सीग्बान, काई मान्ने : (२० एप्रिल १९१८— २० जुलै २००७). स्वीडिश भौतिकीविज्ञ. १९८१ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचे सहविजेते. उच्च-विभेदनक्षमता असलेल्या इलेक्ट्रॉन वर्णपटविज्ञानाचा विकास केल्याबद्दल अप्साला विद्यापीठातील सीग्बान यांना हे पारितोषिक अर्धे आणि लेसर वर्णपटविज्ञानाचा विकास केल्याबद्दल हार्व्हर्ड विद्यापीठातील ⇨ निकोलास ब्लोएम्बरगेन व स्टॅनफर्ड विद्यापीठातील ⇨ आर्थर लेनर्ड शॉलो या दोघांना मिळून अर्धे असे विभागून मिळाले.

सीग्बान यांचा जन्म लुंड येथे झाला. १९४४ मध्ये त्यांना स्टॉकहोम विद्यापीठाची भौतिकी विषयातील पीएच्.डी. मिळाली. ते स्टॉकहोम येथील रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत (१९५१— ५४) आणि अप्साला विद्यापीठात (१९५४— ८४) भौतिकीचे प्राध्यापक होते.

सीग्बान यांनी सहकाऱ्यांबरोबर उच्च-विभेदन आणि द्वि-संकेंद्रण या क्षमता असलेल्या वर्णपटमापकाच्या साहाय्याने फोटोइलेक्ट्रॉनांचे विश्लेषण केले. इलेक्ट्रॉन वर्णपटांमधील तीव्र आणि अतिशय अरुंद अशा पुष्कळ रेषा नमुना द्रव्यातून बाहेर पडताना ऊर्जा हानी न झालेल्या इलेक्ट्रॉनांमुळे तयार होतात, असे त्यांना आढळले. त्यांनी वेगवेगळी मूलद्रव्ये जोडणाऱ्या इलेक्ट्रॉन ऊर्जांचे अध्ययन केले. वैश्लेषिक पद्घतीने नमुन्यामध्ये कोणते अणू आहेत व कोणत्या रासायनिक परिस्थितीत ते असू शकतात, याचेही त्यांनी अध्ययन केले.

सीग्बान यांनी ईएससीए (इलेक्ट्रॉन स्पेक्ट्रोस्कोपी फॉर केमिकल ॲनालिसिस) या रासायनिक विश्लेषण तंत्राला आधारभूत तत्त्वे सूत्ररुपाने मांडली, तसेच त्याकरिता वापरण्यात येणाऱ्या उपकरणांमध्ये सुधारणा केल्या. हे तंत्र प्रकाशविद्युत् परिणामावर अवलंबून आहे. १९७० च्या दशकात ईएससीए या तंत्राचा वापर द्रव्यांचे विश्लेषण करण्याकरिता सर्व ठिकाणी होऊ लागला. प्रदूषित हवेतील कण आणि खनिज तेल परिष्करणात वापरण्यात येणाऱ्या घनरुप उत्प्रेरकांचे पृष्ठभाग यांच्या विश्लेषणाकरिताही इलेक्ट्रॉन वर्णपटविज्ञानाचा वापर होतो.

सीग्बान यांनी बीटा अँड गॅमा रे स्पेक्ट्रोस्कोपी (१९५५) आल्फा-, बीटा-अँड गॅमा रे स्पेक्ट्रोस्कोपी (१९६५) ईएससीए-ॲटॉमिक, मॉलिक्युलर अँड सॉलिड स्ट्रक्चर स्टडीड बाय मीन्स ऑफ इलेक्ट्रॉन स्पेक्ट्रोस्कोपी (१९६७) आणि ईएससीए ॲप्लाइड टू फ्री मॉलिक्युल्स (१९६९) हे ग्रंथ तसेच ४५० संशोधनपर लेख प्रकाशित केले. त्यांना अनेक संस्थांचे मानसन्मान मिळाले. त्यांचे वडील ⇨ कार्ल मान्ने येऑऱ्य सीग्बान यांनाही क्ष-किरण वर्णपटविज्ञानातील संशोधनकार्याबद्दल १९२४ सालचे भौतिकीचे नोबेल पारितोषिक मिळाले होते.

काई सीग्बान यांचे एंजलहोम येथे निधन झाले.

सूर्यवंशी, वि. ल.