व्यापारी तांडा : (ट्रेड कॅरव्हान). अतिप्राचीन काळापासून आफ्रिका व आशिया खंडांतील प्रवासी आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तांड्यांचे संयोजन करीत. फार्सीतील कारवॉं (प्रवाशांचा समुदाय किंवा गट) या शब्दाचा ‘तांडा’हा मराठीतील रूढ पर्याय आहे. अगदी पाच-सहा लोकांपासून ते हजारो लोकांचा समावेश असलेले भिन्न आकाराचे तांडे बांधले जात आणि पाळीव प्राण्यांच्या पाठीवरून प्रवाशांची सामानासहित वाहतूक एका प्रदेशातून दुसर्या् प्रदेशात करणे, हे अशा तांड्यांचे वैशिष्ट्य असे. वाळवंटी प्रदेशातील प्रवासी तांडे उंटांचा वापर मोठ्या प्रमाणावर करीत. याउलट डोंगराळ भागांत व घनदाट जंगलांतून घोड्यांचा व गाढवांचा उपयोग करीत. मुळात नदीकाठी शेती करणे किंवा घनदाट जंगलात शिकार करणे, या प्रमुख उद्देशाने जरी तांडे निर्माण झाले तरी प्रामुख्याने व्यापारी कारणांसाठीच त्यांचे संघटन करण्यात आले. सागरी वाहतुकीचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होईपर्यंत दूरवरच्या प्रदेशांमध्ये वास्तव्य करणार्या  लोकांमध्ये वस्तूंची देवाणघेवाण करण्याचे व्यापारी तांडे हे महत्त्वाचे साधन होते. विशेषत: इस्लाम धर्माच्या प्रसारामुळे मक्का या पवित्र स्थळाला भेट देणाऱ्या यात्रेकरूंची संख्या वाढत गेली. अशा यात्रेकरूंचे तांडे नित्यनेमाने यात्रा करीत.

प्रवाशांच्या तांड्यांना इच्छित स्थळी पोचण्यास अनेक महिने किंवा वर्षेही लागत आणि त्यासाठी खूपच खर्च येई. तांड्यातील लोकांच्या व सोबतच्या जनावरांच्या उदरनिर्वाहाची काळजी घेण्याबरोबरच नैसर्गिक संकटे, चोर, लुटारू यांपासून त्यांचे संरक्षण करणे, अत्यंत जिकिरीचे व खर्चाचे ठरे. म्हणूनच मग व्यापाराच्या उद्देशाने किमती कापड, नक्षीकाम केलेली मातीची भांडी, काचेची भांडी, माठ, हस्तिदंत, चामडे व इतर दुर्मिळ धातू इत्यादींचा तांड्यात प्रवेश झाला आणि पाळीव प्राण्यांच्या साहाय्याने त्यांची वाहतूक होऊ लागली.

अगदी सुरुवातीला व्यापारी तांड्यांचा विकास पूर्वेकडील देशांमध्ये झाला आणि नंतर प्राचीन इराण ते इजिप्त यांदरम्यान वसलेली महत्त्वाची नगरेही व्यापारी कारणांसाठी जोडली गेली. पुढे हे व्यापारी तांडे विविध मार्गांनी मध्य आशिया, भारत व चीन या देशांपर्यंत पोचले. मध्य आशियातून जाणार्या  ‘द ग्रेट सिल्क रूट’ (रेशीम मार्ग) या व्यापारी तांड्याच्या मार्गामुळेच चिनी संस्कृतीची ओळख पाश्चिमात्य देशांना झाली. पहिल्या शतकादरम्यान दक्षिण-पश्चिम आशियातून दक्षिण आफ्रिकेकडे उंटांचे झालेले स्थलांतर हे आफ्रिकेचा समुद्रसपाटीपासूनचा प्रदेश, सूदानचा जंगली भूभाग व सहाराचा दक्षिण विभाग या प्रदेशांदरम्यान दळणवळण सुरू होण्यास कारणीभूत ठरले. आफ्रिकेमधील तिंबक्तू, गाव, तकेद्दा व वालाटा यांसारखी अनेक नगरे पुढे महत्त्वाची बंदरे म्हणून नावारूपाला येण्यास व्यापारी तांड्यांची विशेषत्वाने मदत झाली. प्राचीन व मध्ययुगीन बलाढ्य साम्राज्यांच्या कालखंडांत व्यापारी तांड्यांचे मार्ग नियंत्रित व सुरक्षित करण्यात आले. त्यामुळे व्यापारवृद्धी झालीच शिवाय सैनिकी संघर्षाच्या काळात या मार्गांचा लष्करी दृष्टीने उपयोग झाला. व्यापारी तांड्यांच्या मार्गावर खानावळी उघडण्यात आल्या आणो प्रवाशांच्या, तसेच व्यापार्यांलच्या राहण्या-जेवण्याची स्थायी व्यवस्थाही करण्यात येऊ लागली.  

या व्यापारी तांड्यांचा आढळ प्राचीन भारतातही होता. हे तांडे अंतर्गत व विदेशी या दोन्ही व्यापारांत सहभागी होत. एक मोठा व्यापारी पुढाकार घेत असे आणि इतर लहान व्यापारी त्याच्या आश्रयाने तांड्यात सहभागी होत. या मुख्य व्यापार्यानला ‘सार्थवाह’ अशी संज्ञा असे.

आधुनिक मालवाहू आगगाडीचे प्राचीन काळातील प्राकृतिक आद्य रूप व्यापारी तांड्यांमधील मालवाहू जनावरांच्या रांगांतून जाणवते.

पहा : व्यापारी मार्ग.

संदर्भ : मोतीचंद्र अनु. पारधी, मा. कृ., सार्थवाह (प्राचीन भारताची दळणवळण पद्धती), दिल्ली, १९७४.

चौधरी, जयवंत