असहकारिता : कोणाही व्यक्तीच्या, समाजाच्या अगर सत्तेच्या कार्याशी नीती अगर न्याय ह्या दृष्टीने सहकार्य करणे अयोग्य आहे असे वाटल्यावरून, त्यांच्या कार्यातून आपले अंग काढून घेऊन त्या कामापासून संपूर्णपणे अलिप्त राहणे, म्हणजे असहकार करणे होय. असा असहकार सामाजिक जीवनामध्ये अनेक वेळा करावा लागणे अपरिहार्य आहे. अशा असहकार करण्याच्या स्थितीस असहकारिता असे म्हणता येईल.

सर्व प्रकारचे सामाजिक व राजकीय जीवन हे माणसा-माणसांच्या सहकार्यावरच अवलंबून असते. कुटुंब, गाव, उद्योगधंदे, वाहतूक, शिक्षण, सरकार, युद्ध इ. सर्व सामुदायिक व्यवहारांचा आधार माणसाचा परस्परसहकार होय. पती व पत्नी, मालक व मजूर, विद्यार्थी व शिक्षक, शास्ता व शासित, सैनिक व सेनापती यांच्यापैकी कोणीही एका बाजूने असहकार केला, तर तो-तो व्यवहार स्थगित होईल वा कोलमडेल. अन्यायाचा प्रतिकार करण्याकरिता असहकारासारखे शुद्ध व प्रभावी साधन नाही. परंतु त्याकरिता असहकार करणार्‍यांच्या ठायी आत्मबलाची आवश्यकता असते. प्रबल प्रतिपक्षाच्या हिंसक आक्रमणापुढे टिकेल इतके आत्मबल पाहिजे. शुद्ध नीतिनिष्ठा व शरीरकष्ट, दु:खे वा मृत्यूदेखील स्वीकारण्याची तयारी, हे आत्मबल होय. 

असहकारितेचा उपयोग जगाच्या इतिहासात राजकीय क्षेत्रात प्रथम ⇨ महात्मा गांधींनी केला. अशी असहकारिता हा सत्याग्रहाचाच एक प्रकार होय. राजसत्तेच्या अन्याय्य अगर जुलमी कृत्याला नि:शस्त्र विरोध करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे ते मानीत. ह्यासच ते ‘सत्याग्रह’ अगर ‘नि:शस्त्र प्रतिकार’ म्हणत असत. ह्या तंत्राचा उपयोग त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील गोऱ्या राजसत्तेविरुद्ध १९०६ पासून १९१४ पर्यंत काहीसा यशस्वीपणे केला. परंतु परकीय सत्तेच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ह्या तंत्राचा उपयोग होऊ शकेल, असे गृहीत धरून त्यांनी भारतात १९२० मध्ये प्रथम असहकारितेचे आंदोलन उभारले. 

परंतु सत्याग्रह करीत असताना कोणत्याही व्यक्तीच्या जीविताला अगर मालमत्तेला धक्का पोचेल किंवा तिची नासधूस होईल, अशी कृती करण्यापासून किंवा तसे दुसर्‍याला उत्तेजन देण्यापासून स्वत:ला आवरणे आवश्यक आहे, असे गांधीजी म्हणतात. 

राजसत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याने पापप्रवृत्तीही वाढते. उलट, पापप्रवृत्तीचा आधार काढून घ्यावयाचा असेल तर हिंसेपासून पूर्णपणे निवृत्त होण्याची गरज असते, असे गांधीजी आग्रहाने म्हणत. त्यांचा असहकाराचा लढा हा अहिंसक लढा होता व अत्यंत कठोर हृदयाला वा अत्यंत स्वार्थी प्रतिपक्षी असला, तरी त्याच्या मनात पालट करण्याची शक्ती अहिंसक असहकारितेत आहे, असा त्यांचा आत्मविश्वास होता. ह्यामुळे अहिंसा हा असहकाराचा अत्यंत महत्त्वाचा व अभिन्न भाग आहे, असे गांधीजींचे स्पष्ट मत होते. 

असहकारितेचे आंदोलन : दक्षिण आफ्रिकेतून १९१५ साली परत आल्यानंतर महात्मा गांधींनी आपल्या अहिंसक अगर अनत्याचारी असहकारितेचा प्रयोग चंपारण्यातील मजूर व खेडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध यशस्वी रीतीने करून दाखविला. १९१९ साली संमत केलेल्या रौलट ॲक्ट ह्या नावाने कुप्रसिद्ध असलेल्या जुलमी विधेयकाविरुद्ध गांधीजींनी प्रचंड चळवळ सुरू केली. त्यामुळे चिडून ब्रिटिश सरकारने दडपशाहीस सुरुवात केली. पंजाबात अमानुष अत्याचार करण्यात आले व त्याचे पर्यवसान जलियानवाला बागेतील भीषण हत्याकांडात १३ एप्रिल १९१९ रोजी झाले. त्याच वेळी खिलाफतीसंबंधी हिंदी मुसलमानांना दिलेल्या वचनाचा ब्रिटिश सरकारने भंग केला. १९१९ साली घोषित केलेल्या राजकीय सुधारणाही अत्यंत असमाधानकारक होत्या. ह्या सर्व अन्यायावर एकमेव उपाय म्हणून गांधीजींनी १९२० मध्ये आपल्या अनत्याचारी असहकाराच्या राष्ट्रव्यापी चळवळीची घोषणा केली.

ह्या चळवळीचा अत्यावश्यक भाग म्हणून विधिमंडळे, न्यायालये व विद्यालये ह्यांवरील बहिष्कार, सरकारी नोकऱ्या व सरकारी पदव्या वगैरेंचा त्याग व अन्याय्य वाटणाऱ्या कायद्याचा सविनय भंग—असा असहकाराचा कार्यक्रम गांधीजींनी देशापुढे ठेवला व त्यास पोषक म्हणून परदेशी कापडावर बहिष्कार व स्वदेशी, विशेषत: हातकताईच्या कापडाचा पुरस्कार असे विधायक कार्यक्रम आखले. परंतु केवळ असहकार केल्यामुळे परकीय सत्ता नष्ट होणे शक्य नाही हे जाणून त्यांनी प्रत्यक्ष सविनय करबंदीचा प्रयोग बार्डोली तालुक्यात करण्याचे ठरविले. परंतु ह्या सत्याग्रहाची प्रत्यक्ष सुरुवात होण्यापूर्वीच उत्तर प्रदेशातील गोरखपूरजवळील चौरीपुरा येथे ५ फेब्रुवारी १९२२ ला हिंसात्मक दंगे झाले व देश अद्याप शांततामय सत्याग्रहास आवश्यक तितका शांततामय नाही, असे ठरवून गांधीजींनी सत्याग्रह स्थगित केला. 

स्वातंत्र्याच्या चळवळीचे लोण भारताच्या खेडोपाडी नेऊन सामान्य नागरिकांमध्ये अन्यायाचा प्रतिकार करण्याची व त्याचबरोबर प्रतिकार करताना परकीय सरकारने केलेला छळ सहन करण्याची क्षमता निर्माण करण्याचे महान कार्य असहकाराच्या ह्या चळवळींनी केले, ह्यात शंका नाही. स्वातंत्र्यासाठी लढताना आवश्यक असलेला आत्मविश्वास ह्या चळवळीमुळे जनतेत प्रगट झाला. असहकारितेचे तत्त्व स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतच्या गांधींनी चालविलेल्या आंदोलनांमध्ये अंतर्भूत होते. 

पहा : भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास सत्याग्रह.

नरवणे, द. ना