भगतसिंग : (२८ सप्टेंबर १९०७?-२३ मार्च १९३१). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर सशस्त्र क्रांतीकारक. प. पंजाबमधील (विद्यमान पाकिस्तान) वंग (जिल्हा ल्यालपूर) या गावी एका शेतकरी-देशभक्त शीख कुटुंबात जन्म. आई विद्यावती व वडील किशनसिंग. किशनसिंग लाला लजपतराय यांच्याबरोबर मंडालेच्या तुरुंगात होते. त्यांना क्रांतीकारी वाङमयाचा प्रसार केल्याबद्दल १० महिन्यांची शिक्षा झाली (१९०९). प्राथमिक शिक्षण बंग येथे घेऊन भगतसिंग लाहोरच्या डी ए व्ही व पुढे नॅशनल कॉलेजमधून बी ए झाले (१९२३). विद्यार्थिदशेत जयचंद विद्यालंकार व भाई परमानंद या शिक्षकद्वयींचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. डी.ए.व्ही. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना उभारण्यात पुढाकार घेतला आणि आजन्म अविवाहित राहून स्वातंत्र्य लढयात सहभागी होण्याची शपथ घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना होण्याची शपथ घेतली. त्यांनी प्रारंभीच्या काळात काँग्रेस मध्येही प्रवेश केला होता परंतु काँग्रेसचे तत्कालीन धोरण त्यांना रुचले नाही. गदर चळवळीचे एक नेते कर्तारसिंग सरवा यांना दिलेली फाशी (१९१५), रोलट कायदा व जालियनवाला बाग येथील हत्याकांड (१९१९) यांसारख्या घटनांमुळे लाहोर हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र बनले होते. भगतसिंगनी १९२३ पासून १९३१ मध्ये फाशी देईपर्यंत आपले सर्व जीवन मातृभूमीच्या स्वातंत्र्याला समर्पित केले. १९२३ मध्ये हिंदुस्थानात सोशॅलिस्ट रिपब्लिकन ॲसोसिएशन या संस्थेत ते दाखल झाले. त्यांची लौकरच मध्यवर्ती समितीचा सचिव म्हणून नियुक्ती झाली. संघटित रीत्या कार्य करणाऱ्या सुखदेव, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, भगवती चरण, जतींद्रनाथ दास वगैरेंचे सहकार्य त्यांनी घेतले व नवजवान भारत सभा ही कट्टर देशभक्त युवकांची संघटना स्थापन केली (१९२५). त्याच वेळी उत्तर प्रदेशात सचिंद्रनाथ संन्याल यांच्या नेतृत्वाखाली गुप्तसंघटनेचे जाळे पसरले होते. तिचे वाड्मय लाहोरला आणून प्रसृत करण्याचे कार्य त्यांनी अंगीकारले. तसेच पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश हे भाग स्वातंत्र्य चळवळीच्या दृष्टीने संघटित करण्यास घेतले. नवजवान भारत सभेची शाखा लाहोरला स्थापून तिचे नेतृत्वही त्यांनी केले. चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, जतींद्रनाथ दास इत्यादींच्या मदतीने त्यांनी विविध क्रांतिकारक योजना आखल्या : काकोरी खटल्यात दोषी ठरलेल्या सचिंद्रनाथ संन्याल, जोगेश्वर चतर्जी इत्यादींना जन्मठेपीच्या किंवा दीर्घमुदतीच्या शिक्षा झाल्या होत्या. यांतील रामप्रसाद बिस्मिल, रोशनसिंग, राजेंद्रनाथ लाहिडी, अशफाकुल्ला हे चौघे फासावर गेले होते. फक्त चंद्रशेखर आझाद फरारी राहून त्यांनी उरलेल्यांची जुळवाजुळव केली व क्रांतिकार्यास आरंभ केला. काकोरी खटल्यातील बंदींची तुरंगातून सुटका करणे, सायमन आयोग व त्याच्या शिफारशी यांविरुद्ध तीव्र निपेध नोंदविणे, शस्त्रे जमा करणे, महत्त्वाच्या केंद्रांत बाँब कारखाने चालू करणे, लाला लजपतराय यांच्यावर ज्याने लाठी हल्ला केला (या हल्ल्यामुळे लालाजी आजारी पडून पुढे मरण पावले) त्या जे.ए.स्कॉट या पोलीस अधिकाऱ्यास ठार मारुन त्याचा सूड घेणे इ. कार्यक्रम त्यांनी आयोजित केले.
