बोर्न, माक्स : (११ डिसेंबर १८८२ – ५ जानेवारी १९७०). जर्मन भौतिकीविज्ञ. ⇨पुंजयामिकीतील मूलभूत संशोधनाकरिता विशेषतः त्यातील तरंग फलनांच्या सांख्यिकीय स्पष्टीकरणासाठी, त्यांना ⇨व्हाल्टर बोटे यांच्या बरोबर १९५४ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला. पुंजयामिकीच्या पायाभूत तत्त्वांचे अंगभृत संभाव्यतात्मक स्वरूप दाखवून त्यांनी आधुनिक भौतिकीत मोलाची भर घातली आहे.

माक्स बोर्न

बोर्न यांचा जन्म ब्रेस्लौ येथे झाला. यांचे शिक्षण ब्रेस्लौ, हायडल्‌बर्ग, झुरिक व गटिंगेन या विद्यापीठांत झाले. त्यांनी एफ्. क्लाइन, डी. हिल्‌बर्ट, आणि एच्. मिंकोव्हस्की या सुप्रसिद्ध गणितज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यास केला. ‘स्थितिस्थापक (बाह्य प्रेरणेमुळे आकार व आकारमान यांत बदल होण्याचा आणि प्रेरणा काढून घेतल्यावर पुन्हा मूळ स्थिती प्राप्त होण्याचा गुणधर्म असणाऱ्या) तारा व फिती यांचे स्थैर्य’ या विषयावर संशोधन करून त्यांनी १९०७ मध्ये डॉक्टरेट पदवी मिळविली. नंतर काही महिने केंब्रिज येथे अध्ययन केल्यावर १९०८-०९ मध्ये ब्रेस्लौ येथे त्यांनी संशोधन व ⇨सापेक्षता सिद्धांताचा अभ्यास केला.सापेक्षीय (प्रकाशाच्या वेगाशी तुलनीय इतका वेग असलेल्या) इलेक्ट्रॉनांसंबंधी त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना गटिंगेन येथे १९०९ साली अध्यापकपद मिळाले. १९१५ मध्ये बर्लिन विद्यापीठात माक्स प्लांक यांना मदत करण्यासाठी प्राध्यापक म्हणून बोर्न यांची नेमणूक झाली पण महायुद्धामुळे त्यांना जर्मन लष्करात दाखल व्हावे लागले. त्या वेळी लष्करी तोफखान्याच्या संशोधन केंद्रात काम करण्याबरोबरच त्यांनी सैद्धांतिक भौतिकीचाही अभ्यास केला. युद्धानंतर १९१९ मध्ये फ्रँकफुर्ट विद्यापीठात ते प्राध्यापक झाले व तेथे ओटो स्टर्न यांच्या साहाय्याने त्यांनी संशोधनही केले. पुढे १९२१-३३ या काळात त्यांनी गटिंगेन विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले. त्या वेळी त्यांनी केलेल्या संशोधनात डब्ल्यू. पाउली, डब्ल्यू. के. हायझेनबेर्क, ई. फेर्मी, पी. ए. एम्. डिरॅक, जे. आर्. ओपेनहायमर, मारीआ गोपर्ट-मायर वगैरे नंतर प्रसिद्धीस आलेल्या भौतिकीविज्ञांचे त्यांना सहाय्य लाभले. १९३३ मध्ये हिटलर सत्तेवर आल्यावर त्यांनी जर्मनी सोडून ब्रिटनला प्रयाण केले व केंब्रिज येथे तीन वर्षे स्टोक्स अध्यापक म्हणून काम केले. १९३५-३६ मध्ये सर सी. व्ही. रामन यांच्या बरोबर त्यांनी बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये सहा महिने संशोधन केले. १९३६ साली एडिंबरो विद्यापीठात भौतिकीचे टेट प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली व तेथेच १९५३ मध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांनी काम केले. त्यांना १९३९ मध्ये ब्रिटिश नागरिकत्व मिळाले होते पण सेवानिवृत्तीनंतर ते गटिंनगेनजवळील बाट पिर्‌माँट येथे स्थायिक झाले.

