सावरकर,नारायण दामोदर : (१० मे १८८९–१४ ऑक्टोबर १९४९). स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे धाकटे बंधू आणि अनुयायी तसेच कादंबरीकार, चरित्रकार आणि इतिहासकार. आईवडिलांच्या मृत्यूनंतर  नारायण दामोदर सावरकरस्वातंत्र्यवीर, तसेच गणेश दामोदर ऊर्फ ⇨ बाबाराव सावरकर यांनी त्यांचा सांभाळ केला. कोलकात्याच्या ‘नॅशनल मेडिकल कॉलेजा’तून त्यांनी दंतवैद्यकातील पदवी संपादन केली आणि मुंबईत दंतवैद्याचा व्यवसाय करू लागले. काही काळ ते काँग्रेसच्या राजकारणात होते पण स्वातंत्र्यवीरांच्या राजकीय विचारांकडून प्रेरणा मिळून ते हिंदुहासभेचे निष्ठावंत कार्यकर्ते बनले. सावरकरी विचारांना वाहिलेल्या श्रद्घानंद ह्या साप्ताहिकाचे ते सात वर्षे संपादक होते. हिन्दूंचा विश्वविजयी इतिहास हा त्यांचा इतिहासग्रंथ १९४४ मध्ये प्रसिद्घ झाला. हिंदू संस्कृतीचा एके काळी सर्व जगभर कसा प्रसार झाला होता, हे या ग्रंथातून दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जाईचा मंडप (दोन खंड, १९१२ १९१३) ही कादंबरी त्यांनी ‘जातिहृदय ’ या टोपणनावाने लिहिली. मरण की लग्न?–पूर्वार्ध (१९३३) ही कादंबरी त्यांनी आपल्या मूळ नावाने लिहिली असून ती १८५७ च्या बंडावर आहे. या बंडातले सेनापती तात्या टोपे ह्यांचे चरित्र त्यांनी लिहिले (१९३२).

कुलकर्णी, अ. र.