जॉर्ज जोसेफ स्टिग्लर

स्टिग्लर, जॉर्ज जोसेफ : (१७ जानेवारी १९११—१ डिसेंबर १९९१). सुप्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी (१९८२). त्याचा जन्म वॉशिंग्टन राज्यातील सिॲटल शहरात झाला. वॉशिंग्टन विद्यापीठातून बी.ए. झाल्यानंतर (१९३१) त्याने नॉर्थ-वेस्टर्न विद्यापीठातून व्यवस्थापनशास्त्र विषयातील पदवी प्राप्त केली (१९३२). त्यानंतर शिकागो विद्यापीठाची अर्थशास्त्र विषयातील डॉक्टरेट मिळविली (१९३८). लोवा स्टेट कॉलेज (१९३६—३८), मिनेसोटा विद्यापीठ (१९३८—४६), ब्राउन विद्यापीठ (१९४६-४७), कोलंबिया विद्यापीठ (१९४७—५८) यांतून जवळपास बावीस वर्षे त्याने अर्थशास्त्र विषयाचे अध्यापन केले. १९५८—८१ दरम्यान शिकागो विद्यापीठात अध्यापन व संशोधनकार्याला त्याने स्वतःस वाहून घेतले आणि स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ही संस्था स्थापन करून तिचे नेतृत्व केले. याकामी त्याला अर्थतज्ज्ञ ⇨ मिल्टन फ्रीडमन याचे सहकार्य लाभले. स्टिग्लरवर थोर अर्थतज्ज्ञ फ्रँक नाइट, जेकब विनर, हेन्री सीमेन्स यांचा प्रभाव होता. जगातील सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञांचा समावेश असलेल्या ‘द मोंट पेलेरिन सोसायटी’चा (१९४७) तो संस्थापक-सदस्य, तर १९७६—७८ या काळात अध्यक्ष होता.

स्टिग्लरने स्थूल अर्थशास्त्राच्या संशोधनात मोलाची भर घातली. बाजारपेठेचे चलनवलन सुरळीत राहण्यासाठी श्रमाधिष्ठित व्यवस्थेमधील पारंपरिक सामंजस्याची भूमिका महत्त्वाची असते, असे मत त्याने मांडले.शासनव्यवस्थेने नियामक कायद्यांचा अंमल एकसारखा केल्यास त्याचा ग्राहकांच्या पसंतीक्रमावर प्रभाव पडतो व बाजारव्यवस्थेवरही प्रतिकूल परिणाम संभवतो, हे त्याने आपल्या संशोधनातून दाखवून दिले. उत्पादक व व्यावसायिक अनेकदा मक्तेदारी स्थापन करण्याच्या उद्देशाने नियामक यंत्रणेला नियंत्रित करतात व त्यामुळे ग्राहकवर्गाचे नुकसान होते. हितसंबंधी गट व राजकीय कार्यकर्ते हे शासकीय अधिकारांचा आणि निर्णयांचा विनियोग आपल्या फायद्यासाठी करतात. अशा आशयाचा नियंत्रित अर्थकारणाचा सिद्धांत ( कॅप्चर ) स्टिग्लरने विकसित केला. आर्थिक विचारांच्या इतिहासामधील व्यापक स्वरूपाचे संशोधन त्याने केले. त्याचे अर्थशास्त्रातील सर्वांत महत्त्वाचे योगदान म्हणजे  ‘ इकॉनॉमिक्स ऑफइन्फर्मेशन ’ (१९६१) हा संशोधनपर लेख होय. सदरच्या लेखात स्टिग्लरने ‘ माहिती ’चे एक संसाधन म्हणून असलेले महत्त्व अधोरेखित केले. ‘ माहिती ’ या ज्ञानप्राप्तीसाठीच्या मूल्यवान साधनाचे महत्त्व शैक्षणिक क्षेत्रातील विद्वानांना सांगण्याची गरज नाही तथापि अर्थशास्त्राच्या प्रांतात ते दुर्लक्षितच आहे, असे परखड मत त्याने मांडले.

अनुभवजन्य दिशासाधनांसह प्रदीर्घ व विशाल संशोधनात्मक प्रयत्नांद्वारे स्टिगलरने बाजार प्रक्रिया आणि उद्योगांच्या संरचनात्मक विश्लेषणास मूलभूत अंशदान दिले आहे. या संशोधनाचा एक भाग म्हणून बाजारावर आर्थिकविषयक कायद्याचा कसा परिणाम होतो, याचा त्याने शोध घेतला. त्याच्या अभ्यासाच्या प्रेरणेतून नियामक कायद्याच्या दिशा प्रकट होतात आणि अर्थशास्त्रातील अगदी नवीन क्षेत्राचा परिचय करून देतात. बाजार आणि औद्योगिक संरचना यांच्या अनुप्रयुक्त संशोधनातील त्याचे योगदान निःसंशय मोठे आहे. त्याच्या या क्षेत्राचा उल्लेख नेहमी औद्योगिक संघटना म्हणून केला जातो. अर्थशास्त्रातील कायदा आणि अर्थशास्त्राची माहिती या दोन क्षेत्रांचा अध्वर्यू म्हणून त्याची नोंद झाली असून अर्थशास्त्र व विधी यांच्या छेदनातील त्याचे संशोधन एक प्रणेता म्हणून प्रसिद्ध पावले आहे.

स्टिग्लरला स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषण, चिकित्सा व परिणाम यांसंदर्भातील संशोधनाबद्दल १९८२ चे नोबेल पारितोषिक मिळाले. तसेच  १९८७ मध्ये त्याला नॅशनल मेडल ऑफ सायन्स पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

स्टिग्लरने अर्थशास्त्राचे विविध अंगाने विवेचन करणारे अनेक ग्रंथ व शोधनिबंध लिहिले. त्यांमध्ये थिअरी ऑफ प्राइस (१९४६), इन्टिलेक्चुअल अँड द मार्केट प्लस (१९६४), एसेज इन द हिस्टरी ऑफ इकॉनॉमिक थॉट (१९६५), द सिटिझन अँड द स्टेट ऑन रेग्युलेशन (१९७५), द इकॉनॉमिस्ट ॲज प्रीचर अँड अदर एसेज (१९८२) व शिकागो स्टडीज इन पोलिटिकल इकॉनॉमी (१९८८) या ग्रंथांचा समावेश होतो.

स्टिग्लरचे शिकागो-इलिनॉय येथे निधन झाले.

चौधरी, जयवंत