कोल, जॉर्ज डग्लस हॉवर्ड : (२५ सप्टेंबर १८८९–१४ जानेवारी १९५९). एक थोर ब्रिटिश राजकीय विचारवंत  व श्रेणी समाजवादाचा एक प्रवर्तक अर्थशास्त्रज्ञ. ईलिंग (लंडन) येथे जन्म. सेंट पॉल आणि पुढे बेल्यल महाविद्यालय (ऑक्सफर्ड) येथून पदवी घेऊन मॅग्डेलीन महाविद्यालयात १९१२ मध्ये अधिछात्र झाला. विद्यार्थिदशेतच त्याला लेखनाची गोडी लागली. त्याने जगातील विविध मजूर संघटनांचा अभ्यास करून द वर्ल्ड ऑफ लेबर (१९१३) हे पुस्तक लिहिले. त्यात जगातील कामगार संघटना व कामगार चळवळी यांचा अभ्यासपूर्ण वृत्तान्त आढळतो. तत्पूर्वी ऑक्सफर्ड रिफॉर्मर  हे पुस्तक इतरांबरोबर संपादित केले. १९२५ ते १९४४ पर्यंत ऑक्सफर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र या विषयात प्रपाठक आणि त्यानंतर अर्थशास्त्र व राज्यशास्त्राचा प्राध्यापक म्हणून त्याने काम केले. विद्यापीठात असताना त्याचे अनेक सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांशी निकटचे संबंध आले. काही मजूर संघटनांचा तो सल्लागारही होता. न्यू स्टेट्समन   नेशन  ह्या वृत्तपत्रांतून तो तत्कालीन राजकीय स्थितीवर लिहीत असे. मजूरपक्षाचा तो १९१७ मध्ये सभासद झाला. तत्पूर्वीच तो श्रेणी समाजवादाचा पुरस्कार करू लागला. श्रेणी समाजवादाच्या आद्य प्रवर्तकांपैकी तो एक होता. १९१५ मध्ये त्याने नॅशनल गिल्ड्ज लीग ही संस्था स्थापन केली तथापि त्याचा ओढा फेबियन मतप्रणालीकडे हाेता. त्या संस्थेचा तो अध्यक्ष म्हणूनही निवडला गेला. संघसत्तावाद व समावाद यांत समन्वय करण्याचा प्रयत्न त्याने आपल्या द वर्ल्ड ऑफ लेबर  या ग्रंथात केला आहे. विकेंद्रित लोकशाही समाजवादाची कल्पना प्रथम त्यानेच मांडली, असे म्हटल्यास अतिशययोक्ती होणार नाही.

जी. डी. एच्. कोल

त्याने अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व इतिहास या विषयांवर तसेच चरित्रात्मक असे सु. १३० ग्रंथ लिहिले. याशिवाय त्याने आपल्या मार्गारेट इझाबेला या पत्नीच्या सहकार्याने सु. १५ रहस्यमय कादंबऱ्या लिहिल्या. त्याची पुस्तके अभ्यासपूर्ण, मुद्देसूद, तात्त्विक व वस्तुस्थिती वर्णन करणारी आहेत.  त्यांचा उपयोग संदर्भग्रंथ  म्हणून आजही होतो. त्यांतील सेल्फ-गव्हर्नमेंट इन इंडस्ट्री (१९१७), ॲन इंटलीजंट मॅन्‌स गाइड टू द पोस्ट- वॉर वर्ल्ड (१९४७), ए शॉर्ट हिस्टरी ऑफ द ब्रिटिश वर्किंग-क्लास मुव्हमेंट (१९२५–२७), द कॉमन पीपल (सहलेखक आर्.पोस्ट गेट १९३८), हिस्टरी ऑफ सोशलिस्ट थॉट (पाच खंड, १९५३–६०), व्हॉट मार्क्स रीअली मेंट (१९३४) वगैरे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. याशिवाय त्याची द लाइफ ऑफ विल्यम कॉबेट (१९२४) आणि द लाइफ ऑफ रॉबर्ट ओएन (१९२५) ही दोन चरित्रात्मक पुस्तके विशेष गाजली.

कोल हा विद्यार्थी व मजूर ह्यांत अत्यंत लोकप्रिय होता. राज्यशास्त्राचा आधुनिक अभ्यासक म्हणून त्याचा उल्लेख होतो. तो लंडन येथे वयाच्या सत्तराव्या वर्षी मरण पावला.

संदर्भ : Cole Margaret, The Story of Fabian Socialism, Standford, १९६१.

देशपांडे, सु. र.