वक्रनलिका : वाकविलेल्या नळीच्या दोन भुजांपैकी एक दुसरीपेक्षा लांबीला जास्त असते असे साधन. एका ठिकाणाहून खालील पातळीवर असलेल्या दुसऱ्या ठिकाणी वातावरणीय खालील पातळीवर असलेल्या दुसऱ्या ठिकाणी वातावरणीय दाबाच्या साहाय्याने द्रवरूप पदार्थ उंच काठावरून वाहून नेण्यासाठी वक्रनिलकेचा उपयोग करतात. साधारणपणे काच, रबर, तांबे व शिसे अशा पदार्थांचा वापर करून वक्रनलिका बनविल्या जातात. त्यांचे आकारमान विशिष्ट उपयोगावर अवलंबून असते. वक्रनलिका द्रवाने पूर्णपणे भरण्याची, कायम भरलेली राहील किंवा जरूर असेल तेव्हा ती आपोआप भरली जाईल अशी सोय असलेले तिचे विविध प्रकार वापरात आहेत.

वक्रनिलकेची साधी रचना आ. १ मध्ये दाखविल्याप्रमाणे असते. ती प्रथम द्रवाने पूर्णपणे भरतात. तिच्या आखूड भुजेचे टोक ज्या पात्रातून द्रव काढावयाचा आहे त्यात बुडवितात. तसेच लांब भुजेचे टोक द्रवाच्या पृष्ठभागाहून खालच्या पातळीवर असलेल्या पात्रात ठेवतात. आखूड भुजेच्या (अआ) बाजूकडील निवळ दाब (वातावरणीय दाब वजा आखूड भुजेतील लंब दिशेत असलेला द्रवस्तंभाचा दाब) हा लांब भुजेच्या (इई) बाजूकडील निवळ दाबापेक्षा (वातावरणीय दाब वजा लांब भुजेतील लंब दिशेत असलेला द्रवस्तंभाचा दाब) जास्त असतो. भुजांच्या दाबांतील फरकामुळे वक्रनलिकेचे कार्य सुरू होते. द्रव आखूड भुजेतून वर, वक्रभागातून आणि नंतर लांब भुजेतून खाली जात असतो. ही क्रिया वरच्या पात्रातील द्रवाची पातळी लहान भुजेच्या बुडालेल्या टोकाशी येईपर्यंत किंवा दोन्ही पात्रांतील द्रव पातळ्या समान होईपर्यंत म्हणजेच दोन्ही भुजांतील द्रव स्तंभाची उंची समान होईपर्यंत चालू राहते.

आ. १. वक्रनलिकेची साधी रचना : आखूड भुजा, इई –लांब भुजा.आ. २. खंडित वक्रनलिकावक्रनलिकेची कार्यपद्धती : आ. १ मध्ये अ व ई बिंदूवरील वातावरणीय दाब सारखाच आहे. अआ या आखूड भुजेतील द्रवात अ च्या वरच्या कोणत्याही बिंदूवरील दाब अ वरील दाबापेक्षा कमी आहे. तसेच इई या लांब भुजेतील कोणत्याही बिंदूवरील दाब ई वरील दाबापेक्षा कमी आहे. अ पेक्षा ई खालील पातळीवर असल्यामुळे अआ मधील कोणत्याही बिंदूवरील दाब इई मधील त्याच पातळीतील बिंदूवरील दाबापेक्षा अधिक असतो. त्यामुळे अधिक दाब असलेल्य़ा बिंदूकडून कमी दाब असलेल्या बिंदूकडे द्रव ढकलला जातो व द्रव प्रवाह चालू होतो. यावरून वक्रनलिकेचे कार्य भुजांच्या समपातळीत असणाऱ्या दोन बिंदूंवरील दावांच्या फरकावर अवलंबून असते. अ व ई पातळ्यांतील अंतर जितके जास्त तितक्या जास्त दाबाने व म्हणून जास्त वेगाने प्रवाह मिळतो. वातावरणीय दाबामुळे द्रवाचा स्तंभ पृष्ठभागापासून वर उचलला जातो. तो ज्या अंतरापर्यंत वर चढू शकतो त्यापेक्षा जास्त उंचावरील पात्रातील द्रव-पातळीपासून बाक आलेल्या उंच भागापर्यंतचे उभे (लंब दिशेत) अंतर (अआ) किमी असले, तरच वक्रनलिकेचे कार्य चालते. समुद्रसपाटीला पाण्याकरिता सैद्धांतिक दृष्ट्या ही उंची १०.३६ मी. असते परंतु बाष्पदाब, घर्षण व इतर घटकांमुळे प्रत्यक्ष उंची ८.५३ मी. पर्यंत कमी होते.

खंडित वक्रनलिका: थोडे थोडे पाणी सतत मिळण्यापेक्षा मधून मधून तीव्र झोताची काही ठिकाणी आवश्यकता असते उदा., सार्वजनिक मुताऱ्या किंवा संडास. अशा ठिकाणी त्याकरिता खंडित वक्रनलिका वापरतात. आ. २ मध्ये एक प्रकारची खंडित वक्रनलिका दाखविली आहे. नळीच्या आखूड भुजेचे मोकळे तोंड पात्राच्या तळाजवळ असतेव नळीचे दुसरे तोंड तळाच्या बाहेर खाली इ येथे असते. अ अपात्रात नळाने पाणी हळूहळू पण सतत पडत असते. पाण्याची उंची जसजशी वाढत जाते तसतशी वक्रनलिकेतील पाण्याची पातळी आ ही वाढत राहते. आ पर्यंत (म्हणजे आखूड भुजेच्या सर्वोच्च पातळीपर्यंत) पाणी भरल्यावर वक्रनलिकेचे कार्य सुरू होते व पात्रातील पाणी वेगाने बाहेर पडून नळीच्या तोंडापर्यंत पात्र रिकामे होते. वक्रनलिका पूर्ण भरल्यावरच पुन्हा तिचे कार्य सुरू होते. 


महाभारतातील वसुदेवाच्या कथेवर किंवा ग्रीक पुराणातील टँटॅलसच्या आख्यायिकेवर आधारलेल्या विशिष्ट प्रकारच्या पेल्यातील मूर्तीच्या ओठापर्यंत त्यात पाणी भरल्यावर पेला रिकामा होतो. ही क्रिया वक्रनलिकेच्या तत्त्वावर होते आणि याकरिता आतील बाजूस ओठापर्यंत खंडित वक्रनलिका बसवलेली असते. 

वक्रनलिका जलसेतू: काही वेळा ओढा किंवा नदीच्या प्रवाहावरून किंवा खालून कालवा नेण्याकरिता वक्रनलिका जलसेतूचा वापर करतात. मात्र काही ठिकाणी ही वक्रनलिका नेहमीच्या उलट (बहिर्गोल भाग खाली) असते. [⟶जलवाहिनी]. 

उपयोग: इ. स. पू. सु. १४५० या काळातील ईजिप्तमधील थडग्यांत आढळलेल्या पुराव्यावरून वक्रनलिकेचा उपयोग त्या काळी आणि त्यापूर्वीही केला जात होता, असे आढळून येते. प्राचीन रोमन लोकांनाही वक्रनलिका माहीत होती. तोटी नसलेल्या पात्रातून द्रव बाहेर काढणे, खालचे थर स्थिर ठेवून वरच्या थरातील द्रव दुसऱ्या पात्रात काढणे, धरणातील जादा पाणी बाहेर काढणे, पाणीपुरवठा, जलसिंचन इत्यादींकरिता वक्रनलिकांचा आता उपयोग केला जातो.

आठवले, कुमुद अ.