श्रेणि : (गिल्ड). मध्ययुगात विशेषतः पश्चिम यूरोपात व्यापार व अन्य कारागिरी-व्यवसायानिमित्त निर्माण झालेले आर्थिक आणि सामाजिक संघ. यांचे सदस्यत्व व्यापारी व कारागीर यांपुरते मर्यादित होते. या संघ वा संघटनांचे प्राथमिक कार्य स्थानिक व्यापारावर नियंत्रण ठेवणे, गुणवत्ता व वस्तूंचे भाव निर्धारित करणे, अंतर्गत स्पर्धेपासून व्यापाराचे संरक्षण करणे आणि समाजात श्रेणी सभासदांची प्रतिष्ठा अबाधित राखणे हे होते.

इंग्रजी ‘गिल्ड’ ही संज्ञा सर्व आधुनिक उत्तर यूरोपीय भाषांत आढळते. गेल्ट, गेल्ड किंवा गिल्ड या मूळ प्राचीन जर्मानिक धातूपासून हा शब्द बनला असून, त्याचा अर्थ मेहनताना देणे, अर्पण केलेली वस्तू , किंवा देऊ करण्याची कृती असा आहे. त्याचा मराठी पर्यायी वा प्रतिशब्द श्रेणी असून त्याचा शब्दकोशीय अर्थ व्यापारी संघ, अधिकारयुक्त महाजन मंडळ, पेढी असा दिला आहे.

ही संकल्पना यूरोपीय समाजात निश्चितपणे केव्हा प्रविष्ट झाली, याविषयी तज्ज्ञांत एकमत नाही. प्राचीन ईजिप्शियन संस्कृती किंवा मेसोपोटेमिया यांत व्यापारी संघ अस्तित्वात असल्याचे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे तथापि तत्संबंधी कोणतेही दाखले उपलब्ध नाहीत. मात्र अभिजात ग्रीक संस्कृती, ग्रीकांश वसाहती व रोमन साम्राज्यातील ग्रीक व्यापाऱ्यांच्या संघटना या संदर्भात महत्त्वपूर्ण ठरतात. रोमन साम्राज्यातील प्रत्येक नगरात रोमप्रमाणेच ‘कॉलेजिया’ नावाच्या श्रेणीसदृश आर्थिक संघटना होत्या. पुढे कालांतराने कॉन्स्टँटिनोपल या शहरात ‘कार्पोरा’ नावाचा व्यापारी संघ होता. या श्रेणीसदृश संघटना नंतर पूर्वेकडील देशांत आणि इटलीच्या काही नगरांमधून इ. स. दहाव्या शतकापर्यंत कार्यरत असलेल्या आढळतात कारण त्यांविषयीचा तपशीलवार वृत्तांत द बुक ऑफ द प्रिफेक्ट यात आढळतो. त्यात बायझंटिन काळातील श्रेणींच्या व्यवस्थापनासंबंधी सविस्तर माहिती मिळते. अर्थात त्याचा मध्ययुगातील विकसित श्रेणींच्या (व्यापारी संघांच्या) निर्मितीवर कितपत परिणाम झाला, हे ठामपणे सांगता येत नाही. काही अर्थशास्त्रवेत्ते पश्चिम यूरोपमधील श्रेणींची निर्मिती कॉलेजियामधून झाली असावी, असे अनुमान काढतात.

