भूधारणक्षेत्र : एक शेतकरी जेवढी शेतजमीन धारण करतो, तिला ‘भूधारणक्षेत्र’ म्हणतात. शेतजमिनीचा प्रत्येक मालक स्वतः जमीन कसत असेलच असे नाही. त्यामुळे ‘मालकीचे भूधारणक्षेत्र’ व ‘कसणुकीचे भूधारणक्षेत्र’ यांत फरक पडतो. मालकीच्या दृष्टीने भूधारणक्षेत्राची पाहणी वा गणना करावयाची असल्यास एका शेतकऱ्याच्या (कायदेशीर भाषेत ‘खातेदाराच्या’) मालकीची एका देशात जेवढी जमीन असेल, ती सर्व मिळून त्याचे भूधारणक्षेत्र मानावे लागेल. पाहणीच्या सोयीसाठी भारत सरकारने एका खातेदाराची एका जिल्ह्यात, पण वेगवेगळ्या गावांत मिळून जेवढी जमीन असेल, ती सर्व जमीन म्हणजे त्याचे भूधारणक्षेत्र होय असे ठरविले आहे. खातेदार स्वतःच्या मालकीच्या सर्व जमिनी स्वतः कसत असेलच असे नाही. तो जितकी जमीन कसत असेल, ते त्याचे कसणुकीचे भूधारणक्षेत्र झाले. एखाद्या भूमिहीन शेतमजूर दुसऱ्याची जमीन बटाईने कसत असेल, तर त्याच्या मालकीचे भूधारणक्षेत्र काही नाही, पण कसणुकीच्या दृष्टीने मात्र जेवढी जमीन तो कसतो, तेवढे त्याचे कसणुकीचे भूधारणक्षेत्र होय.

भूधारणक्षेत्राचा आकार किती असावा, याविषयी विविध तज्ञांनी आणि राजकीय विचारसरणीच्या पुरस्कर्त्यांनी वेगवेगळ्या कल्पना मांडलेल्या आहेत. शेतीवर अवलंबून असलेल्या प्रत्येक कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला पुरेसे उत्पन्न मिळू शकेल, इतकी जमीन त्या कुटुंबाला मिळावी असे एक मत आहे. याला ‘उदरनिर्वाही भूधारणक्षेत्र’ (सबसिस्टन्स होल्डिंग) म्हटले जाते. सदर निर्वाहात सध्याच्या जीवनमानाचीच कल्पना पायाभूत मानली आहे. जेमतेम जिवंत राहता आले म्हणजे उदरनिर्वाह झाला, असे यात अभिप्रेत आहे. दुसरी कल्पना ‘किफायतशीर भूधाऱणक्षेत्रा’ची (इकॉनॉमिक होल्डिंग) होय. शेतीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आजच्यापेक्षा अधिक चांगल्या रीतीने होऊ शकेल, इतके उत्पन्न मिळावे व शक्यतो कुटुंबातील सर्व प्रौढांना त्या शेतीत रोजगारही मिळावा, अशी अपेक्षा या कल्पनेने ध्वनित केली जाते.

कौटुंबिक भूधारणक्षेत्र : यात कुटुंबातील सर्व प्रौढांना रोजगार मिळण्याइतकी व सुधारलेल्या शेतीतंत्राचा अवलंब करण्याला अवसर मिळू शकेल, इतकी जमीन कुटुंबाच्या मालकीची असावी, अशी अपेक्षा आहे. ‘समुचित भूधारणक्षेत्र’त (ऑप्टिमम होल्डिंग) मुख्य भर शेतीतंत्रावर दिला जातो. आधुनिक शेतीतंत्राचा अवलंब करून दर हेक्टरी जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी जेवढे क्षेत्रफळ आवश्यक आहे, तेवढे एकाच्या मालकीचे असावे किंवा निदानपक्षी तेवढे एकाला कसणुकीसाठी मिळावे, अशी त्यात कल्पना आहे.

