अर्थशास्त्र, कौटिलीय : कौटिल्याने रचलेला इ.स.पू. चौथ्या शतकातील संस्कृत ग्रंथ. कौटिल्याचीच चाणक्य, विष्णुगुप्त इ. नावे आहेत असे म्हणतात. सम्राट चंद्रगुप्त मौर्याचा (इ.स.पू. ३२२–२९८) चाणक्य हा गुरू व महामंत्री होता व तोच कौटिल्य होय, असे बऱ्‍याच विद्वानांचे मत आहे. कौटिल्य या राजनीतिज्ञाचे विचार व सिद्धांत सांगणारा अर्थशास्त्र हा ग्रंथ आहे हे सर्वमान्य असले, तरी तो खास कौटिल्याने रचला की नाही याबद्दल विद्वानांमध्ये मतभेद आहेत निदान शंका आहे. म्हैसूर येथील पौर्वग्रंथसंग्रहालयाचे व्यवस्थापक डॉ. शामशास्त्री ह्यांस ह्या ग्रंथाची हस्तलिखित प्रत १९०४ च्या सुमारास प्रथम उपलब्ध झाली. त्यांनी सर्वांगीण अभ्यास करून व संपादून हा ग्रंथ १९०९ साली प्रसिद्ध केला. त्यानंतर अनेक भारतीय व भारताबाहेरील विद्वानांनी ह्या ग्रंथाची इंग्लिश व इतर भाषांमध्ये भाषांतरे, संशोधनपूर्ण विवरणे व टीका प्रसिद्ध केल्या.

 

कौटिलीय अर्थशास्त्रात राजनीतिशास्त्र बऱ्‍याच विस्ताराने सांगितले आहे. परंतु पाश्चात्त्यांच्या अर्थाने ह्यास

‘राज्यशास्त्रीय’ ग्रंथ असे पूर्णार्थाने म्हणता येणार नाही. राज्य ह्या संस्थेची उत्पत्ती, तिचा विकास, सत्ता व अधिकार यांचे तात्त्विक स्वरूप नागरिक या कल्पनेचे स्पष्टीकरण अशा स्वरूपाचे तात्त्विक व  सैद्धांतिक विवेचन यात नाही. ह्याबाबत अनुषंगाने काही आले असले, तरी ग्रंथकाराला मुख्यतः राज्य कसे मिळवावे व चालवावे हेच सांगावयाचे आहे. या ग्रंथात पूर्वीच्या राजनीतिकार आचार्यांची नावे व विचार उल्लेखिलेले आहेत. यांवरून या ग्रंथापूर्वी हे शास्त्र लिखित स्वरूपात बऱ्‍याच प्रमाणात निर्माण झाले होते असे मान्य करावे लागते. नंतरही हजार-दीडहजार वर्षे संस्कृतातून राजनीतिविषयक ग्रंथांची निर्मिती होतच होती.

 

ह्या ग्रंथात त्रिवर्ग म्हणजे धर्म, अर्थ व काम असे तीन पुरुषार्थ सांगितले असून हे तिन्हीही पुरुषार्थ अन्योन्याश्रित म्हणजे परस्परपोषक आहेत असे म्हणून त्यात अर्थ हाच प्रधान होय, धर्म व काम हे अर्थावलंबी आहेत, असे कौटिल्याचे मत मुख्य सिद्धांत म्हणून  प्रतिपादिले आहे. ‘अर्थ म्हणजे मनुष्याची वृत्ती म्हणजे जीवन आणि अर्थ म्हणजे मनुष्य राहतो ती भूमी’ असे ‘अर्थ’ शब्दाचे दोन अर्थ सांगून ‘मनुष्यवती भूमी मिळविणे व तिचे पालन करणे याचा उपाय म्हणजे अर्थशास्त्र’ अशी व्याख्या त्यात सांगितली आहे.

