आंद्रेईसाखॅरोव्ह, आंद्रेई डिमिट्रियेव्ह्यिच : (२१ मे १९२१–२४ डिसेंबर १९८९). रशियन अणुकेंद्रीय भौतिकीविज्ञ व शांततावादी राजकीय नेते. औष्णिक अणुकेंद्रीय विक्रियांचे संशोधन करणारे शास्त्रज्ञ म्हणून तसेच मानवी हक्क व जागतिक शांतता यांचे पुरस्कर्ते म्हणून ते सर्वाधिक परिचित होते. नागरी स्वातंत्र्य, तसेच सोव्हिएट युनियनमधील राजकीय सुधारणा आणि त्या देशाने साम्यवादी नसलेल्या देशांशी सलोखा करावा या मतांचा त्यांनी निर्भिडपणे पुरस्कार केला. मानवी हक्कांसाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना १९७५ सालचे शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. मात्र त्यावेळी सोव्हिएट सरकारने त्यांच्यावर बंदी घातल्यामुळे त्यांना हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी ऑस्लो (स्वीडन) येथे जाण्यास परवानगी नव्हती. म्हणून त्यांची द्वितीय पत्नी येलेना बॉनर यांनी त्यांच्या वतीने हे पारितोषिक स्वीकारले.

साखॅरोव्ह यांचा जन्म मॉस्को येथे झाला. सुरुवातीचे शिक्षण मॉस्कोला झाल्यावर साखॅरोव्ह यांनी मॉस्को राज्य विद्यापीठाची भौतिकीची पदवी संपादन केली (१९४२). दुसऱ्या महायुद्घाच्या काळात त्यांनी दारूगोळा कारखान्यात अभियंते म्हणून काम केले. १९४५ मध्ये ते पी. एन्. लेबेडेव्ह इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्समध्ये दाखल झाले. त्यांनी सव्वीसाव्या वर्षीच डॉक्टरेट पदवी मिळविली (१९४७) आणि बत्तीसाव्या वर्षी ते सोव्हिएट ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे पूर्ण सदस्य झाले (१९५३). १९४८–५६ दरम्यान ते शास्त्रज्ञांच्या समवेत कार्यरत होते. तोपर्यंत त्यांनी अनेक वर्षे ⇨ ईगॉऱ्य येव्हग्येन्येव्ह्यिच टाम यांच्याबरोबर सैद्घांतिक भौतिकीविषयीचे काम केले होते. साखॅरोव्ह यांनी हायड्रोजनाच्या संघटनाविषयी संशोधन केले. त्यांनी व टाम यांनी १९५० मध्ये नियंत्रित औष्णिक विक्रिया साध्य करण्यासाठी चुंबकीय क्षेत्रात बंदिस्त केलेल्या आयनद्रायूतून विद्युत् विसर्जन करण्याची कल्पना सुचविली. लवकरच साखॅरोव्ह सोव्हिएट युनियनच्या अण्वस्त्रविषयक गुप्त संशोधन कार्यात सहभागी झाले. यातून रशियाचा पहिला हायड्रोजन बाँब तयार झाला व १९५३ मध्ये त्याची चाचणी घेण्यात आली. यामध्ये साखॅरोव्ह यांचे योगदान महत्त्वाचे होते असे मानतात. या कार्याबद्दल त्यांना हीरो ऑफ सोशॅलिस्ट लेबर हा किताब मिळाला. त्याआधी त्यांना ऑर्डर ऑफ लेनिन हा पुरस्कारही मिळाला होता. त्यांनी १९६८ सालापर्यंत सैद्घांतिक भौतिकीतील संशोधनावरच लक्ष केंद्रित केले होते.

