लुमुम्बा, पॅट्रिस एमरी : (२ जुलै १९२५-१३ फेब्रुवारी १९६१). आफ्रिकेतील झाईरे प्रजासत्तकाचा पहिला पंतप्रधान (३० जून-५ सप्टेंबर १९६०). बेल्जियन काँगोमधील बाटेटेला जमातीत, कॅथलिक कुटुंबात, ईशान्य प्रांतातील सांकुर्‍यू जिल्ह्यातील ऑनल्यूआ गावी त्याचा जन्म झाला. त्याने मिशन विद्यालयातून शिक्षण घेतले तथापि ते अपूर्णच राहिले. तो नियतकालिकांतून कविता व निबंध लिहीत असे. पुढे त्याला बेल्जियमचे नागरिकत्व मिळाले आणि स्टॅन्लीव्हिल येथील डाककार्यालयात कारकुनाची नोकरी मिळाली. पुढे तेथेच तो लेखापाल झाला. त्याने तेथील कामगारांची संघटना स्थापन केली. या काळात त्याचा अनेक सामाजिक-सांस्कृतिक संस्थांशी संबध आला तसेच वृत्तपत्रातूनही तो निर्भीडपणे लिहू लागला. १९५५ मध्ये तो बेल्जियन कामगार संघटनेचा सभासद आणि बेल्जियन लिबरल पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता बनला. त्यामुळे त्यास तुरुंगवासही भोगावा लागला. त्यानंतर त्याला एका बीर कंपनीत विक्री विभाग संचालक नेमण्यात आले. या पदावर असतानाच त्याचा लोकसंपर्क वाढला आणि त्याने काँगोलींची राष्ट्रीय चळवळ उभी केली (नॅशनल मूव्हमेन्ट ऑफ काँगोलीज-एम्. एन्. सी.) व तिचा तो अध्यक्ष झाला (१९५८).

या सुमारास राष्ट्रीय चळवळीत मतभेद झाले आणि लुमुम्बाचा गट अधिक प्रभावी ठरला. तेव्हा दंगधोपे निर्माण होऊन त्यात लुमुम्बाला अटक करण्यात आली (नोव्हेंबर १९५९). स्वातंत्र्यापूर्वी सर्व राजकीय पक्षांची बेल्जियन शासनाद्वारे ब्रूसेल्स येथे गोलमेज परिषद बोलविण्यात आली. त्यावेळी लुमुम्बाला तुरुंगातून मुक्त करण्यात आले. ३० जूनला निवडणुका घेण्याचे ठरले. त्यात एम्. एन्. सी ला इतर पक्षांच्या तुलनेत सर्वाधिक जागा मिळाल्या (१३७ पैकी ४१). लुमुम्बा राजकीय नेता म्हणून प्रसिद्धीस आला आणि त्यास मंत्रिमंडळ बनविण्यासाठी पाचारण करण्यात आले (३० जून १९६०). तो स्वतंत्र काँगोचा पंतप्रधान झाला.

स्वातंत्र्यानंतर थोड्याच काळात काँगोमध्ये लष्कराने उठाव केला. लुमुम्बाने आणीबाणी जाहीर केली. त्याच्या विनंतीवरून संयुक्त राष्ट्रांनी शांतीसेना पाठविली तथापि परिस्थिती नियंत्रणाखाली येईना म्हणून त्याने रशियाची मदत मागितली. ५ सप्टेंबर १९६० रोजी अध्यक्ष जोसेफ कासावुबू याने लुमुम्बास पदच्युत केले परंतु राष्ट्रीय सभेने या पदच्युतीस मान्यता दिली नाही. पुढे लष्करातील कर्नल जोसेफ मोबुटू यांच्या नेतृत्वाखालील एका तुकडीने त्याविरूद्ध उठाव केला आणि लुमुम्बाला नजरकैदेत ठेवले. तेथून तो पळाला. कासावुबू व मोबुटू यांनी त्यास पुन्हा पकडले (जानेवारी १९६१) आणि कटांगात पाठविले. तुरुंगातून पळून जात असताना त्यास गोळ्या घालून मारण्यात आले, असे सरकारतर्फे जाहीर करण्यात आले (१३ फेब्रुवारी १९६१). कटांगा येथे त्याला आणल्यानंतर लगेचच तुरुंगात मारले गेले असा प्रवाद आहे. संयुक्त राष्ट्रांनी त्याची चौकशीही केली पण साक्षीदारांनी सहकार्य करण्यास नकार दिल्याने तीतून काही निष्पन्न झाले नाही. त्याच्या मृत्यूनंतर काँगोत अस्थैर्य निर्माण झाले. आंतरराष्ट्रीय वर्तुळात त्याच्या मृत्यूचा निषेध करण्यात आला.

