हर्ट्झ, गुस्टाफ : (२२ जुलै १८८७–३० ऑक्टोबर १९७५). जर्मन भौतिकीविज्ञ. त्यांना अणूवरील इलेक्ट्रॉनांच्या आघातांचे नियमन करणाऱ्या नियमांचा शोध लावल्याबद्दल १९२५ सालचे भौतिकीचे नोबेल पारितोषिक ⇨ जेम्स फ्रांक यांच्यासमवेत मिळाले. एखाद्या अणूकडून ठराविक प्रमाणात ऊर्जा शोषली जाते, या सिद्धांताची खातरजमा त्यांच्या संशोधनकाऱ्यामुळे झाली.

हर्ट्झ यांचा जन्म हॅम्बर्ग (जर्मनी) येथे झाला. गटिंगेन, म्यूनिक व बर्लिन विद्यापीठांत शिक्षण घेतल्यानंतर त्यांची १९१३ मध्ये बर्लिन विद्यापीठात भौतिकीच्या साहाय्यक पदावर नेमणूक झाली. तेथे ते फ्रांक यांच्याबरोबर संशोधन करू लागले. पहिल्या महायुद्धात जखमी झाल्यामुळे त्यांनी बर्लिन विद्यापीठात १९१७ मध्ये अध्यापनाचे कार्य परत सुरू केले. त्यानंतर त्यांनी आयंटहोव्हेन (नेदर्लंड्स) येथील फिलिप्स कंपनीच्या भौतिकीय प्रयोगशाळेत (१९२०–२५) काम केले. १९२५ मध्ये हाल विद्यापीठात आणि १९२८ मध्ये बर्लिन-शार्लोटेनबर्ग येथील तांत्रिक विद्यालयात भौतिकीचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९३२ मध्ये त्यांनी निऑनाचे समस्थानिक विलग करण्याच्या पद्धतीचा शोध लावला. ते १९३५–४५ दरम्यान सीमेन्स कंपनीच्या बर्लिन येथील संशोधन प्रयोगशाळेचे संचालक होते. सोव्हिएट युनियन (सध्याचे रशिया) येथील संशोधनात त्यांनी भाग घेतला (१९४५–५४). १९५४ मध्ये पूर्व जर्मनीत आल्यावर ते लाइपसिक येथील फिजिक्स इन्स्टिट्यूट येथे भौतिकीचे प्राध्यापक झाले व संचालक म्हणून १९६१ पर्यंत कार्यरत होते.

हर्ट्झ व फ्रांक यांच्या संशोधनावरून असे दिसून आले की, अणूवर इलेक्ट्रॉनाचा आघात होण्याकरिता आघाती इलेक्ट्रॉनामध्ये किमान ऊर्जा असावयास पाहिजे जेणेकरून अणूमधील विशिष्ट इलेक्ट्रॉन स्थानांतरित होतील. इलेक्ट्रॉनामधील किमान ऊर्जेला आयनीभवन वर्चस् असे म्हणतात. हे वर्चस् निरनिराळ्या मूलद्रव्यांसाठी निरनिराळे असते. प्रत्येक मूलद्रव्य प्रकाशाच्या विशिष्ट वर्णरेषा उत्सर्जित करीत असून त्या मूलद्रव्यातील अणूंच्या शक्य असणाऱ्या ऊर्जा-अवस्थेच्या श्रेणींशी तुल्य असतात. ⇨ नील्स बोर यांना या संशोधनाची पूर्वकल्पना आलेली होती आणि त्यांनी ⇨ पुंज सिद्धांता चा उपयोग करून अणूतील इलेक्ट्रॉनांची मांडणी व त्यांची गती म्हणजे अणूचे स्वरूप स्पष्ट करणारा पहिला सुसंगत सिद्धांत विकसित केला. हर्ट्झ यांना १९५१ मध्ये स्टालिन पारितोषिक देण्यात आले.

हर्ट्झ यांचे बर्लिन येथे निधन झाले.

भदे, व. ग.