श्रमिक संघसत्तावाद : ( सिंडिकॅलिझम ). समाजवादी पुनर्रचना हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून सामाजिक कांतीसाठी प्रयत्न करणारी कांतिकारक तत्त्वप्रणाली. कांतिकारी व अराज्यवादी मूलघटक असलेली, ती श्रमिकवर्गाची भांडवलदारविरोधी चळवळ वा मतप्रणाली होय. सिंडिकॅलिझम ही संज्ञा फ्रेंच सिंदिकत ( श्रमसंघ ) या शब्दावरून रूढ पल्या प्रयत्नांच्या आणि संघटनेच्याझाली. यूरोपात व विशेषत: फ्रान्समध्ये विसाव्या शतकारंभी तिचा प्रभाव होता. या तत्त्वप्रणालीनुसार कामगारांनी आ बळावर भोवतालच्या परिस्थितीत बदल घडवून आणला पाहिजे. ही चळवळ प्रसिद्घ रशियन कांतिकारक व ⇨ अराज्यवादा चे पुरस्कर्ते ⇨म्यिकईल बकून्यिन आणि ⇨प्यॉटर कपॉटक्यिन यांच्या अराज्यवादी विचारांतून पुढे आली. तिच्यावर मार्क्सच्या तत्त्वज्ञानाचाही प्रभाव होता. यूरोप व लॅटिन अमेरिकी देशांत तिचा प्रभाव पडला. पुढे ही चळवळ इटली व स्पेनमध्येही प्रसृत झाली तथापि श्रमिक संघसत्तावादाचा खरा जोर फ्रान्समध्येच होता. तत्कालीन फ्रान्समध्ये लहान उदयोगधंदयांतील कामगार चळवळींमध्ये सातत्य नव्हते तसेच घटनात्मक शासनपद्धतीत अडचणी निर्माण होत. यामुळे फ्रेंच कामगारवर्ग पारंपरिक कामगार चळवळ आणि संसदीय लोकशाहीचे राजकारण, यांपेक्षा अधिक जहाल आणि कांतिकारक चळवळीच्या शोधात होता. म्हणूनच श्रमिक संघसत्तावादाने कांतीची शंभर वर्षांची परंपरा असणाऱ्या फ्रान्समध्ये पाय रोवले. १८७१ च्या अयशस्वी कांतीनंतर फ्रेंच कामगार संघटनांवर बंधने आली, तसेच अनेकांना फासावर चढविण्यात आले. पुढे सरकारने ही बंधने सैल केली तथापि फ्रेंच उदयोगधंदयांचे तत्कालीन स्वरूप विकेंद्रित असल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर कामगार संघटना बांधणे अवघड झाले होते.१८९५ नंतर फेंच कामगार चळवळींवर जहाल साम्यवादी गटांचा प्रभाव वाढला. सनदशीर चळवळींवर त्यांचा फारसा विश्वास नव्हता.

श्रमिक संघसत्तावादाचे तत्त्वज्ञान फ्रेंच कामगारनेता फेर्नां पेल्यूत्ये (१८६७१९०१) आणि ⇨ जॉर्ज सॉ रेल यांनी मांडले. ही प्रणाली व संघटना बळकट करण्याच्या कामी पेल्यूत्येने महत्त्वाची भूमिका बजावली. श्रमिक संघसत्तावादी आपल्या प्रणालीस समाजवादाची नवी विचारप्रणाली मानतात. त्यांनी तडजोडी करणारे पारंपरिक वाटाघाटीचे मार्ग आणि राजकीय सत्ता हस्तगत करण्याचे कांतिकारक मार्ग या दोहोंचा अव्हेर केला. त्यांच्या मते कामगारवर्ग हा उत्पादकवर्ग असून त्याचे सर्जनशील कार्य मानवी व्यक्तिमत्त्वाच्या विकासाचा श्रेष्ठ असा आविष्कार आहे. आर्थिक हितसंबंधांबरोबरच इतर बाबतींतही प्रत्येक सामाजिक वर्गाचे हितसंबंध वेगळे असतात. तसेच सत्य व असत्य यांबाबत त्यांचे निकषही वेगळे असतात. समाजात बहुविविधता असते. राज्यसंस्था या सर्व वर्गांना एकत्र आणू शकत नाही कारण ती समाजातील मालमत्ताधारकांची बटीक असते. नव्या संदर्भात कामगारवर्गच आपल्या श्रमिक संघाच्या व्दारे समाजाची पुनर्रचना करू शकतो. म्हणून कामगारांना स्वातंत्र्य देऊन त्याच्या उत्पादक-शक्ती मोकळ्या केल्या पाहिजेत. ‘ मुक्त समाजात मुक्त काम ’ हे ध्येय कामगारवर्गाने निर्माण केलेल्या संघटनांतच विकसित होऊ शकते. त्यामुळे समाजाच्या नवनिर्मितीत श्रमिक व त्यांचे संघ यांची भूमिका महत्त्वाची ठरते.

