ह्यूम, जॉन : (१८ जानेवारी १९३७). उत्तर आयर्लंडच्या आयरिश नागरी हक्कांचा प्रवर्तक व राजनीतिज्ञ. तेथील सोशल डेमॉक्रटिक अँड लेबर पार्टीचा (एस्डीएल्पी) एक संस्थापक सदस्य. उत्तर आयर्लंड-मधील प्रदीर्घ सत्तासंघर्ष मिटावा म्हणून शांततामय व अहिंसक मार्गाने केलेल्या अविरत प्रयत्नांसाठी डेव्हिड ट्रिंबलबरोबर त्याला १९९८ सालचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार विभागून देण्यात आला.

जॉन ह्यूम
 

ह्यूमचा जन्म उत्तर आयर्लंड-मधील लंडनडेरी या शहरात एका रोमन कॅथलिक कामगार कुटुंबात सॅम्युएल व ॲन ह्यूम या दांपत्यापोटी जॉन ह्यूमझाला. प्रारंभीचे शिक्षण जन्मगावी घेऊन तो सेंट कोलंबस कॉलेज व सेंट पॅट्रिक कॉलेज, मेनूथ येथे रोमन कॅथलिक धर्मोपदेशकाच्या अभ्यासासाठी दाखल झाला परंतु धर्मोपदेशकाचा अभ्यास अर्धवट सोडून तो लंडन-डेरीला परतला. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ आयर्लंडमधून एम्. ए. पदवी प्राप्त केल्यानंतर त्याने आपल्या जन्मगावी शिक्षकाची नोकरी पतकरली. लंडनडेरीत पतसंस्था स्थापन करून तिचा सर्वांत तरुण अध्यक्ष (१९६४–६८) म्हणून त्याची निवड झाली. आयर्लंडच्या जनतेसाठी सहकारी तत्त्वावर अर्थपुरवठा करणारी एकमेव अशी संस्था स्थापन केल्याचा त्याला सार्थ अभिमान होता. याच सुमारास त्याने अहिंसक नागरी हक्क चळवळीचे नेतृत्व केले (१९६८-६९).

उत्तर आयर्लंडच्या संसदेत ह्यूम लंडनडेरी मतदारसंघातून निवडून आला (१९६९). तसेच पुढे उत्तर आयर्लंडच्या अधिवेशनासाठी (कन्व्हेंशन) त्याची नियुक्ती झाली (१९७३-७४). तो एक वर्ष वाणिज्य मंत्री होता. त्याने स्थापन केलेल्या एस्डीएल्पीचा तो अध्यक्ष होता (१९७९–२००१). याच सुमारास त्याची यूरोपियन संसदेच्या सदस्यपदी निवड झाली (१९७९–२००४). शिवाय फॉइल मतदारसंघातून त्याची ब्रिटिश संसदेवर निवड झाली (१९८३–९८ आणि १९९८–२००५). आयर्लंडमधील अनेक राजकीय सामाजिक चळवळींत त्याचा सहभाग होता. तसेच तेथील वांशिक पृथक्वासन विरोधी (अपार्थाइट) चळवळ त्याने पुरस्कारिली. एस्डीएल्पीने त्याच्या नेतृत्वाखाली मूळ समाजवादी डावी विचारसरणी सोडून पक्षाचेकॅथलिक नॅशनॅलिस्ट पार्टी ‘त रूपांतर केले. तिला मध्यमवर्गाचा भक्कम पाठिंबा होता. त्याने यूरोपियन संघाच्या मदतीने अनेक व्यापारी उपक्रम राबविले. तसेच लंडनडेरीचे पुनर्वसन केले.

ह्यूम १९८० च्या दशकापासून ‘सीन फेन’ या आयरिश रिपब्लिकन आर्मीच्या (आय्आर्ए) जहाल गटाशी शांततेसाठी संवाद साधत होता. ऑगस्ट १९९४ मध्ये आय्आर्एच्या युद्धविरामास चालना देण्यात त्याचा महत्त्वाचा भाग होता तथापि शांततेविषयीची बोलणी सुरू होण्यापूर्वीच हिंसक कृतींचा जोर वाढला. तेव्हा ‘सीन फेन ‘चा नेता गेरी ॲडम्स याने अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांना भेट दिली आणि आय्आर्एने युद्धविराम जाहीर केला. ह्यूमने ॲल्स्टर पक्ष, ब्रिटिश शासन आणि आयरिश शासन यांच्या प्रतिनिधींना या ऐतिहासिक शांतताविषयक चर्चेसाठी पाचारणकेले. तेव्हा ‘सीन फेन’ या जहाल युद्धपिपासू गटाने या बहुपक्षीय शांतता परिषदेत भाग घेतला. या परिषदेतून ‘गुड फ्रायडे’ करारनाम्याची निष्पत्ती (परिणती) झाली (एप्रिल १९९८). त्यानंतर हा करारनामा जनपृच्छेद्वारे निश्चित करण्यात आला (२२ मे १९९८). उत्तर आयर्लंडमधील सत्तर टक्के लोकांनी या शांतता करारास पाठिंबा दर्शविला, तेव्हा ह्यूमने कृतज्ञता व्यक्त केली. यानंतर त्याने सक्रिय राजकारणातून आपले अंग काढून घेतले मात्र समुद्राच्या प्रदूषणविषयक सल्लागार समितीत व अन्य सामाजिक कार्यांत तो सहभागी होता. आयर्लंडच्या राजकीय इतिहासातील एक महनीय व्यक्तिमत्त्व व शांतता प्रक्रियेचा प्रणेता म्हणूनही तो परिचित आहे.

ह्यूमने पॅट्रिशिया होन या युवतीशी १९६० मध्ये विवाह केला. त्यांना दोन मुलगे व तीन मुली असून पॅट्रिशिया त्याला सामाजिक कार्यांत मदत करीत असते.

नोबेलव्यतिरिक्त ह्यूमला पुढील पुरस्कार-सन्मान लाभले : सन्मान्य एल्एल्.डी. (१९९५), फ्रीडम ऑफ स्पीच मेडल (१९९६), मार्टिन ल्यूथर किंग पीस अवॉर्ड (१९९९), इंटरनॅशनल गांधी पीस प्राइझ (२००१), गांधी, किंग, इकेडा कम्युनिटी बिल्डर्स प्राइझ (२००५), सेंट टॉमस युनिव्हर्सिटी सन्मान्य डी. लिट्. (२००७), आयर्लंड ग्रेटेस्ट पुरस्कार (२०१०), नाइट ऑफ सेंट ग्रेगरी पुरस्कार (२०१२). आयर्लंडमधील शांतताप्रक्रियेसाठी ह्यूमने दिलेल्या अथक योगदानाबद्दल भूतपूर्व अमेरिकन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी त्याची भेट घेऊन (५ मार्च २०१४) त्याला मानवंदना दिली.

ह्यूमने स्फुटलेखांबरोबरच स्वतंत्र ग्रंथलेखन केले. त्यांपैकी न्यू आयर्लंड (१९९६), पर्सनल व्ह्यूज : पॉलिटिक्स, पीस अँड रिकन्सिलिएशन इन आयर्लंड (१९९६), डेरी बियाँड दि वॉल्स : सोशल अँड इकॉनॉमिक ॲस्पेक्ट्स ऑफ दि ग्रोथ ऑफ डेरी (२००२) इ.महत्त्वाचे व मान्यवर होत.

चौधरी, जयवंत