टंडन, पुरुषोत्तमदास : (१ ऑगस्ट १८८२–७ जुलै १९६१). अखिल भारतीय काँग्रेसचे एक मान्यवर नेते आणि राष्ट्रभाषा हिंदीचे निष्ठावंत प्रचारक. अलाहाबाद येथील मध्यमवर्गीय खत्री कुटुंबात जन्म. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अलाहाबाद येथे घेऊन तेथील म्यूर सेंट्रल महाविद्यालयातून एम्.ए. आणि पुढे एल्‌एल्‌.बी. झाले. तत्पूर्वी १८९७ मध्ये चंद्रमुखीदेवी या युवतीबरोबर त्यांनी विवाह केला. विद्यार्थिदशेतच ते काँग्रेसच्या राष्ट्रीय चळवळीत पडले (१८९९). याबद्दल त्यांना एक वर्ष महाविद्यालयातून काढून टाकले होते. १९०६–१४ या दरम्यान त्यांनी सर तेजबहाद्‌दूर सप्रू यांच्या हाताखाली अलाहाबाद उच्च न्यायालयात वकिली केली. मदन मोहन मालवीय यांच्या सल्ल्यानुसार ते नाभा संस्थानात कायदामंत्री म्हणून गेले पण लवकरच हिंदी भाषेच्या प्रचारार्थ त्यांनी ही नोकरी सोडली आणि ते असहकारितेच्या चळवळीत १९२० मध्ये सहभागी झाले. याबद्दल त्यांना १९२१ मध्ये तुरुंगवास भोगावा लागला. १९२३ मध्ये ते प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९२३–२९ या दरम्यान ते पंजाब नॅशनल बँकेचे अधिकारी होते. १९३० मध्ये ते अलाहाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. स्वांतत्र्याच्या लढ्यात त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. १९३९ मध्ये ते प्रांतिक विधिमंडळावर निवडून गेले व सभापती झाले. १९४६ मध्ये त्यांची संविधान समितीवर निवड झाली. १९५० साली नासिक येथे भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेसचे ते अध्यक्ष होते पण पुढे जवाहरलाल नेहरूंशी मतभेद आल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. १९५२ मध्ये ते लोकसभेवर निवडून आले आणि १९५६ मध्ये ते राज्यसभेसाठी निवडले गेले. म. गांधी त्यांचा ‘राजर्षि’ असा उल्लेख करीत. राजकरणापेक्षा समाजकारण त्यांना अधिक प्रिय होते. त्यांनी हिंदी भाषेच्या प्रचारार्थ प्रथमपासूनच विशेष लक्ष दिले. ते लाला लजपतराय यांच्या सर्व्हंट्स ऑफ द पीपल सोसायटीचे काही काळ अध्यक्ष होते (१९२३). राष्ट्रभाषा प्रचार समितीशी त्यांचा निकटचा संबंध होता. भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांच्या समाजसेवेचा यथोचित गौरव केला (१९६१).

पुरूषोत्तमदास टंडन

टंडन यांची निसर्गोपचारांवर श्रद्धा होती. त्यांच्यावर पंडित मदन मोहन मालवीय व लाल लजपतराय यांचा मोठा प्रभाव होता आणि जवाहरलाल नेहरू, राजेंद्रप्रसाद, गोविंद वल्लभ पंत ह्यांसारखे सहकारी त्यांना लाभले होते. अभ्युदय या हिंदी वृत्तपत्राचे ते अनेक वर्षे संपादक होते. पददलित समाजाच्या समस्या सोडविण्यात ते सतत अग्रेसर राहिले. त्यांचा गौरवग्रंथ राजर्षि अभिनन्दनग्रन्थ  या नावने १९६० मध्ये हिंदीत प्रसिद्ध झाला.

देवगिरीकर, त्र्यं. र.