याप्रमाणे कुंदनलाल व चंद्रशेखर आझाद या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी कानपूरच्या तुरंगातून संन्याल व जागेश्वर चतर्जी यांची सुटका करण्यासाठी कट रचला पण तत्पूर्वीच १९२६ च्या दसऱ्याला लाहोरमध्ये झालेल्या बाँबस्फोट प्रकरणी भगतसिंगांना पकडले. परंतु सबळ पुराव्या अभावी त्यांना सोडण्यात आले. त्यानंतर विविध प्रांतांत क्रांतिसंघटनांचे कार्य करणाऱ्यांची एक बैठक १९२८ च्या ऑगस्टमध्ये दिल्लीच्या फिरोझशाह किल्ल्यात भरली. चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानात सोशॅलिस्ट रिपब्लिकन ॲसोसिएशन या संस्थेने पंजाबातील सर्व कार्याचे नेतृत्व भगतसिंगाकडे दिले. तिचे जाळे सर्वत्र पसरले होते. पुढे या संस्थेचे रुपांतर नवजवान सैनिकसंघ (हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मी) या संस्थेत करण्यात आले. सर्व शाखांशी संपर्क ठेवून एकसूत्रता आणायचे कार्य भगतसिंगांवर सोपविण्यात आले होते. त्यानंतर सायमन आयोगाचे मुंबईत आगमन झाले (३ फेब्रुवारी १९२८). आयोगाच्या सदस्यांना नेणाऱ्या आगगाडीवर तसेच मनमाड स्थानकाच्या आवारात बाँबस्फोट करण्यात आले तथापि आयोग लाहोरला सुखरुप पोहोचला. तिथे लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली उग्र निदर्शने झाली. त्या वेळी झालेल्या लाठीहल्ल्यात लालाजी घायाळ झाले आणि त्यातच नंतर त्यांचे निधन झाले (१७ नोव्हेंबर १९२८ रोजी). या घटनेमुळे देशभर असंतोषाची तीव्र लाट पसरली. लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्या हल्ल्याचा मुख्य सुत्रधार पोलीस अधीक्षक स्कॉट याचा खून करण्याचा निर्धार भगतसिंग व त्यांचे साथीदार चंद्रशेखर आझाद व शिवराम राजगुरु यांनी केला परंतु ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी आलेल्या स्कॉटऐवजी दुसरा पोलीस अधिकारी जे.पी.साँडर्स हा स्कॉट समजून मारला गेला (१७ डिसेंबर १९२८). तेव्हा भगतसिंगांच्या हस्ताक्षरांतील ‘साँडर्स मरण पावला’, लालाजींच्या खुनाचा सूड घेतला गेला’, अशी पत्रके लाहोरच्या रस्त्यांवर झळकली. भगतसिंग तेथून फरारी होऊन कलकत्त्याला गेले आणि त्यांनी जतींद्रनाथ दास यांना आणवून आग्रा व लाहोर येथे बाँब कारखाने सुरु केले. पुढे त्यांच्या क्रांतिकारक पक्षाने दोन अन्यायकारक विधेयकांचा (ट्रेड डिस्प्युट बिल व पब्लिक सेफ्टी बिल) निषेध म्हणून बटुकेश्वर दत्त व भगतसिंग यांच्याकडे दिल्लीच्या केंद्रीय विधानसभेत ब्रिटिशांच्या हुकूमशाही वृत्तीचा निषेध करण्यासाठी बाँब टाकण्याचे काम विश्वासपूर्वक सोपविले. सभागृहात ८ एप्रिल १९२९ रोजी ही विधेयके मांडण्यात आली. प्रेक्षकसज्जांतून बटुकेश्वर दत्त व भगतसिंग यांनी बिलाचा निर्णय देण्यासाठी विठ्ठलभाई पटेल उभे राहताक्षणीच सज्जातून सभागृहात बाँब फेकले, हवेत गोळ्या झाडल्या व निषेधपत्रके फेकली. पुढे