लेआँटिएफ, वॅसिली : (५ ऑगस्ट १९०६- ). जन्माने रशियन, तथापि अमेरिकन नागरिकत्व स्वीकारलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नोबेल पुरस्कारविजेते (१९७३)अर्थशास्त्रज्ञ. जन्म सेंट पीटर्झबर्ग (लेनिनग्राड) येथे. त्यांचे वडील प्राध्यापक होते. वडिलांनी प्रथमपासूनच आपल्या मुलाला अभ्यासात मार्गदर्शन केलेले असल्यामुळे मुलाने शास्त्र व संशोधन यांत अधिकाधिक रस घेतला. १९२१ मध्ये सेंट पीटर्झबर्गच्या एका स्थानिक माध्यमिक विद्यालयातून त्यांनी पदवी संपादन केली व ते लेनिनग्राड विद्यापीठात प्रविष्ट झाले. चार वर्षांत त्यांनी अर्थशास्त्र विषयातील पदवी संपादिली. १९२५ मध्ये वॅसिली जर्मनीस गेले व त्यांनी बर्लिन विद्यापीठात अध्ययनास सुरुवात केली. १९२८ मध्ये त्यांनी या विद्यापीठाची डॉक्टरेट ही पदवी प्राप्त केली. त्यांच्या प्रबंधामध्ये भावी èनिवेश-उत्पाद विश्लेषण तंत्राची बीजे आढळतात. हा प्रबंध तयार करीत असताना ‘इन्स्टिट्यूट ऑफ वर्ल्ड इकॉनॉमिक्स’ या संस्थेत लेआँटिएफनी ‘संशोधन सहयोगी’ म्हणून काम केले. १९२८-२९ मध्ये चीन सरकारचे आर्थिक सल्लागार म्हणून नानकिंग येथे राहिल्यानंतर ते पुन्हा संस्थेत येऊन आपल्या पूर्वीच्या कामावर रूजू झाले. एस्टेला हेलेना मार्क्स या युवतीशी त्यांचा १९३२ मध्ये विवाह झाला. लेआँटिएफ दांपत्याला स्वेट्लाना युजेनिया (सांप्रतच्या श्रीमती पॉल ॲल्पर्स) ही एकच कन्या असून ती कॅलिफोर्निया विद्यापीठात अध्यापन करते. 

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत स्थायिक होण्याच्या उद्देशाने लेआँटिएफ ह्यांनी आप्रवासी म्हणून १९३१ मध्ये प्रवेश केला. त्याच वर्षी न्यूयॉर्कस्थित ‘राष्ट्रीय आर्थिक संशोधन विभाग’ या संस्थेत त्यांनी संशोधन सहयोगी म्हणून सेवेस प्रारंभ केला. त्याच वेळी हार्व्हर्ड विद्यापीठाने वॅसिली यांची ‘निवेश-उत्पाद विश्लेषण पद्धती’ (इनपुट-आउटपुट सिस्टम) विकसित करण्यासाठी साहाय्य करण्याची तयारी दर्शविल्यावरून १९३१ च्या अखेरीस ते त्या विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात काम करू लागले. प्रथम अधिव्याख्याता (१८३१), नंतर साहाय्यक प्राध्यापक (१९३३-३८), सहयोगी प्राध्यापक (१९३९-४५) अशा बढत्या प्राप्त करीत अखेरीस ते ‘हेन्री ली अर्थशास्त्र प्राध्यापक’ म्हणून काम करू लागले. या पदावर ते सु. ३० वर्षे होते (१९४६-७५). अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या संरचनाविषयक ‘हार्व्हर्ड इकॉनॉमिक रिसर्च प्रोजेक्ट’ (हार्व्हर्ड आर्थिक संशोधन प्रकल्पा) चे संचालक म्हणून ते १९४२ पासून काम करू लागले. अमेरिकन सरकारच्या श्रमखात्यात सल्लागार (१९४१-४७), सल्लागार-युद्धनीतिकार्यालय (१९४३-४५) संयुक्त राष्ट्रे (१९६१-६२ १९८०-वाणिज्य विभाग १९६६-८२) अशा विविध खात्यांमध्ये त्यांनी महत्त्वाची पदे सांभाळली. अमेरिकन तत्वज्ञान संस्था, अर्थमिती संस्था, अमेरिकन आर्थिक परिषद, तसेच अनेक परदेशी अकादम्या यांचे सदस्यत्व त्यांना बहाल करण्यात आहे आहे. ‘ऑर्डर ऑफ द चेरूबिम’ हा पीसा विद्यापीठाने केलेला सन्मान (१९५३), ब्रूसेल्स विद्यापीठाची सन्माननीय डॉक्टरेट (१९६२), ‘लीजन डी ऑनर’ (१९६७), १९७३ चा नोबेल अर्थशास्त्र पुरस्कार, पॅरिस सुवर्णपदक, ‘ऑर्डर ऑफ रायझिंग सन’ (द्वितीय श्रेणी) हा जपानचा मान (१९८४), ‘कमांडर ऑर्डर देस आर्ट्स एन देस लेटर्स’ (१९८५), इ. विविध मानसन्मान लेआँटिएफना प्राप्त झाले.  

