सिंग, खुशवंत : (२ फेबुवारी १९१५– ). इंडो-अँग्लिअन भारतीय साहित्यिक, ज्येष्ठ पत्रकार व इतिहासकार. त्यांचा जन्म हडली ( प. पंजाब,पाकिस्तान ) येथे शोभा सिंग व विरनबाई या दांपत्यापोटी झाला. वडील शोभा सिंग प्रसिद्घ बांधकाम व्यावसायिक होते. खुशवंत सिंगांचे सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी झाले. पुढे त्यांनी लाहोर, दिल्ली व लंडन या ठिकाणी उच्च शिक्षण घेऊन बार ॲट लॉ (लंडन) ही पदवी संपादन केली. त्यांनी प्रारंभी लाहोरच्या उच्च न्यायालयात १९३९–४७ दरम्यान वकिली केली. नंतर त्यांनी स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र खात्यात नोकरी पतकरली (१९४७). केंद्र शासनाने त्यांची टोराँटो (कॅनडा) येथे परराष्ट्रखुशवंत सिंग खात्यांतर्गत वार्तांकन साहाय्यक (प्रेस ॲटॅची) या पदावर नियुक्ती केली (१९४७-४८). त्यानंतर त्यांची लंडनच्या भारतीय उच्चायुक्तालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून नेमणूक झाली (१९४८– ५१). पुढे त्यांनी युनेस्कोच्या जनसंचारण (मास कम्युनिकेशन) विभागात काही वर्षे (१९५४– ५६) नोकरी केली. माहिती व नभोवाणी मंत्रालयाद्वारे प्रकाशित होणाऱ्या योजना या नियतकालिकाचे ते काही वर्षे संपादक होते. शासकीय नोकरीतून ते अध्यापनाकडे वळले आणि प्रिन्स्टन विद्यापीठात (अमेरिका) अध्यापक झाले (१९६६–६९). या सुमारास बेनेट कोलम ॲण्ड कंपनीने त्यांची इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया या प्रतिष्ठित साप्ताहिकाचा प्रमुख संपादक म्हणून नियुक्ती केली. या पदावर त्यांनी १९६९– ७८ असे दहा वर्षे संपादनाचे काम केले. या काळात त्यांनी विकली चा चेहरामोहरा बदलला. अधिकतर चित्रांवर भर देऊन तत्कालीन महत्त्वाच्या घटनांवर टीकात्मक लेख, राजकीय प्रकरणे आदींवर स्वतंत्र चर्चात्मक लेख प्रसिद्घ केले. त्यामुळे विकली ची वाचकप्रियता वाढली व परिणामतः खप वाढला. त्यानंतर त्यांनी अनुक्रमे नॅशनल हॅरल्ड (१९७८-७९, दिल्ली), न्यू दिल्ली मॅगेझीन (१९७९-८०) आणि हिंदुस्थान टाइम्स (१९८०–८३, दिल्ली ) या वृत्तपत्रांचे प्रमुख संपादक पद भूषविले. टाइम्स मधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पूर्णतः लेखन-वाचन या व्यासंगात उर्वरित जीवन व्यतीत करण्याचे ठरविले तथापि त्यांच्या पत्रकारितेचा आदर करुन त्यांची तत्पूर्वी राज्यसभेवर निवड झाली होती (१९८०–८६).

