खानखोजे, पांडुरंग सदाशिव : (७ नोव्हेंबर १८८४–१८ जानेवारी १९६७). एक सुविख्यात कृषितज्ञ व भारताबाहेर राहून भारतीय स्वातंत्र्यासाठी अहर्निश झटणारे सुप्रसिद्ध क्रांतिकारक. पालकवाडी (वर्धा) येथील एका इतिहासप्रसिद्ध घराण्यात जन्म. प्राथमिक शिक्षण वर्धा येथे घेऊन पुढे १९०२ मध्ये मॅट्रिकच्या परीक्षेस बसले. प्रथमपासून त्यांना क्रांतीविषयी आकर्षण होते. म्हणून लग्न करण्याचे टाळून ते टिळकांच्या सल्ल्यानुसार सैनिकी शिक्षणासाठी परदेशात जाण्यास धडपडू लागले आणि कसेबसे सैनिकी शिक्षणासाठी ते जपानला गेले. १९०८ मध्ये सॅन फ्रॅन्सिस्कोला भूकंप होऊन हानी झाली. ती निस्तारण्यासाठी मजूर हवे होते. मजूर म्हणूनच ते पुढे अमेरिकेस गेले. तेथे कॅलिफोर्निया आणि वॉशिंग्टन विद्यापीठांत शिक्षण घेऊन शेतकी विषयात एम्.एस्‌सी. झाले (१९१३). त्याच सुमारास त्यांनी इंडियन इंडिपेंडन्ट पार्टी या नावाची संस्था स्थापन केली. अमेरिकेत राहून भारतात सशस्त्र क्रांती घडवून आणण्याच्या चळवळीत त्यांचा प्रमुख भाग होता. पहिल्या महायुद्धाच्या काळात त्याच कामासाठी ते पश्चिम आशियात आले व ब्रिटीश पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी इराणातील एका संस्थानात कृषितज्ञ म्हणून त्यांनी नोकरी धरली. तेथून ते जर्मनीत गेले आणि यूरोपातील क्रांतिकारकांशी त्यांनी संपर्क सांधला. महायुद्ध संपल्यानंतर ते अमेरिकेस परत गेले, परंतु ब्रिटिश पोलिसांच्या त्रासामुळे ते शेवटी १९२४ मध्ये मेक्सिकोमध्ये स्थायिक झाले. तेथे शेतकीविषयक मौलिक संशोधन केल्याबद्दल त्यांचा नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्स ह्या संस्थेतर्फे गौरव करण्यात आला.

न्यूयॉर्कमध्ये स्थापन झालेल्या द हिंदुस्थान असोसिएशन ऑफ अमेरिका या संस्थेच्या संस्थापकांपैकी ते होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर खानखोजे मध्य प्रांतातील कृषिमंत्र्यांच्या निमंत्रणावरून भारतात परतले. भारत सरकारने दरमहा अडीचशे रुपयांचे निवृत्तीवेतन त्यांना दिले होते. नागपूर येथे हृदयविकाराच्या झटक्याने ते मरण पावले.

फरांडे, वि. दा.