सुदर्शन, एनॅकल कँडी जॉर्ज : (१६ सप्टेंबर १९३१— ). भारतीय-अमेरिकन सैद्घांतिक भौतिकीविज्ञ. ते ई. सी. जी. सुदर्शन या नावाने जास्त परिचित आहेत. ते सुदर्शनग्लाउबर प्रतिरुपण, दुर्बल प्रेरणेचा V–A सिद्घांत आणि टॅकिऑनाचे (प्रकाशापेक्षा जास्त वेगाने प्रवास करणाऱ्या परिकल्पित मूलकणाचा ) अस्तित्व या संशोधनकार्याकरिता प्रसिद्घ आहेत.

ई. सी. जी. सुदर्शन सुदर्शन यांचा जन्म केरळ राज्याच्या कोट्टयम् जिल्ह्यातील पालम् येथे झाला. त्यांनी मद्रास ख्रिश्चन महाविद्यालयामधून पदवी मिळविली (१९५१). त्यानंतर त्यांनी मद्रास विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी संपादन केली (१९५२). त्यांनी डॉ. होमी भाभा यांच्याबरोबर काही काळ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत काम केले. त्यानंतर त्यांनी न्यूयॉर्क येथील रॉचेस्टर विद्यापीठात पदवीधर विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला. या विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी १९५८ मध्ये त्यांना मिळाली. १९६९ नंतर ते ऑस्टिन येथील टेक्सस विद्यापीठात भौतिकी विषयाचे प्राध्यापक आणि बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत वरिष्ठ प्राध्यापक होते. ते चेन्नई येथील इन्सिट्यूट ऑफ मॅथेमेटिकल सायन्सेस या संस्थेचे पाच वर्षे संचालक होते.

सुदर्शन यांना मूलकण भौतिकी, पुंज प्रकाशकी, पुंज क्षेत्र सिद्घांत, रुढ यामिकी इ. भौतिकी विषयातील क्षेत्रांत आवड होती. ते दुर्बल प्रेरणेच्या V–A सिद्घांताचे आद्यप्रवर्तक होत. नंतर ⇨रिचर्ड फिलिप फाइनमन आणि मरी गेल-मान यांनी सुद्घा V–A सिद्घांतासंबंधी संशोधन केले. त्यामुळे विद्युत् दुर्बल प्रेरणा सिद्घांताचा मार्ग सुकर झाला. त्यांनी कलामेलित प्रकाशपुंजासंबंधीचे प्रतिरुपणसुद्घा विकसित केले, ते सुदर्शन-ग्लाउबर प्रतिरुपण म्हणून ओळखले जाते.

सुदर्शन यांचे महत्त्वाचे कार्य पुंज प्रकाशकी या क्षेत्रात आहे. त्यांच्या सिद्घांतामुळे रुढ तरंग प्रकाशकीची पुंज प्रकाशकीशी समतुल्यता सिद्घ झाली. या सिद्घांतामध्ये सुदर्शन-ग्लाउबर प्रतिरुपणाचा वापर करण्यात आला. या प्रतिरुपणाने केवळ पुंजरुप असलेल्या प्रकाशीय परिणामांचे भाकीत करता येते आणि त्यांचे रुढ पद्घतीने स्पष्टीकरण करता येत नाही. त्यांनी बैद्यनाथ मिश्रा यांच्या सहकार्याने ‘पुंज शून्य परिणाम’ मांडला. सुदर्शन यांनी टॅकिऑनाचे अस्तित्व सर्वप्रथम सुचविले.

सुदर्शन यांना भारत सरकारचे पद्मभूषण (१९७६) आणि पद्मविभूषण (२००७) हे पुरस्कार मिळाले. तसेच त्यांना सी. व्ही. रामन पुरस्कार (१९७०), बोस पदक (१९७७) आणि थर्ड वर्ल्ड ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे भौतिकीमधील पहिले पारितोषिक (१९८५) हे बहुमान मिळाले. त्यांनी वेदान्तासंबंधी सखोल अध्ययन केले आणि त्यावर अनेक व्याख्याने दिली.

सुदर्शन यांच्या संशोधनावर आधारित असलेल्या शोधांकरिता इतर संशोधकांना १९७९ व २००५ सालांमधील भौतिकीची नोबेल पारितोषिके मिळाली, परंतु सुदर्शन यांना त्यात सहभागी करण्यात आले नाही. त्यामुळे नोबेल समितीवर टीका झाली होती.

सूर्यवंशी, वि. ल.