ॲरागो, डॉमीनीक फ्रांस्वा : (२६ फेब्रुवारी १७८६–२ ऑक्टोबर १८५३). फ्रेंच ज्योतिर्विद व भौतिकीविज्ञ शास्त्रीय कार्य प्रामुख्याने ज्योतिषशास्त्र, चुंबकत्व व प्रकाशकी या विषयांत. त्यांचा जन्म एस्टाजेल येथे झाला. पॅरिसमधील एकोला पॉलिटेक्‍निकमध्ये शिक्षण घेतल्यानंतर १८०६ मध्ये ते तेथील वेधशाळेचे चिटणीस झाले. त्यानंतर बार्सिलोना ते बॅलिॲरिक बेटे यांमधील याम्योत्तर (निरीक्षकाचे खस्वस्तिक व खगोलाचे ध्रुवबिंदू यांतून जाणाऱ्या) वृत्ताचा भाग मोजण्यासाठी फ्रेंच सरकारने बायो यांच्याबरोबर त्यांची नेमणूक केली.

फ्रान्सला परतल्यावर १८०९ मध्ये ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थेचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली व एकोल पॉलिटेक्‍निकमध्ये भूमितीच्या प्राध्यापकपदावर नेमणूक झाली.  याच सुमारास रॉयल ऑब्झर्वटरीमध्ये ज्योतिर्विद म्हणूनही त्यांची नेमणूक झाली. १८३० मध्ये ते वेधशाळेचे मुख्याधिकारी व ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे कायम चिटणीस झाले. याच वर्षी चेंबर ऑफ डेप्युटीज्‌मध्ये ते पेरपीन्यां भागातून निवडून आले. १८४८ मधील क्रांतीनंतरच्या हंगामी सरकारात ते युद्ध व नाविक खात्याचे मंत्री होते.

चुंबकाच्या गतीमुळे जवळपास असलेल्या संवाहक माध्यमात प्रवाहावर्त (भोवरे) निर्माण होतात, या आविष्काराचा त्यांनी शोध लावला. उत्तर ध्रुवीय प्रकाश (ध्रुवीय प्रदेशात आढळणारा विविधरंगी प्रकाशीय आविष्कार) व पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात होणारे बदल यांचा परस्परसंबंध त्यांनी सिद्ध केला. १८४२ मध्ये सूर्याच्या खग्रास ग्रहणाच्या वेळी त्यांनी महत्त्वाचे वेध घेतले. सूर्य हा पूर्णपणे वायुरूप आहे असे प्रतिपादन करणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी ते एक होते. ताऱ्यांच्या दीप्तीचे मापन करण्यासाठी त्यांनी प्रकाशमापन पद्धतींचा उपयोग केला. फ्रेनेल व हंबोल्ट यांच्याबरोबर प्रकाशाच्या तरंग सिद्धांतांचा त्यांनी पुरस्कार केला. प्रकाशीय ध्रुवणासंबंधी (एका विशिष्ट प्रतलात प्रकाशतरंग कंप पावण्याच्या आविष्कारासंबंधी,  → ध्रुवणमिति) त्यांनी अनेक प्रयोग केले व ध्रुवणप्रतलाचे परिवलन करण्याच्या क्वॉर्ट्‌झामधील गुणधर्माचा शोध लावला. १८१८ मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली व १८२५ मध्ये त्यांना संस्थेच्या कॉप्ली पदकाचा बहुमान मिळाला. त्यांचे संशोधनकार्य १७ खंडांत प्रसिद्ध करण्यात आले (१८५४–६६). ते पॅरिस येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.