मध्ययुगीन (अकरावे-तेरावे शतक) पश्चिम यूरोपातील श्रेणीसंघ यांचा मूलस्रोत आदिवासी किंवा धार्मिक जर्मन श्रेणीत-संघटनांत असावा, असे काही विद्वानांचे मत आहे. रोमन साम्राज्याच्या अध:पतनानंतर व्यापार व उदयोगधंदे यांची प्रगती खुंटली. तसेच अकराव्या शतकात सरंजामशाहीविरूद्ध काही व्यापारी संघांनी व्यापार-उदयोगाच्या हितासाठी आक्रमक धोरण अवलंबिले. त्यातून या व्यापारी श्रेणींची निर्मिती झाली. प्रथम इटलीतील फ्लॉरेन्स आणि जिनोआ येथील काही व्यापारी श्रेणींनी तत्कालीन स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व प्रस्थापिले. इंग्लंड आणि जर्मनीतील व्यापारी श्रेणींनी तेथील नागरी शासनात हस्तक्षेप करून अनेक सवलती प्राप्त करून घेतल्या. पुढे हळूहळू व्यापारी श्रेणींनी स्थानिक राजकीय उलाढालींपासून अलिप्त राहून व्यापाराची वृद्धी, संवर्धन आणि संरक्षण यांकरिता नगरांतर्गत संघ विकसित केले. त्याचे उल्लेखनीय उदाहरण म्हणजे उत्तर यूरोपमधील ‘हॉन्सिॲटिक लीग’ होय. तिने अनेक व्यापारी नगरांवर नियंत्रण प्रस्थापित करून काही स्वतंत्र श्रेणीसंघांची स्थापना केली. याच सुमारास काही कारागिरांच्या, विशेषतः कुशल कामगारांच्या, विणकरांच्या आणि कोष्ट्यांच्या श्रेणींची निर्मिती झाली. नगरांच्या विकासवाढीबरोबरच त्यांची वाढ व वृद्घी झपाटयाने झाली आणि व्यापाराबरोबरच त्यांनी सत्तेत सहभाग घेण्यास सुरूवात केली. अशा लोकरीच्या व्यापारी श्रेणींची प्रमुख केंद्रे गेंट आणि ईप्र (फ्लँडर्स-बेल्जियम) या ठिकाणी होती. तिथून लोकरीच्या कापडनिर्मितीबरोबरच वितरणाची व्यवस्था करण्यात आली होती.

बाराव्या शतकात व्यापार आणि उदयोगधंद्यात वाढ झाल्यानंतर आपाततः व्यापारी श्रेणीसंघात आमूलाग्र परिवर्तन घडले. भरभराटीला आलेल्या नगरांमधून विशेषतः उत्तर इटली, फ्लँडर्स (बेल्जियम) आणि ऱ्हाईन खोरे यांतील शहरांमधून-विशेषीकरणाची लाट आली. त्यांतून कुशल कामगार व कारागिरी करणाऱ्या लोकांनी व्यापारी संघश्रेणीतून बाहेर पडून स्वतंत्र कारागिरी श्रेण्या स्थापन केल्या. यांत मुख्यत्वे लोकरीचा व्यवसाय करणाऱ्या विणकरांच्या-कोष्ट्यांच्या स्वतंत्र श्रेण्या निर्माण झाल्या. परिणामतः प्रत्येक शहरात व्यापारी श्रेण्यांतून बाहेर पडून त्यांनी कच्ची लोकर, त्यापासून बनविलेले कापड आणि त्यांची खरेदी-विक्री यांवर पूर्ण नियंत्रण प्रस्थापित केले. आपापल्या लोकरधंद्यात या श्रेण्या एवढ्या गुरफटल्या, की त्यांनी श्रेणी प्रशासनासाठी अधिकारी नेमले, स्वतंत्र नियमावली बनविली, कुशल कामगारांना-विशेषतः विणकरांना-कापड साफ करणे, रंगविणे, त्याचे तागे बांधणे वगैरे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली. व्यवस्थापनाच्या सभांसाठी शहरांच्या मध्यभागातील चौकात आणि व्यापारी संकुलात सुरेख सभागृहे बांधली. काही सभागृहे बंदरावरील बोटींच्या धक्क्याजवळ होती. या सभागृहांचे पुरातत्त्वीय अवशेष अद्यापि दृष्टोत्पत्तीस येतात. लोकर आणि लोकरीचे वैविध्यपूर्ण कपडे-कापड आणि व्यापार यांवर या श्रेणींची यूरोपभर त्या काळी मक्तेदारी होती.

