जू-द : (१८ डिसेंबर १८८६–६ जुलै १९७६). चिनी कम्युनिस्टांच्या क्रांतियुद्धातून पुढे आलेला एक सेनापती व लाल सैन्याचा एक संस्थापक. द. चीनच्या सेचवान प्रांतातील ईलुंग या खेड्यातील सधन शेतकरी कुटुंबात जन्म. त्याचे प्राथमिक शिक्षण खेड्यातच झाले. वयाच्या विसाव्या वर्षी चंगडू शारीरिक प्रशिक्षण विद्यालयाचा शिक्षणक्रम त्याने पूर्ण केला. काही काळ तेथे शारीरिक शिक्षणाचा प्रशिक्षक म्हणूनही त्याने नोकरी केली. १९०९ मध्ये कुनमिंग येथे युनान लष्करी अकादमीत त्याने शिक्षण घेतले. मांचू राजसत्तेविरुद्ध क्रांती घडवून आणण्यासाठी सन्-यत्-सेन यांनी उभारलेल्या सैन्यात तो अधिकारी झाला.

१९१६–२१ ह्या काळात चीनमधील तत्कालीन युद्धनेत्यांसारखेच जू-दचे जीवन स्वैर व विलासी होते. पण १९२१ सालापासून त्याने आपल्या जीवनात आमूलाग्र बदल केला व क्रांतिकारकाला आवश्यक असा साधेपणा स्वीकारला. या सुमारास शांघायमध्ये तरुण विद्यार्थी क्रांतिकारकांशी त्याचा परिचय झाला. मार्क्सवादाचा अभ्यास करण्यासाठी १९२२ मध्ये तो जर्मनीस गेला. तेथे त्याचा चौ एन-लायशी परिचय झाला. तेथे गटिंगेन विद्यापीठात त्याने शिक्षण घेतले. १९२६ साली रशियामार्गे त्याला जर्मनीतून हद्दपार केले. तो रशियामार्गे चीनला परत आल्यावर त्याची जिआंगसी प्रांताच्या सावर्जनिक सुरक्षा खात्याचा प्रमुख म्हणून नेमणूक झाली. नवीन लष्करी उमेदवारांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही त्याने स्वीकारली. या कामामुळे क्वोमिंतांगच्या सैन्यात त्याच्या हाताखाली लढलेल्या सैनिकांशी त्याचा पुन्हा  संपर्क आला.

१९२७ मध्ये कम्युनिस्टांनी केलेला नानचुंगचा उठाव चँग कै-शेकने चिरडून काढला. कम्युनिस्ट सैन्याची वाताहत झाली. जू-द हा पन्नास हजार सैनिकांनिशी प्रथम चौएन-लाय याला मिळाला. माओ-त्से-तुंगने आपले विस्कळित सैन्य घेऊन जिआंगसी प्रांताच्या सीमेवरील अभेद्य पर्वतांच्या प्रदेशात आश्रय घेतला व तेथे पहिले सोव्हिएट स्थापन केले. माओने जू-दला आपल्याकडे बोलावून घेतले आणि त्यास सैन्याचे नेतृत्व दिले. त्याने लाल सैन्याची पुनर्घटना केली. त्याच्या या कार्यामुळे तीन वर्षांतच चिनी कम्युनिस्ट काँग्रेसने त्याची सरसेनापती म्हणून एकमताने निवड केली. क्वोमिंतांगच्या हल्ल्यापासून वाचविण्यासाठी ९,६०० किमी. दूर जाण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हा त्या दीर्घ मोर्चाचे धुरंधर नेतृत्व जू-दने केले. ही त्याची एक मोठी लष्करी कामगिरी समजण्यात येते. या ‘लांग मार्च’च्या काळापासून १९४९ पर्यंत क्वोमिंतांग व जपानी आक्रमक यांच्याशी झालेल्या लढायांत त्याने लाल सैन्याचे नेतृत्व केले. अपुरे संख्याबळ आणि मर्यादित शस्त्रास्त्रे असतानाही आधुनिक शस्त्रसामग्रीने युक्त अशा फौजांशी त्याने लाल सैन्याला झुंजविले. अभिनव डावपेच व अत्यंत वेगवान हालचालींचे तंत्र यांच्या साहाय्याने त्याने त्यांच्याविरुद्ध आलेल्या प्रत्येक सेनापतीचा पराभव केला. तो आपल्या सैनिकांशी मिळून मिसळून वागत असे. जू-दची पत्नी कांग को-चिंग हीही गनिमी सैन्याच्या एका पथकाचे नेतृत्व करीत होती.

१९५५ मध्ये माओ-त्से-तुंगने त्याला मार्शल हा किताब दिला. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या राजकीय व मध्यवर्ती समितीचा तो उपाध्यक्ष होता. तसेच पीपल्स लिबरेशन आर्मीचा तो प्रमुख होता. नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या अध्यक्षपदीही त्याची निवड झाली होती. या स्थानावर असतानाच तो निधन पावला.      

साक्रीकर, दिनकर