सकल-जर्मनवाद : अखिल जर्मन भाषिक किंवा जर्मानिक भाषा समूहातील भाषा बोलणाऱ्यांचे राजकीय एकीकरण करण्याच्या उद्देशाने संस्थापित झालेले आंदोलन. या आंदोलनाचे बीज इ. स. १८१३-१५ दरम्यान जर्मन एकीकरणाच्या पहिल्या नेपोलियनविरूद्धच्या स्वातंत्र्ययुद्धात आणि फीड्रिख लुडविक यान व अर्न्स्ट मॉरिट्झ अर्न्ड या जर्मन राष्ट्रवादी विचारवंतांच्या प्रेरणेत आढळते. हा वाद राष्ट्रीय अस्मितेचा अपत्य होता आणि त्याचे स्वरूप पूर्णत: राजकीय होते. त्यामुळे आंदोलनाचा उद्देश राष्ट्रीयत्वाचे संवर्धन, परदेशातील जर्मन बंधूंना सहकार्य करणे व जर्मन सत्तेचा विस्तार हा होता. यातील काही अनुयायी हे आंदोलन मध्य व पूर्व यूरोपातील जर्मन भाषिकांपुरते मर्यादित असावे, या मताचे होते तर काहींना ऑस्ट्रियन साम्राज्याच्या आधिपत्याखालील सर्व जर्मन भाषिकांना त्यात अंतर्भूत करावे, असे वाटत होते. काहींनी स्कँडिनेव्हियाचाही अंतर्भाव यात करावा असे सुचविले. फीड्रिख लिस्ट, कॉन्स्टंटिन फांट्स वगैरे लेखकांनी असा दावा केला की, या संकल्पनेचा मध्य व पूर्व यूरोपमध्ये प्रदेश-विस्तारासाठी उपयोग करावा. याच सुमारास (एकोणिसाव्याचा उत्तरार्ध) आर्य वंशाच्या श्रेष्ठत्वाच्या कल्पनेचा पुरस्कार जोसेफ आर्थर द गोबिनो याने एसे ऑन द इक्वॅलिटी ऑफ ह्यूमन रेसिस (इं. भा. १८५३-५५) या पुस्तकाव्दारे केला. त्यामुळे प्रभावित झालेल्या जर्मन नागरिकांनी नॉर्डिक किंवा जर्मन वंश वाखाणण्यास सुरूवात केली.

अर्न्स्ट हॅस या प्राध्यापकाच्या प्रयत्नांनी १८९४ मध्ये ‘ पॅन जर्मन लीग ’ या संघाची स्थापना झाली. त्यामुळे पूर्वीची ‘ जनरल जर्मन लीग ’ (१८९१) ही संस्था मागे पडली. हॅसच्या संघाचा उद्देश जर्मनीबाहेरील जर्मन भाषिकांत राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करणे हा होता. तसेच जर्मनीचा साम्राज्यवाद यूरोपात प्रसृत करण्याचा होता. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभकाळात संघाचे धोरण फार आकमक बनले. ‘ लक्षात ठेवा, तुम्ही जर्मन आहात’, हे त्याचे ब्रीद वाक्य होते. पुढे कार्ल हेर्मान वुल्फ वगैरेंनी सकल – जर्मनवादाचा प्रसार-प्रचार ऑस्ट्रिया – हंगेरीत केला आणि स्लाव्ह, ज्यू आणि भांडवलशाही यांवर प्रहार केला. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर जहाल राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. शिवाय वांशिक भेदास आणि जर्मनीतील अल्पसंख्याकांवरील जुलूमास उत्तेजन दिले. पहिल्या महायुद्धात (१९१४-१८) जर्मनीचा पराभव झाल्यामुळे हे आंदोलन काही वर्षे थंडावले, तरीसुद्धा राष्ट्रवाद व वांशिक भेद यांचे पुनरूज्जीवन करण्याचे प्रयत्न थांबले नव्हते. या धोरणामुळे ॲडॉल्फ हिटलरचे व्यक्तिमत्त्व घडले. वायमार प्रजासत्ताकाच्या काळात (१९१९-३३) सकल – जर्मनवादयांनी विस्तारवादी धोरण अंगीकारले. त्यातून हिटलर व त्याच्या नाझी पक्षाचा उदय झाला आणि विस्तारवादी धोरणाच्या प्रचाराला भूराजनीती या सैद्धांतिक उपपत्तीचा आश्रय लाभला. हिटलरने या संधीचा फायदा घेऊन ऑस्ट्रिया, रशिया, चेकोस्लोव्हाकिया वगैरे देशांवर आकमण केले आणि ज्यूंची कत्तल आरंभिली. पोलंडवरील आकमणाने दुसऱ्या महायुद्धास तोंड फुटले. त्यात हिटलर आणि जर्मनी यांचा दोस्त राष्ट्रांकडून दारूण पराभव झाला (१९४५). जर्मनीच्या राजकीय पीछेहाटीबरोबर सकल – जर्मनवादाचा प्रभाव कमी झाला. यूरोपच्या अन्य जर्मनव्याप्त भागांतून जर्मन भाषिकांची हकालपट्टी करण्यात आली.

संदर्भ : 1. Usher, Ronald G. Pan-Germanism, Boston, 1913.

2. Werth- eimer, Mildred S. The Pan-German League, 1890–1914, New York, 1924.

शिंदे, आ. ब.