बोर्न यांनी १९१२ मध्ये टी. फोन कार्मान यांच्या सहकार्याने संशोधन करून घन पदार्थाच्या विशिष्ट उष्णतेच्या [⟶ उष्णता] चलनाच्या संपूर्ण कक्षेचे सैद्धांतिक स्पष्टीकरण दिले. तथापि पीटर डेबाय यांनी काही आठवडेच अगोदर यासंबंधीचे आपले संशोधन प्रसिद्ध केलेले असल्यामुळे त्यांनाच या कार्याचे श्रेय देण्यात आले. गटिंगेन येथे प्राध्यापक झाल्यावर त्यांनी हायझेनबेर्क यांच्या समवेत संशोधन करून नील्स बोर व आर्नोल्ट झोमरफेल्ड यांचा आणवीय पुंज सिद्धांत हीलियम अणूच्या रेषीय वर्णपटाला लागू पडत नाही, असे दाखविले.


याकरिता त्यांनी हायझेनबेर्क व पी. योर्डान यांच्या मदतीने कणांच्या गतीची पुंजयामिकी विकसित केली. या सिद्धांताच्या आधारे आणवीय वर्णपट रेषांची स्थाने व त्यांच्या तीव्रता यांचे आणि सु. २० वर्षे शास्त्रज्ञांना गहन वाटत असलेल्या इतर आविष्कारांचे पूर्ण परिमाणात्मक स्पष्टीकरण मिळविण्यात आले. याच सुमारास निराळ्या विचारमार्गाने तरंग यामिकीच्या द्वारे ई. श्रोडिंजर यांनी हेच निष्कर्ष मिळविले. या दोन पद्धतींतील साधर्म्य श्रोडिंजर यांनीच दाखवून दिले. बोर्न यांनी श्रोडिंजर यांची पद्धती एखाद्या आणवीय लक्ष्याने प्रकीर्णित केलेल्या (विखुरलेल्या) कण शलाकेची तीव्रता व तिचे कोनीय वितरण निर्धारित करण्यासाठी कशी वापरता येईल, हे दाखविले. गणितीय सिद्धांतांद्वारे प्रायोगिक निरीक्षणांचे अशा प्रकारे यशस्वीपणे स्पष्टीकरण देता आले, तरी पुंजयामिकीचा प्रत्यक्ष अर्थ तोपावेतो संदिग्धच होता. पाउली, हायझेनबेर्क, श्रोडिंजर इत्यादींनी केलेल्या विविध प्रयत्नांचे एकत्रीकरण करून बोर्न यांनी पुंजयामिकीचा पाया घातला. श्रोडिंजर यांच्या ψ फलनाच्या मूल्याचा वर्ग [⟶ पुंजयामिकी] हा कणाची संभाव्यता घनता दर्शवितो आणि याचा अर्थ पुंजयामिकीद्वारे आणवीय पातळीवरील घटनांचे फक्त सांख्यिकीय स्पष्टीकरण मिळते, असे मत बोर्न यांनी मांडले. हा विचार इतका मूलभूत व धक्कादायक होता की, माक्स प्लांक, ॲल्बर्ट आइन्स्टाइन, ल्वी द ब्रॉग्ली, श्रोडिंजर यांसारख्या आधुनिक भौतिकीतील त्या काळाच्या अग्रगण्य शास्त्रज्ञांनाही तो मोकळ्या मनाने स्वीकारणे अवघड झाले. तथापि नील्स बोर व बोर्न यांच्या अविरत प्रयत्नांमुळे हा क्रांतिकारी विचार वैज्ञानिक जगतात हळूहळू स्वीकारला गेला. या आपल्या विचाराच्या परिणामांसंबंधी बोर्न यांनी मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये १९२५-२६ मध्ये दिलेल्या व्याख्यानांत अधिक विस्तारपूर्वक विवरण केले आणि ते प्रॉब्लेम्स ऑफ ॲटॉमिक डायनॅमिक्स या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आले. नंतर अनेक शास्त्रज्ञांच्या प्रायोगिक कार्यामुळे बोर्न यांची संकल्पना प्रस्थापित झाली. बोर्न यांनी स्वतःही यांपैकी काही अनुप्रयोगांत भाग घेतला होता. त्यांपैकी जे. आर्. ओपेनहायमर यांच्या बरोबर त्यांनी विकसित केलेली रेणूंची पुंजयामिकी विशेष उल्लेखनीय आहे.

