काळे, वामन गोविंद : (१० एप्रिल १८७६—२७ जानेवारी १९४६). सुविख्यात भारतीय अर्थशास्त्रज्ञ व अनेक व्यापारी संस्थांचे प्रवर्तक. सांगली येथे जन्म. प्राथमिक शिक्षण सांगलीस माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण पुण्यास न्यू इंग्लिश स्कूल व फर्ग्युसन महाविद्यालयात. १९०५ मध्ये एम्‌. ए. झाल्यावर ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सभासद झाले (१९०७). सेवानिवृत्त होईपर्यंत सु. वीस वर्षे ते अर्थशास्त्र व इतिहास या विषयांचे फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक होते. ‘कौन्सिल ऑफ स्टेट’ चे सभासद (१९२१—२३), हिंदुस्थान सरकारच्या ‘जकात मंडळा’चे सभासद (१९२३—२५) म्हणून त्यांनी काम केले. काळे ह्यांनी १९३५ मध्ये अर्थ हे अर्थशास्त्रविषयासंबंधीचे मराठी साप्ताहिक सुरू केले. महाराष्ट्रीयांच्या आर्थिक गरजा भागविता याव्यात, म्हणून ‘बॅंक ऑफ महाराष्ट्र’ ची स्थापना करण्यात त्यांनी पुढाकार झेतला आणि त्या बॅंकेचे संस्थापक, अध्यक्ष व संचालक म्हणून अखेरपर्यंत काम पाहिले. ग्वाल्हेर संस्थानाचे आर्थिक सल्लागार, बनारस हिंदु विश्वविद्यालयाचे सन्माननीय प्राध्यापक, अनेक सार्वजनिक संस्था व समित्या ह्यांचे अध्यक्ष व सभासद म्हणूनही काळे ह्यांनी महाराष्ट्राची व भारताची मोठी सेवा केली.

वामन गोविंद काळे

न्यायमूर्ती रानड्यांच्या व नामदार गोखल्यांच्या शिष्यत्वाचा मान काळे ह्यांना मिळाला. त्यामुळे त्यांच्या विचारांचा पिंड उदार व अभ्यासू बनला. अध्ययन, अध्यापन व लेखन ह्या त्रयीच्या साहाय्याने त्यांनी आपल्या गुरूंची परंपरा अत्यंत उज्ज्वल रीतीने चालविली. राजकारणात ते प्रागतिक पक्षाच्या मताचे होते. अर्थशास्त्रावर त्यांनी सोळा ग्रंथ लिहिले. ॲन इंट्रॉडक्शन टू द स्टडी ऑफ इंडियन इकॉनॉमिक्स (१९१७) हा ग्रंथ लिहून भारतीय अर्थशास्त्रविषयक वाड्‌मयाचा त्यांनी पाया घातला. ह्या ग्रंथाच्या सात आवृत्त्या निघाल्या. गोखले अँड इकॉनॉमिक रिफॉर्म्स (१९१६), इंडियाज वॉर फायनान्स अँड पोस्टवॉर प्रॉब्लेम (१९१९), करन्सी रिफॉर्म्स इन ‌इंडिया (१९१९), व डॉन ऑफ मॉडर्न फायनान्स इन इंडिया (१९२२), इकॉनॉमिक्स ऑफ प्रोटेक्शन इन इंडिया (१९२९), प्रॉब्लेम्स ऑफ वर्ल्ड इकॉनॉमी (१९३१) हे त्यांचे इंग्रजी ग्रंथ आणि अर्थशास्त्र, भारतीय अर्थशास्त्र, बॅंका आणि त्यांचे व्यवहार इ. मराठी ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

‘इंडियन इकॉनॉमिक असोसिएशन’चे ते प्रथमपासूनच एक मोठे कार्यकर्ते होते. या संस्थेच्या इंडियन जर्नल ऑफ इकॉनॉमिक्स ह्या नियतकालिकाचे ते अनेक वर्षे संपादक होते. ‘इंडियन इकॉनॉमिक कॉन्फरन्स’ च्या म्हैसूर येथे भरलेल्या बाराव्या अधिवेशनाचे (१९१९) अध्यक्षपद त्यांनी भूषविले.

काळे हे प्रखर राष्ट्रवादी अर्थशास्त्रज्ञ होते. भारतीय अर्थशास्त्राच्या निर्मितीमध्ये काळे ह्यांचा मोठा वाटा असून त्यांचे कार्य आद्य अर्थशास्त्रज्ञाचेच समजले जाते. चलन, सरकारी अर्थकारण, व्यापार आणि जकात ह्या विषयांत त्यांची मोठी गती होती. वयाच्या सत्तराव्या वर्षी ते मरण पावले.

संदर्भ : 1. Indian Journal of Economics, V. G. Kale Memorial Number, Bombay, January , 1949.

2. Madan, G. R. Economic Thinking in India, New Delhi, 1966.

गद्रे, वि. रा.