गिडिंग्झ, फ्रँकलिन हेन्‍री : ( २३ मार्च १८५५ —११ जून १९३१). अमेरिकन समाजशास्त्रज्ञ, कनेक्टिट राज्यातील शर्मन येथे जन्म. न्यूयॉर्क येथे युनियन महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण. पदवी संपादन केल्यानंतर (१८७७) तो वृत्तपत्रव्यवसायाकडे वळला. नंतर ब्रिन मार महाविद्यालयात काही काळ अध्यापन केले (१८८८—९४). कोलंबिया विद्यापीठात आरंभी समाजशास्त्राचा आणि पुढे समाजशास्त्र व इतिहास (१९०६—२८) या विषयांचा तो प्राध्यापक होता. त्यानंतर विद्यापीठ अनुदान पुरस्कृत प्राध्यापक (१९२८—३१). ‘अमेरिकन सोशिऑलॉजिकल सोसायटी ’ (१९१०—११) आणि ‘इन्स्टिट्यूट इंटरनॅशनल द सोशिऑलॉजी ’ (१९१३) या संस्थाचा काही काळ अध्यक्ष. ‘न्यूयॉर्क सिटिझन कमिटी ऑफ एज्यूकेशन’चा तो सभासद होता.

गिडिंग्झने विपुल समाजशास्त्रीय लेखन केले. एक मूलभूत सामाजिक शास्त्र म्हणून समाजशास्त्राची सर्वांगीण रूपरेषा त्याने आपल्या प्रिन्सिपल्स ऑफ सोशिऑलॉजी  (१८९६) मध्ये विशद केली. समाजाच्या मानसशास्त्रीय विश्लेषणात त्याने मांडलेल्या ज्ञातिबोधाच्या (द कॉन्शसनेस ऑफ काइंड) संकल्पनेचे मूळ त्याच्यावरील ॲडम स्मिथच्या प्रभावात आढळते. त्याच्या परिपक्व समाजशास्त्रीय विचारांचे दर्शन स्टडीज इन द थिअरी  ऑफ ह्यूमन सोसायटी  (१९२२) या ग्रंथात आढळते. यात सामाजिक वर्तन म्हणजे, ‘एकाच उद्दीपनाला मिळणारे भिन्न भिन्न प्रकारचे प्रतिसाद होत’ असा विचार त्याने मांडला आहे. ऑग्यूस्त काँत, हर्बर्ट

फ्रँकलिन गिडिंग्झ

स्पेन्सर, चार्ल्‌स डार्विन, एमील द्यूरकेम वगैरेंच्या विचारसरणींचा कमीअधिक प्रमाणात आधार घेऊन गिडिंग्झने एक सुसंगत समाजशास्त्रीय विचारप्रणाली सिद्ध केली. द माइटी मेडिसीन  (१९३०) आणि त्याच्या मरणोत्तर प्रसिद्ध झालेले सिव्हिलायझेशन अँड सोसायटी  (१९३२) या ग्रंथांत त्याचे सिद्धांत व त्यांचे उपयोजन यांचे सारभूत दर्शन घडते. त्याच्या इतर उल्लेखनीय ग्रंथांत डेमॉक्रसी अँड एम्पायर (१९००), वेस्टर्न हेमिस्फिअर इन द वर्ल्ड ऑफ टुमारो  (१९१५), द रिस्पॉन्सिबल स्टेट (१९१८) व द सायंटिफिक स्टडी ऑफ ह्यूमन सोसायटी  (१९२४) यांचा समावेश होतो. न्यूयॉर्क येथे त्याचे निधन झाले.

  

  

भोईटे, उत्तम