सिडनी आणि बिआट्रिस वेबवेब, सिडनी जेम्स आणि बिआट्रिस : (१३ जुलै, १८५९–१३ ऑक्टोबर, १९४७), (२२ जानेवारी, १८५८–३० एप्रिल, १९४३). हे इंग्लिश दांपत्य समाजकारण, कामगार चळवळ, अर्थशास्त्रीय व समाजशास्त्रीय संशोधन, तसेच ⇨फेबिअन समाजवाद  इ. अनेक चळवळींत व कार्यक्षेत्रांत केलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल प्रसिद्ध आहे. सिडनी वेब यांचा जन्म लंडनमध्ये एका कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. ब्रिटिश नागरी सेवेमध्ये त्यांनी तेरा वर्षे काम केले. १८८४ मध्ये त्यांनी बॅरिस्टरची पदवी मिळविली. फेबिअन सोसायटीच्या संस्थापक-सदस्यांपैकी ते एक होते. सिडनी वेब यांनी या सोसायटीसाठी फॅक्ट्स फॉर सोशॅलिस्टस (१८८७) हे पुस्तक लिहिले. त्यांनी अनेक व्याख्यानेही दिली. लंडन काउंटी कौन्सिलमध्ये त्यांची १८९२ मध्ये निवड झाली व तेथे त्यांनी अठरा वर्षे काम केले. तत्पूर्वी त्यांनी नागरी सेवेचा राजीनामा दिला व समाजकारण, राजकारण या क्षेत्रांना स्वतःला पूर्णपणे वाहून घेण्याचे ठरविले. तांत्रिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणून तसेच रॉयल कमिशन ऑन ट्रेड युनियन लॉ या मंडळाचे सदस्य म्हणूनही (१९०३ ते १९०६) त्यांनी काम केले. १८९२ साली त्यांचा बिआट्रिस पॉटर या उच्च घराण्यातील विदुषीशी प्रेमविवाह झाला. या विवाहाविरुद्ध त्या काळी समाजात बरेच वादळही उठले होते.

मार्था बिआट्रिस पॉटर यांचा जन्म ग्लॉस्टर येथे एका सधन खानदानी कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण खाजगी रीत्या झाले व १८८२ मध्ये आईच्या मृत्यूनंतर त्यांनी आपल्या उद्योगपती वडिलांचे साहाय्यक म्हणून काम पाहिले. त्यांची प्रवृत्ती व ओढा पहिल्यापासूनच समाजवाद व कामगार चळवळ यांकडे होता. त्यामुळेच सिडनी वेब यांच्याकडे त्या आकर्षिल्या गेल्या. त्यांनी लाईफ अँड लेबर ओफ़ द पीपल इन लंडन (१८९११९०३) ह्या चार्ल्स बूथ संचलित समाजशास्त्रीय सर्वेक्षणाचा (ग्रंथरूपाने १७ खंडांत प्रसिद्ध, १९०२-१९०३) एक भाग म्हणून श्रमजीवी वर्गाच्या स्थितीविषयी संशोधन केले. द को-ऑपरेटिव्ह मूव्हमेंट इन ग्रेट ब्रिटन हा ग्रंथ त्यांनी १८९१ साली प्रसिद्ध केला. बिआट्रिस वेब ह्या ‘रॉयल कमिशन ऑन द पुअर लॉज’ या मंडळाच्या सदस्या होत्या (१९०५–०९) व या कार्यकाळातच त्यांनी आपला ‘मायनॉरिटी रिपोर्ट’ (भाग १-द ब्रेक-अप ऑफ द पुअर लॉ, १९०९) हा लक्षणीय अहवाल तयार केला. आपल्या पतीसमवेत त्यांनी कामगार चळवळीत, समाजकारणात व राजकारणात हिरिरीने भाग घेतला.

