिराळ्या राष्ट्रांचे जीवनमान वेगवेगळे असते तसेच प्रत्येक राष्ट्राचे जीवनमान निरनिराळ्या कालखंडांत वेगवेगळे असू शकते. जीवनमानांतील हे फरक मोजण्यात व निरनिराळ्या राष्ट्रांच्या जीवनमानांची तुलना करण्यात बऱ्याच अडचणी उद्भवतात कारण वेगवेगळ्या राष्ट्रांनी गाठलेला आर्थिक प्रगतीचा टप्पा व त्यांच्या चालू आर्थिक विकासाचा वेग निरनिराळा असतो. त्यांची राहणी व जीवनमान इतके विभिन्न असते की, त्याची खऱ्या अर्थाने दुसऱ्या राष्ट्रातील जीवनमानाशी तुलना करता येणेच अशक्य होते.
जीवनमानातील हे फरक मोजण्यासाठी जीवनमान निर्देशांक वापरता येतात परंतु निरनिराळ्या राष्ट्रांतील जीवनमानांची तुलना करताना या निर्देशांकांचा उपयोग करण्यामध्ये बऱ्याच अडचणी उद्भवतात. एखाद्या गटाच्या विशिष्ट गरजा विशिष्ट प्रमाणात भागविता येण्यासाठी त्यामधील सरासरी कुटुंबाला करावा लागणारा खर्च किंमतींमधील फेरफारांमुळे कसा बदलत जातो, याचे मोजमाप जीवनमान निर्देशांकाने करता येते. महागाई भत्ता केव्हा आणि कोणत्या प्रमाणात द्यावा, हे ठरविताना जीवनमान निर्देशांकांतील फरक लक्षात घेतले जातात.
संदर्भ : 1. Duesenberry, J. S. Income, Saving and The Theory of Consumer Behaviour, New York, 1949.
2. Hamilton, D. The Consumer in Our Economy, Boston, 1962.
3. Gertrude, Williams, The Economics of Everyday Life, London, 1964.
धोंगडे, ए. रा.