तेराव्या शतकात व्यापारी श्रेण्यांनी सदस्य होण्यासाठी काही जाचक अटी लादल्या. त्यानुसार प्रत्येक सभासदाकडे एक विशिष्ट रक्कम वा संपत्ती असावी, किंवा त्याचे वार्षिक उत्पन्न कमीत कमी किती असावे, याचा दंडक ठरविला. त्यातून सदस्यत्व वंशोपभोग्य झाले आणि व्यापारी श्रेणी अभिजनवादी व स्वल्पतंत्रवादी बनली. तिने शहरी शासनावर बऱ्यापैकी वर्चस्व प्रस्थापित केले. या काळात व्यापारी श्रेण्या कारागिरांच्या श्रेणींचा तिरस्कार करू लागल्या व कुशल कारागिरांना तुच्छ लेखू लागल्या. गेंट, ईप्र, बर्जेस, फ्लॉरेन्स, लूक्का, मिलान आणि पॅरिस या शहरांतून श्रीमंत व्यापारी आणि कुशल कामगारवर्ग यांत तणाव निर्माण होऊन या दोन वर्गांत सामाजिक-आर्थिक संघर्ष उद्‌भवला.

मध्ययुगातील अर्थव्यवस्थेत आणि समाजव्यवस्थेत श्रेण्यांची भूमिका महत्त्वाची होती. मोठया व व्यापारात प्रभाव निर्माण केलेल्या श्रेण्या आंतरराष्ट्रीय व्यापार व राजकारण यांत सहभागी होत असत. इतर देशांत वसाहतीही स्थापन करीत. एखादया शहरातील व्यापारी सदस्याने आपले व्यवहार करताना कुचराई केल्यास किंवा कर्जाची परतफेड न केल्यास, संपूर्ण श्रेणीला जबाबदार धरले जाई. परकीय देशात व्यापार करताना कर्जाची परतफेड न केल्यास अशा व्यापाऱ्यांचा माल जप्त करून कर्ज वसूल केले जात असे. असे व्यापारी आपल्या शहरात परतल्यानंतर मूळ थकबाकीदाराकडून रक्कम वसूल करून राज्यकर्त्यांच्या जाचापासून सदस्यांना संरक्षण देण्याचे काम व्यापारी श्रेण्या करीत असत. राज्यकर्ते कधीकधी माल जप्त करून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करीत असत. त्याचा प्रतिकार श्रेण्यांच्या माध्यमातून केला जाई. मुख्यत्वेकरून शासनास व्यापारी करातून उत्पन्न मिळत असल्यामुळे श्रेण्यांच्या सदस्यांना त्रास न देण्याचे सर्वसाधारण धोरण राज्यकर्त्यांकडून अवलंबिले जात असे. व्यापारी श्रेण्या बऱ्यापैकी श्रीमंत असत. समाजात व शासनव्यवस्थेत त्यांना मानाचे स्थान असे.