खुशवंत सिंगांची ग्रंथसंपदा विपुल आहे. वृत्तपत्रे व नियतकालिकांतूनही त्यांनी भरपूर लेखन केले आहे. ‘विथ मॅलिस टू वर्ड्‌स वन अँड ऑल’ हा त्यांचा साप्ताहिक स्तंभलेख अनेक वृत्तपत्रांतून प्रसिद्घ होत असे व तो वाचकप्रियही झाला होता. त्यांनी प्रामुख्याने इंग्रजीतूनच लिहिले आहे. द मार्क ऑफ विष्णू अँड अदर स्टोरिज (१९५०), ट्रेन टू पाकिस्तान (१९५६), द व्हाइस ऑफ गॉड अँड अदर स्टोरिज (१९५७), आय शाल नॉट हिअर द नाइटिंगेल (१९५९), द शिख्‌स टूडे (१९५९), द फॉल ऑफ द किंगडम ऑफ पंजाब (१९६३), रणजित सिंग : द महाराजा ऑफ पंजाब (१९६३), गदर १९१५ : इंडियाज फर्स्ट आर्म्‌ड रेव्हलूशन (१९६६), ए ब्राइड फॉर द साहिब अँड अदर स्टोरिज (१९६७), ब्लॅक जस्मिन (१९७१), इंदिरा गांधी रिटर्न्‌स (१९७९), ट्रॅजेडी ऑफ पंजाब (१९८४), दिल्ली ए नॉव्हेल (१९९०), सेक्स, स्कॉच अँड स्कॉलरशिप : सिलेक्टेड रायटिंग्ज (१९९२), वी इंडियन्स (१९९३), विमेन अँड मेन इन माय लाइफ (१९९५), अनसर्टन लायझन्स : सेक्स, स्ट्राइफ अँड टुगेदरनेस इन अर्बन इंडिया (१९९५), द कंपनी ऑफ विमेन (१९९९), द एन्ड ऑफ इंडिया (२००३), पॅरडाइज अँड अदर स्टोरिज (२००४), व्हाय आय सपोर्टेड द इमर्जन्सी एसेज अँड प्रोफाइल्स (२००९) इ. त्यांचे ग्रंथ प्रसिद्घ आहेत. यांशिवाय त्यांनी ट्रूथ, लव्ह अँड अ लिटल मॅलिस (२००२) हे आत्मचरित्र लिहिले आहे. त्यांनी काही धार्मिक दोहे इंग्रजीत अनुवादिले असून उमरावजान अदा-कोर्टिझॅन ऑफ लखनौ (१९६१), लँड ऑफ द फाइव्ह रिव्हर्स (१९६४), इकबाल्स डायलॉग विथ अल्लाह (१९८१) इ. ग्रंथ उल्लेखनीय होत. नभोवाणी व दूरदर्शनवर त्यांची अनेक व्याख्याने-मुलाखती झाल्या आहेत.

त्यांच्या कादंबऱ्यांपैकी ट्रेन टू पाकिस्तान ही चक्षुर्वैसत्यम अनुभवांवर बेतलेली कादंबरी असून तीत भारत-पाकिस्तान विभाजनाच्या परिणामांची करुण कहाणी आढळते. तिच्या अनेक आवृत्त्या निघाल्या असून या कादंबरीला ‘ग्रोव्ह प्रेस अवॉर्ड ’ प्राप्त झाले (१९५६). त्यांचे लघुकथासंग्रह पारंपरिक पद्घतीने लिहिलेले असून त्यांत हलक्या -फुलक्या विनोदांनी भरलेल्या ग्रामीण कथांचा धागा पकडला आहे. त्यांचा द हिस्टरी ऑफ द शीख्‌स (तीन खंड) हा बृहद्‌ग्रंथ अधिकृत व विश्वसनीय पुराव्यांवर आधारित व निःपक्षपातीपणे लिहिला आहे तथापि त्यांचे रणजित सिंगांचे चरित्र व्यक्तिपूजात्मक व अवास्तव स्तुतीने युक्त आहे. त्यांच्या द हिस्टरी ऑफ द शीख्‌स या ग्रंथाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या असून त्यांनी शिखांचा सचित्र इतिहासही प्रसिद्घ केला आहे. त्यांच्या एकूण लेखनात विनोद, वक्रोक्ती व स्त्रियांविषयीचे शृंगारिक प्रच्छन्न वर्णन आढळते. तद्‌वतच भारताविषयीचा जाज्ज्वल्य अभिमान दृग्गोचर होतो. त्यांची भाषाशैली ओघवती, संवादात्मक व साधी आहे.

त्यांचा पक्षीय राजकारणात कधीच सक्रिय सहभाग नव्हता, पण काँग्रेसविषयी – विशेषतः इंदिरा गांधींबद्दल – त्यांना नितान्त आदर होता. त्यामुळेच त्यांनी तत्कालीन आणीबाणीचे समर्थन केले तथापि सुवर्ण-मंदिरातील (अमृतसर) लष्कराच्या कारवाईच्या (ऑपरेशन ब्लू स्टार, १९८४) निषेधार्थ त्यांनी पद्‌मभूषण पुरस्कार केंद्र शासनाला परत केला.

त्यांना अनेक मानसन्मान लाभले. पंजाब राज्यशासनाने त्यांना ‘डिस्टिंग्विश्ड मॅन ऑफ लेटर्स’ (१९७०) आणि ‘पंजाब रत्न अवॉर्ड ’ (२००६) देऊन गौरविले, तर भारत सरकारने त्यांना ‘पद्‌मभूषण’ (१९७४) आणि ‘पद्‌मविभूषण’ (२००७) हे पुरस्कार दिले. शिवाय सुलभ इंटरनॅशनलने त्यांचा ‘ऑनेस्ट मॅन ऑफ द यीअर’ (२०००) या बिरुदावलीने सत्कार केला.

त्यांच्या पत्नीचे नाव कवाल (कुबल) मलिक असून त्यांना दोन सुविद्य अपत्ये आहेत.

वाड, विजया