साखॅरोव्ह यांना (१९६०–६३ दरम्यान) संभाव्य अणुयुद्घाची चिंता वाटत होती. १९६३ साली अण्वस्त्रांच्या चाचणीवर अंशतः बंदी घालण्यासाठीच्या कराराविषयी वाटाघाटी करण्यासाठी त्यांनी रशियन साम्यवादी नेता न्यिक्यित एस्. ख्रुश्चॉव्ह यांची खात्री पटविण्यासाठी प्रयत्न केले होते. ख्रुश्चॉव्ह यांची १०० मेगॅटन हायड्रोजन बाँबची वातावरणात चाचणी घेण्याची योजना होती. या चाचणीतून उद्‌भवणाऱ्या किरणोत्सर्गी अवपाताचे व्यापक प्रमाणावर दुष्परिणाम होतील, असे साखॅरोव्ह यांना वाटत होते. म्हणून त्यांनी या योजनेविरुद्घ मत नोंदवून तिचा जाहीर निषेध केला. स्टालिन युगातील जीववैज्ञानिक ⇨ ट्रोफीम देनीसोव्ह्यिच लायसेंको या वनस्पतिशास्त्रज्ञाच्या कलंकित वंशवादीभ्रामक तत्त्वप्रणालीचा प्रभाव टिकून होता व १९६३ च्या सुमारास तिच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न होत होते. साखॅरोव्ह यांनी याविरुद्घच्या चळवळीत भाग घेऊन वंशवादीभ्रामक तत्त्वप्रणालीला होणारा विरोध यशस्वीपणे एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. यामुळे वैज्ञानिक आस्थापनांमधील रूढिवादी वैज्ञानिकांशी त्यांचा संघर्ष झाला व ते मानवी हक्कविषयक कार्यात अधिकाधिक भाग घेऊ लागले. १९६८ मध्ये साखॅरोव्ह यांनी आपला ‘प्रोग्रेस, को-एक्झिस्टन्स, ॲण्ड इंटलेक्चुअल फ्रीडम’ हा निबंध पाश्चात्त्य देशांत प्रसिद्घ केला. या निबंधात त्यांनी अणुयुद्घाच्या व हुकूमशाहीवादी पोलिसी राज्यांच्या धोक्याकडे लक्ष वेधले होते. त्यांनी सर्व अण्वस्त्रधारी सत्तांना अण्वस्त्रांमध्ये कपात करावी असे आवाहन केले होते आणि सोव्हिएट युनियनमध्ये नागरी हक्क प्रस्थापित व्हावेत असेही म्हटले होते. शिवाय साम्यवादी व भांडवलशाही प्रणालींचे अखेरीस लोकशाहीवादी समाजवादात एकत्रीकरण होईल असे भाकितही त्यांनी यात केले होते.

साखॅरोव्ह यांनी इतरांबरोबर १९७० मध्ये मॉस्को ह्यूमन राइट्स कमिटी स्थापन केली. आपली वेगळी मते मांडल्यामुळे शिक्षा झालेल्या मित्रांची व सहकाऱ्यांची बाजू त्यांनी घेतली. मृत्युदंडाची शिक्षा, विरोधी मतांमुळे मानसोपचार संस्थांत बंदिस्त केलेले लोक, स्वदेशाचा त्याग करण्याच्या अधिकाराला नकार, तसेच पर्यावरणीय प्रदूषणासारखे इतर प्रश्न यांसाठी त्यांनी आवाज उठविला.

अशा प्रकारची कामे आणि रशियन धोरणांविरुद्घची मते यांमुळे साखॅरोव्ह यांचा सोव्हिएट शासनाशी संघर्ष सुरू होता. देशांतर्गत राजकीय दडपशाही व परदेशांशी वैरभाव हा सरकारचा कार्यक्रम आहे, असे त्यांचे मत होते. याविरुद्घ उघडपणे आवाज उठविल्यामुळे ते शासकीय निंदा, निर्भत्सना आणि छळणूक यांचे लक्ष्य झाले. यामुळे सरकारने त्यांना २२ जानेवारी १९८० रोजी देशातील गॉर्की (आताचे निझन्यी नोव्हगोरॉड) या औद्योगिक शहरी हद्दपार केले. या गावात परदेशी लोकांना जाण्यास मनाई होती. सोव्हिएट युनियनविरोधी कामे केल्याचा आरोप ठेवून १९८४ मध्ये बॉनर यांना तेथेच नजरकैदेत ठेवण्यात आले. साखॅरोव्ह यांची सन्मानचिन्हे व मानमरातब काढून घेण्यात आले. मात्र ते यू. एस.एस. आर. ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य म्हणून कायम राहिले. येथील सात वर्षांच्या विजनवासात असताना त्यांनी आपल्या नातेवाईकांच्या छळाच्या निषेधार्थ दोन वेळा अन्नत्याग केला. मात्र करडी पाळत असतानाही त्यांनी आपल्या आठवणी लिहून त्या अमेरिकेत पाठविल्या होत्या. त्यांच्या या हद्दपारीविरुद्घ जगातील अनेक विचारवंत, सामाजिक संस्था व लोकशाहीवादी देश यांनी रशियावर नैतिक दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता.