भूधारणक्षेत्राचा आकार हा मालकी हक्क, वारसा हक्काचा कायदा, कुटुंबाची आर्थिक स्थिती, कुटुंबातील प्रौढांना बिगरशेती व्यवसायांत रोजगार मिळण्याची शक्यता वगैरे बाबींवर अवलंबून असतो. अर्थव्यवस्थेचा विकास साधणे व तीत परिवर्तन घडवून आणणे या हेतूंनी भूधारणक्षेत्राच्या आकारात बदल केला जावा असे सुचविले जाते. त्यातही केवळ दर हेक्टरी उत्पादनवाढीचा किंवा शेतीवर अवलंबून असलेल्या प्रत्येक कुटुंबाला स्वतःच्या मालकीची शेतजमीन मिळवून देण्याचाउद्देश असू शकतो. शक्यतो या दोन उद्देशांचा समतोल साधून भूधारणक्षेत्राचे फेरवाटप करावे, असा आग्रह धरणारांचा मोठा वर्ग आहे.

काही प्रमुख देशांतील आणि भारतातील व महाराष्ट्रातील भूधारणक्षेत्राची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे : (१ हेक्टर = २.४७ एकर). 

 तक्ता क्र.१. अमेरिका (१९५०)

आकार (हेक्टरांत)  एकूण भूधारणक्षेत्रांपैकी  एकूण जमिनीपैकी 
शेकडा  शेकडा
४ हेक्टरांपेक्षा कमी  ९.९  ०.२
४ ते १२  १५.९  १.३
१२ ते २० ११.६ २.१
२० ते ४० १९.४ ६.५
४० ते २०२ ३८.४ ३६.४
२०२ ते ४०४ ३.४ १०.९
४०४ हे. पेक्षा अधिक २.३ ४२.६

 

तक्ता क्र.२ जपान (१९५०)

आकार (हेक्टरांत)  एकूण भूधारणक्षेत्रांपैकी शेकडा  एकूण जमिनीपैकी 
शेकडा 
०.३ हेक्टरपेक्षा कमी  ३.८  ६.० 
०.३ ते ०.५  १७.०  ८.७ 
०.५ ते१.०८ ३१.९ २७.६
१ ते २ २१.७ ३४.६
२ ते ५ ४. ७ १५.२
५ ते १० ०.६ १५.२
१० हेक्टरांपेक्षा अधिक ०.२ २.६

 


तक्ता क्र. ३. ऑस्ट्रेलिया (१९४७ -४८)

आकार (हेक्टरांत) 

एकूणभूधारणक्षेत्रांपैकीशेकडा 

एकूणजमिनी-पैकी 

शेकडा 

०.४ ते ७.६ 

११.८ 

०.०३९ 

८ ते १९.८ 

८.९ 

०.१ 

२० ते ४०

९.०

०.२

४०.४ ते १२१

२२.०

१.०

१२१.४ ते २०१.९

१०.४

१.०

२०२.३ ते ४०४.२

१३.६

२.६

४०४.६ ते ३,६४२

२१.०

१४.६

३,६४२.५७ ते ३६,४२५

२.८

२१.९

३६,४२५.७ पेक्षा अधिक

०.५

५८.६

तक्ता क्र. ४. भारत (१९५०-५१)

आकार (हेक्टरांत) 

एकूण भूधारण- क्षेत्रांपैकी शेकडा 

एकूण जमिनी पैकी शेकडा 

०.४०४ 

१६.८ 

१.० 

०.४०४ ते १.०११ 

२१.३ 

४.६ 

१.०१२ ते २.०२३

२१.०

९.९

२.२४ ते ४.०४६

१९.१

१७.६

४.०४७ ते १०.११७

१६.२

३२.५

१०.११८ ते २०.२३४

४.२

१९.०

२०.२३४पेक्षा अधिक

१.४

१५.४


 तक्ता क्र. ५. महाराष्ट्र (१९५०-५१)

आकार (हेक्टरांत) 

एकूण भूधारण क्षेत्रांपैकी शेकडा – 

एकूण जमिनी-पैकी शेकडा 

०.० ते २.०२३ 

४४.०० 

७.५० 

२.४२८ ते ६.०७० 

३१.६० 

३५.०० 

६.४७५ ते २४.२८१

२२.७०

४२.७०

२४.६८५ पेक्षा अधिक

१.७०

१४.८०

तक्ता क्र. ६. भारत (१९७० -७१)

आकार (हेक्टरांत) 

एकूण भूधार क्षेत्रापैकी संख्या 

(१,०००) 

टक्केवारी 

एकूण शेत- 

जमिनीपैकी 

क्षेत्रफळ(००० हे.) 

