ब्रूस्टर, सरडेव्हिड : (११ डिसेंबर १७८१-१० फेब्रुवारी १८६८). स्कॉटिश भौतिकीविज्ञ. प्रकाशकीतील (प्रकाशाच्या विविध गुणधर्मांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रातील) महत्त्वपूर्ण संशोधनाकरिता विशेष प्रसिद्ध.

ब्रूस्टर यांचा जन्म स्कॉटलंडमधील जेडबर येथे झाला. धर्मगुरू होण्याच्या उद्देशाने त्यांनी एडिंबरो विद्यापीठात धर्मशास्त्राचे शिक्षण घेतले. १८०० साली त्यांनी सन्माननीय एम्.ए. पदवी मिळविली. १८०४ मध्ये चर्च ऑफ स्कॉटलंडमध्ये धर्मपर व्याख्याने देण्यास त्यांना परवानगी देण्यात आली. तथापि त्यांना भौतिकीची विशेष आवड असल्यामुळे या विषयातच त्यांनी कार्य केले. १७९९-१८०७ या काळात ते खाजगी शिक्षक होते. १८३८ मध्ये सेंट अँड्रूझ येथील सेंट साल्व्हाटोर आणि सेंट लिओनार्ड या संयुक्त महाविद्यालयांचे प्राचार्य म्हणून त्यांची नेमणूक झाली. १८५९ साली ते एडिंबरो विद्यापीठाचे प्राचार्य व नंतर कुलगुरू झाले. त्यांनी १८१३ मध्ये प्रकाशकीवर लिहिलेला ग्रंथ व लंडनच्या रॉयल सोसायटीच्या फिलॉसॉफिकल ट्रॅन्झॅक्शन्समध्ये लिहिलेला निबंध यांमुळे त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. प्रकाशकीमध्ये त्यांनी ध्रुवित प्रकाशाच्या (एकाच विशिष्ट प्रतलात कंप पावणाऱ्या प्रकाशाच्या) गुणधर्मांवर प्रामुख्याने संशोधन केले. परावर्तनामुळे होणाऱ्या ध्रुवणाचा नियम त्यांनी शोधून काढला व तो त्यांच्याच नावाने ओळखण्यास येतो. उष्णता व दाब यांच्या परिणामामुळे पदार्थांत निर्माण होणाऱ्या व त्यातून जाणाऱ्या ध्रुवित प्रकाशाच्या बाबतीत आढळणाऱ्या प्रकाश स्थितिस्थापकता [⟶ पदार्थांचे बल] या आविष्काराचा ब्रूस्टर यांनी सखोल अभ्यास केला. स्फटिकीय संरचनेच्या अभ्यासात ध्रुवित प्रकाशाचा उपयोग करण्याच्या पद्धतीचा त्यांनी पाया घातला. बहुतेक स्फटिकांना द्विप्रणमनाचे [⟶ प्रकाशकी] दोन अक्ष असतात, असे त्यांनी दाखवून दिले. १८१६ मध्ये त्यांनी बहुरूपदर्शक [⟶ कॅलिडोस्कोप ⟶ प्रकाशकी] या मनोरंजक उपकरणाचा शोध लावून पुष्कळ प्रसिद्धी मिळविली. त्यांनी १८४९ मध्ये एक त्रिमितिदर्शक तयार केला व त्या प्रकारचे त्रिमितीदर्शक अद्यापही वापरात आहेत [⟶ त्रिमितिदर्शन]. त्यांच्या कालात प्रस्थापित होत असलेल्या प्रकाशाच्या तरंग सिद्धांताला मात्र त्यांनी विरोध केला व प्रकाशाच्या कण सिद्धांताचेच समर्थन केले.

एडिंबरो येथील रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून १८०८ मध्ये त्यांची निवड झाली. पुढे ते या संस्थेचे सचिव (१८२१-२८) व अध्यक्ष (१८६४) झाले. लंडनच्या रॉयल सोसायटीचे १८१५ मध्ये ते सदस्य झाले आणि सोसायटीच्या कॉप्ली (१८१६), रम्फर्ड (१८१९) व रॉयल (१८३१) या पदकांचा त्यांना बहुमान मिळाला. ब्रिटिश ॲसोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थेची १८३१ मध्ये स्थापना होण्यात ब्रूस्टर यांनी महत्त्वाचे कार्य केले. १८५१ साली एडिंबरो येथे भरलेल्या या संस्थेच्या बैठकीचे अध्यक्ष होते. १८३१ मध्ये त्यांना नाइट हा किताब मिळाला. एडिंबरो मॅगेझीन व स्कॉट्स मॅगेझीन (१८०२ – ०६), एडिंबरो एन्‌सायक्लोपीडिया (१८०७ – ३०), एडिंबरो जर्नल ऑफ सायन्स वगैरे अनेक वैज्ञानिक नियतकालिकांचे त्यांनी संपादन केले. त्यांनी सु. ३५ शास्त्रीय निबंध, २० ग्रंथ व विविध नियतकालिकांत अनेक लेख लिहिले. तर आयझॅक न्यूटन यांचे आयुष्य, लेखन व शोध या विषयांवर ब्रूस्टर यांनी १८५५ मध्ये लिहिलेला ग्रंथ प्रमाणभूत व अधिकृत समजला जातो. विज्ञानाचे मूल्य जाणण्याच्या दृष्टीने जनसामान्यात जागृती निर्माण करण्याबरोबरच शास्त्रज्ञ, कारखानदार व त्या काळचा सत्ताधीश वर्ग यांच्यातील परस्पर संवादात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. ते स्कॉटलंडमधील ॲलर्ली येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.