व्हीट्‌स्टन, सर चार्ल्स : (६ फेब्रुवारी १८०२–१९ ऑक्टोबर १८७५). इंग्रज भौतिकीविज्ञ. विद्युत्-मापन उपकरणे आणि विद्युत्‌-तारायंत्र यांमध्ये विशेष कार्य. ⇨ व्हीट्‌स्टन सेतू  या साधनाचे संशोधक. या साधनाने विद्युत्‌रोध अचूकपणे मोजता येतो व प्रयोगशाळांमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

सर चार्ल्स व्हीट्सन

व्हीट्‌स्टन यांचा जन्म इंग्लंडमधील ग्लॉस्टर (ग्लॉस्टरशर) येथे झाला. त्यांचे शास्त्रीय शिक्षण पद्धतशीरपणे झाले नाही. तथापि त्यांनी स्वत:च भौतिकीविषयक अनेक प्रयोग केले. १८३४मध्ये लंडन येथील किंग्ज महाविद्यालयात प्रायोगिक तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्याच वर्षी त्यांनी विद्युत्‌-संवाहकातील विजेची गती फिरत्या आरशाच्या साहाय्याने मोजली. या गतीचा संदेशवहनासाठी उपयोग करून घेता येईल, असे त्यांच्या लक्षात आले (त्यांच्या सूचनेवरून नंतर हाच फिरता आरसा प्रकाशवेग मोजण्यासाठी वापरण्यात आला). १८३७मध्ये त्यांनी व विल्यम फॉदरगिल कुक यांनी एकसूची विद्युत्‌-तारायंत्राचे एकस्व (पेटंट) संयुक्तपणे घेतले. १८४३ मध्ये सॅम्युएल हंटर क्रिस्ती या ब्रिटिश गणितज्ञांच्या सल्ल्यानुसार व्हीट्‌स्टन यांनी व्हीट्‌स्टन सेतू या साधनाची रचना केली व हे साधन लोकप्रिय झाले.

व्हीट्‌स्टन यांनी घन पदार्थाचील ध्वनि-संक्रमणाबाबत निबंध लिहिले. त्यांनी कॉर्न्सेटिना नावाचे एक छोटेसे अकॉर्डिअनासारखे वाद्य तयार केले तसेच चलरोधक आणि त्रिमितिदर्शक [→त्रिमितिदर्शक] यांचा शोध लावला. क्ष-किरण व हवाई छायाचित्रे यांच्या निरीक्षणासाठी हे त्रिमितिदर्शक अजून वापरतात. त्यांनी विद्युत्‌-जनित्रामध्ये (यांत्रिक ऊर्जेचे विद्युत्‌-ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या साधनामध्ये) विद्युत्‌-चुंबकांचा प्रथम वापर केला. त्यांनी निरनिराळ्या धातूंच्या विद्युत्‌-ठिणग्यांपासून निरनिराळे वर्णपट मिळतात असे दाखविले. त्यांनी संदेशामधील युग्म अक्षरांच्या जागी अक्षरांच्या भिन्न जोड्या ठेवण्याच्या क्रियेवर आधारलेल्या प्लेफेअर सायफर या सांकेतिक लिपीचा व गुप्तलेखन यंत्राचा शोध लावला [→ गुप्तलेखनशास्त्र]. त्यांनी ⇨ ध्रुवीय घड्याळाचाही शोध लावला.

इ. स. १८३६ मध्ये व्हीट्‌स्टन यांची रॉयल सोसायटीच्या फेलो पदावर निवड झाली. १८६८मध्ये त्यांना ‘नाइट’ (सर) हा किताब मिळाला. फिजिकल सोसायटी ऑफ लंडन या संस्थेने १८७९ साली व्हीट्‌स्टन यांचा वैज्ञानिक लेखसंग्रह प्रकाशित केला.

पॅरिस येथे त्यांचे निधन झाले.

भदे, व. ग.