लिलाव : कमाल किंमत येईपर्यंत चढाओढीने बोली बोलून मालमत्तेची जाहीर विक्री करण्याची एक पद्धत. या पद्धतीत सर्वांत  जास्त किंमत  बोलणारास माल विकण्यात येतो. अत्यंत कुशल लिलावदार सामूहिक गर्दीचे मानसशास्त्र बरोबर ओळखून वस्तूला जास्तीत जास्त किंमत कशी येईल, हे पाहतो. लिलाव पद्धतीने स्थावर आणि जंगम अशा दोन्ही मिळकतींची विक्री करता येते. वस्तूचा मूळ मालक, लिलावदार आणि जास्तीत जास्त बोली बोलून वस्तू घेणारा खरेदीदार, अशा तीन पक्षांचा लिलावात समावेश असतो. मिळकतीची विक्री करण्याच्या इतर पद्धतींहून लिलाव पद्धती  वेगळी असून , न्यायालयाकडून  परवाना  मिळालेल्या व्यक्तीस म्हणजेच  लिलावदारास मिळकतीची कायदेशीर विक्री करण्याचा अधिकार आहे.

 

खाजगी मालक, संस्था इ. आपल्या मालकीच्या वस्तूंची योग्य किंमत येण्यासाठी लिलाव पद्धतीने विक्री करतात. वस्तूंची अथवा मिळकतीची विक्री करू इच्छिणाऱ्या मूळ मालकाचा लिलावदार हा एक प्रकारचा अभिकर्ताच (एजंट) असतो . लिलावात स्वतःच्या अधिकारात वस्तूची अथवा मिळकतीची विक्री लिलाव पद्धतीने जाहीर करणे, लिलावातील मूळ मालकाची वस्तू अथवा मिळकत यांबाबत कायदेशीर मालकी हक्क इत्यादीसंबंधी काही दोष अथवा उणिवा नसल्याचे जाहीर करणे, लिलाव पूर्ण होऊन पैसे हातात पडल्याबरोबर  लिलाव वस्तूचा ताबा खरेदीदारास देणे, लिलावातील वस्तूचा प्रत्यक्ष ताबा मालकाडून अथवा स्वतःच विना-अडथळा खरेदीदाराला देणे इ. कामे लिलावदार पार पाडत असतो.

भारतीय मालविक्री अधिनियमात कलम ६४ मध्ये लिलावाबाबत कायदेशीर तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यांनुसार लिलावाच्या मालविक्रीचे नियमन केले जाते. लिलावात विकण्यात येणाऱ्या प्रत्येक वस्तूचा ढीग (लॉट) मांडला जातो आणि असा प्रत्येक ढीग स्वतंत्र प्रसंविदा करारच असतो. लिलावदार विशिष्ट पद्धतीने अथवा इतर रूढ पद्धतीने लिलाव जाहीर करतो. गिऱ्हाइकांना चढाओढीत भाग घेता यावा म्हणून लिलावाची तारीख, वेळ, स्थळ, शर्ती, नियम, राखीव किंमत इत्यादींची जाहिरात तसेच प्रसिध्दी केली जाते. या पद्धतीने मालाची विक्री करणारे काही  धंदेवाईक लिलावदार असतात आणि त्यांच्यामार्फतही लिलावाचे काम योग्य मेहनतान्यावर केले जाते. लिलावात किमान ठराविक किंमत आल्याखेरीज वस्तू विकली जाणार नाही, अशीही अट घालता येते. अनिर्बंध लिलाव करण्याचे अगोदर जाहीर केलेले नसल्यास लिलावातील   कोणतीही वस्तू लिलाव पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही लिलावातून काढून घेता येते. त्याचप्रमाणे लिलाव पूर्ण होण्याअगोदर दिलेली बोली (बिड) मागे घेण्याचे स्वातंत्र्य लिलावात बोली बोलणारास (बिडरला) असते. लिलावाच्या जाहिरातीनुसार वस्तूची विक्री करण्याचे बंधन लिलावदारावर नसते. मात्र लिलावाच्या मुक्रर केलेल्या दिवसाबाबत अथवा निर्णयाबाबत बदल केलेला नसल्यास लिलावाने वस्तूची विक्री करण्याचे बंधन त्याच्यावर पडते. लिलावात बोली केल्यावर व बोली अंतिम ठरल्यानंतर लिलाव प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर ती नाकारता अथवा रद्द करता येते नाही, अशी एक अट असून कायद्याने ती बंधनकारक असते.

