पोलादी पडदा : ‘आयर्न कर्टन’ या इंग्रजी संज्ञेचा मराठी प्रतिशब्द. ‘पोलादी पडदा’ या मार्मिक वाक्‌प्रचाराचा प्रयोग रशिया व इतर साम्यवादी यूरोपीय देशांना उद्देशून दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात करण्यात आला. शीतयुद्धाच्या सुरुवातीचा तो कालखंड होता. आपली सत्ता स्थिर राखण्यासाठी पाश्चात्त्य प्रचारांपासून आपल्या जनतेस दूर ठेवण्यासाठी या देशांनी सर्व प्रकारच्या संदेशवहन व्यवस्थेवर सरकारी नियंत्रण ठेवले मुक्तसंचार, शासनविरोधी भाषणलिखाण यांवर बंदी घातली परदेशगमन अथवा परकीयांचे आगमन, परकीय वृत्तपत्रे, चित्रपट, रेडिओ इत्यांदीवर कडक नियंत्रण ठेवले. अशा रीतीने यूरोपचे लष्करी, आर्थिक व राजकीय तत्त्वप्रणाली यांच्या दृष्टीने साहजिकच दोन स्वतंत्र भाग पडले. ह्यास उद्देशून विन्स्टन चर्चिल यांनी अमेरिकेतील वेस्टमिन्स्टर महाविद्यालयात (फुल्टन) दिलेल्या व्याख्यानात (५ मार्च १९४६) पोलादी पडदा ही संज्ञा वापरली. कम्युनिस्ट आक्रमणाच्या धोक्याचा इशारा देऊन ते म्हणाले की, ‘यूरोपमध्ये श्टेटीन ते ट्रीएस्ट असा एक जणु अभेद्य पोलादी पडदा रशियाने उभा केला असल्यामुळे त्या पलीकडच्या देशांत काय चालले आहे, कशाची तयारी चालली आहे हे कळणे दुरापास्त झाले आहे’.

चीनमध्ये साम्यवादी सत्ताधीश सत्तेवर आल्यावर (१९४९) त्यांनीही असेच तुटकपणाचे धोरण अंगीकारले. याला उद्देशून ‘बांबू पडदा’ ही संज्ञा पुढे रूढ झाली.

जोझेफ स्टालिनच्या मृत्यूनंतर (१९५३) या धोरणात हळूहळू शैथिल्य आले. नंतरच्या रशियन सत्ताधाऱ्यांनी सापेक्षतः उदार धोरण अवलंबिले तसेच परराष्ट्र संबंधांतील तणाव कमी करण्यास सुरुवात केली. पुढेपुढे साम्यवादी गटातही फूट पडून त्यातील यूगोस्लाव्हिया, अल्बेनिया, चीन हे देश बाहेर पडले. तंत्रविज्ञानात प्रगती झाल्यामुळे रेडिओ, दूरचित्रवाणी यांवर परिणामकारक नियंत्रण ठेवणे कठीण झाले. या सर्वांचा परिणाम म्हणजे या देशांचा पाश्चात्त्य देशांशी व्यापारी व्यवहार वाढला आणि सांस्कृतिक, वैज्ञानिक व तांत्रिक क्षेत्रांत देवाणघेवाण सुरू झाली.

हेल्‌सिंकी येथे झालेल्या यूरोपीय सुरक्षा परिषदांत (१९७३–७५) सहभागी होऊन रशिया आणि इतर यूरोपीय साम्यवादी देशांनी आंतरदेशीय विवाह, आंतरदेशीय पर्यटन, क्रीडा स्पर्धा, वृत्तपत्रे, पत्रकार इत्यादींना सुविधा पुरवून विविध मार्गांनी पाश्चात्त्य जगातील लोकांशी वेगवेगळ्या पातळ्यांवरील संबंध वाढविण्याचे मान्य केले. परिणामतः एकूणच आंतरराष्ट्रीय संबंधांत पोलादी पडद्याचे युग संपून ⇨देतान्तचे नवे पर्व सुरू झाले आहे.

पहा : शीतयुद्ध.

मोरखंडीकर, रा. शा.