अमेरिकन शासनाने १९४१ मध्ये लेआँटिएफ यांच्यावर ९६ अमेरिकन उद्योगांचे विश्लेषण करण्याची तसेच युद्धविषयक सुसज्जतेचा अमेरिकन अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकेल, ते शोधून काढण्याची प्रचंड कामगिरी सोपविली. अमेरिकन शासनाच्या श्रमविभागाचा सल्लागार म्हणून काम करीत असताना, लेऑटिएफ ह्यांनी १९३९ ची जनगनना-आकडेवारी पायाभूत करून ९५ उद्योग व विभागीय क्षेत्रे यासंबंधीचे निवेश-उत्पाद विश्लेषण कोष्टक तयार करण्याच्या कामी मार्गदर्शन केले. 

निवेश-उत्पाद विश्लेषणासंबंधी संक्षेपाने असे सांगता येईल : लेआँटिएफ यांच्या समिश्र पद्धतीचा पाया म्हणजे एक जालकतक्ता (कोष्टक) असून त्याची तुलना एखाद्या रस्त्याच्या नकाशावरील मैलांच्या कोष्टकांशी करता येईल. त्यावरून विविध उद्योग एकमेकांकडून काय खरेदी करू तसेच एकेमेकांना काय विकू शकतात हे दर्शविता येते. याच कोष्टकात शासन, ग्राहक (उपभोक्ते), परकीय देश यांसारखे विभाग समाविष्ट केले म्हणजे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील वस्तूव सेवा ह्यांच्या अभिसरणाचे समग्र चित्र स्पष्टपणे उपलब्ध होते. कोष्टकाच्या डाव्या भागात प्रमुख उद्योग व विभाग यांची एकाखाली एक अशी यादी देण्यात येते. या कोष्टकाची प्रत्येक आडवी ओळ त्या उद्योगाचा उत्पाद विविध उद्योगांच्या उत्पादन प्रक्रियांसाठी व अंतिम उपयोगासाठी कसकसा वापरला जातो, हे आकड्यांनिशी दर्शविते. कोष्टकाच्या वरच्या भागात उद्योगांची व विभागांची तीच नावे असून प्रत्येक नावाखाली उभे आकडे एकाखाली एक अशा प्रकारे मांडलेले असतात. कोष्टकाच्या चौकोनांमधील आकडे उभे वा आडवे वाचले असता एकसमयावच्छेदेकरून निवेश (खरेदी) व उत्पाद (विक्री) हे सूचित करतात. कोष्टकाच्या वरच्या भागातील उद्योगाच्या संदर्भात उभ्या स्तंभातील आकडे म्हणजे निवेश असतात तर कोष्टकाच्या डाव्या भागातील उद्योगाच्या संदर्भात आडव्या ओळीतील आकडे हे उत्पाद असतात. तंत्रविद्या, कर अथवा पोलाद उत्पादन यांमधील संभाव्य बदल हे समग्र अर्थव्यवस्था अथवा तिचा कोणताही विभाग यांवर कशा प्रकारे प्रभाव पाडू शकतील, ते लेआँटिएफ यांचे हे तंत्र अचूकपणे सांगू शकते. अनेक देशांच्या शासनांनी आर्थिक आव्हानांची संभाव्यता लक्षात घेऊन त्यांना तोंड देण्याकरिता तसेच शासकीय सांख्यिकी तपासण्याकरिता निवेश-उत्पाद विश्लेषण तंत्राचे साहाय्य घेतलेले आहे. अर्थव्यवस्थेतील विनिर्दिष्ट परस्परावलंबी गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी तसेच महत्त्वाचे प्रवाह आणि विनिर्दिष्ट प्रसंगांचे परिणाम यांची भाकिते करण्यासाठी या तंत्राचा अवलंब करण्यात येतो. उदा., या तंत्राचा वापर करून मालवाहू गाडीचालकांच्या संपाची व्याप्ती निर्धारित करता येते. या तंत्राची मूळ संकल्पना जरी सोपी व सुलभ असली, तरी या तंत्राचे स्वरूप अतिशय क्लिष्ट वा गुंतागुंतीचे ठरले आहे, कारण प्रवाह वा परिणाम यांची कल्पना येण्यासाठी लक्षावधी परस्परावलंबी एकसमयावच्छेदी समीकरणांची उकल करावी लागते. १९७३ च्या सुमारास जगातील पन्नासांवर राष्ट्रांमध्ये आर्थिक प्रवाहांचा अभ्यास आणि भाकिते करण्यासाठी हे तंत्र अवलंबिण्यात आले. अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयाने लेआँटिएफ तंत्राचा अवलंब करून देशाच्या अर्थव्यवस्थेशी अनेक संगणकीय प्रतिमाने तयार केली.  

