ब्राउन, व्हेर्नर फोन: (२३ मार्च १९१२-१६ जून १९७७). जर्मन अमेरिकन रॉकेट अभियंते. युद्धात व अवकाश समन्वेषणात वापरल्या जाणाऱ्या आधुनिक रॉकेटांच्या विकासात त्यांनी प्रथमतः जर्मनीत व दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेत अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी केली.

ब्राउन यांचा जन्म जर्मनीतील व्हिर्झिट्स (आता पोलंडमधील व्हिझिस्क) येथे झाला. त्यांचे शिक्षण झुरिक (स्वित्झर्लंड) व बर्लिन येथील तांत्रिक संस्थांत झाले. १९३२ मध्ये त्यांनी यांत्रिक अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. तरुण पणातच त्यांना अवकाश उड्डाण व आंतरग्रहीय प्रवास यांत गोडी निर्माण झाल्याने ते १९२९ मध्ये जर्मन सोसायटी फॉर स्पेस ट्रॅव्हल या संस्थेचे सदस्य झाले. १९३० मध्ये⇨ हेर्मान यूलिउस ओबेर्थ या जर्मन रॉकेट तज्ञांनी एका द्रवइंधनयुक्त छोट्या रॉकेटाची चाचणी घेतली. त्या वेळी त्यांचे एक साहाय्यक म्हणून ब्राउनव्हेर्नर फोन ब्राउन यांनी काम केले. त्याच वर्षी ओबेर्थ रूमानियाला अध्यापनकार्यासाठी परत गेल्यावरही ब्राउन यांनी जर्मन सोसायटी फॉर स्पेस ट्रॅव्हलच्या पुरस्काराने द्रव इंधनयुक्त रॉकेटा संबंधीचे प्रायोगिक कार्य पुढे चालू ठेवले. १९३२ मध्ये जर्मन लष्कराने क्युमेर्सडॉर्फ येथील रॉकेट केंद्रात द्रवइंधनयुक्त रॉकेटाचे तज्ञ म्हणून त्यांची नेमणूक केली. १९३४ मध्ये त्यांना बर्लिन विद्यापीठाची भौतिकीची पीएच्. डी. पदवी मिळाली. या पदवीकरिता सादर केलेल्या प्रबंधात त्यांनी स्वतः द्रव इंधनयुक्त रॉकेटासंबंधी केलेल्या सैद्धांतिक व प्रायोगिक कार्याची माहिती दिलेली होती. या कार्यामुळे १९३४ मध्ये जर्मन लष्करी सामग्री खात्याने त्यांची रॉकेट विकास अभियंते म्हणून नेमणूक केली. १९३७ पावेतो त्यांच्या रॉकेट केंद्रातील तंत्रज्ञांची संख्या ८० पर्यंत पोचली. १९३४ मध्ये ब्राउन व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रक्षेपित केलेली दोन द्रवइंधनयुक्त रॉकेटे ३.२ किमी. उंची पर्यंत गेली. १९३७ मध्ये हा गट २४ किमी. उंचीपर्यंत सु. ४५ किग्रॅ. वजनाची वस्तू नेऊ शकणारे पूर्णपणे निरूढी मार्गनिर्देशित [⟶ मार्गनिर्देशन] रॉकेट विकसित करण्याचे कार्य करीत होता. त्याच वर्षी पंख्यावर चालणाऱ्या एकच एंजिन असलेल्या लढाऊ विमानात द्रव इंधनयुक्त रॉकेट बसवून प्रथमच प्रायोगिक यशस्वी उड्डाणे करण्यात आली. या भरगच्च विकास कार्यक्रमामुळे जर्मन लष्कर व वायुदल यांची संयुक्त योजना म्हणून बाल्टिक समुद्राच्या किनाऱ्यावरील पेनेम्यूंडे येथे रॉकेट केंद्र स्थापन करण्यात आले. या केंद्रातील लष्कराच्या विभागाच्या तंत्रिक संचालकपदावर १९३७ मध्ये ब्राउन यांची नेमणूक झाली. याच केंद्रात पुढे सुप्रसिद्ध दीर्घ पल्ल्याच्या व्ही २ रॉकेटाचा (क्षेपणास्त्राचा) व वासरफाल या नावाच्या विमानविरोधी क्षेपणास्त्राचा विकास करण्यात आला. त्या काळी पेनेम्यूंडे येथील रॉकेट व क्षेपणास्त्र तंत्रविद्येचा दर्जा इतर देशांच्या मानाने कित्येक वर्षे आघाडीवर होता.

