व्हेर्‍नॉन लोमॅक्स स्मिथ

स्मिथ, व्हेर्‍नॉन लोमॅक्स : ( १ जानेवारी १९२७). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी (२००२). त्याला डॅनिएल काहनेमनसोबत हा पुरस्कार लाभला. स्मिथचा जन्म कॅनझस प्रांतातील ( अ. सं. सं. ) विचिटॉ येथे झाला. जन्मगावीच आपले शालेय शिक्षण घेऊन त्याने कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून विद्युत् अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली (१९४९). त्यानंतर त्याने कॅनझस विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयाची एम्. ए. (१९५२) व हार्व्हर्ड विद्यापीठातून पीएच्. डी. (१९५५) या पदव्या मिळविल्या. तत्पूर्वी त्याची कॅनझस विद्यापीठात असताना जॉइस हार्कलेरोड या युवतीशी ओळख झाली व त्याची परिणती त्यांच्या विवाहात झाली (१९५०). त्यांना डेबोरा व एरिक ही जुळी मुले आणि टोरी नावाची कन्या आहे. सुरुवातीला त्याने परड्यू विद्यापीठाच्या क्रानेट स्कूल ऑफ मॅनिजमेन्टमध्ये प्राध्यापक म्हणून जवळपास बारा वर्षे (१९५५—६७) अर्थशास्त्राचे अध्यापन केले. दरम्यान स्टॅनफर्ड विद्या-पीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही त्याने अध्यापन केले (१९६१–६२). येथे अर्थशास्त्राची मूलतत्त्वे ’ या विषयाचे अध्यापन करीत असताना त्याने सूक्ष्म अर्थशास्त्रातील विविध संकल्पना प्रात्यक्षिकांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविल्या. त्याने बाजारपेठांना प्रत्यक्ष भेटी देऊन मागणी व पुरवठा यांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न कसा होतो, याबाबतची निरीक्षणे नोंदण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले. अर्थशास्त्रातील वास्तव परिस्थितीचे योग्य प्रशिक्षण मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना त्याचा बराच उपयोग झाला. ब्राउन विद्यापीठ (१९६७–६८), मॅसॅचूसेट्स विद्यापीठ (१९६८—७२) व कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (१९७३—७५) यांतून प्राध्यापक म्हणून तो कार्यरत होता. सदर इन्स्टिट्यूटमध्ये चार्ल्स प्लॉट याच्या प्रोत्साहनाने प्रायोगिक अर्थशास्त्राच्या पद्धतींना औपचारिक स्वरूप देण्याच्या स्मिथच्या कार्याला चालना मिळाली. ‘इक्स्पेरिमेन्टल इकॉनॉमिक्स : इंड्यूश्ड व्हॅल्यू थिअरी’ हा त्याचा प्रायोगिक अर्थशास्त्राच्या विचारांचा मांडणी करणारा पहिला लेख अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्यूमध्ये प्रकाशित झाला (१९७६). याच वर्षी तो ॲरिझोना विद्यापीठात अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून रुजू झाला. या काळात त्याचे संशोधन व अध्यापन मुख्यत्वे भांडवल आणि गुंतवणूक व सुसंगत अशा मूल्याधारित समस्यांवर केंद्रित होते. सहा वर्षांनी तोच विचार त्याने आपल्या ‘ मायक्रो इकॉनॉमिक सिस्टिम ॲज ॲन इक्स्पेरिमेन्टल सायन्स ’ या लेखात विस्तारित स्वरूपात मांडला. त्याने मूल्यांकन प्रवृत्तीचा सिद्धांत विकसित केला.