टक्केवारी 

१ हेक्टरापेक्षा कमी 

३५,६८२ 

५०.६ 

१४.५४५ 

९.० 

१.० ते २.०

१३,४३२

१९.०

१९,२८२

२२. ९

२. ० ते ४.०

१०,६८१

१५.२

२९,९९९

१८.५

४.० ते १०.०

७,९३२

११.३

४८,२३४

२०.७

१० हेक्टरांपेक्षाअधिक

२,७६६

३.९

५०,०६४

३०.९

एकूण

७०,४९३

१००.०

१,६२,१२४

१००.०

 भारतातील कसणुकीच्या दृष्टीने भूधारणक्षेत्राचे सरासरी आकारमान फार छोटे आहे. पुढील तक्त्यावरून ही गोष्ट होईल 

तक्ता क्र. ७. निवडक देशांतील भूधारणक्षेत्राचे सरासरी क्षेत्रफळ

देश

वर्ष

भूधारणक्षेत्राचे सरासरी आकारमान(हेक्टर)

अमेरिकेची संयुक्त संस्थाने 

१९६९ 

१५८ 

ऑस्ट्रेलिया 

१९७० 

१,९९३ 

ग्रेट ब्रिटन 

१९७० 

५५ 

बेल्जियम

१९७०

८.४

यूगोस्लाव्हिया

१९७०

५.०

जपान

१९७०

१.०

भारत

१९७०

२.३


भारतातील सरासरी भूधारणक्षेत्र २.३ हेक्टरांचे असले, तरी छोट्या शेतकऱ्याचे भूधारणक्षेत्र लहान आहे. त्याचे सरासरी भूधारणक्षेत्र १.२१ हेक्टरांचे असून मध्यम शेतकऱ्याचे सु. २.४२, मोठ्या शेतकऱ्याचे सु. ६.०७ व बड्या शेतकऱ्याचे सु. १०.९ हेक्टरांचे आहे. पंजाबच्या काही भागांत एकेक भूधारणक्षेत्र सु. एक-पंचमांश हेक्टराचे आहे. 

मालकीच्या दृष्टीने असलेले भूधारणक्षेत्र जसेच्या तसे कसणुकीसाठीचे क्षेत्र नसते, हे वर पाहिलेच आहे. कसणुकीच्या दृष्टीने एका शेतकऱ्याचे असलेले भूधारणक्षेत्रदेखील सर्व एकत्र, सलग असते असे नाही बहुधा ते तसे नसते. प्रत्येक भूधारणक्षेत्रदेखील तीन, चार, पाच, असे तुकडे असतात. त्यांचा आकार कमीअधिक व जमिनीचा पोत वेगवेगळा असतो. कधी ते तुकडे एकाच गावच्या शिवारात विखुरलेले असतात, तर कधी त्यांतील कमीअधिक लांब असलेले काही तुकडे दुसऱ्या गावच्या शिवारात असतात. तुकडीकरणाचे प्रमाण किती आहे, हे पुढील तक्त्यावरून दिसून येईल :

तक्ता क्र. ८. ( १९५१ -६० ) 

कसणुकीच्या भूधारण-क्षेत्राचा गट (आकार-मानाप्रमाणे हेक्टर)

प्रत्येक क्षेत्रातील तुकड्यांची सरासरी संख्या

प्रत्येक तुकड्याचे सरासरी क्षेत्रफळ(हेक्टर) 