लेआँटिएफ यांनी १९४८ मध्ये अमेरिकन अर्थव्यवस्था प्रकल्पाच्या धर्तीवर हार्व्हर्ड अर्थशास्त्रीय प्रकल्प उभारला. मार्च १९५१ मध्ये निःशस्त्रीकरणाचे आर्थिक परिणाम अभ्यासण्यासाठी पश्चिम जर्मनीमधील कील शहरात भरविण्यात आलेल्या अर्थशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये लेआँटिएफ ह्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. शस्त्रसंभारावर करण्यात येणारा खर्च हा आवश्यक नसतो, तसेच हा खर्च म्हणजे पूर्ण रोजगार मिळविण्याचे एक प्रभावी साधनही नव्हे, असे लेआँटिएफ ह्यांनी दाखवून दिले. निःशस्त्रीकरणाच्या संदर्भात येणाऱ्या आर्थिक अडचणी ह्या संक्रमणकालीन असू शकतील, असेही त्यांनी मत मांडले.  

लेआँटिएफ यांचे सुप्रसिद्ध ग्रंथ असे आहेत : (१) स्ट्रक्चर ऑफ अमेरिकन इकॉनॉमी १९१९-२० (१९५३) (२) स्टडीज इन द स्ट्रक्चर ऑफ अमेरिकन इकॉनॉमी (१९५३) (३) इनपुट आउटपुट इकॉनॉमिक्स  (१९६६ १९८६) (४) एसेज इन इकॉनॉमिक्स खंड १ (१९६६ १९८५) (५) द फ्यूचर ऑफ द वर्ल्ड इकॉनॉमी (१९७७) (६) एसेज इन इकॉनॉमिक्स खंड २, (१९७७,१९८५) (७) मिलिटरी स्पेंडिंग : फॅक्ट्स अँड फिगर्स, वर्ल्डवाइड इम्प्लिकेशम्स अँड फ्यूचर आउटलुक (१९८३-सहलेखक-एफ्. डचिन) (८) द फ्यूचर ऑफ नॉनफ्यूएल मिनरल्स इन् द यू. एस्. अँड द वर्ल्ड इकॉनॉमी (१९८३-सहलेखक-जे. कू. एस्. नासर आणि आय्. सोइन) (९)कलेक्टेड एसेज (१९६६ १९८५) (१०) द फ्यूचर इंपॅक्ट ऑफ ऑटोमेशन ऑन वर्कर्स (१९८६). 