डिसेंबर १९८६ मध्ये मिखाइल एस्. गॉर्बोचेव्ह यांनी सत्ता हाती घेतली आणि पेरेस्त्रोइका व ग्लासनोस्त धोरणांचा पाठपुरावा केला. पुढे त्यांनी साखॅरोव्ह व बॉनर यांची देशांतर्गत हद्दपारीतून सुटका केली आणि त्यांना मॉस्कोत परत येऊन आपल्या घरी राहायला व प्रयोगशाळेत काम करायला परवानगी दिली. अफगाणिस्तानातून रशियन सैन्य काढून घेणे व सोव्हिएट युनियनमधील सर्व राजकीय कैद्यांची सुटका करणे या त्यांच्या मागण्याही मान्य झाल्या. मार्च १९८९ मध्ये साखॅरोव्ह काँग्रेस ऑफ पीपल्स डेप्युटीज या नवीन सोव्हिएट विधान मंडळावर निवडून आले. राजकीय व आर्थिक विकेंद्रीकरण जलदपणे व्हावे आणि साम्यवादी पक्षाचा विशेषाधिकार प्राप्त दर्जा संपुष्टात यावा, याबद्दल ही मंडळी आग्रही होती. साखॅरोव्ह यांनी आपला मानवी हक्कविषयक लढा चालूच ठेवला. व्यक्तिस्वातंत्र्य व लोकशाहीकरण यांचा त्यांनी पाठपुरावा केला. जागतिक प्रश्न सोडविण्यासाठी अमेरिका व रशिया या महासत्तांनी एकमेकांस सहकार्य करावे, असे त्यांचे म्हणणे होते.

साखॅरोव्ह यांनी आपले माय कंट्री अँड वर्ल्ड (१९७५) हे पुस्तक रशियाबाहेर प्रसिद्घ केले. त्यात त्यांनी रशियात संमिश्र अर्थव्यवस्था व लोकशाहीवादी समाजवाद यावा असे सुचविले होते. त्यांनी सरकारने बहिष्कृत केलेल्या आलिक्सांद्र सोल्झेनित्सीन या लेखकाला बिनशर्त पाठिंबा दिला. या कार्यामुळे साखॅरोव्ह यांना परदेशांतून मानसन्मान मिळाले होते. उदा., एलिनार रूझवेल्ट पारितोषिक (१९७३), ऱ्हाइनहोल्ड नायमार पारितोषिक (शिकागो विद्यापीठ, १९७४), सीनो देल द्यूका पुरस्कार (१९७४) वगैरे.

सैद्घांतिक भौतिकीमध्ये साखॅरोव्ह यांनी अनेक महत्त्वपूर्ण कामे केली आहेत. उदा., मरी गेल-मान यांनी १९६४ मध्ये प्रथम सुचविलेल्या क्वॉर्क या ⇨ मूलकणांची पुष्टी करणारा महत्त्वाचा पुरावा साखॅरोव्ह यांनी १९६६ मध्ये दिला होता. तसेच वेध घेण्यात आलेल्या विश्वामध्ये प्रतिद्रव्याची तूट का भासते वा त्याचा अभाव का जाणवतो, याचे स्पष्टीकरणही त्यांनी १९६६ मध्ये दिले होते. त्यांनी साखॅरोव्ह स्पीक्स (१९७४) आणि अलार्म अँड होप (१९७९) ही पुस्तके लिहिली.

साखॅरोव्ह यांचे मॉस्को येथे निधन झाले.

ठाकूर, अ. ना.