 या काळात काही अव्यावसायिक श्रेण्यांही अस्तित्वात होत्या. शहराबरोबर ग्रामीण भागातही अशा श्रेण्यांची निर्मिती केली जात असे. शहरी भागांतील श्रेणींच्या धर्तीवरच खेड्यांतील श्रेणींचे काम चालत असे. अशासकीय व धार्मिक स्वरूपाची कामे अशा श्रेण्या करीत असत. त्यांमध्ये सभासदांना परस्पर विमासंरक्षण देणे, गरजेनुसार अर्थपुरवठा करणे, न्यायालयीन बाबींसंबंधी मार्गदर्शन करणे व सदस्यांच्या मुलांना व्यवसाय प्रशिक्षण देण्याबरोबरच लग्नाच्या बाबतीत आर्थिक सहकार्य करणे, या प्रकारच्या कामांचा त्यात अंतर्भाव असे. सदस्याच्या आत्म्याला मृत्यूनंतर शांती मिळावी व हयात असताना त्याच्या हातून कोणतेही पाप घडू नये, यासाठी अशा श्रेण्या प्रयत्नशील असत. श्रेण्यांच्या कार्याचे नियोजन, संघटन, व्यवस्थापन आणि वेळोवेळी अर्थपुरवठा करणे यांची यंत्रणा होती. सामान्यपणे अशा श्रेण्या तीन प्रकारची कामे करत. दैनंदिन स्वरूपाची व धार्मिक कार्यात सहभागी होण्याबाबतची कार्ये प्राथमिक स्वरूपाची असत. श्रेणीचे सदस्य दर रविवारी किंवा सोयीच्या दिवशी चर्चमध्ये जमत. सण-समारंभ साजरे करण्याबरोबरच प्रेषितांचे स्मरण, गुडफ्रायडेला प्रार्थना, मिरवणुका, गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, अशा स्वरूपाचे कार्यकम करीत. सदस्याच्या मृत्यूनंतर अंत्यविधी पार पाडण्याबरोबरच त्याच्या आत्म्याला शांती लाभावी, याविषयीची कार्ये दुसऱ्या प्रकारात मोडत. सदस्याच्या मृत्यूनंतर इतर सदस्य चर्चमध्ये एकत्रितपणे प्रार्थना करण्यास प्राधान्य देत. तिसऱ्या प्रकारच्या कार्यामध्ये श्रेणी सदस्यांचे पावित्र्य जपण्याची व त्यावर देखरेख करण्याची व्यवस्था केली जात असे. ख्रिस्ती धर्मशास्त्रानुसार स्पष्ट असे आदेश दिले जात. सत्य बोलणे व वागणे, इतरांना न फसविणे, शुद्घ चारित्र्य ठेवणे, कुटुंबाशी प्रामाणिक राहणे, वरिष्ठांच्या आज्ञा पाळणे, नम्रतेने वागणे, शेजारधर्म पाळणे, चोरी न करणे, सट्टेबाजी न करणे, भरपूर कष्ट करणे, चर्चला मदत करणे यांबाबतचे आदेश पालन करण्याची सक्ती केली जात असे. आपण ईश्वराचे पुत्र आहोत, या भावनेने प्रार्थना करणे व गरिबांची सेवा करणे या गोष्टींचा आग्रह धरला जात असे.

