ब्रिजमन, पर्सी विल्यम्स : (२१ एप्रिल १८८२ – २० ऑगस्ट १९६१). अमेरिकन भौतिकीविज्ञ. अतिशय उच्च दाब निर्माण करणारे पात्र तयार करून त्याच्या साहाय्याने उच्च दाब भौतिकीमध्ये लावलेल्या शोधांबद्दल त्यांना १९४६ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला. त्यांनी विज्ञानाच्या तत्वज्ञानातही मोलाची भर घातली.

ब्रिजमन यांचा जन्म केंब्रिज (मॅसॅचूसेट्स) येथे झाला. त्यांचे शिक्षण हार्व्हर्ड विद्यापीठात झाले. त्यांनी १९०४ मध्ये बी. ए. , १९०५ मध्ये एम्. ए. आणि १९०८ मध्ये भौतिकीतील पीएच्. डी. या पदव्या संपादन केल्या. ते हार्व्हर्ड विद्यापीठात १९१० मध्ये निदेशक, १९१९ मध्ये साहाय्यक प्राध्यापक, १९२६ मध्ये गणित व भौतिकीचे हॉलिस प्राध्यापक आणि १९५० मध्ये हिगिन्स प्राध्यापक झाले. १९५४ साली ते सेवानिवृत्त झाले.

ब्रिजमन यांनी सातत्याने सु. ५० वर्ष अतिशय उच्च दाबाखालील द्रव्यांचा प्रायोगिक अभ्यास केला. १९०५ मध्ये त्यांनी या अभ्यासाला प्रारंभ केला व सुरुवातीला त्यांनी ६,५०० वा. दा. (वातावरणीय दाबाच्या पट) पर्यंत दाब वापरला आणि हळूहळू त्यांनी ही मर्यादा काही विशिष्ट बाबतींत ४,२५,००० वा. दा. पर्यंत वाढविण्यात यश मिळविले. या विषयात पूर्वी फारसे संशोधन झालेले नसल्याने त्यांना स्वतःलाच प्रयोग सामग्री विकसित करावी लागली. यांपैकी त्यांनी आपल्या दाबपात्रासाठी योजलेला खास झिरप-प्रतिबंधक (सील) सर्वांत महत्त्वाचा ठरला. यात दाबाखालील द्रवातील दाबापेक्षा झिरप-प्रतिबंधकातील भरणावरील दाब नेहमी जास्त असल्याने झिरप-प्रतिबंधन आपोआप होते [⟶ झिरपबंदी]. पुढे त्यांनी नवीन प्रकारच्या पोलादांचा, मिश्रधातूंचा व उष्णतारोधक संयुगांसह धातूंचा (उदा., कारबॉलॉय म्हणजे कोबाल्टामध्ये संयोजित केलेले टंगस्टन कार्बाइड) दाबपात्रांच्या संरचनेत व त्यांच्या बाह्य आधाराकरिता उपयोग केला. त्यांनी उच्च दाबाखालील अनेक पदार्थांच्या संपीड्यता (संकोचनशीलता), विद्युत् रोधकता, ऊष्मीय संवाहकता, श्यानता (दाटपणा), प्रावस्थांमधील बदल [⟶ प्रावस्था नियम ], ताणबल, कर्तनबल इ. गुणधर्मांचे मापन केले. या मापनांसाठीही त्यांनी स्वतः विविध प्रयुक्त्यांची योजना केली. दाबाची मर्यादा वाढविण्यात जसजसे यश लाभले तसतसे ब्रिजमन यांना काही नवीन व अनपेक्षित आविष्कार आढळले (उदा., सिझियम धातूतील इलेक्ट्रॉनांची मांडणी एका विशिष्ट संक्रमण दाबाला बदलते, असे त्यांना दिसून आले). ब्रिजमन यांच्या दाबपात्रात जनरल इलेक्ट्रिक कंपनीच्या अभियंत्यांनी सुधारणा करून १,००,००० वा. दा. खाली ग्रॅफाइटापासून औद्योगिक दृष्ट्या उपयुक्त असे कृत्रिम हिरे मिळविले. त्यांच्या तंत्रांचा विस्तार करून इतरही अनेक पदार्थ संश्लेषित करण्यात (कृत्रिम रीत्या मिळविण्यात) आले आहेत. उच्च दाबाच्या परिणामांच्या अभ्यासातून ब्रिजमन यांनी लावलेल्या अनेक शोधांत बर्फाच्या निरनिराळ्या सात प्रावस्था प्रकारांचे अभिज्ञान [अस्तित्व ओळखणे ⟶ प्रावस्था नियम], फॉस्फरसाची दोन नवी रूपे इत्यादींचा समावेश होतो. ब्रिजमन यांच्या कार्याचा भूभौतिकी, स्फटिकविज्ञान आणि विज्ञान व तंत्रविद्या यांच्या इतर शाखांत प्रत्यक्ष उपयोग होत आहे. अणूंच्या बाह्य संरचनेवर उच्च दाबाच्या होणाऱ्या परिणामांचा सैद्धांतिक अभ्यास करण्यासाठीही त्यांचे कार्य उपयुक्त ठरले आहे [⟶ उच्च दाब प्रक्रिया]. त्यांनी स्फटिकविज्ञानातही कार्य केलेले असून एकच स्फटिक वाढविण्याची एक पद्धत त्यांनी शोधून काढली. धातूंतील विद्युत् संवहनाच्या प्रश्नांच्या संदर्भात त्यांनी अंतर्गत पेल्त्ये परिणामाचा [⟶ विद्युत्] शोध लावला.

