प्रूदाँ, प्येअर झोझेफ : (१५ जानेवारी १८०९- १६ जानेवारी १८६५). फ्रेंच समाजवादी विचारवंत आणि ⇨ अराज्यवादाचा निर्भीड पुरस्कर्ता. बझांसाँ येथे शेतकरी कुटुंबात जन्म. घरच्या गरीब परिस्थितीमुळे बझांसाँ येथील एका छापखान्यात काम करूनच आपले शालेय शिक्षण त्याला घेता आले. या कामामुळेच विविध विषयांचे ज्ञानही त्याला आत्मसात करता आले. वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी त्याने पदवी संपादन केली. ‘बझांसाँ अकादमी’कडून त्याला शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यामुळे लेखनासाठी त्याला उसंत मिळाली. पुढे स्वतःचा छापखाना चालविण्याच्या अपेशी प्रयत्नांनंतर, प्रूदाँने लीआँ येथील एका लहानशा जहाज कंपनीत नोकरी धरली. या कंपनीतर्फे त्याला पॅरिसला पाठविण्यात आले. तेथे त्याचा उदारमतवादी, साम्यवादी, समाजवादी विचारवंतांशी संबंध आला. काही हद्दपार जर्मनांशीही त्याचा परिचय होऊन कांट व हेगेल या जर्मन विचारवंतांच्या तत्त्वज्ञानाशीही त्याची ओळख झाली.

प्रूदाँची १८४८ च्या क्रांतीनंतर नॅशनल असेंब्लीवर निवड झाली. त्या वेळी त्याच्याबरोबर प्रूसिद्ध फ्रेंच कवी, नाटककार व कादंबरीकार व्हिक्टर ह्यूगो (१८०२-८५), सम्राट नेपोलियन बोनापार्टचा पुतण्या ल्वी-नेपोलियन बोनापार्ट (१८०८-७३) इत्यादींनीही निवडणूक लढविली. ‘नॅशनल वर्कशॉप्स’, ‘कामाचा हक्क’ यांसारखे कार्यक्रम बंद करण्यात आल्यामुळे प्रूदाँने त्या संदर्भातील आपले विरोधी विचार वृत्तपत्रांतून प्रसिद्ध केले. याच काळात, प्रूदाँने कामागारांच्या हितासाठी कर्ज पुरवठा सुलभतेने व्हावा म्हणून नॅशनल बँक उभारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

प्येअर

प्रूदाँने १८४८ च्या क्रांतीकाळात ल् रप्रेझानता द्यु पप्ल या दैंनिकाचे संपादकपद स्विकारले. पॅरिसमध्ये कामगार जगतात हे दैनिक अतिशय लोकप्रिय परंतु वादग्रस्त ठरले या टिका –प्रूहारातून नवे प्रूजासत्ता शासनाने सुटले नाही. परिणामी सरकारने हे दैनिक बंद पाडले. परंतु प्रूदाँने दुसरे दैनिक सुरू केले ते पहिल्यापेक्षाही अधिक लोकप्रिय ठरले. अखेरीस ल्वी-नेपोलियन बोनापार्ट या नवनिर्वाचित राष्ट्रध्यक्षावर (१८५२-७०) अनेक वेळा कठोर टिका झाल्यामुळे मार्च १८४९ मध्ये प्रूदाँला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली. तुरुंगात असतानाच त्याने पॅरिसमधील एका कामगार मुलीशी विवाह केला. तुरुंगवास संपविल्यानंतर १८५७ मध्ये प्रूदाँने ऑफ जस्टिस इन द रेव्हलूशन अँन्ड इन द चर्च हा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यामधून त्याने मानवाचे स्वातंत्र्य खंडीत करण्याच्या व भ्रष्टाचारी नैतिक विचारांना चिरस्थायी करण्याच्या प्रयत्नांबद्दल कॅथॅलिक चर्चवर टिका केली. या बद्दल प्रूदाँनवर पुन्हा खटले भरण्यात आले. तथापि तो भूमीगत होऊन बेल्जियमला पळाला. व तेथे त्याने बराच काळ वास्तव्य केले. याच सुमारास तो आजारी पडला. व त्याला पुढील बरीच वर्ष विपन्नावस्थेत काढावी लागली. १८६२ मध्ये बेलजीयमच्या नेत्याशी त्याचे मतभेद झाले. फ्रांन्सच्या सम्राटाने (म्हणजेच ल्व-नेपोलियन बोनापार्टने) त्याला माफी केल्यामुळे त्याला मायदेशास परत येता आले. त्या नंतर तीनच वर्षांनी मानसिक ताणतणाव व विपन्नवस्था यांमुळे प्रूदाँनचा पॅरिस येथे मृत्यू झाला.