 

धर्मशास्त्रकारांनी म्हणजे स्मृतिकारांनी दंडनीती किंवा राजनीती ही धर्मशास्त्रातच अंतर्भूत केली आहे. परंतु अर्थशास्त्राच्या पूर्वपरंपरेप्रमाणे राजनीती हा धर्मशास्त्राचा भाग नसून ते स्वतंत्र शास्त्र आहे. राजधर्म हा स्वतंत्र विषय आहे आणि त्याचे विवरण धर्मशास्त्रावर अधिष्ठित असू नये, अशी दृष्टी कौटिल्यपूर्व बार्हस्पत्य व औशनस इ. राजनीतिकारांची होती व तीच कौटिल्याने मान्य केली. ऐहिक पद्धतीने म्हणजे धर्मकल्पनानिरपेक्ष असा राजकीय विचारांचा ऊहापोह कौटिलीय अर्थशास्त्रातच प्रथम केलेला सापडतो. या शास्त्राची विचारपद्धती वास्तववादी आहे.

 

या ग्रंथात निर्दिष्ट केलेले राजनीतिकार─मानव, बार्हस्पत्य, औशनस, पाराशर, आंभीय (सर्व बहुवचनी निर्देश) व भारद्वाज, विशालाक्ष, पिशुन, कौणपदंत, वातव्याधी आणि बाहुदन्तीपुत्र (सर्व एकवचनी निर्देश) हे होत. या ग्रंथात एकूण पंधरा अधिकरणे आहेत. पहिल्या पाचांत राज्यशासन व पुढील आठांत अन्य राजसत्तांशी संबंध आणि शेवटच्या दोहोंत क्रमाने अधार्मिकांच्या नाशाचे गुप्त उपाय व शास्त्ररचना-पद्धती हे विषय प्रामुख्याने येतात. सर्व ग्रंथ प्रायः गद्य स्वरूपातच आहेत परंतु प्रत्येक अध्यायाच्या शेवटी व क्वचित मध्येही काही श्लोक आहेत. हे श्लोक ३८० च भरतात. परंतु या ग्रंथात सहा सहस्र श्लोक आहेत असे म्हटले आहे, ते जुळत नाही. ३२ अक्षरे म्हणजे श्लोक असे एक प्रसिद्ध मापन लागू केले, तरी या ग्रंथात ४,८०० श्लोकांइतकाच मजकूर सापडतो. भाषा आणि शैली प्राचीन सूत्रांच्या शैलीसारखी गद्यपद्यमिश्रित व संक्षिप्तार्थक आहे. विशिष्ट परिभाषेमुळे व संस्कृतमध्ये अन्यत्र न सापडणाऱ्‍या अनेक संज्ञांमुळे काही ठिकाणी ती क्लिष्ट वाटत असली, तरी एकंदरीत सुगम अशीच आहे.

 

राज्याची अंतर्गत शासकीय व्यवस्था आणि त्याचे परराष्ट्रसंबंध यांविषयी सर्व दृष्टिकोनांचा आढावा घेणारे खंडनमंडनात्मक असे सविस्तर विवेचन या ग्रंथात केलेले आहे. कोणत्याही राज्याची स्वामी, अमात्य, जनपद, दुर्ग, कोश. दण्ड आणि मित्र अशी सात अंगे सांगून प्रत्येकाविषयी तपशीलवार विवेचन केले आहे. प्रजेला संतुष्ट ठेवून व धाकातही ठेवून राज्यकारभार कसा करावा आणि त्याकरिता उपर्युक्त सातही अंगांचे रक्षण कसे करावे, याचे व्यावहारिक भूमिकेतून त्या काळाला योग्य असे मार्गदर्शन केले आहे. परराष्ट्रसंबंधांचा ऊहापोहही स्वराज्याचे स्थैर्य व वृद्धी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून केलेला दिसतो.

 