 

ज्याच्या मालकीची वस्तू लिलावात विक्रीसाठी ठेवलेली असते, अशा व्यक्तीस किंवा तिच्यातर्फे इतर कोणत्याही व्यक्तीस बोली बोलता येत नाही, असा सर्वसाधारण रूढ नियम आहे. तथापि विक्रेत्याने आपला विशेष हक्क पूर्वसूचनेने राखून ठेवला असेल, तर त्याला स्वतःला अगर त्याच्या कोणत्याही प्रतिनिधीला लिलावाच्या बोलीत सहभागी होता येते, परंतू अशी पूर्व-तरतूद केली नसेल, तर त्यांचे भाग घेणे कादेशीर ठरत नाही. शिवाय लिलावात अंतिम बोली बोलणारा खरेदीदार अशा प्रकारचा लिलाव लबाडीने अथवा फसवणुकीने केलेला आहे, असा आक्षेप घेऊ शकतो. तसेच बनावटीने किंवा लबाडीने बोली बोलून जर कोणी मालकाच्या बाजूने लिलावात भाग घेऊन किंमत वाढविण्याचा प्रयत्न केला, तर खरेदीदार त्याला होणाऱ्या  नुकसानीच्या कारणस्तव लिलाव नाकारू अथवा रद्दबातल करू शकतो. त्याचप्रमाणे लिलावात संभाव्य खरेदीदारास नुकसानीची भीती दाखवून किंवा वस्तूमध्ये दोषच आहेत हे मुद्दाम दाखवून किंवा वस्तूच्या किंमतीचा अंदाज येऊच नये या दृष्टीने कृती केल्या असतील, तर त्या  कृतींना लिलावव्यवहारातील ‘अवमंदन’(डँपनिंग) असे म्हणतात. अवमंदन नेहमीच बेकायदेशीर असते.

लिलावदाराने लिलावातील वस्तूच्या मूळ मालकाचे नाव उघड करून सांगणे आवश्यक नसते. एकदा का त्याने लिलावातील माल विकून लिलाव पूर्ण केला की, त्याची जबादारी संपते. कायद्यानुसार व रूढीनुसार लिलावातील वस्तू योग्य प्रकारे खरेदी करणे ही ज्याची त्याची जबाबदारी असते. परंतु लिलावदाराच्या लबाडीमुळे जर लिलावातील खरेदीदाराचे नुकसान झाले, तर त्यास मालक जबाबदार असतो. स्वेच्छेने होणाऱ्या  लिलावात मालाच्या अथवा वस्तूच्या मालकीबद्दलची जबाबदारी किंवा जोखीम मालकावर असते.


लिलावातील वस्तूची समाइकांत खरेदी करता येते व समाईक खरेदीदारांपैकी कोणाही एकाने केलेली बोली समाईक समजून तसा करार केल्यास तो कायदेशीर ठरतो. मात्र समाईक खरेदीदारांविरुद्ध वरचढ बोली करणार नाही, अशा प्रकारचा करार करणे अवैध आहे.

