हेरास, फादर हेन्री : (११ सप्टेंबर १८८८–१४ डिसेंबर १९५५). स्पॅनिश धर्मगुरू व इतिहासकार. त्याचा जन्म स्पेनमधील बार्सेलोना येथे मध्यमवर्गीय धार्मिक कुटुंबात झाला. त्याने सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी घेऊन जेझुइट सोसायटीत उच्च शिक्षणाबरोबरच ख्रिस्ती धर्मशास्त्राचाही अभ्यास केला आणि १९२० मध्ये धर्मोपदेशक म्हणून नियुक्त झाला. त्यानंतर तो सॅक्रेड हार्ट कॉलेज, बार्सेलोना येथे इतिहासाचा प्राध्यापक म्हणून रुजू झाला. तत्पूर्वी त्याने इत्सल्वडोर कॉलेज, सॅरगॉसा (सारागोस्सा) येथे प्राचार्य म्हणून कार्यभार सांभाळला. 

फादर हेन्री हेरास

१९२२ मध्ये हेरासचे भारतात आगमन झाले व लगेचच त्याची सेंट झेविअर्स कॉलेज, मुंबई येथे इतिहासाचा प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर त्याने भारतीय इतिहास संशोधनामध्ये स्वतःला वाहून घेतले. मुंबईमध्ये त्याने इंडियन हिस्टॉरिकल इन्स्टिट्यूट नावाची संस्था काढली (१९३६). त्यात ग्रंथालय स्थापन केले. त्यामध्ये सु. पंचवीस हजार ग्रंथ असून त्यांपैकी काही ग्रंथ अत्यंत दुर्मिळ आहेत. साधारणतः याच कालावधीत त्याने लिहिलेला द रायटिंग ऑफ हिस्टरी हा ग्रंथसुद्धा संशोधनाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला. त्याने आपल्या आयुष्याची अनेक वर्षे दऱ्याखोऱ्यांमधून फिरत पुरातन वस्तुशास्त्राचे बारकावे शोधून त्याचे संशोधन करण्यात खर्च केली. सध्या उपलब्ध असलेल्या वस्तूवरून त्या काळच्या पुरातनकालीन लोकांविषयींचे ज्ञान मिळविण्याचे जे शास्त्र आहे, त्या पुरातनशास्त्राविषयीचा असलेला त्याचा गाढा अभ्यास, कामगिरी आणि योगदान फार मोलाचे होते. तसेच त्याचा सिंधू संस्कृतीबद्दल सखोल अभ्यास होता. शिवाय त्याचे सिंधू संस्कृतीविषयीचे जे ज्ञानभांडार आहे, ते स्टडीज इन प्रोटो-इन्डो-मेडिटरेनिअन कल्चर या सहाशे पन्नास पृष्ठांच्या ग्रंथात शब्दबद्ध केले आहे (१९५१). हे त्याच्या परिश्रमाचे फळ आहे. सिंधू संस्कृतीविषयीची माहिती नसणे, त्याविषयी अनेक शंका-कुशंका, अनुत्तरित प्रश्न असणे, या सर्व प्रश्नांना सततच्या आत्यंतिक परिश्रमाने उत्तरे मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न त्याने या ग्रंथात केला आहे. 

हेरासचे व्यक्तिमत्त्व अत्यंत अभ्यासू असून त्याने केलेले पुरातन-वस्तुशास्त्राविषयीचे कार्य नव्या पिढीला प्रेरणादायी असेच आहे. तो बाँबे हिस्टॉरिकल सोसायटीचा संस्थापक असून त्याचा अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी निकटचा संबंध होता.

अल्पशा आजाराने हेरासचे मुंबई येथे निधन झाले. त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ हेरासने स्थापन केलेल्या इंडियन हिस्टॉरिकल इन्स्टिट्यूट या संस्थेचे नंतर हेरास इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन हिस्टरी अँड कल्चर असे नामकरण करण्यात आले. त्याच्या पंचविसाव्या स्मृतिदिनी केंद्र शासनाने त्याचे छायाचित्र असलेले पोस्टाचे तिकीट काढले.

सोसे, आतिश सुरेश