कौंटिल्य हा मॅकिआव्हेली ह्या मध्ययुगीन यूरोपीय राजनीतिशास्त्रज्ञाप्रमाणे कुटिल राजकारणाचा पुरस्कर्ता होता, असे मत मांडले जाते, व त्यात तथ्यही आहे. राजाने आपले आसन स्थिर ठेवण्याकरिता व राज्यविस्ताराकरिता सर्वसामान्यांना लागू होणारे किंवा प्रजेला लागू होणारे नीतिनियम बाजूस ठेवण्याचा प्रसंग आला, तर तसे करावे असे कौटिल्याचे मत आहे. तथापि कौटिल्याने कुटिल आणि कठोर उपायांची जी तरफदारी केली आहे, ती मुख्यतः राजद्रोही व समाजकंटक यांच्या विरुद्ध केली आहे, हे ध्यानी घेणे आवश्यक आहे. मॅकिआव्हेलीपेक्षा कौटिल्याचा विशेष असा, की त्याच्या मते राजाचे कल्याण व सुख प्रजेच्या कल्याणात, सुखात, व विशेषतः वर्णाश्रमधर्माच्या रक्षणात सामावले आहे आणि त्याला याहून अधिक श्रेयस्कर असे दुसरे काहीही असू शकत नाही. जमिनीची मशागत, पाणीपुरवठा, सार्वजनिक आरोग्य, प्रजांच्या नवीन वसाहती वसविणे, धातूंच्या खाणी व अन्य उद्योगधंदे उभारणे इ. अनेक बाबतींत कौटिल्याने सांगितलेल्या कल्याणकारी योजनांवरून त्याची प्रजाभिमुख राजनीती सुस्पष्टपणे दिसून येते.

 

या ग्रंथाइतका राजनीतिविषयक मूलगामी ग्रंथ संस्कृत भाषेत निर्माण झालेला आढळत नाही पुढील काळात कामंदक वगैरेंनी लिहिलेले राजनीतिविषयक ग्रंथ, मनु-याज्ञवल्क्यादिकांच्या स्मृतींमध्ये आलेले राजधर्माविषयीचे अनेक विचार आणि पुराणांतील अनेक ठिकाणचे राजनीतिविषयक विवेचन या सर्वांवर या ग्रंथाचा प्रभाव पडलेला दिसतो.

 

प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती जाणून घेण्याच्या दृष्टीने अर्थशास्त्र  हा एक वैशिष्ट्यपूर्ण साधनग्रंथ आहे. त्यात ऐतिहासिक घडामोडींचे विशेषसे उल्लेख नसले, तरी मौर्यकालापासून तिसऱ्‍या शतकापर्यंतच्या भारतीय समाजाची सर्वसाधारण स्थिती जाणून घेण्यास हा ग्रंथ फारच उपयुक्त आहे. नेपाळची लोकरीची वस्त्रे, पुंड्रक व काशी येथील रेशीम, मथुरा व अपरांत येथील कापसाचे कापड, मगध व मैकल येथील वजन तयार करण्यासाठी वापरले जाणारे पाषाण, कंबोज व आरट्ट येथील घोडे, कलिंग व दशार्ण येथील हत्ती अशा कितीतरी गोष्टींचे स्पष्ट उल्लेख त्यात आहेत. चोऱ्‍या, व्यभिचार इ. गुन्हे व त्यांसंबंधी सांगितलेल्या शिक्षा यांवरून तत्कालीन समाजजीवनावर बराच प्रकाश पडतो. शेती, उद्योग व व्यापार, कामगार, दास-विषयक कायदेकानून व करपद्धती ह्यांच्या विवेचनावरून तत्कालीन अर्थकारणाची बरीच कल्पना येते. चक्रवर्ती राजा, दुर्बल गणराज्ये ह्यांसारख्या काही उल्लेखांवरून राजकीय स्थितीचेही थोडेबहुत आकलन होते. एकंदरीत, अनेक दृष्टींनी एक ऐतिहासिक साधनग्रंथ म्हणूनही ह्या ग्रंथाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

 

या ग्रंथावरील चारपाच जुन्या संस्कृत टीका, अपूर्ण वा त्रुटित स्वरूपात मिळतात. गणपतिशास्त्री यांची श्रीमूल ही संपूर्ण नवी संस्कृत टीका त्रिवेंद्रम संस्कृत सिरीजमध्ये प्रकाशित झालेली आहे.

 

पहा : चाणक्य मौर्यकाल राज्यशास्त्र.

 

संदर्भ : 1. Kangle, R. P., Ed. The Kautiliya ArthasastraPart I, II, III, Bombay, 1960, 1963, 1965.

    २. कंगले, र. पं. प्राचीन भारतीय राजनीती, मुंबई, १९६९.

    ३. हिवरगावकर, व. रा. करंदीकर, ज. स. कौटिलीय अर्थशास्त्र─पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, मुंबई, १९२७, १९२९.

 

जोशी, लक्ष्मणशास्त्री