दोघेही ‘इन्किलाब जिंदाबाद’ अशा घोषणा देत सरकारच्या स्वाधीन झाले. निषेधपत्रात “जाणूनबुजून बहिऱ्या झालेल्यांसाठी ‘हा मोठा आवाज केला आहे’ आणि ‘मानवाचे मानवाकडून शोषण बंद होईल’ अशा खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी बलिदान चालू आहे”, असे नमूद केले होते. हा व इतर अनेक आरोप लादून त्यांना व त्यांच्या सहकार्यांना शिक्षा ठोठवण्यात आल्या. भगतसिंगाना प्रथम काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली (१२ जून १९३०) पण पुढे खास न्यायाधिकरणाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली (७ आँक्टोबर १९३०). या शिक्षेची अंमलबजावणी शिवराम हरी राजगुरु व सुखदेव ऊर्फ दयाळ यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेबरोबर लाहोरमधील मध्यवर्ती तुरंगात २३ मार्च १९३१ रोजी करण्यात आली. या क्रांतिकारकांची शिक्षा कमी करण्यासाठी म.गांधी व काँग्रेस यांनी प्रयत्न केले परंतु त्यांस यश आले नाही.
भगतसिंगांना ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देश मुक्त करण्यासाठी रशियन क्रांतीच्या धर्तीवर उठाव करावयाचा होता, असे म्हटले जाते. त्यांनी कम्युनिस्टांचे वाड्मय विशेषतः कार्ल मार्क्सचा दास कॅपिटल आणि कम्युनिस्ट जाहीरनामा यांचा अभ्यास केला होता. भगतसिंग एक तडफदार वृत्तपत्रकार होते. अर्जुंन (दिल्ली), प्रताप (कानपूर) इ. नियतकालिकांतुन बसवंतसिंग या टोपणनावाने त्यांचे स्फुटलेखन प्रसिद्ध होत असे. अमृतसरमधून प्रकाशित होणाऱ्या अकाली व कीर्ति या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात असंख्य हुतात्मे झाले, सशस्त्र क्रांतीचेही अनेक प्रयत्न झाले पण आपल्या कर्तव्यनिष्ठेने, त्यागाने, नेतृत्वाने, धाडसाने आणि अत्युच्च आहुतीने ऐन तारुण्यात सबंध देशात चैतन्य निर्माण करणारे भगतसिंग अद्वितीय होते. त्यांची प्रेरणा फक्त स्वातंत्र्यप्राप्तीची नव्हती, तर समाजवादी क्रांतीची, शोषणरहित मानव समाजनिर्मितीची होती, हे त्यांच्या जबान्या, निषेधपत्रक व एकूण कार्यावरुन स्पष्ट होते.
भारत – पाकिस्तान फाळणी नंतर त्यांची दफनभूमी हुसेनीवाला हा भाग पाकिस्तानात गेला होता पण भारत सरकारने बदली जमीन देऊन तो मिळविला. तेथे १९६८ मध्ये सरकारतर्फे भव्य स्मारक उभारण्यात आले. त्या वेळी भगतसिंगांच्या वृद्ध माता विद्यावती तेथे उपस्थित होत्या.
संदर्भ : 1. Chatterji, Jogesh Chandra. In Search of Freedom, Delhi, 1966.
2. Gupta, Manmath Nath, History of the Revolutionary Movement in India, Delhi, 1960.
3. Khullar, K. K. Shaheed Bhagat Singh, Delhi, 1981.
4. Singh, Gulab, Under the Sheadows of Gollows, Delhi, 1963.
५. नगरकर, व. वि. भारतीय स्वातंत्र्य संग्राम, पुणे, १९८१.
६. बन्साल, रतनलाल, तीन क्रांतिकारी शहीद, आग्रा, १९५४.
शेख, रुक्सना
“