डाल्टन, जॉन : (६ सप्टेंबर १७६६–२७ जुलै १८४४). इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ व भौतिकीविज्ञ. अणुसिद्धांत व वायूंचे गुणधर्म यांसंबंधी महत्त्वाचे कार्य. त्यांचा जन्म ईगल्सफील्ड (कंबर्लंड) येथे झाला. त्यांनी केंडल येथे भौतिकी व गणित या विषयांचा खाजगी रीत्या अभ्यास केला. १७८७ मध्ये त्यांनी वातावरणीय निरीक्षणांची नोंद ठेवण्यास सुरुवात करून मृत्यूपावेतो हे कार्य अविरतपणे चालू ठेवले व दोन लक्षापेक्षाही जास्त नोंदी संग्रहित केल्या. या निरीक्षणांच्या आधारे त्यांनी मिटिऑरॉलॉजिकल ऑब्झर्वेशन्स अँड एसेज हा ग्रंथ १७९३ मध्ये प्रसिद्ध केला. उत्तर ध्रुवीय प्रकाश (ध्रुवीय प्रदेशात आढळणारा विविधरंगी आविष्कार) मूलतः विद्युत् स्वरूपाचा आहे, असे त्यांनी या ग्रंथात प्रतिपादन केले होते. ते मॅंचेस्टर येथील न्यू कॉलेजमध्ये गणित आणि भौतिकीचे प्राध्यापक होते. (१७९३–९९). 

जॉन डाल्टन

मॅंचेस्टर येथील लिटररी अँड फिलॉसॉफिकल सोसायटीचे सदस्य झाल्यानंतर १७९३ साली रंगांधत्वाचा (वर्णपटलातील एका किंवा अधिक रंगांची डोळ्याला संवेदना न होण्याचा) शोध त्यांना लागला. त्यासंबंधीचे विस्तृत विवेचन त्यांनी सोसायटीपुढे मांडले, ते स्वतःच रंगांध होते. तांबड्या व हिरव्या रंगात भेद न करता येणे या सर्वांत जास्त आढळणाऱ्या दोषाला डाल्टनीझम असे म्हणतात. १८०१ मध्ये त्यांनी ‘ संमिश्र वायूंची घटना’, ‘बाष्पशक्ती’, ‘बाष्पीभवन’ आणि ‘वायूचे उष्णताजन्य प्रसरण’ या विषयांवरील चार निबंध सोसायटीपुढे सादर केले. वातावरणविज्ञानाचा शास्त्र या दृष्टीने त्यांनीच पाया घातला व त्यामुळे त्यांना यूरोपभर प्रसिद्धी मिळाली. वायूंची पाण्यातील निरनिराळी विद्राव्यता (विरघळण्याचे प्रमाण) व त्यांचे इतर गुणधर्म हे ज्या निरनिराळ्या मूलभूत कणांपासून वायू तयार झालेले आहेत त्या कणांची वजने व संख्या यांवर अवलंबून आहेत, असे त्यांनी अनुमान काढले. ‘वायूंचे शोषण’ (१८०३) या आपल्या निबंधात त्यांनी वरील सिद्धांत, अणुभारांचे एक प्राथमिक स्वरूपाचे कोष्टक तसेच त्यांचा वायूंच्या आंशिक दाबासंबंधीचा सुपरिचित नियमही (वायुमिश्रणातील एखाद्या वायूचा दाब हा त्या वायूचे त्याच तापमानाला मिश्रणातील एकूण वायूंच्या घनफळाइतके घनफळ व्यापल्यास त्याच्या होणाऱ्या दाबाइतके असते) प्रसिद्ध केला होता. न्यू सिस्टिम ऑफ केमिकल फिलॉसॉफी (१८०८–२७) या आपल्या ग्रंथात त्यांनी आपले सिद्धांत विस्तारपूर्वक दिलेले आहेत. हे सिद्धांत मांडताना रासायनिक संयोग म्हणजे त्यातील प्रत्येक मूलद्रव्याच्या ठराविक वजनाच्या अलग कणांचे एकत्रीकरण होय, असे त्यांनी गृहीत धरले होते. अणू हे अविभाज्य व अविनाशी आहेत आणि कोणत्याही विशिष्ट मूलद्रव्याचे सर्व अणू एकसारखेच असतात, असे त्यांचे मत होते. संयुगांमधील अणूंच्या संख्येनुसार संयुगांचे वर्गीकरण करण्याची पद्धतीही त्यांना तयार केली होती. डाल्टन यांचे प्रायोगिक कौशल्य विशेष उच्च दर्जाचे नव्हते व त्यांची कित्येक अनुमाने अगदीच चुकीची असल्याचे नंतर आढळून आले, परंतु त्यांचा अणुसिद्धांत आणि अणुभाराची कल्पना मात्र मूलभूत महत्त्वाची ठरली आणि त्यांमुळे रसायनशास्त्रात एक मोठी क्रांती घडून आली. 

रॉयल सोसायटीने १८२२ मध्ये सदस्य म्हणून त्यांची निवड केली व १८२५ मध्ये अणुसिद्धांताबद्दल सोसायटीतर्फे त्यांना बहुमानाचे पदक देण्यात आले. फ्रेंच ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने १८३० साली त्यांची परदेशी सदस्य म्हणून निवड केली. एडिंबरो, बर्लिन, म्यूनिक व मॉस्को येथील शास्त्रीय संस्थांचेही ते सदस्य होते. ते मँचेस्टर येथे मृत्यू पावले. 

भदे, व. ग.