०.२०२ हेक्टरपेक्षा कमी

१.६१

०.०६०

०.२०२ ते ०.३६०

२.८२

०.१००

०.४०४ ते १.००९

४.४१

०.१५०

१.०११ ते १.९७

६.३०

०.४०४

२.०२३ ते ३.०३

७.६०

०.३२०

३.०३४ ते ४.०३

८.३०

०.४३०

४.०४६ ते ५.०५

८.४७

०.५२९

५.०५ ते ६.०६

८.१३

०.६५४

६.०७ ते ८.०८

८.८७

०.७७०

८.०९ ते १०.१०

८.६६

१.०३०

१०. ११ ते ११.७३

८.५०

१.२९०

१२.१४ ते २०.२२

९.०६

१.६६०

२० . २३ हेक्टरांवर

९.३९

३.२६०

सर्वांची सरासरी

५.८२

०.४६०

भूधारणक्षेत्राचा लहान आकार व त्याचेही वाढते तुकडीकरण, यांची कारणे बरीच आहेत. मुख्य कारण असे की, जी कुटुंबे शेतीवर अवलंबून आहेत त्यांची संख्या फार मोठी आहे. लोकसंख्येच्या वाढीमुळे कुटुंबात भर पडत जाते, पण त्या प्रमाणात कुटुंबातील प्रौढांना बिगरशेती व्यवसायात रोजगार मिळत नाही. त्यामुळे प्रत्येकाला शेतीवरच अवलंबून रहावे लागते. हिंदू एकत्र कुटुंबपद्धतीच्या कायद्यामुळे एका कुटुंबाची मालमत्ता भावाभावांत समप्रमाणात वाटली जाते. त्यामुळे प्रत्येक पिढीत शेतजमिनीचे विभाजन वाढत्या प्रमाणात होत जाते. एका कुटुंबाच्या मालकीची जमीन वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली व वेगवेगळ्या कुवतीची असते. प्रत्येक भावाला प्रत्येक तुकड्यातील हिस्सा हवा असतो. उदा., एका कुटुंबात तीन भाऊ असले व उत्त्म, मध्यम आणि कनिष्ठ अशा तीन प्रकारच्या प्रत्येकी तीन एकरांचे तीन तुकडे मिळून त्या कुटुंबाचे भूधारणक्षेत्र नऊ एकर असेल, तर वाटणीच्या वेळी एकेक भाऊ तीन एकरांचा एकेक तुकडा घेण्याऐवजी प्रत्येकजण प्रत्येक तुकड्यातील एक-तृतीयांश हिस्सा घेईल व त्यामुळे पूर्वीच्या तीन तुकड्यांऐवजी आता नऊ तुकडे होतील. 


कूळकसणुकीमुळेही तुकडीकरणाला साहाय्य होते. एखाद्या शेतकरी आपली सर्व जमीन कुळाला देण्याऐवजी तिच्यातील एखादा तुकडा तोडून देतो. तसेच आर्थिक अडचणीमुळे एखादा शेतकरी आपल्या जमिनीतील एखादा तुकडा तोडून विकतो. उत्पादनाचा घटक या दृष्टीने जमिनीच्या अमर्याद तुकडीकरणाला परवानगी असू नये, अशी भूमिका रूढीने किंवा कायद्याने पूर्वी घेतली नव्हती. त्यामुळे मालकी हक्काच्या उपयोगात एकेक भाग या भूमिकेतून भूधारणक्षेत्राच्या आकाराचे विभाजन व तुकडीकरण सतत होत राहिले. याचा शेती उत्पादनावर अनिष्ट परिणाम होणे स्वाभाविक आहे. भूधारणक्षेत्र लहान झाले, तरी शेतकऱ्याला स्वतंत्र बैलबारदाना ठेवावा लागतो. त्याचा खर्च पूर्वी जितक्या क्षेत्रावर विभागला जात होता, त्यापेक्षा कमी क्षेत्रावर विभागला जातो. क्षेत्र फारच लहान झाले, तर हा खर्च परवडेनासा होतो. त्यामुळे अनेक छोटे शेतकरी  स्वतःचा बैलबारदाना बाळगू शकत नाहीत. कामाच्या वेळी बैल व अवजारे भाड्याने मिळतीलच याची शाश्वती नसते. आधुनिक शेतीतंत्राचा अवलंब करण्यासाठी जमीन समतल करणे, बांधबंदिस्ती, सिंचन व निचऱ्याची सोय इ. सुधारणा करणे आवश्यक असते, त्या करणे त्याला परवडत नाही. तुकडीकरणामुळे दोन तुकड्यांमधील बांधाखालची जमीन वाया जाते एकाच्या मालकीच्चा एका तुकड्यातून लांबवर असलेल्या दुसऱ्या तुकड्यात जाण्यासाठी वेळेचा व शक्तीचा अपव्यय होतो विहीर एका तुकड्यात पाडली, तर तिचा फायदा फार दूर असलेल्या तुकड्याला मिळू शकत नाही राखणीचा प्रश्न बिकट बनतो. अशा विविध मार्गानी शेती उत्पादनखर्च वाढतो, उत्पादनक्षमता खालावते व ती वाढविण्यासाठी जे कार्यक्रम हाती ध्यावयास हवेत, ते घेणे अशक्य होऊन बसते. 