मोठ्या श्रेण्यांमध्ये अधिकाऱ्यांची एक अधिपतिश्रेणी (हायरार्की) निर्माण केली जाई. सामान्यतः श्रेणींच्या सभासदांची विभागणी प्रमुख वा मालक (मास्टर्स), शिकाऊ उमेदवार (ॲप्रेन्टिस) आणि उमेदवारी संपवून रोजगारीस पात्र झालेले कामगार (जर्निमेन) अशी करण्यात येई. प्रमुख हे दुकानांचे/कर्मशाळांचे किंवा जहाजांचे मालक असून, शिकाऊ उमेदवाराचे प्रशिक्षक-अध्यापक असत. शिकाऊ उमेदवार मालकांना बांधील असत. प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांवर प्रमुख देखरेख ठेवीत असे. उमेदवार प्रमुख वा मालक यांना प्रशिक्षणाकरिता काही रक्कम देत असत. प्रशिक्षित झाल्यानंतर त्यांना उदरनिर्वाहासाठी किंवा उपजीविका करता यावी, म्हणून मजुरी वा पगार अनेक वर्षे दिला जाई. ते पूर्णतः प्रमुखाच्या नियंत्रणाखाली असत तथापि त्यांच्या नियंत्रणाच्या अटी व शर्ती श्रेणी संघटनेच्या नियमावलीनुसार निश्चित केलेल्या असत. उमेदवारी संपवून रोजगारीस पात्र झालेले कामगार हे कामगार म्हणूनच कार्यरत राहत. त्यांना कधीही प्रमुखाचा दर्जा प्राप्त होत नसे. त्यामुळे प्रमुखांची-मालकांची संख्या मर्यादित असे. संपूर्ण यूरोपभर श्रेणींची अंतर्गत रचना, तसेच शासन व श्रेण्यांचे परस्परसंबंध भिन्न स्वरूपाचे असल्याचे दिसते. शासनाची आपल्याला मान्यता असावी व आपल्या नावावर मालमत्ता असावी, तसेच कायदेशीर अस्तित्वही असावे, यांसाठी बहुसंख्य श्रेण्या प्रयत्नशील असत. बऱ्याचशा श्रेण्या स्वयंभू , स्वयंनियंत्रित व सरकारच्या औपचारिक परवानगीशिवाय कार्यरत असत. तमोयुगाच्या दोन शतकानंतर मध्ययुगातील सर्व शहरांत श्रेण्यांचे वर्चस्व प्रस्थापित झालेले होते. चौदाव्या शतकापासून श्रेणींची उपयुक्तता संपुष्टात येऊन मोठया शहरांतून समांतर सामाजिक-आर्थिक व्यवस्था निर्माण झाली. श्रीमंत व्यापाऱ्यांनी स्वतःचे उदयोग सुरू करून आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक उलाढालींत सहभाग घेतला. तसेच कुशल कारागिरांनी गिरण्यांतून पर्यवेक्षक आणि मुकादमाच्या सेवा पतकरल्या. औदयोगिक क्रांतीनंतर एकूण जागतिक आर्थिक उलाढालींना कलाटणी मिळाली आणि परिणामतः श्रेणिसंघ ही संकल्पना हळूहळू अधोगतीला लागली. सोळाव्या शतकात शासकीय धोरणामुळे असंख्य श्रेण्या डबघाईला आल्या. सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये श्रेण्यांचे अधिकार काढून घेण्यात आले. केवळ कॅथलिक धर्मपंथीय राज्यांत श्रेण्या काही प्रमाणात अस्तित्वात होत्या. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी (१७९१) सर्व श्रेण्यांचे उच्चाटन केले गेले. नेपोलियनच्या अंमलाखालील (१७९८-१८१४) प्रदेशांत पुढे श्रेण्यांवर बंदी घालण्यात आली.