लिओनीड हुर्विक्झ याच्या प्रायोगिक अर्थशास्त्र विकसित करण्यासंबंधीच्या पद्धतींशी स्मिथच्या संशोधनकार्याचे साधर्म्य दिसते. सूक्ष्म अर्थशास्त्रातील पद्धतींत आर्थिक पर्यावरण, आर्थिक वा वित्तीय संस्था व आर्थिक फलनिष्पत्ती या तीन बाबींचा अंतर्भाव होता. त्यांपैकी स्मिथने विकसित केलेल्या प्रायोगिक अर्थशास्त्रीय पद्धतींचा उपयोग अर्थव्यवस्थेतील संघटनांचे ( संस्थांचे ) मूल्यमापन करण्यासाठी केला जातो. स्मिथचे या क्षेत्रातील दुसरे योगदान म्हणजे विकसित केलेले मर्यादित असे अर्थशास्त्रीय प्रयोग, की ज्यांद्वारे बाजारपेठांचे विश्लेषण प्रयोगशाळेत केले जाऊ शकते. विशिष्ट वस्तू बनविण्यासाठी खर्च येतो व ती जेव्हा ठराविक किमतीत विकली जाते, तेव्हा विक्रेत्याला विक्रीची किंमत व खर्च यांतील फरक नफ्याच्या स्वरूपात मिळतो. वस्तूला उपभोग्यमूल्य असल्याने तिच्यापासून मिळणारी उपयोगिता व किंमत यांतील फरकाचा ग्राहकांना लाभ होतो. स्मिथने सहकार्‍यांच्या मदतीने साधनसामग्रीच्या विनियोगासंदर्भातील पर्यायी व्यापारी तंत्रांच्या कामगिरींचे मूल्यमापन केले. ज्या संशोधनासाठी त्याला नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले, त्यापैकी बहुतांशी संशोधन त्याने १९७६—२००२ यांदरम्यान ॲरिझोना विद्यापीठात केले. नंतर तो कॅलिफोर्नियातील चॅपमन विद्यापीठात गेला व तेथे त्याने इकॉनॉमिक सायन्स इन्स्टिट्यूटची स्थापना केली (२००८). सँता ॲना ( कॅलिफोर्निया ) येथे चॅपमन विद्यापीठाच्या सहकार्याने सुरू केलेल्या निकोलस अकॅडेमी सेंटरमध्ये त्याने अभ्यागत प्राध्यापक म्हणून अनेक व्याख्याने दिली. परिसरातील उपेक्षित कुटुंबांतील शालेय विद्यार्थ्यांना बाजारपेठांची कार्यप्रणाली समजावी, त्यांच्या वर्तनात योग्य असा बदल व्हावा, यांसाठी त्याने आपली तीन वर्षे खर्च केली. त्याला नोबेलव्यतिरिक्त ॲडम स्मिथ अवॉर्ड (१९९५), अल्युम्नी अवॉर्ड (१९९६) इ. सन्मान लाभले.

स्मिथने स्वतंत्र तसेच इतरांच्या सहकार्याने विपुल लेखन केले. त्याच्या ग्रंथांपैकी इकॉनॉमिक्स : ॲन ॲनॅलिटिकल ॲप्रोच (सहलेखक — १९५८), इन्व्हेस्टमेन्ट अँड प्रॉडक्शन (१९६१), इकॉनॉमिक्स ऑफ नॅचरल अँड इन्व्हाय्र्न्मन्ट रिसोअर्सिस (१९७७), पेपर्स इन इक्स्पेरिमेन्टल इकॉनॉमिक्स (१९९१), एसेज इन इक्स्पेरिमेन्टल इकॉनॉमिक्स (२०००) इ. मान्यवर व संशोधनात्मक ग्रंथ होत. यांशिवाय त्याचे दोनशेच्यावर लिहिलेले संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. तसेच कॅपिटल थिअरी फायनान्स, नॅचरल रिसोअर्स इकॉनॉमिक रिव्ह्यू , जर्नल ऑफ फायनान्स, द कॅटो जर्नल या नियतकालिकांचा तो संपादक आहे. ऑस्ट्रेलियन अर्थशास्त्राचा विकास व्हावा, यासाठी स्मिथच्या नावाने ‘ व्हेर्नॉन स्मिथ प्राइझ ’ हा पुरस्कार संशोधकांना दरवर्षी दिला जातो.

चौधरी, जयवंत