शेतीच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम होऊ नये आणि उत्पादनवाढीच्या कार्यक्रमांच्या आड तुकडीकरण येऊ नये, उलट त्या कार्यक्रमांना साहाय्य होईल अशा रीतीने तुकडेजोडीचे कार्यक्रम हाती घेतले जावेत, अशी सूचना सर्व शेतीतज्ञांनी केली आहे. ताली टाकणे, जमीन समतल करणे, छोटेमोठे बांध बांधणे, कालव्याच्या किंवा विहिरीच्या साहाय्याने पाणीपुरवठ्याची सोय करणे, यासाठी भूधारणक्षेत्राचा सध्या असलेला आकार कमी होणार नाही, अशी किमान व्यवस्था झाली पाहिजे. अन्यथा या सुधारणांवर केलेला भांडवली खर्च वाया जाईल यांपैकी काही सुधारणा करण्यासाठी सध्या असलेले फार लहान तुकडे उपयोगाचे नाहीत. त्यात तांत्रिक व आर्थिक अशा दोन्ही अडचणी आहेत. एका शेतकऱ्याचा एक एकराचा तुकडा असेल, तर त्यात विहीर पाडून उपयोग नाही. कारण एका विहिरीवर चार ते पाच एकर जमीन भिजू शकते, पण त्या शेतकऱ्याची मात्र तेवढी जमीन तेथे असणार नाही एक एकरासाठी एक विहीर बांधणे त्या शेतकऱ्याला व समाजालाही परवडण्यासारखे नाही.तुकडीकरण थांबविण्याच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या मार्गात मोठ्या अडचणीही आहेत. वारसा हक्कविषयी असलेला हिंदूंचा कायदा व मुसलमानांनी बऱ्याच अंशी आत्मसात केलेले रीतिरिवाज यांमुळे वडिलोपर्जित मिळकतीचे भावाभावांत वाटप ही प्रथा अतिशय बद्धमूल झाली आहे. बहुसंख्य लोकांकडे शेतजमिनीशिवाय दुसरी फारशी मिळकत नाही. तेव्हा तुकडीकरणाला प्रतिबंध करावयाचा, तर वारसा हक्काच्या कायद्यात प्रथम सुधारणा कराव्या लागतील. दुसरी अडचण आर्थिक स्वरूपाची आहे एकीकडे लोकसंख्या मोठ्या वेगाने वाढत आहे आणि दुसरीकडे बिगरशेती व्यवसायांतील रोजगार मिळण्याचे प्रमाण अत्यंत अल्प प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या सर्वांनाकिमानपक्षी सर्व पुरूषांना व त्यांच्या कुटुंबियांना-वडिलोपर्जित शेतजमिनीशिवाय उपजीविकेचे दुसरे साधन उपलब्ध नाही. तुकडीकरण न करता शेतजमीन एकत्र ठेवली व कसली पाहिजे असे बंधन कायद्याने घातले, तर त्यामुळे आपापसांतील हेवेदावे, कटकटी वाढण्याची व पर्यायाने शेती उत्पादनावर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता आहे.  

तुकडीकरणाला प्रतिबंध करणे याचबरोबर तुकडेजोडीचा कार्यक्रम हाती घेऊन कसणुकीच्या तुकड्याचा आकार वाढविणे, याही कार्यक्रमाची तितकीच गरज आहे. शेतकऱ्यांच्या मालकीचे तुकडे इतस्तत: विखुरलेले आहेत. त्यांची आपापसांत अदलाबदल करून तुकडेजोड करणे हे या कार्यक्रमाचे स्वरूप होय. यातही तशाच अडचणी आहेत. वेगवेगळ्या तुकड्यांचा आकार, जमिनीचा पोत, उंचसखलपणा, जाण्यायेण्यास रस्त्याची सोय वगैरे बाबतींत कमालीची भिन्नता आहे. आपल्या मालकीच्या तुकड्याचे फार फायदे आहेत, असा प्रत्येक शेतकऱ्याचा समज असतो. तसेच अदलाबदलीला तयार झालो, तर दुसऱ्याचा तुकडा घेताना आपले नुकसान हमखास होईल, तो शेतकरी किंवा मधला अधिकारी आपली फसवणूक करील अशी भीती त्याला वाटत असते. त्याचे अज्ञान व भोवतालची परिस्थिती यांमुळे त्याच्या भीतीला आधारही आहे. त्यामुळे तुकडेजोडीचा कार्यक्रम अंमलात आणणे कठीण आहे. 