दिवाणी व्यवहार संहितेनुसार न्यायालयास ऋणकोच्या स्थावर आणि जंगम मिळकतींचा जाहीर लिलाव करण्याचा अधिकार आहे. त्याला ‘अनैच्छिक विक्रीचा लिलाव’ असे म्हणतात. ऋणकोचे कर्ज, देणे इ. असल्यास त्याच्या मिळकतीतून त्याचे हितसंबंध व मालकी हक्क यांची विक्री करून ते भागविले जातात. अशा ऋणकोची मिळकत, लिलावाद्वारे खरेदी करणाऱ्यात व्यक्तीने, ती त्याचीच मिळकत आहे, हे स्वतःच सिद्ध करून घ्यावे लागते. याबाबतची कोणतीच जोखीम अथवा जबाबदारी न्यायालयावर नसते. न्यायालयामार्फत झालेल्या लिलावातील मिळकत खरेदी करणारा इसम माझा बेनामीदार आहे, असा कोणासही नंतर दिवाणी न्यायालयात मिळकतीच्या ताब्याबाबत दावा लावता येत नाही.

 

आधुनिक व्यापाराच्या क्षेत्रात कारखानदार, उत्पादक तसेच घाऊक व्यापारी आपल्याकडील शिल्लक माल लिलाव पद्धतीने विकतात. काही छोटे व्यापारी आपल्या दुकानाची जागा एका शहरातून दुसऱ्या शहरात बदलताना आपल्याकडील शिल्लक माल लिलाव करून काढतात. शेतकरी आपल्याकडील गहू, तांदूळ, तंबाखू, लोकर, चहा इ. वस्तू मोठ्या प्रमाणात लिलाव पद्धतीने विकून पैसा झटपट उभा करतात. शासकीय अधिकारी काही वेळा एका ठिकाणाहून दुसऱ्याव ठिकाणी बदलीच्या वेळी आपल्याकडील लाकडी फर्निचर, कपाटे इ. अवजड माल आर्थिक दृष्ट्या दूर वाहून नेणे परवडत नाही म्हणून लिलाव पद्धतीने विकून टाकतात. व्यापारात लिलाव पद्धतीने वस्तूची विक्री करण्यासाठी दलालाची नेमणूक केली जाते. या व्यवहारात दलाल अनुभवी व तज्ञ असतो आणि तो खरेदीदार व विक्रेता यांच्यातर्फे कार्य करतो. विक्रेत्याकडून वस्तूची विशिष्ट किंमत सुचविण्यात आल्यानंतर दलाल लिलावाने वस्तू विकण्याची व्यवस्था करतो. लिलावाच्या दिवशी दलाल एका उंच जागेवर उभा राहून उपस्थितांना प्रथम वस्तू दाखवितो आणि ‘एक वार, दोन वार,तीन वार’ असे शब्द क्रमाक्रमाने मोठ्या आवाजात उच्चारत ‘वस्तू जात आहे’, ‘गेली’ वगैरे शब्द पुकारतो. खरेदीदार एकापेक्षा एक वरचढ बोली बोलून वस्तूची किंमत करतात. सर्वांत जास्त बोली बोलणाऱ्या खरेदीदाराची किंमत स्वीकारून दर्शक चिन्ह म्हणून दलाल टेबलावर हातोडा आपटून लिलाव पूर्ण झाला, असे जाहीर करून वस्तूची विक्री करून वस्तूची विक्री त्यास करतो.

सर्वसाधारणपणे बाजारात ज्या वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणावर असते, वस्तूंचा पुरवठा फारच थोड्या लोकांपर्यंत झालेला असतो आणि वस्तूंची वर्गवारी व प्रतवारी करता येत नाही, अशा वस्तू लिलावयोग्य मानल्या जातात. लिलावापूर्वी ग्राहकांना अगोदर काही दिवस वस्तू पाहण्यासाठी ठेवल्या जातात. तसेच संभाव्य खरेदीदारांना किंमतींचे पत्रकही पाठविण्यात येते. तत्पूर्वी विक्रीच्या अटी, सुरक्षित किंवा राखीव किंमत आणि दलाली अडत (कमिशन) निश्चित केली जाते. विक्री केलेल्या वस्तूंच्या आवश्यक नोंदी दलाल आपल्या पुस्तकात करतो.