एकोणिसाव्या शतकातील भांडवलशाही विरोधी विचारांची एकधारा प्रूदाँनच्या रूपाने प्रकट झाली. हे विचार ग्रथीत करणारे त्याचे बारांवर ग्रंथ आहेत. [⟶ भांडवलशाही]. त्याच्या लिखानात तत्त्व चिकित्सेचा व तार्किक विश्लेषणाचा मोठा बडिवार मांडलेला असला, तरी स्वतंत्र कसणूक करणाऱ्या मालमत्ताधारी शेतकऱ्याच्या दृष्टीकोनातूनच त्याने जगाकडे पाहिले असे जानवते त्याच्या लिखानात भरपूर विसंगती आहेत व अर्थशास्त्रीय सिद्धांतांवर त्याची नीटशी पकड नाही. तरीही काही धीट विचार व नव्या कल्पना त्याने प्रभाविशैली मांडल्या आर्थिक व राजकीय विचारांच्या इतिहासात, विशेषत: अ-मार्क्सवादी, सामाजवादी विचारेतीहासात, प्रूदाँला महत्त्वाचे स्थान दिले जाते.

‘प्रॉपर्टी इज थेफ्ट’ – ‘खाजगी मालमत्तेचा हक्क म्हणजे चोरी’, हे मत प्रूदाँनच्या नावाशी निगडीत आहे. आणि आपल्या व्हॉट इज प्रॉपर्टी ह्या १८४० च्या निबंधात त्याने ते अशा स्वरूपात मांडलेही आहे. वस्तुत: प्रुदाँनचा विरोध स्वामित्वाच्या हक्काला नसून त्या हक्काचा उपयोग अनर्जित उत्पन्न मिळविण्यासाठी करण्याच्या पद्धतीला होता आपल्या मालमत्तेचे केवळ स्वामीत्व न उपभोगता, तीचा उत्पादक रीतीने वापर करणाऱ्यांचा स्वामीत्वाधीकार त्याला मान्य होता किंबहुना अधिकांत अधिक लोकांना असा हक्क असावा व त्यासाठी त्यांना बिनव्याजी कर्जे मिळावीत, असा त्याचा आग्रह होता.

न्याय व समता ह्यांचा प्रूदाँ खंबीर पुरस्कर्ता होता पण त्याचबरोबर शासकीय केंद्रीकरणाला त्याचा कडवा विरोध होता. खरे म्हणजे तो अराज्यवादीच होता. सुप्रूसिद्ध अराज्यवादी ⇨ प्यॉटर क्रपॉटक्यिन (१८४२-१९२१) ह्याने प्रूदाँला ‘अराज्यवादीचा पिता’ (जनक) असे बिरुद दिले होते. प्रूदाँचा समाजवाद हा केंद्रीत राज्यसत्तेवर आधारलेल्या मार्क्सवादी समाजवादापासून संपूर्ण तया वेगळा असून स्वतंत्र व स्वायत्त व्यक्तींनी आणि संस्थांनी केलेले सहकार्य ही त्याची आधारशीला आहे. शिवाय त्याचा समाजवाद उत्पादना ऐवजी समाजवितरणावर अधिक भर देतो. [⟶ समाजवाद].⇨कालमार्क्सच्या विचारांतून एक नवे असहिष्णू धर्मपिढ निर्माण होत आहे, असे प्रूदाँला वाटत होते. आणि त्याची त्याने मार्क्सला जाणीव दिली होती. सिस्टीम ऑफ इकॉनॉमिक काँन्ट्रॅडिक्शन्स ऑर् द फिलॉसॉफी ऑफ पॉव्हर्टी (१८४६, इं. भा. १८८८) ह्या आपल्या एका महत्वाच्या ग्रंथाने प्रूदाँला आघाडीच्या फ्रेंच समाजवादी विचारवंतांच्या मालीकेत नेऊन बसविले प्रूदाँनच्या या ग्रंथावर मार्क्सने आपल्या पॉव्हर्टी ऑफ फिलॉसॉफी (१८४७) या ग्रंथात टिका केली. दोघांचे दृष्टीकोन मुळातच भिन्न असल्याचे या वादातून स्पष्ट झाले. आणि त्याची मैत्री संपुष्टात आली [⟶ आर्थिक विचार – इतिहास आणि विकास ].

प्रूदाँच्या न्यायाच्या व समतेच्या विचारांतील एक महत्त्वाची विसंगती म्हणजे स्त्री-पुरुष व स्त्री स्वातंत्र्य ह्यांना त्याचा असलेला प्रखर विरोध, ही होय.

शासन व व्यक्ती ह्यांमधील संघर्ष सोडविण्याचा उपाय म्हणून प्रूदाँने संघराज्यवादाची कल्पना पुढे मांडली. प्रूदाँच्या अराज्यवादाचे व्यावहारिक स्वरूप म्हणजे ⇨संघराज्यवाद (फेडरॅलिझम) होय. राष्ट्रांतर्गत शासकीय रचना ही स्वायत्त समूहांच्या संघांची असावी आणि राष्ट्राराष्ट्रांचे, विशेषत: यूरोपीय राष्ट्रांचे, ह्याच तत्त्वावर संघटन व्हावे असे त्याचे मत होते.

प्रूदाँने मोठी ग्रंथसंपदा निर्माण करून तिच्याद्वारा फ्रान्समधील औद्योगिक कामगार चळवळीवर (फ्रेंच सिंडिकॅलिस्ट मूव्हमेंट) मोठा प्रभाव पाडला.

संदर्भ : 1 Brogan, D. W. Proudhon, London, 1934.

2. Marx, Karl, The Poverty of Philosophy, Moscow, 1976.

3. Schumpeter, J. A. History of Economic Analysis, New York, 1961.

देशपांडे, स. ह.