जेफ्रिझ, सर हॅरल्ड : (२२ एप्रिल १८९१   –   ). ब्रिटिश ज्योतिषशास्त्रज्ञ व भूभौतिकीविज्ञ. सूर्यकुलासंबंधीच्या समस्यांवर आणि भूभौतिकीतील अनेक सिद्धांतांवर त्यांनी केलेले संशोधन फार महत्त्वाचे ठरले आहे. त्यांचा जन्म फॅटफिल्ड (डरॅम) येथे झाला. त्यांचे शिक्षण न्यू कॅसल येथील रदरफर्ड व आर्मस्ट्राँग महाविद्यालयांत आणि केंब्रिज येथील सेंट जॉन महाविद्यालयात झाले. १९१७-२२ या काळात त्यांनी वातावरणविज्ञान कार्यालयात काम केले. त्यानंतर केंब्रिज विद्यापीठात त्यांनी गणिताचे प्राध्यापक (१९२३–३२), भूमौतिकीचे प्रपाठक (१९३२–४६) व ज्योतिषशास्त्रांचे प्राध्यापक (१९४६–५८) या पदांवर काम केले.

ज्योतिषशास्त्रात त्यांनी सूर्यकुलाची उत्पत्ती, बहिर्ग्रहांचे तापमान व त्यांचे संघटन, चंद्राची दोलना [→ चंद्र], पृथ्वीच्या अक्षाचे आंदोलन इ. समस्यांवर महत्त्वाचे संशोधन केले. बहिर्ग्रहांचे पृष्ठभाग तप्त लाल आहेत अशी पूर्वापार चालत आलेली कल्पना त्यांनी प्रत्यक्ष निरीक्षणांच्या आधारे खोडून काढली व बहिर्ग्रहांच्या पृष्ठभागाचे तापमान – १२०से. किंवा त्यापेक्षाही कमी असते, असे प्रतिपादन केले. तसेच बहिर्ग्रहांच्या घनतेवरून त्यांतील प्रमुख घटक कमी रेणुभाराचे (अमोनिया व मिथेन यांसारखे) असावेत असा निष्कर्ष काढला व इतर ज्योतिषशास्त्रज्ञांनी तो बरोबर असल्याचे पडताळूनही पाहिले. १९२६ मध्ये त्यांनी पृथ्वीच्या गाभ्याची रचना स्पष्ट केली व पुष्कळसा गाभा द्रवरूप असावा, असा निष्कर्ष काढला. पृथ्वीच्या अंतरंगातून जाणाऱ्या भूकंप तरंगांना प्रवास करण्यास लागणाऱ्या वेळेचे त्यांनी के. ई. बुलेन यांच्या समवेत १९४० मध्ये तयार केलेले कोष्टक प्रमाणभूत मानण्यास येते. मॉन्सून व खारे वारे यांचे गतिकीय स्पष्टीकरण तसेच वातावरणातील सर्वसाधारण अभिसरण यांसंबंधीचे त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. यांखेरीज जेफ्रिझ यांनी संभाव्यता सिद्धांत आणि त्यासंबंधातील वैज्ञानिक पद्धतीतील समस्या, द्रवगतिकी, स्थितिस्थापकता, गणितीय भौतिकीतील पद्धती इ. अनेक विषयांत बहुमोल संशोधन केले आहे.

त्यांची १९२५ मध्ये रॉयल सोसायटीच्या सदस्यत्वावर व १९४५ मध्ये अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सभासद म्हणून निवड झाली. यांशिवाय ते रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष (१९५५ – ५८) आणि इंटरनॅशनल सिस्‌मॉलॉजिकल ॲसोसिएशनचे अध्यक्ष (१९५७–६०) होते. १९५३ मध्ये त्यांना नाइट हा किताब देण्यात आला. याशिवाय रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्ण पदक (१९३७), रॉयल सोसायटीचे रॉयल पदक (१९४८) व कॉप्ली पदक (१९६०), रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीचे गाय पदक (१९६३) इ. अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले.

त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांपैकी पुढील ग्रंथ महत्त्वाचे गणले जातात : द अर्थ : इट्स ओरिजीन, हिस्टरी अँड फिजिकल कॉन्स्टिट्यूशन  (१९२४, सहावी आवृत्ती १९७०) ऑपरेशनल मेथड्स इन फिजिक्स  (१९२७, दुसरी आवृत्ती १९३१) द फ्युचर ऑफ द अर्थ   (१९२९) सायंटिफिक इन्फरन्सेस  (१९३१, चौथी आवृत्ती १९७३) कार्टेशियन टेन्सॉर्‌स  (१९३१, दुसरी आवृत्ती १९५३) अर्थक्वेक्स अँड मौंटन्स  (१९३५, दुसरी आवृत्ती १९५०) थिअरी ऑफ प्रॉबॅबिलिटी  (१९३९, चौथी आवृत्ती, १९६७) ॲसिमटोटिक ॲप्रॉक्झिमेशन्स  (१९६२, दुसरी आवृत्ती १९६८) आणि आपल्या पत्नीबरोबर (बर्था एस्. जेफ्रिझ) लिहिलेला मेथड्स ऑफ मॅथेमॅटिकल फिजिक्स (१९४६, चौथी आवृत्ती १९६२).

सणस, दि. बा.