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने १९५१ साली जे. सी. कुमारप्पा यांच्या अध्यक्षतेखाली ‘शेती सुधारणा समिती ’ (अँग्रेरिअन रिफॉर्म्स कमिटी) 


तक्ता क्र. ९. तुकडेजोडीच्या कार्यक्रमाची प्रगती (हेक्टर)

राज्य-केंद्रशासित प्रदेश

पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या अखेर- पर्यत (१९५५-५६)

दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या अखेर-पर्यत (१९६०-६१)

१९६१-६२

एकूण 

स्तंभ(२+३) 

 

आंध्र प्रदेश

१,२६,२३५

५७,०४८

१,८३,२८३

बिहार

२४,२७६

८,०९२

३२,३६८

गुजरात

१,०५,६००

२,४२,१६०

४८,९५६

२,९१,७१६

मध्य प्रदेश

११,८४,२६४

१५,४५,५७२

१,०५,१९६

१६,५०,७६८ 

महाराष्ट्र

१,७४,७८७

५,३४,०७२

२,५४,४९४

७,८८,५६६

कर्नाटक

१,१०,८६०

४,०२,५७७

७७,६८३

४,८०,२६० 

पंजाब

२५,००,४२८

५९,५८,७४८

११,२७,६२०

७०,८६,३६९

राजस्थान

७,५७,८१५

३,००,२१३

१०,५८,०२९

उत्तर प्रदेश

७६,४७०

२१,८२,४१३

८,५७,७५२

३०,४०,१६४ 

दिल्ली

८१,७२९

८२,५३८

८२,५३८

हिमाचल प्रदेश

१,६१८

५०,९७९

२,४२७

५३,४०७ 

एकूण

४२,३५,५५८

१,१९,२७,००८

२८,४३,९३४

१,४७,७०,९४२

नेमली होती. शेती उत्पादन व कार्यक्षमता यांच्यात कायम स्वरूपाची सुधारणा घडवून आणण्यासाठी देशातील शेतजमीनव्यवस्थेत अतिशय मूलगामी परिवर्तन घडवून आणले पाहिजे, असे त्या समितीचे म्हणणे होते. त्या दृष्टीने तिने अनेक शिफारशी केल्या. भूधारणक्षेत्राविषयीच्या शिफारशींमागील मुख्य कल्पना अशी की, प्रत्येक कसणाराला शक्यतो किफायतशीर भूधारणक्षेत्र प्राप्त करून द्यावे. किफायतशीर क्षेत्राचा आकार वेगवेगळ्या प्रदेशांतील शेतीची कुवत व अन्य आर्थिक स्थिती यांनुसार कमीअधिक राहील. तो आकार ठरविण्याचे निकष पुढीलप्रमाणे असावेत : (१) शेतकऱ्याला त्याच्या जमिनीतून किमान जीवनमानाइतके उत्पन्न मिळावे, (२) सरासरी आकाराच्या कुटुंबातील सर्व प्रौढांना व किमान एका बैलजोडीला पूर्ण काम मिळावे. याच्यापेक्षा कमी आकार असलेल्या भूधारणक्षेत्रांना प्राथमिक भूधारणक्षेत्र म्हणावे. शेतीप्रक्रिया कार्यक्षम रीत्या करता येण्याच्या दृष्टीने प्राथमिक भूधारणक्षेत्राला पुनर्वसनाच्या स्वरूपाची मदत द्यावी. शेतीप्रक्रिया अतिशय शास्त्रशुद्ध व आदर्श रीतीने चालविता येण्यासाठी मोठे भूधारणक्षेत्र काही ठिकाणी उपयुक्त ठरेल. अशा क्षेत्रांना समुचित (ऑप्टिमम) भूधारणक्षेत्र म्हणावे. मात्र कुठल्याही परिस्थितीत समुचित क्षेत्राचा आकार किफायतशीर क्षेत्राच्या आकाराच्या तिपटीपेक्षा मोठा नसावा. 