लुमुम्बाची आफ्रिकी जगातील लोकप्रियता त्याच्या गूढ मृत्यूमुळे अधिक वाढली. त्याने अल्पकाळ राजकीय जीवन उपभोगले तथापि त्यातही त्याचे प्रखर व्यक्तिमत्व प्रकर्षाने दृष्टोत्पत्तीस येते. तो विविध भाषांत अस्खलित संभाषण करीत असे. त्यामुळे त्याचा लोकसंग्रह मोठा होता आणि त्यात सर्व स्तरांतील लोक होते. घानाचे नेते क्काहमेह एनक्रुमाह यांच्याशी त्याचे घनिष्ठ संबंध होते. त्याने काँगो माय कंट्री हे आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहिले. त्यात त्याचा वसाहतवादविरोध आणि स्वकीयांबद्दलची तळमळ दिसते. त्याच्या मृत्यूनंतर आफ्रिकेत त्याच्या समाजवादी विचारांचा ‘लुमुम्बावाद’ म्हणून गौरव झाला. आफ्रिकी समाजवादाचा तो आधार मानला जातो. त्याच्या या विचाराचे चार प्रमुख घटक कल्पिण्यात येतात : (१) वांशिक भिन्नतेवर मात करून ‘काँगोली’ अस्मिता जागृत करणे. (२) स्वातंत्र्य टिकविण्यासाठी प्रबळ केंद्रसत्तेचा पुरस्कार, (३) सामाजिक आणि आर्थिक सुधारणांवर समाजवादी मूलतत्त्वाच्या आधारे भर देणे आणि (४) आफ्रिकी ऐक्य व अलिप्तता यांचा आंतरराष्ट्रीय क्षेत्रात पुरस्कार. लुमुम्बाचे प्रभावी व्यक्तिमत्व आणि धोरण राबविण्याची दुर्दम्य महत्त्वाकांक्षा तसेच सर्व विरोध कठोरपणे मोडून काढण्यावर त्याने दिलेला भर यांमुळे त्यास अंतर्गत व आंतरराष्ट्रीय क्षेत्रांत अनेक शत्रू निर्माण झाले. आफ्रिकेच्या भूराजनीतीचा विचार केला असता झाईरे ही भूमी सर्व बाबतींत संपन्न होती. साहजिकच पाश्र्चात्य राष्ट्रांना रशियाचा हस्तक्षेप शीतयुद्धास कारणीभूत ठरेल, अशी भीती वाटली.

लुमुम्बा हा राष्ट्रीय व आफ्रिकी नेता म्हणून इतिहासप्रसिद्ध आहे. मॉस्कोमध्ये त्याच्या स्मरणार्थ विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे.

संदर्भ : 1. Dayal, Rajeshwar, Mission for Hammarskjold : The Congo Crisis, Delhi, 1976

           2. Kanza, T. R. The Rise and Fall of Patrice Lumumba, Boston (Mass.) 1979.

           3. Mckown, R. Lumumba, New York, 1969.

           4. Nkrumah, Kwame, Challenge of the Congo, Trinidad, 1967.

           5. Skurnik, W. A. E. Ed. African Political Thought : Lumumba, Nkrumah and Toure, Denver, 1968.

           6. Young, Carwford, Polities in the Congo : Decolonization and Independence, Oxford, 1965.  

घाटगे, विमल