व्यापारी क्षेत्रात ‘खुली लिलाव पद्धती’ व ‘गुप्त लिलाव पद्धती’ असे दोन प्रकार प्रचलित आहेत. खुल्या लिलाव पद्धतीत खरेदीदार वस्तूंच्या साठ्याची पाहणी करून तसेच वस्तूंच्या गुणांवरून किंमती निश्चित करतो. लिलावात वरचढ बोली बोलणाऱ्या आणि विक्रेत्याला रोख पैसे देणाऱ्या खरेदीदारास वस्तू विकण्यात येते. विक्री करण्यात आलेली वस्तू स्वतंत्र नोंदणीपुस्तकात नोंदवून मगच ती खरेदीदाराच्या ताब्यात दिली जाते. गुप्त लिलाव पद्धतीत खरेदीदारांना निविदा पत्रे पुरविण्यात येतात. त्यांवर विक्रीस ठेवलेल्या मालाची संपूर्ण माहिती लिहिलेली असते. प्रत्यक्ष मालाची पाहणी करून, ज्या किंमतीला माल खरेदी करावयाचा आहे, अशी किंमत खरेदीदार निविदा पत्रांमध्ये घालतात. अशी आलेली सर्व निविदा पत्रे एका सीलबंद पेटीत अथवा सुरक्षित जागी ठेवली जातात ठरलेल्या विशिष्ट वेळी निविदा पत्रे उघडून त्यांची तपासणी केली जाते. ज्या निविदा पत्रावर जास्तीत जास्त किंमत लिहिलेली असेल आणि विक्रेत्याला ती मान्य असेल, तर संबंधित खरेदीदाराला व्यवहार पूर्ण करून वस्तूचा ताबा देण्यात येतो. तर निविदा पत्रांवर सारख्याच किंमती घालणारे अनेक खरेदीदार असतील, तर चिठ्ठ्या टाकून त्यांतील एकास वस्तूची विक्री करण्यात येते.

व्यापारी जगतात लिलाव पद्धतीने मालाची विक्री केल्यामुळे विक्रेता व खरेदीदार यांना काही प्रमाणात फायदे आणि तोटेही सहन करावे लागतात. फायद्याच्या दृष्टीने विचार केल्यास विक्रेते व खरेदीदार यांत प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित होऊन मागणी व पुरवठ्याच्या सिद्धांतानुसार योग्य किंमतीत वस्तूंच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येतात. फळे, भाजीपाला, अंडी वगैरे नाशवंत मालाचा त्वरित उठाव होण्याच्या दृष्टीने लिलाव-विक्री पद्धती खूप उपयुक्त असून तिचा फायदा खरेदीदार आणि विक्रेता या दोघांनाही होतो. लिलाव-विक्री पद्धतीमुळे माल दीर्घकाळ साठून राहत नाही आणि उत्पादन-विक्रीतील वरकड खर्चही वाढत नाही. शिवाय गुंतविलेले भांडवल लवकर रिकामे होण्यासाठी ही उपयुक्त ठरते. तोट्याच्या दृष्टीने विचार केल्यास काही वेळा लिलावात वस्तूंच्या किंमतीत फार मोठे चढ-उतार होऊन बाजारात अस्थिरता निर्माण होऊ शकते. यामुळे खरेदीदार व विक्रेते यांचे नुकसान होण्याची शक्यता असते. तसेच काही वेळा मालाची विक्री होण्यास बराच विलंब होतो. लिलावात ग्राहकांना वस्तू पहावयास मिळतात. परंतु त्यांच्या दर्जाबाबत हमी मिळत नाही आणि विक्रीनंतर कसलीही पुनर्सेवा उपलब्ध होते नाही. विक्रेते आपल्यामार्फत कोणाही व्यक्तीला लिलावात बोली बोलण्यास सांगून नेहमीच्या पद्धतीने वस्तूंच्या किंमती वाढविण्याचा प्रयत्न करतात. अर्थातच त्यामुळे खरेदीदार व विक्रेते यांत तंटे निर्माण होण्याची शक्यता असते.

पटवर्धन, वि. भा. गोसावी, मो. सं.