श्रमिक संघवादी कांतिकारक विचारांवर विश्वास ठेवतात व हिंसेच्या मार्गाने आपला प्रभाव वाढवावा, असे त्यांचे मत आहे. त्यासाठी त्यांनी व्यापक अशा सार्वत्रिक संपाची कल्पना मांडली आहे. या संपापूर्वी वातावरणनिर्मितीसाठी इतर संप केले जातील पण शेवटचा सार्वत्रिक संप सत्ता प्राप्त करण्यासाठी करावयाचा असतो. या संपाबरोबर मोर्चे, निदर्शने, दंगे व इतर हिंसक मार्गांचा अवलंब केला जातो. राजकीय सुधारणांवर या प्रणालीचा विश्वास नव्हता. 

सॉरेलच्या मते प्रत्येक सामाजिक चळवळीत मिथ्यकांची भूमिका महत्त्वाची असते. समाजातील बहुसंख्य लोक शास्त्रीय युक्तिवादापेक्षा स्वप्नरंजन करणाऱ्या मिथ्यकांनी प्रेरित होत असतात. त्यांच्या दृष्टीने मिथ्यक त्यांना नव्या युगाचे स्वप्न दाखविते. मिथ्यकांमुळे हजारो लोक चळवळीत येतात आणि त्यांच्या व्यापक सहभागामुळे समाजात परिवर्तन होते. उदा., अठराव्या शतकात समता व स्वातंत्र्य या मिथ्यकांच्या आधारावरच भांडवलशाहीचा आर्थिक व राजकीय विकास झाला.

हिंसा, घातपाताच्या कारवाया, बहिष्कार आणि हिंसक संप ही श्रमिक संघसत्तावादयांची मुख्य हत्यारे होती. राज्याच्या राजकीय प्रकियेत सहभागी होण्याची त्यांची तयारी नव्हती. कामगारांचे लढे दडपण्यासाठी राज्याचा उपयोग होतो. तात्त्विक दृष्टया राज्यसंस्था ही चुकीची कल्पना आहे कारण सामाजिक ऐक्य प्रस्थापित करण्याचे अशक्य असे उद्दिष्ट तिच्यासमोर असते. समाज बहुविध स्वरूपाचा असतो आणि कोणतीही राज्यघटना त्यास एकात्म करू शकत नाही. भांडवलशाही व्यवस्थेत संसद निरनिराळ्या सामाजिक गटांत ऐक्य साधू शकत नाही. त्यामुळे राज्यसंस्थेचा नाश करणे, कामगारांच्या हातात उत्पादनाची व विनिमयाची साधने देणे व सर्व सत्ता श्रमिक संघांच्या हाती देणे, ही श्रमिक संघसत्तावादाची उद्दिष्टे होती. थोडक्यात भांडवली अर्थव्यवस्था व राजकारण यांना कडाडून विरोध करणारी ही विचारसरणी होती. भांडवलशाही अर्थव्यवस्था व राज्यसंस्था यांना नष्ट करण्यासाठी प्रत्यक्ष कृतीचा श्रमिक संघवादयांनी पुरस्कार केला व  खाजगी मालमत्तेस विरोध केला. राज्यकांतीनंतर कशा प्रकारचा समाज स्थापन करावयाचा आहे, याचा फारसा गंभीर विचार त्यांनी केला नाही पण काही ज्येष्ठ विचारवंतांनी त्याबाबत काही विवेचन केले आहे. त्यांच्या मते समाजाच्या व उदयोगांच्या व्यवस्थापनाचे कार्य श्रमिक संघच करतील. राष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या संघटनांस व्यापक स्वायत्तता देण्यात येईल. स्थानिक श्रमिक संघांना तांत्रिक माहिती देण्यासाठी व सल्ला देण्यासाठी राष्ट्रीय स्तरांवर संघ असतील. राष्ट्रीय स्तरावर नियम व धोरणे ठरविण्यासाठी Confe’de’ration Ge’ ne’rale du Travail (सीजीटी) सारखा व्यापक कामगारसंघ असेल. श्रमिक संघाच्या सत्तेचे रक्षण करण्यासाठी सशस्त्र बळही असेल परंतु व्यावसायिक सैन्य व लष्करी शाळा मात्र असणार नाहीत. प्रत्येक व्यक्ती आपले स्वातंत्र्य मूल्यवान मानून त्याचे संरक्षण करील.