सुमारे दोन-अडीचशे वर्षे व्यापारी व कारागिरांच्या श्रेण्यांनी नागरी (शहरी) लोकसमूहांच्या आर्थिक, सामाजिक व राजकीय हितसंबंधांसाठी सेवा दिली. व्यापारी श्रेणिसंघांनी आपल्या अखत्यारीखालील शहरांना कार्यक्षम प्रशासन-व्यवस्थापन दिले. तसेच सार्वजनिक वास्तुनिर्मितीस विशेषतः तटबंदी, विदयालयांच्या इमारती, चर्च, रस्ते यांना उदारपणे आर्थिक साहाय्य केले. कारागिरांच्या श्रेण्यांनीही दानधर्मार्थ देणग्या दिल्या. अनेक गॉथिक कॅथीड्रलच्या चित्रकाच गवाक्षांचे काम कारागिरी श्रेण्यांच्या देणग्यांमधून झाले होते. मध्ययुगीन श्रेणीसंघाच्या कार्यपद्धतीतूनच आधुनिक आर्थिक संघटना, व्यापार आणि उदयोगधंदे यांना चालना मिळाली आणि पश्चिमी भांडवलदार (बूर्झ्वा) संस्कृतीचा उगम झाला.


 प्राचीन भारतात मध्ययुगीन यूरोपीय सदृश श्रेणिसंघ किंवा श्रेणी ही संकल्पना अस्तित्वात असल्याचे उल्लेख प्राचीन भारतीय वाङ्‌मयात व काही कोरीव लेखांत आढळतात मात्र त्यांचे स्वरूप आणि कार्यपद्धती यूरोपीय श्रेणींहून भिन्न होती आणि राज्यशासनात त्यांचा सहभाग नव्हता. श्रेणी या शब्दाचा वाच्यार्थ व्यापारी संघ किंवा निरनिराळ्या कारागिरांचा समूह असा आहे. प्राचीन काळी व्यापार मुख्यतः श्रेणींद्वारा होत असे. कौटिलीय अर्थशास्त्रात (इ. स. पू. चौथे शतक) श्रेणीबल आणि पण्याध्यक्ष अशा दोन संज्ञा या संदर्भात आढळतात. कौटिल्याने मित्रबलापेक्षा श्रेणीबल अधिक उपयुक्त व विश्वसनीय असल्याचे म्हटले आहे. श्रेणींना अनेक देशांशी व स्थलांशी व्यापार करावा लागत असल्यामुळे सुरक्षिततेकरिता त्यांना स्वतःचे रक्षक ठेवावे लागत कारण त्यांना अरण्यादिकांतून आपला माल न्यावा लागे. या श्रेणीबलाचा उपयोग राजे लोक जरूरीच्या वेळी राज्याच्या संरक्षणार्थ करीत असत. पण्याध्यक्ष हा व्यापारावरील मुख्य अधिकारी होय. मेधातिथी (इ. स. नववे शतक) या मनुस्मृती वरील भाष्यकाराने श्रेणीची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे : ‘ एकजातीय कर्मांवर उपजीविका करणाऱ्या नाना जातींचा संघ म्हणजे श्रेणी होय’. कैय्यट भट्ट (इ. स. दहावे शतक) या वैयाकरणाने महाभाष्या वरील प्रदीप नावाच्या टीकेत श्रेणी या संघटनेची व्याख्या ‘ एकाच कलाप्रकारावर वा एकाच व्यापारावर जीवन चालविणाऱ्या व्यक्तींचा संघ ’ अशी केली आहे (२.१.५९). बौद्ध जातककथांत अठरा प्रकारच्या श्रेणींची नामावली आढळते. त्यात जातिनिहाय विविध उदयोगधंदे करणाऱ्या सुतार, सोनार, लोहार, चर्मकार, कुंभार, दंतकार, रंगारी, जव्हेरी, नापित, मालाकार, तेली, चित्रकार, कासार, गवळी, बुरूड, सुगंधी यांचा उल्लेख आहे.

प्राचीन कोरीव लेखांतून-विशेषतः कलचुरी, सातवाहन वंशांच्या लेखांतून-श्रेणींचा उल्लेख आणि तत्संबंधीची माहिती मिळते. सातवाहनांच्या कोरीव लेखांत धानिक (धान्याचे व्यापारी), गान्धिक (सुगंधी पदार्थांचे व्यापारी), मालाकार, सुवर्णकार, सेलवढकी (पाथरवट), ओदयंत्रिक (जलयंत्र चालविणारे), तिलपिषक, कुलरिक (कुंभार), कोलिक (वस्त्रे विणणारे), वंसकार (बुरूड) इ. श्रेणींचा उल्लेख आढळतो. एका गावात एका धंद्याची एकच श्रेणी असे, असे नाही. उदा., ऋषभदत्ताच्या नासिक लेण्यातील लेखात गोवर्धन (विद्यमान गोवर्धनपूर- नासिक जिल्हा) येथे विणकऱ्यांच्या दोन श्रेण्या होत्या आणि बहुधा त्यांच्या स्थिरतेनुरूप त्यांच्याकडे ठेवलेल्या अक्षयजीवीवरील (ग्रामांवरील) व्याजाचे दर निरनिराळे होते. या श्रेणी केवळ आपल्या मालाची निर्मिती व व्यापार यांचेच काम पाहात नसत, तर त्या पेढींचेही काम करीत. त्या रोख ठेवीवर मासिक किंवा वार्षिक व्याज देत. लोकांचा त्यांच्या स्थिरतेवर व प्रांजलपणावर विश्वास असे. ऋषभदत्त हा वस्तुतः शासक होता पण त्यानेही नासिकच्या भिक्षुसंघाला द्यावयाच्या आपल्या ठेवी शासकीय खजिन्यात (सरकारी पेढ्यांत) न ठेवता गोवर्धन येथील दोन श्रेणींत ठेवल्या होत्या. गामांच्या देणग्या प्रथम निगमसभेत (प्रतिनिधींची गामपंचायत) उद्‌घोषित करून नंतर त्यांची शासनाच्या स्थानिक कार्यालयात नोंदणी होत असे. भिक्षूंची राहण्याची व चीवरांची (वस्त्रप्रावरणे) व्यवस्था उदार दाते जवळच्या श्रेणींमध्ये ठेवी कायम ठेवून त्यावरील व्याजातून करीत असत. यावरून या श्रेणींवर तत्कालीन दात्यांचा विश्वास प्रकट होतो. उत्तर भारतात वैशाली येथील उत्खननात अनेक श्रेणींच्या मुद्रा सापडल्या. त्यावरून त्यांच्याविषयी बहुविध माहिती ज्ञात होते.