पहिल्या महायुद्धकाळात लष्करी नोकरीत असताना त्यांनी स्फटिकांविषयी अभ्यास करून Dynamik der Kristallgitter (१९१५) हा ग्रंथ लिहिला (मात्र हा ग्रंथ अभिजात यामिकीवर आधारलेला होता). त्यानंतर आयुष्यभर त्यांनी स्फटिकजालकांची गतिकी या विषयात अनेक सहकाऱ्यांबरोबर संशोधन केले. कून ह्‌वांग यांच्या बरोबर बोर्न यांनी स्फटिकजालकांच्या पुंजयामिकीवर लिहिलेला ग्रंथ विशेष उल्लेखनीय ठरला. १९२८ नंतर त्यांनी आणवीय सिद्धांतावरील आपले संशोधन थांबवून प्रकाशकीवर एक पाठ्यपुस्तक लिहिले (१९३३) व ते अतिशय गाजले. या ग्रंथाचे ई. वुल्फ यांच्या सहकार्याने आधुनिकीकरण करून तो इंग्रजीत प्रिन्सिपल्स ऑफ ऑप्टिक्स (१९५९ पाचवी आवृत्ती १९७५) या नावाने त्यांनी प्रसिद्ध केला. केंब्रिज येथे त्यांनी एल्. एनफेल्ट यांच्या बरोबर नैकरेषीय विद्युत् गतिकीचे [⟶ विद्युत् गतिकी] नवीन स्पष्टीकरण देऊन त्यावर आधारलेले कण व पुंज यांचे वर्णन देणारा ‘बोर्न-इनफेल्ट सिद्धांत’ या नावाने ओळखला जाणारा सिद्धांत विकसित केला. बोर्न यांनी ऊष्मागतिकी (उष्णता व इतर रूपांतील ऊर्जा यांतील संबंधाचे गणितीय विवरण करणारे शास्त्र) आणि संघनित (द्रवीभूत) वायू व द्रव यांची सांख्यिकीय यामिकी [⟶ सांख्यिकीय भौतिकी] या विषयांतही संशोधन केले होते. अन्योन्यतेचे तत्त्व ही भौतिक प्रणालींतील नवीन प्रकारची सममिती त्यांनी प्रतिपादिली व तिचा ⇨मूलकणांच्या सिद्धांतात यशस्वीपणे उपयोग करण्यात आला. केंब्रिज येथे त्यांनी ॲटॉमिक फिजिक्स (१९३५ सातवी आवृत्ती १९६२) व लोकप्रिय स्वरूपाचा द रेस्टलेस युनिव्हर्स (१९३६) हे ग्रंथ लिहिले. नॅचरल फिलॉसॉफी ऑफ कॉज अँड चान्स (१९४९) या ग्रंथात त्यांनी विज्ञानाची नैतिक बांधिलकी व मानवी संस्कृतीच्या रचनेतील विज्ञानाची भूमिका यासंबंधाचे आपले विचार मांडलेले आहेत. त्यांचे निवडक निबंध १९६३ मध्ये ॲकॅडेमी ऑफ गटिंगेन या संस्थेने प्रसिद्ध केले. सेवानिवृत्तीच्या काळात त्यांनी अणुऊर्जेच्या युद्ध व शांततेच्या काळातील वापरामुळे शास्त्रज्ञांवर येणाऱ्या जबाबदारीच्या समस्येवर अनेक लेख व काही ग्रंथ लिहिले. बोर्न लंडनच्या रॉयल सोसायटीचे (१९३९), अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे (१९५५), बंगलोरच्या इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे तसेच गटिंगेन, मॉस्को, बर्लिन, एडिंबरो, कोपनहेगन इ. ठिकाणच्या ॲकॅडेमींचे सदस्य होते. नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना जर्मन फिजिकल सोसायटीचे माक्स प्लांक पदक, रॉयल सोसायटीचे ह्यूझ पदक, केंब्रिज विद्यापीठाचे स्टोक्स पदक इ. अनेक बहुमान मिळाले. १९५३ मध्ये त्यांना गटिंगेनचे सन्मान्य नागरिकत्व देण्यात आले. ते गटिंगेन येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.