वैज्ञानिक संकल्पनांच्या व्याख्या मांडताना त्यांत अपरिहार्यपणे येणाऱ्या संदिग्धता व द्वयर्थता यांकडे १९१४ मध्ये त्यांचे लक्ष वेधले. यावरून त्यांना सुचलेल्या वैज्ञानिक संकल्पनाच्या अर्थाच्या क्रियात्मक दृष्टिकोनाची चर्चा त्यांनी द लॉजिक ऑफ मॉडर्न फिजिक्स (१९२७) या आपल्या ग्रंथात केलेली आहे. भौतिकीय संकल्पना निरीक्षणक्षम असतील तरच त्यांना अर्थ देणे योग्य होईल, असे त्यांचे मत होते. या संदर्भात त्यांनी ⇨ पुंज सिद्धांत व ⇨ सापेक्षता सिद्धांत या मान्यवर सिद्धांतावरही टीका केली. गणितीय समीकरणातील दर्शनी यथार्थतेमागे प्रत्यक्षात अशोधित निरीक्षणे व अदमासे दिलेली शाब्दिक स्पष्टीकरणे दडलेली असतात, असे त्यांनी प्रतिपादन केले होते. तथापि अनुभवसिद्ध माहिती आधारित नसलेल्या गणिताच्या कार्यासंबंधी मात्र क्रियात्मक विश्लेषण पुरेसा खुलासा करू शकत नाही, याची त्यांनी दखल घेतली नाही.

नोबेल पारितोषिकाखेरीज स्टीव्हेंझ इन्सिट्यूट, प्रिस्टन विद्यापीठ, पॅरिस विद्यापीठ इ. संस्थांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदव्या दिल्या. त्यांना अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्टस अँड सायन्सेसचे रम्फर्ड पदक, फ्रँक्लिन इन्स्टि्‌ट्यूटचे क्रेसन पदक, नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे कॉमस्टॉक पारितोषिक इ. बहुमान मिळाले. ते अमेरिकेची नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, अमेरिकन ॲसोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्सेस, लंडनची रॉयल सोसायटी वगैरे संस्थांचे सदस्य होते. त्यांनी अनेक वैज्ञानिक नियतकालिकांत निबंध लिहिण्याबरोबरच द लॉजिक ऑफ मॉडर्न फिजिक्स (१९२७), द फिजिक्स ऑफ हाय प्रेशर (१९३१), द नेचर ऑफ फिजिकल थिअरी (१९३६), द इंटेलिजंट इंडिव्हिज्युअल अँड सोसायटी (१९३८), द नेचर ऑफ थर्मोडायनॅमिक्स (१९४१), रिफ्लकेशन्स ऑफ ए फिजिसिस्ट (१९५०), ए सॉफिस्टिकट्स प्रायमर ऑफ रिलेटिव्हिटी (१९६२), वगैरे कित्येक महत्त्वाचे ग्रंथ लिहिले. त्यांचे निबंध त्यांच्या मृत्यूनंतर कलेक्टेड एक्सपिरिमेंटल पेपर्स ऑफ पी. डब्ल्यू. ब्रिजमन (७ खंड, १९६४) या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आले. ते रँडॉल्फ (न्यू हँपशर) येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.