प्राचीन काळी व्यापारीमार्गांवर बराच प्रवास जंगल व डोंगरदऱ्यांतून करावा लागत असे आणि त्या मार्गांवर पुरेशी सुरक्षितता नसे. अशा प्रवासात दरोडेखोर-चोरटे यांनी माल लुटू नये, म्हणून व्यापाऱ्यांच्या जथ्याबरोबर सशस्त्र संरक्षक दल पाठविले जाई. प्रत्येक व्यापाऱ्याला स्वतःचे संरक्षक दल स्वतंत्रपणे बाळगणे शक्य नव्हते. त्यामुळे अनेक व्यापारी एकत्र येऊन एक संघ वा पेढी स्थापून सर्वांचा माल एका संरक्षक दलासह पाठवू लागले. या एकत्रित व्यापारातून फायदा होतो, हे लक्षात घेऊन श्रेणी स्थापन करण्याची संकल्पना रूढ झाली असावी, असे तज्ज्ञांचे मत आहे. तत्संबंधीचे नियम व स्वरूप यांची माहिती अर्थशास्त्र, नारद, बृहस्पती, याज्ञवल्क्य आदी स्मृतिगंथांतून मिळते. तसेच धर्मशास्त्रा त श्रेणीधर्माचा उल्लेख असून श्रेणींना व्यवहारातील महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला होता. तत्कालीन राजे या नियमांना-अधिकारांना योग्य तो मान देत असत.

मनुस्मृत्या दी धर्मगंथांनुसार श्रेण्यांनी आपल्या सदस्यांतील भांडणतंटे मिटविण्याचे व त्यासंदर्भात योग्य तो न्यायनिवाडा करण्याचे अधिकार अशा व्यापारी संघांना (श्रेण्यांना) असावेत, असे सुचविले असून त्याला राजाची मान्यता मिळत असे. शिवाय धर्मविद राजाने जातिधर्म, जानपदधर्म, कुलधर्म व श्रेणिधर्म (रीतिरिवाज) पारखून त्यांना अनुकूल असे राजकीय विधिनियम तयार करावेत असे मनुस्मृती त (८.४१) म्हटले आहे. काही राजे अशा श्रेण्यांमध्ये धर्मार्थनिधी जमा करीत व त्याच्या व्याजातून विविध प्रकारची धर्मकृत्ये चालवीत असत. यामुळे सर्वत्र श्रेण्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली होती.श्रेणी ही संकल्पना मध्ययुगापर्यंत तग धरून होती. पुढे तिच्या अंतर्गत कार्यपद्धतीत व नियंत्रणात जातिधर्माप्रमाणे फेरबदल झाले आणि श्रीमंत व्यापारी श्रेणींचे व्यवहार त्या त्या नगरापुरतेच मर्यादित न राहता, अन्य प्रदेशांतून विखुरले तसेच जातिधर्मानुसार व्यवसायांची विभागणी झाली. त्यामुळे श्रेणींचे महत्त्व कमी झाले. मात्र प्राचीन काळी या श्रेणींमुळेच भारतात व्यापारवृद्धी झाली, असे तज्ज्ञांचे मत आहे.

संदर्भ : 1. DeMan, Hendrik, The Cloth Crafts in Medieval Ghent, London, 1990.

            2. Gross, C. The Guild Merchant, 2 Vols., London, 1965.

            3. Hobson, S. G. National Guilds and the State, New York, 1985.

            4. Kane, P. V. History of Dharmasastra, 5 Vols., Poona, 1968–74.

            5. Mackemny, Richard, Tradesman and Traders : The World of Guilds in Venice and Europe, New York, 1987.

            6. Postan, M. M. Ed. The Cambridge Economic History of Europe, Cambridge, 1952–63.

            ७. मिराशी, वा. वि. सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख, मुंबई, १९७९.

चौधरी, जयवंत देशपांडे, सु. र.