मार्च १९४५ मध्ये रशियन लष्करी पेनेम्यूंडेजवळ येऊन ठेपले असताना ब्राउन व त्यांचे कित्येक सहकारी बव्हेरियात गेले आणि तेथे अमेरिकन लष्कराला शरण गेले. त्या वेळी अमेरिकन लष्कराशी झालेल्या एका करारानुसार ब्राउन व त्यांचे १२० अभियंते शास्त्रज्ञ सहकारी यांना १०० व्ही २ रॉकेटांसह अमेरिकेला पाठविण्याचे ठरले. या करारानुसार ब्राउन यांची न्यू मेक्सिकोमधील व्हाइट सँड्स चाचणी क्षेत्राचे तांत्रिक सल्लागार व टेक्ससमधील फोर्ट ब्लिस येथील क्षेपणास्त्र योजनेचे तांत्रिक संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली. येथे ब्राउन व त्यांच्या सहकाऱ्यांनी उच्च वातावरणीय संशोधनासाठी व्ही २ रॉकेटांचे प्रक्षेपण करण्याकरिता मदत केली. १९५० मध्ये ॲलाबॅमा राज्यातील हंट्सव्हिलजवळील रेडस्टोन आर्सेनल येथे लष्करी सामग्री मार्गदर्शित क्षेपणास्त्र विभाग हा नवीन विभाग स्थापन करण्यात येऊन तेथील मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास खात्याचे प्रमुख म्हणून ब्राउन यांची नेमणूक झाली व तेथेच त्यांच्या सहकाऱ्यांनाही नेण्यात आले. तेथे १९५०- ५५ या काळात ३२० किमी. पल्ल्याचे रेडस्टोन हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले. १९५६ मध्ये हंट्सव्हिल येथे नव्याने स्थापन झालेल्या लष्करी क्षेपणास्त्र विभागाच्या विकासकार्य खात्याचे ब्राउन संचारलक झाले आणि त्यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली ज्युपिटर, ज्युपिटर-सी, जूनो व पेर्शिंग ही क्षेपणास्त्रे विकसित करण्यात आली. १९५७ च्या सुमारास कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित करण्याची अमेरिकेची ऑर्बिटर योजना शसकीय पाठिंब्याच्या अभावी बारगळली. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये रशियाने स्पुटनिक हा पहिला कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित केल्यावर नोव्हेंबरमध्ये अमेरिकेच्या शासनाने उपग्रह प्रक्षेपण योजनेला तातडीने मान्यता दिली. ३१ जानेवारी १९५८ ला ब्राउन व त्यांच्या सहकाऱ्यांनी पहिल्या टप्प्याकरिता सुधारित रेडस्टोन रॉकेट वापरून अमेरिकेचा एक्प्लोअरर-१ हा पहिला उपग्रह कक्षेत सोडण्यात यश मिळविले. १९५९ मध्ये त्यांनीच ज्युपिटर रॉकेट पहिल्या टप्प्यासाठी वापरून पायोनियर-४ हे अमेरिकेच पहिले अन्वेषक यान सूर्याभोवतीच्या कक्षेत सोडण्याची जबाबदाही पार पाडली. या कार्यामुळे १९६० मध्ये ब्राउन व त्यांच्या सहकाऱ्यांची नॅशनल एरॉनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनच्या (नासाच्या) हंट्सव्हिल येथील जॉर्ज सी. मार्शल अवकाश उड्डाण केंद्रात बदली करण्यात आली आणि ब्राउन यांची या केंद्राच्या संचालकपदावर नेमणूक झाली. या केंद्रात  त्यांनी चंद्रावर मानवी पदार्पण करण्याच्या अमेरिकेच्या अपोलो योजनेकरिता द्रव इंधनयुक्त प्रचंड सॅटर्न रॉकेटांची मालिका विकसित करण्याच्या कार्यात महत्त्वाची कामगिरी केली. १९७० मध्ये ते नासाच्या योजना विभागाचे उपसहयोगी प्रशासक झाले. १९७२ पर्यंत त्यांनी नासामध्ये काम केले व त्यानंतर ते फेअरचाइल्ड इंडस्ट्रिज या विमाने, अवकाशयाने इत्यादींची निर्मिती करणाऱ्या खाजगी कंपनीत अभियांत्रिकी व विकास विभागाचे उपाध्यक्ष झाले. कर्करोगाने ग्रस्त झाल्यामुळे मृत्यूपूर्वी काही महिने ते या पदावरून निवृत्त झाले.

ब्राउन व त्यांच्या ४० सहकाऱ्यांनी १९५५ मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले. तथापि प. जर्मनीला ब्राउन यांनी त्यानंतरही अनेक वेळा भेटी दिल्या. ब्राउन यांना त्यांच्या कार्याबद्दल अनेक सन्मान मिळाले. त्यात स्मिथसोनियन इन्स्टिट्युशनचे लँग्ली पदक, अमेरिकन इन्सिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स अँड ॲस्ट्रॉनॉटिक्सचा ल्वी डब्ल्यू. हिल अवकाश परिवहन पुरस्कार (१९६५), राष्ट्रीय विज्ञान पदक (१९७५) व जर्मनीचे व्हिल्हेल्म बोल्श पदक (१९६७) हे उल्लेखनीय आहेत. ब्राउन यांनी अवकाशविज्ञानासंबंधी शेकडो लेख व अनेक ग्रंथ लिहिले. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांत ॲक्रॉस द स्पेस फ्रंटियर (१९५२), द मार्स प्रॉजेक्ट (१९५३), काँक्वेस्ट ऑफ द मून (एफ्. एल्. व्हीपल व डब्ल्यू. ली यांच्या समवेत संपा. सी. रायन १९५३), द एक्सप्लोरेशन ऑफ मार्स (१९५६), फर्स्ट मेन टू द मून (१९६०), स्पेस फ्रंटियर (१९६७), हिस्टरी ऑफरॉकेट्री अँड स्पेस ट्रॅव्हल (एफ्. आय्. ऑर्डवे यांच्या समवेत १९६७), द रॉकेट्स रेड ग्लेअर (एफ्. आय्. ऑर्डवे यांच्या समवेत१९७६) यांचा समावेश होता. व्यक्तीगत अनुभवावर भर देण्याचा त्यांचा स्वभाव असल्याने अवकाश उड्डाणाचा शरीरावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी करण्यात आलेल्या कित्येक प्रयोगांत (उदा., वजनरहित अवस्था व उच्च प्रवेग यासंबंधीच्या प्रयोगांत) त्यांनी स्वतः भाग घेतला होता. ते ॲलेक्झांड्रिया (व्हर्जिनिया) येथे मृत्यू पावले.

पहा : अवकाशविज्ञानरॉकेट.

भदे, व. ग.