वेब दांपत्याने ब्रिइश कामगार चळवळीस बौद्धिक अधिष्ठान व सामर्थ्य मिळवून देण्याच्या संदर्भात १९०९ सालापासून विशेष महत्त्वाची कामगिरी बजावली. प्रचलित अर्थशास्त्रीय सिद्धांत व सामाजिक तत्त्वज्ञान यांवर त्यांनी प्रखर हल्ला चढविला. १९१३ साली त्यांनी न्यू स्टेट्समन हे नवीन साप्ताहिक सुरू केले. तसेच ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स’ (१८९५) या संस्थेच्या स्थापनेसाठी व प्रगतीसाठी त्यांनी भरीव कार्य केले. लंडन विद्यापीठाच्या कक्षेत येणाऱ्या या संस्थेत सिडनी वेब हे लोकप्रशासन या विषयाचे मानद प्राध्यापक होते (१९१२–२७). तसेच १९१५ ते १९२५ या काळात मजूर पक्षाच्या कार्यकारी समितीवर सदस्य म्हणूनही काम करत होते. या कार्यकाळातच त्यांनी लेबर अँड द न्यू सोशल ऑर्डर (१९१८) हे पक्षाचे धोरणात्मक निवेदन तयार केले. १९२२ साली ते ब्रिटिश संसदेत निवडून आले. मजूर पक्षाच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते व्यापार खात्याचे मंत्री होते. पंतप्रधान मॅक्डॉनल्ड यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी वसाहतविषयक खात्यात सचिव म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावली.

वेब दांपत्याने अनेक विद्वत्ताप्रचुर, संशोधनात्मक ग्रंथ निर्माण केले. उदा., द हिस्टरी ऑफ ट्रेड युनियनिझम (१८९४), इंडस्ट्रिअल डेमॉक्रसी (१८९७), इंग्लिश लोकल गव्हर्नमेंट (१० खंड, १९०६–२९), द कंझ्यूमर्स को-ऑपरेटिव्ह मूव्हमेंट (१९२१), द डीके ऑफ कॅपिटॅलिस्ट सिव्हिलिझेशन (१९२३), अ कॉन्स्टिट्यूशन फॉर द सोशालिस्ट कॉमनवेल्थ ऑफ ग्रेट ब्रिटन (१९२०) इत्यादी. वेब पतिपत्नी यांनी १९३२ मध्ये रशियाला भेट दिली. तेथे त्यांना त्यांच्या कल्पनेतील समजवादाचे दर्शन घडले. त्याचे वर्णन त्यांच्या सोव्हिएट कॉम्यूनिझम : ए न्यू सिव्हिलिझेशन ? या ग्रंथात आहे. बिआट्रिस वेब यांनी माय ॲप्रेंटिसशिप (१९२६) व अवर पार्टनरशिप (१९४८) या दोन पुस्तकांतून आत्मचरित्रात्मक लिखाण केले. फेबिअन विचारप्रणालीच्या माध्यमातून लोकशाही समाजवादाची पाळेमुळे ब्रिटिश भूमीत रुजविण्याचे महत्त्वाचे कार्य वेब दांपत्याने केले. त्यासाठी त्यांनी प्रचंड ग्रंथसंपदा निर्माण केली. त्यांनी कामगार चळवळींचा व संघटनांचा अभ्यास करून आर्थिक समतेचे तत्त्व प्रस्थापित केले. ब्रिटिश स्थानिक स्वराज्याचा सतराव्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंतचा इतिहास अभ्यासून जी ग्रंथमाला (इंग्लिश लोकल गव्हर्नमेंट) त्यांनी निर्माण केली, ती त्यांच्या अव्वल दर्जाच्या इतिहास-संशोधनाची निदर्शक आहे. सामाजिक-शैक्षणिक कार्यासाठी त्यांनी नव्या संस्था (उदा., ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स’) स्थापल्या. सामाजिक व आर्थिक सुधारणांचे आद्य प्रणेते व इतिहासकार म्हणून त्यांनी केलेल्या ह्या कार्याचा प्रभाव ब्रिटनमधील आधुनिक राजकीय व संस्थात्मक जीवनावर विशेषत्वाने दिसून येतो.

सिडनी आणि बिआट्रिस या दोघांचेही निधन लिप् हूक(हँपशर) येथे झाले.

संदर्भ : 1. Cole, Margaret, Ed. The Webbs and Their Work, London, 1949.

            2. Hamilton, M. A. Sidney and Beatrice Webb, London, 1933.

दामले, य. भा.