‘निवेश-उत्पाद विश्लेषण तंत्रा’चे जनक म्हणून, वॅसिली लेआँटिएफ यांना १९७३ चा अर्थशास्त्र विषयातील नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

हेक्शर-ओह्लिनप्रणीत आंतरराष्ट्रीय व्यापारसिद्धांतानुसार एखाद्या देशामध्ये जो उत्पादन-घटक विपुलतेने उपलब्ध आहे, त्याचा वापर करून त्या देशात निर्माण केल्या जाणाऱ्या वस्तूंची निर्यात तो देश अधिक प्रमाणात करतो. या सिद्धांताप्रमाणे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत भांडवलसमृद्धी आणि श्रमदुर्मिळता आढळते. परंतु वॅसिली लेआँटिएफ ह्यांनी ‘डोमेस्टिक प्रॉडक्शन अँड फॉरिन ट्रेड’ (१९५३) या शोधनिबंधात अमेरिका हा भांडवलाची उणीव असलेला देश असल्याचा धक्कादायक सिद्धांत मांडला आहे. लेआँटिएफ यांच्या मते आपल्याजवळील अतिरिक्त श्रमबळाची विल्हेवाट लावण्याच्या तसेच आपल्याजवळील दुर्लभ भांडवल राखून ठेवण्याच्या उद्देशाने अमेरिका आंतरराष्ट्रीय व्यपारात भाग घेत असते. यालाच ‘लेआँटिएफ विरोधाभास’ म्हणण्यात येते व तो निवेशउत्पाद विश्लेषण तंत्राचा उपसिद्धान्त मानण्यात येतो. आजपर्यंतचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा आंतर-उद्योगविषयक अभ्यास-प्रकल्प संयुक्त राष्ट्रांच्या विद्यमाने लेआँटिएफ व त्यांचे इतर अनेक सहकारी यांच्याकडे सोपविण्यात आला होता. या प्रकल्पाचे निष्कर्ष १९७७ साली प्रसिद्ध झालेल्या द फ्यूचर ऑफ द वर्ल्ड इकॉनॉमी या ग्रंथात पहावयास मिळतात. जगातील राष्ट्रांचे पंधरा विभागांमध्ये तसेच आर्थिक क्रियांचे पंचेचाळीस क्षेत्रांमध्ये विभाजन करण्यात आले अशा प्रकारे वैश्र्विक प्रतिमान आंतरविभागीय प्रतिमानांमध्ये प्रतिबिंबित करण्यात आले. २,००० वर्षांपर्यंत वैश्र्विक अर्थव्यवस्थेवर पर्यायी विकास व्यूहतंत्रांच्या आर्थिक आणि परिस्थितिकीय दृष्टीकोनांतून पडणाऱ्या प्रभावांचे मूल्यमापन करणे, असे या प्रकल्पाभ्यासाचे उद्दिष्ट होते.

प्रचलित अर्थशास्त्र-मग ते नवसनातनवादी वा केन्सप्रणीत अर्थशास्त्र असो-बाजार अर्थव्यवस्थेला प्राधान्य देत असले, तरी आंतरउद्योगविषयक अर्थशास्त्राचा उपयोग आर्थिक प्रणालीच्या कोणत्याही प्रकाराचे-अनिर्बंध भांडवलशाही वा नियंत्रित, केंद्रनियोजित अर्थव्यवस्था-विश्लेषण करण्यासाठी केला जातो.

गेली कित्येक वर्षे निवेश-उत्पाद विश्लेषणाचा वापर बहुतेक अर्थशास्त्रज्ञांकडून अतिशय मर्यादित प्रमाणात करण्यात येई, कारण त्याकडे फारसे लक्षच दिले जात नव्हते. सांप्रतच्या काळात आंतरउद्योग अर्थशास्त्र हा विषय अर्थशास्त्राच्या पदवी अभ्यासक्रमात अविभाज्य अंग म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे. आंतरउद्योग अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची विस्तारणारी शाखा मानण्यात येते.

आर्थिक विचारेतिहासावर आपल्या सिद्धांतांचा चिरस्थायी ठसा उमटविणाऱ्याॲडम स्मिथ, जॉन मेनार्ड केन्स यांसारख्या आर्थिक विचारवंतांच्या मालिकेत वॅसिली लेआँटिएफ यांना मानाचे स्थान देण्यात आले आहे.

संदर्भ : 1. Chenery, Hollis B. Clark, Paul G. Interindustry Economics, New York, 1959.

            2.  Miernyk, William H. The Elements of Input-Output Analysis, New York, 1965.

            3. Richardson, Harry W. Input-Output and Regional Economics, New York, 1975.

गद्रे, वि. रा.