कुक, सर विल्यम फॉदरगिल : (४ मे १८०६–२५ जून १८७९). इंग्लिश भौतिकीविज्ञ. विद्युत् तारायंत्राच्या विकासात महत्त्वाचे कार्य. त्यांचा जन्म एलिंग, मिडलसेक्स येथे झाला व शिक्षण डरहॅम व एडिंबरो येथील विद्यापीठांत झाले. भारतामध्ये १८२६–३१ मध्ये सैन्यात नोकरी केल्यानंतर त्यांनी पॅरिस व हायड्लबर्ग येथे वैद्यकीय शिक्षण घेतले.

हायड्लबर्ग येथे असताना त्यांनी तारेच्या साहाय्याने संदेशवहन करण्याचे प्रात्यक्षिक पाहिले व त्यामुळे विद्युत् तारायंत्र तयार करण्याकडे त्यांचे लक्ष वेधले. व्हीट्स्टन यांच्या मदतीने त्यांनी रेल्वे संदेशवहनात बऱ्याच सुधारणा घडवून आणल्या. १८४५ मध्ये त्या दोघांना एकसूची तारायंत्राचे पेटंट संयुक्तपणे देण्यात आले.

सोसायटी ऑफ आर्ट्‌सतर्फे कुक व व्हीट्स्टन यांना एकत्रितपणे ॲल्बर्ट सुवर्णपदक देण्यात आले. १८६९ साली कुक यांना ‘नाईट’ हा किताब मिळाला. ते सरेमध्ये मृत्यू पावले.

भदे, व. ग.