जमीन सुधारणेच्या प्रयत्नांचे मुख्य उद्दिष्ट जास्तीत जास्त कसणारांना किफायतशीर क्षेत्र मिळवून देणे हे असावे. या दृष्टीने ज्यांची  स्वतःची जमीन किफायतशीर क्षेत्रापेक्षा कमी असेल, तर कुळाचे सर्व क्षेत्र किफायतशीर बनविण्यासाठी आवश्यक असेल तेवढी जमीन मूळ मालकाकडून काढून घेऊन त्या कुळाला द्यावी, या दृष्टीने कूळ कायद्यांत बदल करण्यात यावेत. तसेच ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे, अशा जमीन मालकांकडे जास्तीत जास्त समुचित भूधारणक्षेत्राइतकी जमीन ठेवून बाकीची काढून घेऊन लहान भूधारकांना देण्यात यावी. या दृष्टीने कमाल धारण मर्यादा कायदेही करण्यात यावेत. या दोन्ही प्रयत्नांनंतर ज्यांची भूधारणक्षेत्रे बिगर-किफायतशीर राहतील, त्यांना पुनर्वसनाच्या दृष्टीने विशेष सवलती द्याव्यात. 

तुकडीकरणाला प्रतिबंध करणे व तुकडेजोड करणे या दिशांनी १९४७ सालापासून व विशेषतःपहिल्या पंचवार्षिक योजनेच्या सुरूवातीपासून विशेष प्रयत्न झाले आहेत. १९५१ पूर्वी त्यावेळचे मुंबई, पंजाब, मध्य प्रदेश, हैदराबाद व उत्तर प्रदेश या राज्यांत यासंबंधीचे कायदे झालेले होते. १९५१ नंतर ओरिसा, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश या राज्यांत कायदे झाले. उत्तर प्रदेशात पूर्वीचा कायदा रद्द करून अधिक पुरोगामी कायदा १९५३ साली करण्यात आला. बिहार (१९५६), कर्नाटक व आसाम (१९६०) आणि जम्मू व काश्मीर (१९६२) या राज्यांतही कायदे झाले. १९५६ पर्यत तमिळनाडू व केरळ या राज्यांत मात्र तुकडेजोडीचे कायदे झाले नव्हते.या कायद्यानुसार विक्री, वाटणी, बटाईने देणे वगैरे कुठल्याही कारणास्तव जमिनीचे एका विशिष्ट आकारापेक्षा लहान तुकडे करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. शिवाय सध्याचे तुकडे जोडण्याच्या दृष्टीने एका गावाचा नकाशा समोर ठेवून शेतकऱ्यांना त्यांचे इतस्ततः विखुरलेले तुकडे अदलाबदल करावयास लावून प्रत्येकाला एका ठिकाणी सलग मोठा तुकडा किंवा फार तर सलग असणारे दोन-तीन तुकडे मिळवून देण्याच्या दृष्टीने असे कार्यक्रम राज्य सरकारांनी हाती घेतले आहेत. १९६२ पर्यंत तुकडेजोडीच्या कार्यक्रमाची झालेली प्रगती तक्ता क्र. ९ मध्ये दर्शविली आहे. 

तुकडेजोडीच्या कार्यक्रमाला दुसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर अधिक चालना मिळाली. १९७२ अखेर ३.२६ कोटी हेक्टर जमिनीत तुकडेजोडीचा कार्यक्रम पूर्ण झाला होता. १९७८ साली हा आकडा ४.४० कोटी हेक्टरांवर गेला. 

मात्र देशाच्या वेगवेगळ्या राज्यांतील प्रगती समान नाही. पंजाब, हरयाणा व उत्तर प्रदेश या राज्यात तुकडेजोडीचा कार्यक्रम जवळजवळ पूर्ण झाला आहे, तर गुजरात, मध्य प्रदेश , प. बंगाल या राज्यांत तुकडेजोडीचा कार्यक्रम अद्यापही ऐच्छिक ठेवला असल्याने तेथील प्रगती अतिशय मंद आहे. केरळ व तमिळनाडू या राज्यांनी तर अद्याप याबाबत कायदेच केले नाहीत. 

सुराणा, पन्नालाल