 श्रमिक संघसत्तावादयांच्या मते मार्क्सच्या मूळ तत्त्वज्ञानाचा तर्कशुद्ध विकास त्यांनी केला. सॉरेलच्या मते मार्क्सचे विद्रोहाचे तत्त्व त्यांनी खऱ्या अर्थाने पुढे नेले पण मार्क्सच्या कामगारवर्गाच्या हुकूमशाहीच्या कल्पनेस व उदयोगांच्या केंद्रीकरणाच्या कल्पनेस त्यांचा विरोध होता. क्रांतीनंतर राज्यसंस्थेचा लगेच विलय झाला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. राज्याच्या आज्ञा पाळण्यास व त्याचे अस्तित्व कायमस्वरूपी मानण्यास सॉरेल व इतर श्रमिक संघसत्तावादयांनी नकार दिला.

पहिल्या महायुद्धापूर्वी यूरोपमधील अनेक देशांत श्रमिक संघसत्तावादी विचारांचा प्रभाव वाढला. इंग्लंडच्या मजूरपक्षातही या प्रणालीबद्दल सहानुभूती बाळगणारे नेते होते. शिकागो येथे १९०५ मध्ये इंटरनॅशनल वर्कर्स ऑफ द वर्ल्डची स्थापना झाली पण या संघटनेतही प्रत्यक्षकृतिवादी श्रमिक संघवादी व राजकीय समाजवादी यांच्यांत मतभेद झाले. वेगवेगळ्या देशांतील सरकारांनीही चळवळ मोडून काढण्याचे प्रयत्न केले. शिवाय वाटाघाटी व राजकीय प्रकियेच्या द्वारा सुधारणा घडवून आणण्यावर विश्वास असणारा वर्ग कामगारांत नेहमीच प्रबळ राहिला. तरीही १९११ ते १९१३ यांदरम्यान श्रमिक संघवादयांनी ब्रिटनमध्ये काही संप घडवून आपल्या आकमक राजकारणाची चुणूक दाखविली. पहिल्या महायुद्धानंतर फ्रान्समध्ये नव्या श्रमिक संघसत्तावादाचा उदय झाला. त्यांनी राजकीय प्रकियेत भाग घेण्यास असणारा विरोध कमी केला. उत्पादनाची प्रकिया आणि तीमधून निर्माण होणारे व्यवस्थापन, संशोधन, वितरण, कारागिरी यांसारख्या प्रश्नांचाही त्यांनी विचार केला व अतिरेकी मार्गाचा त्याग केला. या परिवर्तनात पेरो, मॅक्सिम लेरॉ यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी हिंसा व हुकूमशाही यांस विरोध केला. उदयोगांचे सहकारी तत्त्वाच्या आधारे कसे नियमन करता येईल, याचाही त्यांनी विचार केला.

विसाव्या शतकाच्या सुरूवातीस व त्याआधीही श्रमिक संघसत्तावाद ही महत्त्वाची चळवळ होती. कामगारांच्या चळवळी स्वायत्त व स्वयंशासित कशा होतील, याचा या चळवळीने विचार केला. तथापि या चळवळीच्या विचारप्रणालीतच तिचा पराभव गर्भित होता कारण या चळवळीने अतिरेकी हिंसा आणि अव्यवहार्य अराज्यवाद यांचा पुरस्कार केला. कामगारांच्या वेगवेगळ्या श्रेणींत एकोपा कसा राहील आणि समाजाचे योग्य व्यवस्थापन कसे करता येईल, यांचाही विचार श्रमिक संघसत्तावादयांनी केला नाही पण जगातील कामगारांना जागृत करण्याचे व त्यांचे आकमक लढे जिद्दीने लढविण्याचे काम त्यांनी केले. तसेच या चळवळीने अधिकारीतंत्रवाद (ब्यूरोकॅटिझम ) आणि संपुंजित राजकीय सत्ता या धोक्यांविषयी इशारा दिला, जागृती केली.

संदर्भ : 1. Coker, F. Recent Political Thought, Calcutta, 1966.

             2. Levine, L. Syndicalism in France, New York, 1914.

             3. Lewis, Arthur, Syndicalism and the General Strike, 1976.

             4. Sorel, G. Reflications on Violence, New York, 1914.

             5. Spargo, J. Sindicalism, Industrial Unionism and Socialism, New York, 1913.

चौसाळकर, अशोक